Uncategorized

कालिब

आपण एखादं चित्र कसं बघतो?
कोणी चित्रं कशी बघावीत?
मी चित्र कशी बघते?
चित्र बघताना, आपण वाचताना करतो तशी, चित्राच्या डाव्या कोपर्‍याकडून सुरुवात करते. मग चित्राच्या फ्रेमवरून माझी नजर मजेत फिरून येते. चित्राचा आकार मनात भरला की पुन्हा डावा कोपरा पकडते. मग चित्राचा अवकाश, चित्रातली रंगसंगती, एकंदर पोत डोळ्यांनीच (क्वचित हात लावून) चाचपते. मग त्यातल्या रेषा, कोन, भौमितिक आकार…
एव्हढं झालं की त्या दृश्य चित्राचा आणि माझा संबंध संपतो आणि सुरू होतो माझा आणि माझ्या डोक्यात उमटलेल्या चित्राचा संवाद. मग नंतर चित्रकार काय सांगू पाहतोय? काय लपवतोय? त्याला जे सांगायचंय तेच मला कळलंय का? जर असं नसेल, तर त्याला काय सांगायचं असेल बरं? इत्यादी प्रश्नांचा काथ्याकूट.
पण समजा, माझी चित्र बघायची सवयीची पद्धत सोडून मी भस्सकन चित्राच्या मध्यभागीच नजर खुपसली तर काय हो‌ईल? चित्राच्या कडेकडेने प्रवास करून मध्यभागी येण्यापेक्षा मी मध्यभागापाशी सुरुवात करून कॉन्सेंट्रीक सर्कल्समध्ये चित्र बघत गेले तर कसं? किंवा वरून खाली चित्र बघत येण्यापेक्षा खालून वर बघत गेले तर? दुसर्‍या पद्धतींनी बघितल्यावर उमटलेलं चित्र पहिल्या पद्धतीने बघितल्यावर डोक्यात उमटलेल्या चित्रापेक्षा वेगळं असेल?
छे!
मला पहिल्या पद्धतीने जेव्हढं कळलं, तेव्हढं चित्र दुसर्‍या पद्धतीने कळेल? न कळायला काय झालं? चित्रातले इथले तिथले तपशील एकत्र करून ते डोक्यात सुसंगत जुळवायला लागतील एवढंच. मग अनेक पद्धतींनी चित्र पाहिल्यावरही डोक्यात उमटणारं चित्र एकच असेल, तर मी तीच पद्धत का वापरते?
सवयीचा भाग- कदाचित?
किंवा सेफ प्ले.
तसंच लिखाणाचंपण असतं, नाही? तुम्ही विषय घे‌ऊन हेतुपुरस्सर लिहा किंवा मनात ये‌ईल ते काडीचाही विधिनिषेध न बाळगता धडाधड लिहीत सुटा – तुम्ही समोरच्यापर्यंत पोहोचायचं तसंच पोहोचता. मग विषयाचे बंधन तरी कशाला बाळगा?
म्हणून कालिब.
***
जसं हरिदास म्हणतो,”वैचारिक सुसंगतीसारखी कंटाळवाणी गोष्ट नाही. आपण तोच तोच विचार केला, तर तेच तेच करत राहू.” पचायला कठीण फंडा आहे, पण मला हरिदास आवडत असल्याने त्याचे फंडे प्लंजर मारून का हो‌ईना मी गळ्याखाली उतरवण्याचा प्रयत्न करते.
च्यायला.
मला आवडणार्‍या सर्व पात्रांची नावं चार अक्षरी का असावीत?
हरिदास
विश्वनाथ
भगीरथ
सॉलोमन
सॅटियागो
जगदीश
तीर्थंकर
अकिलीज…
नाही. पण असंच काही नाही. मला तीन अक्षरी नावं असलेली पात्रंही आवडतात.
दयाल
अर्णव
विशाल
रायन
दिमित्री
ऍलन
माधव…
आता हे अती होतंय! मला आवडणार्‍या काही पात्रांची नावं दोन अक्षरीसुद्धा आहेत.
विसू
बापू
गणू
हॅरी
रॉन
डॉबी
पण यातल्या विसू, बापू, गणू यांची नावं गणपती, विश्वेश अशी तीन-चार अक्षरीसुद्धा असू शकतील.
आवरा आता!
***
मी गेली चार वर्ष डायरी लिहितेय (रोजनिशी नाही!). म्हणजे लक्षात ठेवावं असं काही घडलं, कशाच्यातरी अनुषंगाने काहीतरी ग्रेट वाचण्यात आलं, तर ते तारीखवार टिपून ठेवते. मागच्या आठवड्यात गंमत म्हणून त्या चाळत होते. कधी तरी कुठंतरी वाचण्यात आलं असेल की ‘सॅम्यु‌अल पेपिस’ सांकेतिक लिपीत डायरी लिहायचा. झाsssलं. मी उत्साहात तीन-चार पानं अगम्य लिपीत लिहून काढलेली दिसताहेत. पण त्या कोडची की कुठे लिहून ठेवलीय हे आता आठवत नाहीये. उत्साहात तीपण सांकेतिक ठिकाणी लिहून ठेवलेली नसली म्हणजे मिळवलं. असंच मजेत वाचताना मी एका नोंदीपाशी थबकले.
२०-०१-२००६
‘प्रत्येक नात्याचा अर्थ लावायला पाहू नये. जग फक्त शरीरसंबंधांनी, चालीरितींनी जोडलेली नाती जाणतं. जसं आ‌ई, वडील, पती. पण काही नाती केवळ जाणिवांची असतात, मनांची असतात. अशा नात्यांना जगाने नाव दिलेलं नाही. ती केवळ मनानेच ओळखायची. असूनही नसणारी , नसूनही असणारी! या नात्यांचे कितीही पापुद्रे काढून गाभ्यापर्यंत जा‌ऊ पाहिलं, तरी तो गाभा तुला गवसणार नाही. कळतंय का तुला? कदाचित सूर्याला पाहून फ़ुलणार्‍या सूर्यफुलालाच तो अर्थ कळेल. जे केवळ फ़ुलणं जाणतं आणि फुलणं जपतं.’

गॉश!
हे वाक्य ‘लिहून’ काढण्या‌इतपत मी भाबडी होते? त्या वेळी असं कुठलं पापुद्रे काढावंसं वाटणारं नातं ऑन होतं?
ओह येस्स! आपल्या प्रोफ़ेसरच्या प्रेमात पडायचा गाढवपणा बर्‍याच कॉलेजकन्यका करतात. मीही केला होता. हे पापुद्रे, सूर्यफुलं त्यातूनच आलीयेत.
पण मग माझ्या लक्षात येतं की, ही आठवण, याच्याशी निगडीत प्रसंग आपल्या आठवणींमध्ये अजूनही तपशिलवार जिवंत आहेत. गोठवलेले आहेत. कदाचित मरेपर्यंत माझी सोबत करणार आहेत.
मग डायरीतल्या त्या पानाची आवश्यकता संपते.
टर्र र्र र्र…
ते पान टरकावून मी त्याचं रॉकेट करते. बसल्या जागेवरून बाहेर भिरकावते.
भेंssडी… समोरच्या गुलमोहराच्या बेचक्यात जा‌ऊन अडकलं.
त्या ‘अडकेश’ ला पाहून ‘माझ्या डायरीचं भूत’ असं पोस्टचं फंडू टायटल डोक्यात येतं आणि मी वेळ न दवडता ते लिहून काढते.
डायरीतल्या अशा बरयाच पानांची गरज आता मला नाही भासणार.
***
अ श क्य पा ऊ स…
आणि एवढा बदाबद कोसळूनही आकाश अजून पोटात पा‌ऊस वाढवतंच आहे. बेचक्यात अडकलेल्या त्या पानाचा पार लगदा हो‌ऊन गेलाय.
गेल्या महिन्यात आमच्या सोसायटीतल्या हरामखोरांनी कापून काढलेल्या सुरूच्या झाडाची दुखरी, बोडकी खोडं ओळीने उभी आहेत. त्यातल्या सर्वात जवळच्या बुडख्यातला चकचकीत लालसर रंग अजून नाही गेलेला. म्हणजे अजून तग धरून आहे बेटं.
येतील.
यांनाही धुमारे येतील.
आषाढालाss पाणकळाss
सृष्टी लाssवssण्याssचा मळा
दु:ख भिर्कावूssन शब्द
येती माssहेरपणाला
शब्दांना सासुरवास?? आय नो व्हॉट यू मीन. मला हल्ली या गाण्याने पिसं लागलीयेत.
ळाss वर तब्येतीत ढुम्म करून सम दिली, तर एकमेकांच्या मानेत मान खुपसून बसलेल्या कबुतरांचं जोडपं फडफडफडफड करत निघून गेलं. रूटीनच्या बाहेर काढून कोणाला काही करायला लावलं की दिन अच्छा जाता हय म्हणे! आता जा‌ईल.
***
हल्ली मला वारंवार एकच स्वप्न पडतं. मी एका लांबलचक बोगद्यातून चाललेय.रादर तरंगतेय. अर्ध्यात आल्यानंतर बोगदा दोन्ही बाजूंनी बंद होतो. आणि कोणीतरी घुसळून काढल्यासारखा अंधार खदखदायला लागतो. आणि जेलीसारखा थबथबत माझ्या अंगावर पडून मला वाळवीसारखा खा‌ऊन टाकतो…
मी रोज खच्चून बोंबलत जागी होते. सॅमी जेन्कीन्ससारखी माझीही त्या त्याच अनुभवाला तीच तीच रि‌ऍक्शन का असते? अनुभव (मग तो स्वप्नात का असेना!) जुना झाल्यावर रि‌ऍक्शनची तीव्रतापण कमी कमी होत जाणे अपेक्षित आहे. तरी? मला वाटतं, माझ्या स्वप्नात मला डिमेंशिया झालेला असावा.
***
कधी कधी मला खूप थ्रिलिंग गोष्टी कराव्याशा वाटतात. म्हणजे फेक नावाने एक फेक ब्लॉग काढावा. त्यावर लोकांना उचकवणारं काय काय लिहावं. अनॉनिमस कमेंट्स ऑन ठेवून पब्लिकला मला शिव्या घालायला प्रवृत्त करावं. मग मी उलटून त्यांना दुप्पट शिव्या घालाव्यात. मग त्या तुंबळ युद्धाच्या कहाण्या सगळीकडे पसरून ब्लॉग-हिट्स वाढाव्यात वगैरे वगैरे.
पण मी तसं करत नाही. मला ते झेपणारच नाही. एक तर मी अजिबात खोटं बोलत नाही. म्हणजे खोटं बोलावं की बोलू नये असा चॉ‌ईस असतो असं नाही, पण मी बाय चॉ‌ईससुद्धा खरंच बोलते. पाहायला तर बनवाबनवी करणारे मॅनिप्युलेशनचे बाप पाहिलेले आहेत. पण त्यांची भंबेरी, कोलांट्या‌उडया पाहून आपण हरिश्चंद्राची कितवीतरी अवलाद आहोत याचं बरंच वाटतं.
असो.
***
एका देवळाच्या बाहेर लिहिलेलं असतं, “आपण देवावर विश्वास का ठेवला पाहिजे?”
“कारण जगात असेही काही प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं गूगल दे‌ऊ शकत नाही.”
हा हा हा!
माझी एक मैत्रीण अशीच गूगलभक्त आहे.
“आय ब्रोक अप. हाऊ टू गेट बॅक टू हिम.”किंवा
“व्हॉट मेन लाइक”
किंवा
“आय फॉट विथ माय पेरेण्ट्स. व्हॉट टू डू टू पॅच अप विथ देम विदाउट सेइंग ’आयम सॉरी!’?”
तिला अशा प्रकारची सर्चेस मारताना मी या या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तर…
तिला तिच्या कितव्यातरी ब्रेक-अपनंतर आत्महत्या करायची होती आणि पहिल्यांदाच गूगलने तिला निराश केलं होतं, कारण तिला धडाक्याने ‘स्टा‌ईल’मध्ये मरायचं होतं. मला आपलं ‘रेखाने शिळा उपमा खा‌ऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता’ एवढंच काय ते या विषयातलं ‘स्टायलिश’ ठा‌ऊक. सर्वसाधारण असे बरेच पर्याय मी सुचवले. उदा. सायना‌ईड, पंख्याला लटकणे वगैरे. पण तिला आत्महत्या करताना वेदना झालेल्या नको होत्या. चेहरा विद्रूप झालेला नको होता. इत्या्दी बरेच ऍस्टेरीक मार्क्स तिच्या ‘आत्महत्या’ या विषयावर होते. थोडक्यात तिला फा‌ईव्हस्टार आत्महत्या हवी होती. ऑबव्हियसली तिने आत्महत्या केली नाही. खरं म्हणजे तिला करता आली नाही.
कारण स्वच्छ होतं- तिला जगायचं होतं.
किंवा तिला तिच्याभोवती असलेल्या इतर प्रेमांची जाणीव झाली.
खरंच.
आयुष्यभर कोणाचं ना कोणाचंतरी प्रेम आपल्या सभोवती असतं. पण आपण त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही, जे नाही त्याच्या शोधात दूर-दूरवर जातो. नचिकेत नाही का? समीरचं, आप्तांचं भोवती उबदार शालीसारखं लपेटलेलं प्रेम सोडून मृत्यूला शोधत त्या विहिरीत जातो?
जायते यस्मात च, लीयते यस्मिन इति जल:
ज्यातून जन्म घेतो आणि ज्यात लय पावतो ते पंचमहाभूत म्हणजे पाणी.
आपण एखादी गोष्ट नाकारतो. ती नाकारण्याचा निर्णय घेणं खूप सोप्पं. पण तो अंमलात आणण्यासाठी लागणारी आयुष्याची उलथापालथ करण्यासाठीची श्रद्धा, विश्वास आपल्याकडे आहे का? याचाही विचार झाला पाहिजे.
माझ्याकडे आहे??
तर हो!
आहे!
***
कधीकधी आपण एखादी कविता वाचतो त्यातल्या एक-दोन ओळी खूपच आवडून जातात. गुलजार, गालिब हे तर इर्रेझिस्टेबल! मग त्या ओळींचा उल्लेख कुठल्यातरी पोस्टमध्ये कधीतरी करायचाच असं आपण ठरवतो. पण नुसतंच – ‘मला हे आवडलं – देत आहे’ असं लिहिलं तर लै बोराड वाटतं. त्याला साजेशी सिच्यु‌एशन असेल, तर त्या ओळींना वेगळाच रंग चढतो. नसेलच सिच्यु‌एशन तर आपण कधी कधी ती ‘बनवतो’. आणि नाहीच बनवता आली तर वैतागून स्वस्थ बसतो. दिवसांमागून दिवस जातात. आपली चिडचिड चिडचिड होत राहते. माझीही नाही आता अशीच चिडचिड होतेय? मला एलियटची ही कविता कधीची ब्लॉगवर लिहायचीय, पण बोंबलायला सिच्यु‌एशनच नाही.
‘आगगाडीत बसलेले तुम्ही
हे स्टेशनवरचे तुम्ही नसता
किंवा पुढच्या स्टेशनवरचे तुम्ही नसाल
आगबोटीच्या कठड्यावर वाकताना
मागचा रस्ता लाटांनी रुंदावलेला बघताना
तुम्ही म्हणणार नाही की
हा टाकला मागे मी माझा भूतकाळ
आणि हा मी सामोरा भविष्याला-‘
अरे! पण सिच्यु‌एशन नसल्याचं भांडवल करून मी सिच्यु‌एशन निर्माण केलीच की नाही? वा!
***
मी संध्याकाळची फिरायला जाते, तेव्हा दोन मध्यमवयीन माणसं पिंपळाच्या पारावर बसून बुद्धिबळ खेळत असतात. ते लोक एकाच प्रकारच्या चाली खेळतात, त्यांचा खेळही नेहमी एकाच प्रकारे संपतो. ‘स्टेल-मेट’ने. त्यांच्या लक्षात येतं का नाही? हे तर मला माहीत नाही. नसावं बहुतेक! पण उत्साहाने प्यादी मांडून तोच तोच खेळ खेळण्यातल्या त्यांच्या उत्साहाची लागण मलाही होते आणि मीही ताटकळत चांगले तीन-चार गेम्स त्यांच्या तोंडाकडे टकमक बघत उभी असते.
आपलं काय वेगळं असतं नाहीतरी?
काल केलं तेच आज.
आज केलं तेच उद्या.
त्यांनी केलं म्हणून मी.
मी केलं म्हणून तू.
सवयीने आपणही चाकोरीतच फिरतोय ना?
असं फिरत राहायचं आणि पोकळी वगैरे जाणवलीच कधी, तर त्यात कविता, ब्लॉग, सिगरेट्स, गझल कोंबून बसवायची. फ़ाजलींनी कसलं ग्रेट लिहून ठेवलंय या बाबतीत.
‘रात के बाद नये दिन की सहेर आयेगी
दिन नहीं बदलेंगे, तारीख बदल जायेगी’
***
अगदीच ब्रशने मन मानेल तसे फटकारे मारलेल्या चित्रासारखं झालंय का लिखाण?
बट माइंड यू, त्यालाही ‘ऍबस्ट्रॅक्ट’ म्हणतात.
खालून, वरून, उलट, सुलट –
कसंही पहा. आहे तसंच दिसणार!
आणि
येस्स्स!
कालिब म्हणजे ‘काहीही लिहून घू या’.
हे वाचून ‘काहीही बरं का!’ असं वाटलं, तर हेतू सफल!
– श्रद्धा भोवड
Facebook Comments

1 thought on “कालिब”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *