Uncategorized

शब्द

Words, words, words. ~ Hamlet, 2.2
शेक्सपिअरने हॅम्लेटच्या तोंडी हे वेगळ्या अर्थाने घातले आहे, पण त्याला शब्दांची महती नक्कीच ठाऊक होती असे म्हणण्यावाचून पर्याय नाही, कारण एकहाती एखाद्या भाषेला किमान १०,००० शब्द (वाक्प्रचार वेगळे) देणे हे येरागबाळ्याचे काम नोहे. म्हणूनच इंग्रजी भाषेचा इतिहास बघताना शेक्सपिअरच्या आधीचे आणि नंतरचे असे दोन कालखंड स्पष्टपणे दिसतात. जहाँ हम खडे होते है, लाइन वहीं से शुरू होती है… वगैरे वगैरे. हे इतरही महान लोकांबाबत दिसते. टोलकिनने ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’मध्ये नवीन शब्दच नाही तर नवीन भाषाच तयार केली.
पण लेख शेक्सपिअर किंवा टोलकिनवर नाही, तर शब्दांवर आहे.
शब्द म्हणजे हत्यारे आहेत. हत्यारे हा शब्द जरा तीव्र होतो आहे कदाचित. कारण हत्यारे म्हटले की तलवारी किंवा हातोडा डोळ्यापुढे येतात. पण चित्रकाराचा कुंचला हेही हत्यारच आहे आणि भवानी तलवारही. शब्दांची खासियत ही की ते दोन्हींचे रूप घेऊ शकतात. “मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास । कठिण वज्रासी भेदू ऐसे” असे काहीसे.
आपण शब्द बरेचदा निष्काळजीपणे वापरतो, कारण शब्दांमुळे आपल्या वागण्यात किती फरक पडतो हे आपल्या लक्षात येत नाही. भाषा संशोधकांना असे आढळले आहे की, आपल्या मातृभाषेचा आपल्या विचारांवर आणि जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर बराच मोठा पगडा असतो. ‍ऑस्ट्रेलियातील अबोरोजिनी जमातीमधील एका भाषेत वर, खाली, डावा, उजवा असे शब्दच नाहीत. त्याऐवजी ते लोक पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशा वापरतात. उदा. तुझ्या डाव्या हातावर मुंगी आहे असे म्हणण्याऐवजी या भाषेत तुझ्या उत्तरेकडील (किंवा पूर्वेकडील – तो माणूस कसा उभा आहे यावर ते अवलंबून आहे) हातावर मुंगी आहे असे म्हणतात. याचा परिणाम असा की जन्मल्यापासून प्रत्येक क्षणाला आपली आणि सभोवतालच्या सर्व वस्तूंची दिशा कोणती आहे याचा ते सतत वेध घेत राहतात. यामुळेच हे लोक प्रवासात चुकण्याची शक्यता अत्यंत कमी असते.
पेरूमध्ये बोलल्या जाणार्‍या मात्सेससारख्या काही भाषांमध्ये तुम्ही कुठलेही विधान केलेत तर त्या विधानापर्यंत तुम्ही कसे आलात (प्रत्यक्ष पाहिलेत, पुरावा आहे की तर्क) हे दर वेळेस सांगावे लागते. हे सांगितले नाहीत तर तुम्ही खोटे बोलत आहात असे गृहीत धरले जाते. उदा. समजा तुम्ही एखाद्या मात्सेस बोलणार्‍याला विचारले की तुला किती बायका आहेत तर तो एक, दोन असे उत्तर देणार नाही. जर त्या क्षणी त्याच्या दोन बायका त्याच्या डोळ्यासमोर असतील तर तो दोन म्हणेल अन्यथा “मी मागच्या वेळेस बघितले तेव्हा दोन होत्या” असे उत्तर देईल. कारण मागच्या वेळेस बघितल्यापासून आत्तापर्यंत एखादी बायको पळून गेली असेल तर काय घ्या? आपल्याला हा विनोद वाटतो, पण ही त्यांची वस्तुस्थिती आहे. मग विचार करा, जन्मभर अशा तर्‍हेने विचार करणार्‍या माणसाची विचारपद्धती, तर्क किती वेगळे असतील? आणि जगात अधिकृत अशा सात-एक हजार भाषा आहेत. त्यांच्यातले फरक लक्षात घ्यायचे ठरवले तर छाती दडपते.
जपानी भाषेत एक शब्द आहे, काईझेन (Kaizen). याला इंग्रजी प्रतिशब्द नाही. याचा अर्थ आहे गुणवत्तेमध्ये सतत सुधार करत रहाणे. जपानी उत्पादनांची गुणवत्ता वर्षानुवर्षे उत्कृष्ट रहाण्यामागचे कारण – काईझेन हा त्यांच्या व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग आहे. आणि हा नुसता शब्द राहिलेला नाही, तर त्यामागे एक विचारधारा तयार झाली आहे. मग रोजच्या आयुष्यात काईझेनचा वापर कसा करता येईल यावरही लोकांनी लेख लिहिले आहेत.
याउलट एखाद्या भाषेतील अविभाज्य शब्द “चलता है” असतील, तर तिथे काय परिस्थिती असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
आपल्या संस्कृतीमध्ये एकूणातच आभार मानायचे प्रकरण जरा अवघडच आहे. आपल्याकडे आभार मानायला शब्द आहेत, धन्यवाद किंवा आभारी आहे. पण एखाद्याने आभार मानल्यानंतर काय? इतर भाषेत कमीत कमी दोन तरी ठरलेली उत्तरे आहेत. इंग्रजीत प्लेझर किंवा वेलकम म्हणतात, इटालियनमध्ये प्रेगो किंवा फिगुराती म्हणतात, फ्रेंचमध्ये द रियां किंवा आ व्हू/त्वां. मराठीत ‘हॅहॅहॅ, त्यात काय यवढं’ वगैरे काहीतरी बोलून वेळ मारून न्यावी लागते. पण खरे तर अशी वेळ कमीच येते, कारण मुळात आभार किंवा धन्यवाद आपण बोलताना किती वेळा वापरतो? इथे मराठीला कमी लेखायचा हेतू नाही. यावरून संस्कृतींमधील फरक अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येतात. उदा. इंग्रजीत मामेभाऊ, मावसभाऊ, आतेभाऊ, चुलतभाऊ वगैरे भानगडी नाहीत. कझिन आणि निस/नेफ्यू आयुष्यभर पुरतात.
एखादी भाषा शिकताना शब्दांशी ओळख करून घ्यायला फार मजा येते. आपल्याला तो शब्द कसा वाटतो हे आपली मातृभाषा, आपल्याला येत असलेल्या भाषा या सर्वांवर अवलंबून असते. नंतर त्याची सवय झाली की डोक्यात एक नवीन न्यूरल कनेक्शन तयार होते. इटालियनमधील एक प्रिय शब्द आहे फ्रुशिओ (fruscio). हे इटालियन आडनावही असू शकते. याचा अर्थ आहे पुस्तकाची पाने उलटताना होणारा आवाज किंवा शरद ऋतूमध्ये वार्‍याने पानांची जी सळसळ होते ती. याचा इंग्रजी प्रतिशब्द रसल (rustle) ऐकला की मस्त कढी केल्यानंतर भांडे विसळले तर त्या पाण्याची चव कशी लागेल तसे काहीसे वाटते.
आणखी एक क्रियापद आहे, कोनोशेरे (Conoscere). याचा अर्थ आहे ओळखणे. पण ही ओळख फक्त व्यक्तींपुरतीच नाही, तर शहरांनाही लागू होते. “कोनोस्को मुंबई” म्हणजे मुंबई शहर मला चांगले माहीत आहे. माणसासारखेच शहराला ‘ओळखणे’ ही कल्पना जाम आवडून गेली. एखाद्या शहरात ‘आबोदाना ढूंढता है, आशियाना ढूंढता है’ म्हणजे काय याच्या अर्थाचा आणखी एक पदर उलगडल्यासारखा वाटला. नेहमीचेच शब्द आणि विशेषणे यांची थोडी वेगळी सांगड घातली, तर किती सुरेख प्रतिमा तयार होतात याची असंख्य उदाहरणे गुलजारच्या काव्यातून मिळतात. ‘दिन खाली खाली बरतन है’ किंवा ‘सावन के कुछ भीगे भीगे दिन’. ‘गीला मन’ किंवा ‘गीला चांद’. (तसे गुलजारचे फेवरिट विषयही मधून-मधून अनपेक्षित ठिकाणी डोकावत रहातात. ‘पोर्ट्रेट ऑफ गालिब’मधील बल्लीमाराची गल्ली चक्क ‘कजरारे’मध्ये परत भेटते.)
मला एखादी परकीय भाषा ऐकल्यावर नाक मुरडणार्‍या लोकांचे नवल वाटते. तुमच्यासाठी त्या शब्दांचे महत्त्व नसेल, पण आणखी कुणासाठी तेच आवाज संपूर्ण विश्वाचे रहस्य उलगडतात. ही खरे तर नवलाईची गोष्ट आहे. तिच्याकडे तसे बघता येत नसेल, तर निदान तिरस्काराच्या नजरेने तरी बघू नये.
The least you can do is say, Respect.
– राज
संदर्भ :
Facebook Comments

2 thoughts on “शब्द”

  1. छान माहितीपूर्ण लेख आहे. संदर्भातले लेख वाचले होते, पण तुमच्या लेखातून त्यात नसलेल्याही बऱ्याच गोष्टी कळल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *