Uncategorized

ब्लाइण्ड डेट

ब्लाइंड डेट

अमेरिकेच्या रणधुमाळीमधे या वेळी बऱ्याच काही तिरपागड्या गोष्टी घडल्या. शक्य असतं तर प्रत्येकावर काही ना काहीतरी लिहिलं असतं. पण असो. आता परत ‘आत्याबाईंना मिशा असत्या’ प्रकारच्या बाता नको मारायला. ‘अमेरिकेच्या लेटेश्ट ट्रिपमधे’ असं म्हणायचं होतं खरं तर, पण उगाच इफेक्ट तयार करण्यासाठी रणधुमाळी वगैरे. नको त्या ठिकाणी नाही ते करण्याचा किडा जरा उपजातच आहे आपल्याला. काय करणार? पुण्यातून निघताना मला आठवतंय, आदितीशी बोलणं सुरू होतं. कशाबद्दल? तर ब्लाइंड डेटबद्दल. म्हणे ‘किती मज्जा येईल नं!’ आपण थोडीच मागं हटणार बाता मारायला? सुरू एकदम जोरदर चर्चा आणि कल्पनांचे मनोरे. पण आता कसं आहे ना, की देवानंपण काही गोष्टी विचित्र बनवल्यात यार. म्हणजे ज्याचा जोरदार विचार कराल, तसलं काही म्हणे खरंच घडतं. याची खरंच काही गरज नव्हती. पण आता करणार काय? म्हणालो ना, देवानं खरंच विचित्र बनवल्यात काही गोष्टी. काही लोकांसाठी त्या शाहरुख खाननं बनवलेल्या असतील. शिद्दत, कयामत, सजिश, कायनात वगैरे तो जे काही म्हणतो तसं. पण मुद्दा काय – पुढे अमेरिकेत असल्या काही गोष्टी घडल्या. अगदी अशाच नाही, पण आता जवळपास देव डी आणि देवदासमधे जेवढा फरक होता, तेवढ्या फरकानं घडल्या. एक जवळपास ब्लाइंड डेट घडून आलीच आली. वर आणि बरंच काही उगाचच पणाला लागलं. कारण काहीही नाही. बस झालं, एवढंच.

सॅली नावाची एक फटाक पोरगी योगायोगानं पदरात पडली. म्हणजे पडली म्हणजे एकदम धपाक करून पडली. आले देवाजीच्या मना. कोणा अमुकची तमुक फ्रेंड वगैरे. फ्रेंड सिटिंगचा जॉब मिळालेला एका इव्हिनिंगसाठी. आता कसा आणि का ही वेगळी कथा. पण माझी सो-कॉल्ड ब्लाइंड डेट अशी सुरू झालेली. ज्या गोष्टी एकत्र नाही यायला पाहिजेत, त्या सगळ्या एकत्र येऊ लागल्या, की बऱ्याच भलत्या आणि असंबद्ध गोष्टींची शृंखला सुरू होते. तसा प्रकार होता. माझ्या सुपीक डोक्यानं सॅलीला सूट होईल आशी आयडिया काढली. आम्ही डिस्को नाईटला जायचा प्लान केला. तोही बप्पी लहरी येणार होता त्यावाल्या. तीही लगेच तयार झाली. ऑलमोस्ट म्हणालीच, “व्हॉट अ‍ॅन आयडिया, सरजी!” आता हे का केलं? याची मला आजिबात कल्पना नाही. मी तसा डीजे डिस्कवाला माणूसही नाही. पण आता काय सांगू? योग असतात सगळे, जशी सॅली धपाक करून पदरात पडलेली, तसे.

लगेच तयार होऊन आम्ही पोचलोही, अ‍ॅवलॉन नामक देसी डिस्कमधे. सॅली तर आलेलीच फटाक कपडे घालून. माझ्या मंद बुद्धीनं गडबडीत एक काळा पायजमा आणि लाल टीशर्टवर भागवलं. डिस्कमधे पोरींना ड्रेस कोड नाही, पण मुलाना मात्र आहे, या स्वार्थी परंपरेचा मला क्षणभर विसर पडलेला. तसंही देसीच डिस्क आहे, करू अ‍ॅडजस्ट ही असली मनातल्या मनात कारणं दिली अ‍ॅवलॉनला पोचल्यावर. गोऱ्या पोरींना तशीही देसी गाण्यांची, खाण्याची भलती आवड. तशी सॅलीलापण. माझ्या कोण्या देसी मित्रानंच पटवलेली हिला. आणि हिच्याबरोबर मी डिस्कमधे. ‘नादखुळा, गणपतीपुळा, तुमच्या लाईनीवर आमचा डोळा’ हे जे काही लहानपणी शाळेमधे बोबडे बोल ऐकलेले, थोडंफार तसंच होणार होतं. म्हणजे माझा डोळा वगैरे नव्हता सॅलीवर, पण त्रयस्थ होऊन पहाल, तर तशी डेटच ना ही!

असो. आपल्या डेट्स तशाही मनातल्या मनातच व्हायच्या. सॅली आणि मी पुसटशा पिवळ्या लाईटखालून लाईनीतून काउंटरपर्यंत आलो. आत जाऊन येड्यागत देसी नाच करायला तिकीटपण काढलं. माझ्या पायजम्याला कोणी जमेत धरलं नाही. कदाचित सॅलीसारखी चिकनी पोरगी आत येणार नाही या भीतीनं मला डिस्काऊंट मिळाला असावा. दणदणीत आवाजात आत ‘पग घुंगरू’ सुरू होतं. ड्रम बीटवर आख्खी जमीन वर-खाली होतीये असं वाटत होतं. इतकं जुनं गाणं का वगैरे विचार मनात येण्याआधीच समोर बप्पीदांचं पोस्टर बघितलं. सोन्याच्या माळांच्याखाली दबलेला भलासा देह. डोळ्यावर गॉगल. हात वर उंचावलेला. ठाकरेंनी ही पोज आधी शोधली की बप्पीदांनी, असा पीजे उगाचच मनात येऊन गेला. सॅलीकडे बघितलं आणि पीजे सांगायचा मोह आवरला. काय काय एक्सप्लेन करणार हिला? ठाकरे कोण असा पहिला प्रश्न असायचा हिचा. आमच्या कोल्हापुरामधे असलं कोणी म्हणलं असतं, तर आजूबाजूचे ४-५ शिवसैनिक पुढं सरसावले असते. काहीतरी काम मिळाल्याचं सुख असतंच की. पण असो, त्यात नको पडायला. तसंही तिथे एकमेकांशी बोलायचं म्हणजे जवळजवळ किंचाळूनच बोलावं लागणार होतं. मग आपली एनर्जी सांभाळून खर्च करणंच भलं.

बाईंनी मोर्चा बारकडं वळवला. काहीतरी दोन-चार ग्लास रिचवल्याशिवाय या नाचणार कशा? किंवा याला मूड क्रिएशन म्हणू या. सुरेख पोजमधे बार स्टूलवर बसून बाईंनी चोहीकडे नजर टाकली.

क्षणभर मला वाटलं की, सगळं म्युझिक अचानक थांबलंय आणि सगळे लोक (आणि कपल्स विशेषतः) रागानं (किंवा असूयेनं वगैरे) माझ्याकडं बघताहेत – ‘भला इस की लडकी मेरी लडकी से सफेद कैसे?’

आता माझी काय चूक यार, कधी पडतो लंगूर के मूंह मे अंगूर. सॅलीच्या ड्रिंकच्या ऑफरने मी तसा लगेचच भानावर आलो. बाईंसाठी वोडका आणि माझ्यासाठी लिंबू सरबत! छ्या:! असं कसं? मी कशी अशी ऑर्डर करू? ‘आजूबाजूच्या तमाम कपल्स को जेलस बनायेंगे’वाल्या मघाच्या कल्पनेला यानं तडा गेला असता. तेवढ्यात सॅलीनेच तशी ऑर्डर करून टाकली. काहीही म्हणा, गोऱ्या पोरींच्या तोंडी काहीही छानच वाटतं. माझ्यासाठी हिने लेमोनेड (लिंबू सरबताचं लेमोनेड व्हायला इतकं पुरे होतं) मागितलं हे बघूनच मला सगळी कपल्स परत माझ्याकडं मत्सरानं बघताहेत असा भास परत झाला. परत म्युझिक वगैरे थांबलंय, असलं सगळं वाटलं. बार टेंडरनं एकदम विरक्त भावनेनं माझ्यासमोर जेव्हा लेमोनेड बडवलं, तेव्हा थेट कॉलेजच्या कॅंटीनमधल्या वेटरची आठवण झाली. तोही असंच टेबलवर येऊन उपकार केल्यागत कठिंग वगैरे बडवून ठेवून जायचा. अर्धा चहा कपात, अर्धा खालच्या थाळीत. इथे थाळी नव्हती, पण प्रकार थोडा-फार तोच होता. तसंही ग्लासमधे बर्फ जास्त! त्यातलं सांडणार काय? एकदा हातात ग्लास आला की बास. त्यात लेमोनेड आहे की वोडका हे फक्त तुम्हालाच माहीत. परत एंबॅरेसमेंटचा सवाल नाही. सॅलीनं तिचे काहीतरी अनुभव सांगितले. कधी-काळी मागे जेव्हा ती देसी डिस्कमधे आलेली, तेव्हाचे. कळो न कळो, हसणं प्राप्त होतं. तसा हसलो. मी सहसा येत नाही डिस्कमधे, ही माहिती देण्याची गरज नव्हती. पण दिली उगाचच. तिला कळली असेल-नसेल, काही कळलं नाही, पण तिनंही मान हलवून माझ्यासारखंच प्राप्त हसून दाखवलं. तसंही कोणी डिस्कमधे गप्पा मारायला थोडीच येतं? आणि येऊही नये म्हणून तसंही दणादण म्युझिक. आणि ते तर बप्पीदांचं! एव्हाना ‘नौ दो ग्यारह’ वगैरेची गाणीपण झालेली. तशी नॉन-बप्पीदा गाणीही होतीच. सॅलीनं मधे बप्पीदा कोण वगैरे समजून घ्यायचा माफक प्रयत्न केला. आता हिच्या ब्रायन अ‍ॅडम्स वगैरे उदाहरणांसमोर मी कसं समजवावं या प्रश्नातून त्या दाणादाण म्युझिकनं मुक्तता केली.

समोर आता आत घुसण्याकडे कूच केली. अशक्य उत्साहामधे नाचणारी जनता बघून जोश नाही चढला तर नवल. बाजूला सहसा कपल्सच असावीत.

मला उगाच वाटलंही, हे सगळे खरंच इतके खूश असतील का? की असं बेहोश होऊन नाचताहेत? इतका आनंद! इतकी मस्ती! जन्नत! काय माहीत? खरंच काय झालं असेल असं? मला त्यांच्या आनंदाचं नेहमीच कौतुक वाटलंय. पण नंतर नंतर तेही मॅनिप्युलेशन वाटायला लागलं. मला अगदी खात्री होती की, तिथे इतका वेड्यासारखा खूश असणारा कोणीच नव्हता. खरं तर दिवसभर कचकच झाली, कधी आठवडाभर बॉसनं डोकं खाल्लं, किंवा बरेच दिवस खूश झालोच नाही, असं काही झाल्यानं तिथं आलेली जनता खूप असावी, असं मला वाटलं. आठवड्याच्या खुशीचा कोटा भरवण्याची ही रिच्युअल! एकदम बेहद्द खूश होणं गरजेचं तर आहे. पण घडत काही नाही तसलं! मग स्वतःच स्वतःचा मामा बनवायचा. नाचायचं इथं येऊन. परवा ‘झूठा ही सही’मधे जॉन अब्राहमपण पाखीला तेच सांगतो. ‘वेडे, दुःखी झालीस की नाच.’ देवानंही कुठल्यातरी वेदामधे सांगितलं असेलच, ‘वत्सा, दुःखी-कष्टी झालास की नाच!’ शंकराचा तर स्वतःचा बॅण्डही होता. पण काहीही म्हणा, तिथे आलेले लोक खूश तर दिसत होते. एकमेकांच्यात मिसळलेले. ४-५ जणांचा घोळका जरी असेल, तरी त्यांच्याही बऱ्याच कलाकार्‍या चालू. वेगवेगळ्या पोज घेऊन गाण्याची नक्कल करण्याच्या. काही लोक केवळ नाच एंजॉय करत होते. आपल्यामधेच गुंग. नाचाची देसी स्टाईल तशी एकमेवाद्वितीय. वर डिस्को गाणी.

आम्हीही त्या अनोळखी आनंदाच्या जश्नमधे सामील झालो. ओळख असो नसो, काही तासांपूर्वी बऱ्यापैकी अनोळखी आणि एकमेकांसाठी अनभिज्ञ असलेलो आम्हीही तिथे मिसळून गेलो. नाचू लागलो. उड्या मारू लागलो. वेगवेगळ्या पोज देऊन एकमेकांना अ‍ॅप्रिशिएट करू लागलो. नाही म्हटलं तरी, कपल म्हणून नाचू लागलो. तेवढ्याश्या छोट्या जागेमधे तसे भरपूर लोक मावलेले. पण सगळेच तितकेच झिंगलेले. आत आल्यावर तो लेमोनेड पिऊन नाचतोय की वोडका, हे कोण सांगणार. तसा एक टकीला शॉट सॅलीमुळं माझ्यातपण रिचलेला. त्यामुळं मीही काही फारसा वेगळा नव्हतो. सगळे सारखेच असल्यानं कोणाला कोणाचा धक्का वगैरे कळत नव्हता. नाहीतर आपल्याला सवय कुठली – तर, धक्का लागला की एकदम अक्षम्य गुन्हा केल्याचा लुक घेण्याची! पण तसं काही नसतं डिस्कमधे. सगळे किती छान नाचतोय असाच लुक देतात. तेही लुक दिला तर. नाहीतर रनटाईम अ‍ॅडजस्ट करणं सुरू असतंच. कदाचित हेही एक कारण असावं लोक डिस्कमधे येण्याचं. प्रचंड टॉलरन्स.

पण असो. सगळं सुरू होतं. बप्पीदा स्टेजवर येणार अशी अनाउन्समेंट झाली. लोक नाचायचे थांबले. जसे काही स्वतःला स्थिरस्थावर करून झाल्यावर बप्पीदा काही म्हणणार होते. किंवा असंच असेलही बुवा. कशाला प्रत्येक गोष्टीवर कमेंट करा? माझेही हात खिशात गेले. सॅलीबरोबर नाचताना मला आमच्या ऑफीसमधल्या एका बॉसचं दर्शन झालेलं. उंचीला जरा कमी, रंग सावळा. तरीही तिथल्या डिम लाईटमधे दिसलाच मला. अचानक माझ्यातला ‘लोग क्या कहेंगे’ वगैरे जागा होऊन मी शक्य तितक्या जागा बदलून पाहिलेल्या. आता या फिरंगबरोबर असं डिस्कमधे? आता हे का आणि कसं घडलं याचं उत्तर मी घरी जाऊन तयार करायचं ठरवलेलं. आताच हा येडा भेटला तर काय सांगू! आता म्युझिक थांबल्यावर परत एकदा माझं लक्ष चौफेर गेलं. कुणी सांगावं, माझ्याच मागे उभे असायचे साहेब! पण असं काही नव्हतं. कदाचित मलाही तिथं बघून त्यानंही असाच लपाछपीचा डाव सुरू केला असावा. कुणी सांगावं!

हे सर्व सुरू असताना खिशातल्या हाताला अपेक्षित जाणीव झाली नाही आणि माझी असली-नसलेली सगळी झिंग सर्रकन उतरली. समोरच्यानं मधेच परत अनाउन्समेंट केली, ” “पुट युअर हॅण्ड्स टुगेदर फॉर ब – प्पी – दा!” आणि हात तसेच खिशामधे ठेवून सॅलीकडे वळून मी जवळ जवळ किंचाळलो, “सॅली! माय आयफोन???”
ब… प्पी… दा…! ब… प्पी… दा…! ब… प्पी… दा…! ब… प्पी… दा…!
म्युझिक थांबलेलं तरी आता या आवाजानं जमीन हादरत होती. बप्पीदांबद्दल मला काही आकस नाहीये, पण खरं सांगायचं तर असं वाटलं, काय यार? बप्पीदांसाठी काय इतका दंगा करायचा? पण पक्का मुरलेला डिस्कवाला समोर तुषार कपूर आला, तरी त्याला ‘तु… षा… र! तु… षा… र!’ असे चीत्कार टाकेल. म्हणजे माझं तुषार कपूरशीही वाकडं नाहीये. पण… असो.

डिस्कमधे येऊन खूश असल्याचा आविष्कार करण्यासारखी (किंवा साक्षात्कार होण्यासाअरखी) हीपण एक रिच्युअल असावी. किंवा जसा प्रचंड टॉलरन्स हा एक यूएसपी आहे डिस्कचा, तसाच लोकांवर बिनशर्त प्रेम करणं हाही दुसरा यूएसपी असावा. मग तो तुषार असो किंवा बप्पीदा. जो मेन गेस्ट असेल त्याच्या तालावर मुकाट्यानं सगळे खूश होऊन नाचतात. किती विनविन सिच्युएशन ना? असं आणि कुठं होतं यार? लोक इतके गुण्यागोविंदानं नांदताना आणखी कुठे दिसतील? बप्पीदांची एंट्री जबरदस्त झाली. लोकांचा आवाज. ड्रमरने तेव्हाच धडाधड काहीतरी वाजवलं. बप्पीदांचा हात वर होताच, ठाकरेंसारखा. गळ्यात चेन्स. काळा पोषाख. आधीच पुरेसा लाईट नसतो डिस्कमधे. त्यात एवढासा देह. काळा काय म्हणून घातला असेल पोषाख? पण चालायचंच, त्यावर चेन होत्या भरपूर. एकदम लखलख चंदेरी केलेलं बप्पीदांना. काहीतरी २-४ वाक्यं म्हटली यार त्यांनी! पण आठवत नाही अजिबात. लोकांनी टाळ्या मारल्या जबराट.

हे सगळं सुरू असताना, आख्खी जनता वर बघत होती आणि एकच गरीब, गरजू, होतकरू तरूण आणि त्याच्याबरोबर आलेली फटाकडी खाली बघत होते. मी आणि सॅली होतो ते.

“डॅम! सॅली, आय लॉस्ट इट! शिट! गेस आय ड्रॉप्ड इट. आय न्यू इट मॅन! आय जस्ट न्यू इट. हू गेट्स द फोन ऑन डान्स फ्लोअर याऽऽर!?”
सॅलीला सहानुभूती होती की डिस्कची मजा खराब केल्याचा राग, हे काहीही समजून घेण्याच्या मन:स्थितीत मी अजिबातच नव्हतो. मी तिच्याकडं बघतही नव्हतो. अशक्य गोष्ट! असं कसं काय करू शकतो मी? एकदम सुरुवातीपासूनच्या सगळ्याच गोष्टी चूक वाटू लागल्या. फ्रेंड सिटिंग? असं कधी असतं का? साल्या माझ्या मित्राची फ्रेंड एकटी म्हणून तिला मी एंटरटेन करायचं? मला समजतात तरी काय लोक? आणि मीही हिच्याबरोबर नाईट आऊटला कसा काय लगेच जाऊ शकतो? जगात असलेल्या अब्जावधी पर्यांयांपैकी कोणता पर्याय निवडला, तर म्हणे डिस्क!? का? का? डिस्क का? गरज काय होती? कधी नाचणं माहीत नाही, पण आम्हाला गोरी पोरगी घेऊन नाचायचंय! साला निजामाची औलाद असल्यासारखं एका खिशात वॉलेट आणि दुसरीकडं फोन घेऊन नाचायची हौस. इम्पॉसिबल! आय अ‍ॅम जस्ट फ्रीकिंग इम्पॉसिबल फेलो! वॉलेट आठवल्यावर क्षणभर पोटात आणखी बुडबुडा आला, पण वॉलेट होतं जागेवरच. ते अजून हरवलं नव्हतं. सध्या फक्त फोन डिझास्टरच सुरू होतं. सॅलीपण बिचारी त्या गर्दीमधे ‘खाली मुंडी फोन धुंडी’ करत होती. बप्पीदांचं बोलणं संपूच नये अशी मनोमन प्रार्थना करत मी माझा शोध सुरू ठेवला. कारण नंतर लोक परत नाचायला लागले, तर मला हार्ट अटॅक येणार हे नक्की होतं. काहीही सुचत नव्हतं. एकदम शून्य. देअर वॉज नो पॉसिबल एक्स्प्लनेशन आय हॅड फॉर द सिच्युएशन! कोणावर साला ब्लेमपण टाकता येत नव्हता यार. फोन कधी पडला असेल? म्हणजे बप्पीदा येणार असं सांगितल्यावर जेव्हा म्युझिक थांबलं, तेव्हा मला कळलं की फोन नाहीये खिशात. याचा अर्थ नाच सुरू असतानाच पडलाय फोन. आई शप्पथ सांगतो, छातीतून कळ येणं बाकी होतं. खास वाट बघून मुद्दामहून पांढराशुभ्र आयफोन घेतलेला. कायच्या काय जपून वापरलेला. एवढा महागाचा फोन घेण्याचं सत्कार्य करताना हजारदा विचार केलेला. आणि आता सगळं कोणाच्यातरी पायदळी तुडवलं गेलं असणार होतं. फोनवर एक स्क्रॅच आला तर दु:ख, पुढचे सगळे स्क्रॅचेस माफ, असलं गणित मी कित्येकांना सांगितलेलं. आता मला सगळे स्क्रॅचेस एकत्र मिळणार होते. वेळ जसा जसा वाढत होता, तसतशी मला एकसंध फोन मिळण्याची आशा कमी होत होती.

सॅलीनं तेवढ्यात बोलावलं.
“हे… ही सॉ युअर फोन! आय गेस.”
हे अशक्य आहे. मगाशी हिच्या कमरेत हात टाकून नाचताना ही पोरगी मदतीलापण येईल असं, खरं सांगतो, अजिबात वाटलं नव्हतं. ‘एक शाम का साथ, करा ऐश, कल हम कहाँ तुम कहाँ’ असला प्रकार सुरू होता. पण कोणताही आशेचा किरण तेव्हा पुरेसा होता.

“हू? डिड यू फाइण्ड एनी फोन? व्हाइट वन… आयफोन…” पुढे थ्रीजीएस, आयओएसफोर हेही सांगायची फार इच्छा झाली…
“व्हाइट वन? येस, आय डिड. इट वॉस ऑन द फ्लोअर.”
बप्पीदांचे शब्द तिकडं संपले. म्युझिक परत सुरू. बप्पीदांचं गाणं सुरू. लोकांचा नाच सुरू. जमिनीचं हादरणं सुरू!
माझा फोन जमिनीवर सापडला? म्हणजे जमिनीवर होता तो! किती वेळ कोणास ठाऊक? तो सापडला याला? खाली बघून कोण कशाला नाचेल? म्हणजे पायच दिला असेल! स्क्रीनवर दिला असेल का? नाही! नकोच. स्क्रीन कशी होती हे विचारायचं धाडसच नाही झालं. मी मख्खासारखा बघत होतो त्याच्याकडं. सॅलीनं विचारलं पुढं, “व्हेअर इज इट नाउ?” स्वाभाविक प्रश्न होता हा. पण मला नाही सुचला. सॅलीला सुचला. त्या बाबाने स्टेजवर दिला म्हणे बप्पीदा यायच्या आधी. अशक्य योगायोग होता तो.

मी स्टेजकडं धाव घेतली. सिक्युरिटीनं अडवलं. स्टेजवर तर आणखी जोरात आवाज होता. त्याला सांगायचा प्रयत्न केला की, माझा फोन स्टेजवर कोणाकडं तरी दिलाय. त्याला कळेना. आवाजामुळं तसंही घसा दुखेपर्यंत ओरडून बोलायला लागत होतं. व्हीलनसारखं त्यानं मला फारसं काही न ऐकून घेता हाकललं. स्टेजवर जोवर बप्पीदा आहेत, तोवर बाकी कोणाला एंट्री नाही! हताश झाल्यासारखा मी स्टेजच्या बाजूला उभा होतो. बप्पीदांच्या डायहार्ड फॅनसारखा, आधाश्यासारखा त्यांच्या गाण्याकडं बघत. माझ्यामागं एक गोड गोरी मेम असूनही! फोन आत्ता कोणाच्या पायात नाही हे तरी कुठं थोडं होतं! पण काय? असंख्य शिव्या देऊन झालेल्या माझ्या मलाच!

सॅलीनं मधेच मागे ओढलं. म्हणाली, “आय वॉण्ट टू यूज द रेस्टरूम!” मनात म्हणालो, मग कर ना यूज! मला काय सांगते? इथं मी माझा फोन शोधायचं सोडून रेस्टरूम शोधू काय? पण हे डिस्कमधे नॉर्मलच. ढसाढसा प्यायची, आणि मग रेस्टरूमला पळायचं. तसंही बप्पीदा दमल्याशिवाय फोन मिळणार नव्हता. गेलो मॅडमबरोबर रेस्टरूम शोधायला. छताकडं बघत, भिंतीवर रेलून बाहेर वाट बघत उभा राहिलो. मॅडम घुसल्या आत. किती मूर्खपणा केलाय आपण याचं गणित वर छतावर मांडायचा प्रयत्न करत होतो. म्युझिकपासून लांब आल्यामुळं आता तुलनेनं जरा शांत वाटत होतं.

एवढ्यात एक सिक्युरिटी गार्ड दिसला. त्याला शांतपणे माझी दर्दभरी कहाणी सांगितली. कमीत कमी मी काय म्हणतोय हे त्याला कळलं तरी होतं. निर्दयीपणानं मला स्टेजवरून हाकलणार्‍या पहिल्या गार्डसारखा हा नव्हता. म्हणाला, “मदत करीन.” त्यानं विचारलं, “Your girlfriend is inside?” आता या प्रश्नाचं उत्तर आपण जे काही पाहतो सिनेमामधे ते साफ चूक आहे. अजिबात एनर्जी नव्हती स्पष्टीकरण देण्याची आणि मुख्य म्हणजे गरजही नव्हती. कुठं त्याला शब्दबंबाळ होऊन सांगू की, ‘नाही बाबा, ती फ्रेंड आहे, जी गर्ल आहे’? किती बकवास? गौतम बुद्धांना जसा बोधी वृक्षाखाली साक्षात्कार झाल्यावर आनंद झाला, चक्क तसं वाटलं मला तिथं! हे सगळं स्पष्टीकरण देण्याचं प्रकरण थोतांड आहे. मी दाबात काहीही आढेवेढे न घेता म्हणालो, “येस, शी इज इनसाइड.” आहाहा! काय ते सुख. ज्ञानप्राप्तीचे. पण गार्डनं पुढच्याच वाक्यात विकेट काढली. “शी इज टेकिंग लॉट ऑफ टाइम.” आता यावर काय उत्तर देतात कोणाला ठाऊक? आता माझी गर्लफ्रेंड आहे म्हणजे ही किती सेकंदात रेस्टरूममधून बाहेर येते याचं गणित मी ठेवावं की काय? की ‘तुला काय घाई आहे बाबा?’ असं विचारावं गार्डला? शेवटी शरण येऊन, ‘अरे, ही आत्ता पाच सेकंदांपूर्वी या प्रश्नाबरोबरच माझी गर्लफ्रेंड झालीये, तेव्हा मला माहीत नाही का वेळ लावतेय,’ असं सांगावसं वाटलं. खरं तर मुलींना लागतो कशाला इतका वेळ यार? आता लेका तुझी गर्लफ्रेंड असती, तर तुला मी विचारलं असतं काय?

पण असो, इतक्यात सॅली आलीच बाहेर. हसली गोड आमच्याकडं बघून. सगळे प्रश्न, शंका चुपचाप जाहिरातीतल्या ‘मुंह के किटाणूं’सारख्या आपल्या आपण अचानक गायब झाल्या. आमची गाडी परत आत गेली. बप्पीदांचा निरोप घेणं सुरू होतं. माझ्या ‘दिल की धडकनें’ वाढलेली. लोक ओरडत होते परत ‘… ब… प्पी… दा!!! ब… प्पी… दा!!! ब… प्पी… दा!!!’

मला भेटलेला गुड-मॅन-गार्ड मगाचच्या व्हीलन गार्डशी आता बोलायला गेला. माझ्याकडे मधे मधे हात वगैरे करून काहीतरी सुरू झालं त्यांचं. मीही केविलवाणा चेहरा घेऊन उभा होतो. पण बाजूला सॅली होती. माझा केविलवाणा चेहरा आणि फटाकडी सॅली, यामधे साहजिकच सॅली जिंकत होती. पण काही का असेना. कोणाकडं का बघून होईना, फोन मिळाल्याशी कारण. व्हीलन गार्डच्या चेहऱ्यावरची माशीही हलत नव्हती. लेकाचा मख्खासारखा ऐकत होता. मग कुठेतरी गेला आतमधे. मी परत वर चढलो स्टेजवर आणि गुड-मॅन-गार्डला विचारलं – की बाबा काय झालं? तो काही बोलेल, तोपर्यंत मगाचचा व्हीलन गार्ड क्लायमॅक्सला एकदम चांगल्या माणसासारखा हातात फोन घेऊन आला.

खुशीनं पागल होणं काय असतं, त्याची अनुभूती मिळाली मला पुढच्या काही क्षणांत. स्क्रीनवर काहीही नव्हतं! एकदम स्वच्छ. जसं काही झालंच नाही. एक रेघोटी होती हलकीशी, पण तीही स्क्रीन प्रोटेक्टरवरच. माझा विश्वासच बसत नव्हता. खुशीची परिसीमा! दुधात साखर म्हणजे समोर तमाम जनता खुशीत बेभान झाल्यासारखी नाचत होती. जणू काही माझ्याचसाठी. सुखद अनुभव होता तो!

खरं सांगायचं, तर हेही वाईट नाही ना? कोणीतरी खूश आहे म्हणून आपण नाचावं. जसे काही आपणच खूश आहोत. खूश व्हायला कशाला काय कारण लागावं? कारण नसताना डिस्कमधे येऊन नाचलं, तर बिघडलं कुठं? जगाच्या पाठीवर माझ्यासारख्या कोण्या वेड्या माणसाला त्याची जवळजवळ गमावलेली गोष्ट मिळाली ,म्हणून तमाम जनता नाचली तर काय वाईट? आता जनतेला आनंदाचा तपशील माहिती असावा असं थोडीच आहे? डिस्क ही एकदम मंदिर वगैरेसारखी गोष्टी वाटली क्षणभर. मी स्टेजवरून खाली उतरलो.

पण रुको … पिक्चर अभी भी बाकी था, मेरे दोस्त! एक शेवटची हिक-अप अजूनही बाकी होती!

मी फोन वापरून पाहिला. सगळं सुरू होतं. रात्रीचे २ वाजून गेलेले. सॅलीला आता ड्रिंक हवं होतं. परत डान्स फ्लोरवर जायची माझी इच्छा नव्हती. फोन घेऊन तर नक्कीच नाही. आम्ही बारकडं रस्ता वळवला, पण थोड्या वेळात संपलंच सगळं. म्युझिक थांबलं. लोकही पांगायला लागले. आम्हीही बाहेर पडलो. रात्रीचे ३ वाजत आले होतो. माझा हात सॅलीपेक्षा माझ्या खिशाकडंच जास्ती होता. फोन सहीसलामत परत मिळाला या धक्क्यातून मी अजून बाहेर आलो नव्हतो. घरी परतताना फोन खिशातून घसरून कारच्या सीटखाली घसरला, तेव्हा मी गाडी चालवत असताना कसरत करून तो परत खिशात ठेवला. अब ‘एक पल भी दूर रहा जाये ना’ असं. आम्ही घरी आलो. गादीवर पडल्या पडल्या झोपलो. म्हणजे आपापल्या गाद्यांवर पडल्या पडल्या झोपलो. अंगात अजिबात एनर्जी नव्हती. फ्रेंड सिटिंगचा प्लॅन जवळजवळ अंगावर येता येता राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा मित्र परत येणार होता आणि माझं हे फ्रेंड सिटिंगचं प्रकरण संपणार होतं.

सकाळ झाली. मित्र काही आला नव्हता, पण सॅलीनं काहीतरी बनवलेलं. फटाक गोऱ्यापान मुलीनं सकाळी ‘ब्रेकफास्ट बनवलाय’ म्हणून उठवणं यापेक्षा सुंदर ते आणखी काय? मुकाट्यानं उठून लगेच तयार झालो. काही तासांपूर्वीची माझी हालत आणि आत्ताची हालत यांत जमीन-अस्मानाचा फरक होता. फोन बघण्यासाठी नजर फिरवली, पांघरुणाच्या पसाऱ्यात काही दिसेना. समोर असा ब्रेकफास्ट. तोही सॅलीनं बनवलेला. ते सोडून पांघरूण कोण आवरेल? पण परत फोन आठवला आणि मनाशी म्हणालो, ‘ते काही नाही! आधी लगीन फोनचं.’ आत्ता जेव्हा विचार करतो, तेव्हा वाटतं, सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सनी आयुष्य बरबाद केलंय. मी सॅलीचा ब्रेकफास्ट सोडून आयफोनसाठी पझेसिव होतो!

असो.

उठलो. झरझर आवरलं सगळं. सॅलीनं एव्हाना आशा सोडून स्वतः खायला सुरुवात केलेली. मी परत भेळसटलेलो. मला परत फोन सापडत नव्हता! आता हे म्हणजे अतिरेकी होतं. शक्यच नाही. पण मला माहीत होतं, गाडीमधे असेल. सॅलीचा ब्रेकफास्ट तसाच ठेवून मी पार्किंगकडे पळालो. आपल्या कर्वे रोडची जितकी रुंदी आहे, तितकाच रस्ता मधे होता – पार्किंग आणि अपार्टमेंटमधे. कारमधे सगळीकडं पाहिलं, फोन कुठंच नव्हता! आता उगाचच अनईझी होत होतं. वर येऊन सॅलीच्या फोनवरून कॉल देऊन पाहिला. फोनवर रिंग तर वाजत होती. पण आख्ख्या अपार्टमेंटमधून कुठूनही आवाज येत नव्हता. परत गाडीमधे जाऊन पाहिलं. परत फोनवर रिंग वाजत होती, पण गाडीतूनही कुठूनही आवाज येत नव्हता! सॅली माझ्याकडं ’व्हॉट अ लूजर!’ अशा नजरेनं बघतीये असं मला उगाचच वाटलं. पण बिचारी शोधायला मदत करत होती! आता हे मात्र नक्की होतं की, मी डिस्कमधे फोन नक्कीच पाडला नव्हता. मला मधे गाडीमधे सीटखालून फोन काढतानाची कसरत आठवत होती. आता गाडी पार्किंगमधे लावून अपार्टमेंटपर्यंत येईपर्यंत काय होऊ शकेल? या वेळी मी नाचतपण नव्हतो. मला ‘फायनल डेस्टिनेशन’ मूव्ही आठवला. म्हणजे काल कदाचित चुकून सापडला होता फोन! त्याला जायचंच होतं. आता गेला बापडा. विचार तर हाच होता. पण मन मानायला अजिबात तयार नव्हतं.

मी परत परत कॉल करत होतो. कधी खाली जाऊन कारमधे, तर कधी परत घरामधे शोधत होतो.

अचानक रिंग बंद झाली! कट.

वाजता वाजता कट!? पुढे वाजेचना. डायरेक्ट व्हॉईसमेलमधे!

आई शप्पथ!? म्हणजे फोन चोरला कोणीतरी? आणि आता बंद केला!

नाही. हे म्हणजे शक्यच नाही. पण कधी करेल हे कोण? पार्किंगमधून घरापर्यंत येताना पाखरू नव्हतं रस्त्यावर. १० सेकंदं लागली असतील फार फार तर. तेवढ्यात? कसं यार? काहीच अर्थ लागेना. वेडा झालेलो जवळ जवळ. त्याहू अशक्य गोष्ट कुठली असेल, तर १२ तासांमधे आयफोन हरवल्याची दुसरी वेळ आणि मधेच आपण फेसबुकवर काय स्टेटस टाकणार याचा विचार माझ्या डोक्यात आला! खरं सांगतो, असाच विचार आला! किती क्रूर! पण आपलेच दात, आपलेच ओठ! बेसिकमधे खरंच काहीतरी गंडलंय माझ्या! फेसबुक? काहीही काय!

’हाउ टु ट्रॅक लॉस्ट आयफोन’ यावर लगेच गूगल करायचं ठरवलं.

मशीन उघडलं, तसं नवं ईमेल आलं. यशकडून. “युअर फोन इज विथ नवीन. प्लीज कॉल मी वन्स यू गेट इट.”

आता मात्र मी बेशुद्ध पडायच्या मार्गावर होतो. यश? नवीन? यांचा संबंध काय? दोघेही माझे कलीग्स. नवीन तर त्याच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधे राहायचा. पण पार दुसऱ्या टोकाच्या इमारतीत. म्हणजे मी रस्त्यात पाडलेला फोन नवीनला मिळाला? आणि त्याने यशला फोन केला? काहीच गणित लागेना. यांनी माझा बकरा केला असावा! पण कसा? सॅलीनं माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला काहीही न विचारायचं ठरवलेलं. ब्रेकफास्टची प्लेट ठेवून तिचे फोन सुरू झालेले. तिचा डार्लिंग यायचा होता. ती कशाला माझ्या फोनचं सुतक करत बसेल? मदत केली मात्र तिनं, कशाला नाही म्हणू? गोड दिसत होती कारमधे फोन शोधायला आलेली तेव्हा. नाईट ड्रेसमधे कदाचित सगळ्याच मुली सुंदर दिसत असाव्यात. कदाचित तेव्हा अजिबात मेकअप नसतो म्हणून असेल. पण असो. पोरीनं गिव्हअप तरी कधीच मारला नव्हता माझ्यावर. सगळीकडे मदत करत होती. माझं चक्र पुढं सुरू झालं. फोन नवीनकडं कसा, याचं कुतुहल असलं तरी जरा हायसंपण वाटलं.

त्याच विचारात मी सॅलीकडं गेलो. ती पाठमोरी होती बाल्कनीमधे. फोनवर बोलून झालेलं तिचं नुकतंच. तिला कळलं, मी मागे उभा आहे. चपापून वळली मागं. माझ्या चेहऱ्यावरचा लॉस्ट लुक अजून गेलेला दिसत नव्हता. मी तर भेळसटलेलो होतोच तसाही. “व्हॉट? व्हॉट हॅपण्ड?” असं ती म्हणेपर्यंत मी तिचा हात पकडला. आता क्षणभर तिच्या चेहऱ्यावरही लॉस्ट लुक आला. आत्तापर्यंत गोड वगैरे दिसणारा चेहरा जरा वेगळाच दिसला. पण मला लगेचच कळलं की, मी काही न बोलताच तिच्या हातातला फोन घ्यायचा प्रयत्न करत होतो. आता तिला थोडीच कळणार की मी कोणते ईमेल्स बघितलेत आणि माझ्या मनात काय विचार आहेत? हॅंग झाली बिचारी जरा वेळ. आपले विचार कृतीपेक्षा वेगात पळतात यावर कित्येक शिक्षकानी कॉलेजमधे टाहो फोडलेच होते. आज थोबाड वगैरे फुटलं असतं. किंवा नाहीही. गोड आहे पोरगी. असलं काही नसतं केलं. मी फोन प्रकरणामधे इतका गुंगलेलो की, काय घडतंय बाजूला याच्यावरचं लक्ष तसं कमीच झालेलं. सॅलीचा फोन घ्यायचा माझा प्रयत्न अजून सुरू होता आणि तिला कळत नव्हतं, मी काय करतोय ते!
“डूड! व्हॉट आर यू डुइंग?”
“अरे… आय फाउण्ड द फोन … लेट मी मेक ए कॉल ना! प्लीज….”

हे असं इंग्लीशमधे बोलताना मधे ‘अरे’ आणि ‘ना’ करणं मला अजिबात आवडत नाही. तरीही अशा मोक्याच्या क्षणी मी असलं काही हमखास करतो.

तिनं सोडला फोन. हसली गोड परत आणि येडा मुलगा आहे असा लुक देऊन गेली आतमधे! अशक्य मुली असतात राव! या असल्या प्रसंगी कशाला तिनं असं गोड दिसावं?

असो. मी नवीनला कॉल लावला. म्हणाला, ‘तो मूव्ही थेटरमधे आहे’. मी मनात विचार केला, दुपारी बाराला कोण जाईल मुव्हीला? पण ते सोड, याला माझा फोन तिथं कुठं मिळाला? नवीनच परत म्हणाला की दोनला तो परत येईल, तेव्हा देईल फोन. मी यशला फोन केला.

“बाबा! काय भानगड? तुला काय माहीत नवीनकडं फोन?”

“त्यानं कॉल केलेला मला. त्याला वाटलं, तू गेलास शिकागोला.”

“पण त्याला मिळाला कसा फोन?”

“मी सांगितलं त्याला घ्यायला.”

“???? तुला काय माहीत फोन कुठं होता?”

“तुला जेवायला बोलवायचं होतं ना बाबा. सकाळपासनं कॉल करतोय. शेवटी फोन कोणीतरी उचलल्यावर ओरडलो मी, ‘क्या भाई, कितनी बार बुलाया तुझे?'”

“मग?”

“तिकडून जरा दबकून आवाज आला, ‘मै भाई नही हूं!'”

आता मात्र मगाचच्या सगळ्या टेन्शनचं रूपांतर पोट धरून हसण्यात झालं. या त्रयस्थानं यशला सांगितलं की, त्याला रस्त्यात आयफोन दिसला. पांढरा म्हणून दिसला, काळा असला तर मिस झाला असता. मधेच आपण पांढरा फोन निवडला याचं कौतुकही वाटलं. यशला सॅली प्रकरण माहीत नाही, म्हणून त्यानं त्यातल्या त्यात जवळचा म्हणून नवीनचा नंबर दिला. नवीननं फोन घेतला खरा, पण मी शिकागोला असेन म्हणून तसाच मूव्हीला गेला आणि यशनं मेल केलं, चेक करायला की, मी शिकागोला गेलो की आहे अजून.
सुन्न!

अगदी अशीच अवस्था झालेली माझी! अशक्य नशीब होतं ते!

दोनला नवीनकडून फोन घेतला.

फोनवर अजूनही स्क्रॅचेस नव्हते पडलेले!

– संग्राम

http://rohitbhosale.blogspot.com/2010/10/blind-date.html
http://rohitbhosale.blogspot.com/2010/11/blind-date-contd.html

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *