Uncategorized

पोस्टमार्टेम ३

“वी हॅव अ लीड!” अधिकारी म्हणाला.
“काय?”
“ती एका सायकिऍट्रिस्टला कन्सल्ट करत होती.” मला अचानक घाम फुटला. “आम्ही तिचे फोन रेकॉर्ड्स पाहिले. अगदी दोन महिन्यांपूर्वीपर्यंत ती बरेचदा कॉल करायची तिथे. तीन महिन्यांपूर्वी तिथे गेलीही होती.तुमच्याच शहरातले डॉक्टर आहेत. आज मी त्यांना इथे बोलावलंय. येतीलच एवढ्यात.”
मी दोन मिनिटं शांत राहिलो. “मला फोन रेकॉर्ड्सची कॉपी देता का?”
“तसं करणं इल्लिगल आहे, पण भोळेसाहेबांशी ओळख आहे तुमची म्हणून देतो.”
डॉक्टरनं सगळं सांगितलं तर बट्ट्याबोळ होईल. जे गुपित राखायला नलूनं आत्महत्या केली, तेच बाहेर येईल. मी डॉक्टरांना फोन लावून किमान दोन दिवस काही न बोलायची विनंती केली आणि त्यांनीही मोठ्या मनानं मान्य केली. नाहीतर माझ्या बंदुकीच्या स्टंटनंतर त्यांनी मला पोलिसात दिलं असतं तरी मला आश्चर्य वाटलं नसतं.
मी नलूची डायरी त्या दिवशीही पुन्हा पुन्हा वाचली. मनीषानं चार कॉल्स केले आणि एकदा तर घरीही येऊन गेली, पण मी खोलीचा दरवाजाच उघडला नाही. तिचं अचानक माझ्याशी काय काम होतं कळत नाही. मला डम्प करून समाधान नव्हतं का झालं तिचं?
पण नलूची डायरी वाचताना मला एक विचित्र गोष्ट दिसली. शेवटची काही पानं फाडली होती. पण शेवटच्या पानावर लिहिलेलं मागच्या पानावरून कळू शकतं. सिनेमात पाहिलेली ट्रिक मी प्रत्यक्षात केली, पण ती काही एवढी फळली नाही. फक्त मधू एवढं एक नाव लिहिलेलं आढळलं. मग एकदम डोक्यात दिवा पेटला.हे नाव मी कॉल रेकॉर्ड्समध्ये पाहिलंय. महिन्याभरापूर्वीपर्यंत अगदी वारंवार. तासंतास बोलणं झाल्याचे रेकॉर्ड्स आहेत. तिच्या सेलफोन डायरीतला नंबर असल्यानं थेट नावच आलं रेकॉर्ड्समध्ये. पण तिचं नाव असलेलं पान फाडण्याचं प्रयोजन काय? मी आईला हळूच मधूबद्दल विचारलं. तर ही माधुरी नामक मुलगी नलूची अगदी खास मैत्रीण. अभ्यासाला बरेचदा यायची आणि रात्री राहायची. तिचं गेल्या महिन्यात लग्न झालं. मी मनाशीच एक अंदाज बांधला.
संध्याकाळी मी थेट माधुरीच्या घरी पोचलो. का कुणास ठाऊक पण माझी शंका खरी असावी अन्‌ नलूच्या आत्महत्येचं कारण हेच असावं असं मला वाटू लागलं. स्वतःची अपराधी भावना कमी करायला असेल कदाचित, पण नलू गेलीय हा विचार सोडून ती आपल्यामुळे गेली नाही ह्यामध्ये एक तकलादू दिलासा शोधायचा प्रयत्न माझं मन करत होतं.
माधुरीनं मला पाणी आणून दिलं आणि माझ्यासमोर बसली.
“तुमचे मिस्टर कुठेयत?” मी सहज इथेतिथे पाहत विचारलं.
“येतीलच एवढ्यात ऑफिसातून.” ती थोडीशी गोंधळली होती. माझ्या येण्याच्या कारणाचा अंदाज तिला येत नव्हता.
“मला तुमच्याबद्दल आणि नलूबद्दल सगळं ठाऊक आहे.” मी थेट मुद्द्यालाच हात घालत अंधारात तीर मारला.
“काय?” ती एकदम गडबडली. माझी खात्रीच पटली.
“सगळंच!” मी शांतपणे अन्‌ ठामपणे तिच्या डोळ्यांत पाहत म्हणालो.
ती दोन मिनिटं डोळे विस्फारून माझ्याकडे पाहत राहिली.
“पण माझ्यामुळे नाही केलं तिनं हे!” असं म्हणून ती ढसाढसा रडायला लागली.
“मी दुसरा ग्लास भरून तिला पाणी दिलं. “काय म्हणाली ती जाण्यापूर्वी? तुमच्याशी बोलली होती का?”
“मी लग्न करायचा निर्णय घेतल्यावर ती माझ्याशी खूप भांडली. रडली. वैतागली. पण मी तरी काय करू.माझ्या आई-वडलांचा मी विचार केला. तिलाही हेच करायचा सल्ला दिला मी. पण तिला ते शक्य होणार नाही असं तिचं मत होतं. माझ्याकडे हाच एक पर्याय होता. माझं लग्न होईपर्यंत तिनं माझं मन वळवायचा खूप प्रयत्न केला. पण नंतर तिनं माझ्याशी बोलणं टाकलं. मग आठवडाभरापूर्वी तिचा फोन आलेला. मला ’सॉरी’ म्हणाली. इकडचं तिकडचं बोलली. पण ती असं काही करेल असं मला वाटलं नाही.”ती रडतच होती.
“हे बघा. तिनं का केलं, कशासाठी केलं, हे आता महत्वाचं नाही. ती गेलीय हे सत्य आहे. आय जस्ट नीडेड सम क्लोजर, म्हणून मी इथे आलो. स्वतःला दोष देऊ नका. त्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही. मीस्वतःला तिचा दुसरा बाप मानायचो, पण तिनं हे सत्य माझ्यापासून लपवल्यानं मी भावाची कर्तव्य तरी पार पाडली का, असा संशय येऊ लागलाय मला. पण ह्या सगळ्या पश्चात्तापाचा आता काहीच उपयोग नाही.तुमचं आयुष्य आनंदमय होवो हीच माझ्या नलूची इच्छा असेल. अन्‌ तीच शुभेच्छा देतो तुम्हाला.” अन्‌मी तिथून निघून आलो.
प्रत्यक्षात मला तोकडा दिलासा मिळाला होता, पण तिलाही खोटा का होईना दिलासा देणं भाग होतं.
मी डॉक्टरांना फोन केला आणि त्यांना विनंती केली की, तुम्ही प्रेमभंगाची थियरीच योग्य असल्याची साक्ष द्या. नावं घेण्यास तुम्ही तसेही बांधील नाही. माझ्या ओळखी वापरून मी ही केस लवकरात लवकर क्लोज करेन. कारण जर सत्य बाहेर आलं, तर बरीच घरं उद्ध्वस्त होतील. डॉक्टरांनीही विनंती मान्य केली. मी माझ्या उद्योगाला लागलो. सरकारी वकील, पोलीस सगळ्यांशी व्यवस्थित बोलाचाली उरकून मी घरी आलो तर समोर मनीषा.
“तुला काय हवंय माझ्याकडून?” मी वैतागून एकदाचा बोललो तिच्याशी. मनावरचं ओझं कमी व्हायच्याऐवजी वाढल्यासारखं वाटत होतं.
“तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय.”
“चल.” म्हणून मी तिला नलूच्या खोलीत घेऊन गेलो.
“तुला ठाऊक आहे मी तुला का सोडलं?” मनीषानं एकदम वर्मी घाव घातला.
मी गप्पच राहिलो.
“कारण मला नलिनीबद्दल काही कळलं होतं.”
“काय?” मी एकदमच जोरात बोललो. “काय कळलं तुला?” मी आवाज नियंत्रणात आणून बोललो.
“तेच जे तुला आधीच कळायला हवं होतं. तेच जे सांगायला मी तुझ्यामागे लागले आहे.”
“काय?” मी साशंकपणे विचारलं.
“ती सम..”
“माहितीय मला.” मी तिचं वाक्य तोडत बोललो.
“काय?” आता आश्चर्यचकित व्हायची पाळी तिची होती.
“मला नुकतंच कळलंय ते. पण तुला कसं कळलं?”
“माझा एक मावसभाऊपण समलैंगिक आहे. त्यांची एक संघटना आहे, ज्यांच्या संपर्कात नलिनी आली होती. मला अपघातानंच एकदा कळलं. तेव्हा मी तिलाही ओपनली बाहेर यायला सांगितलं. पण तिनं तू आणि आई-बाबांसाठी तसं करायला नकार दिला. तिची घुसमट मला पाहवत नव्हती.”
“पण ह्याचा अन्‌ माझ्याशी लग्न मोडण्याचा काय संबंध?”
“मी तुझ्याबद्दल अजून माहिती करून घेतली. तुझे समलैंगिकांबद्दल लिहिलेले विषारी लेख शोधून वाचले.अन्‌ तुझ्यासारख्या कोत्या विचारांच्या माणसाबरोबर मी लग्न करू शकणार नाही हे माझ्या लक्षात आलं.पण तिला जेव्हा कळलं की मी लग्न मोडलं, तेव्हा तिनं मला रडतरडत फोन करून विचारलं की माझ्यामुळे तू लग्न मोडलंस का? मी तिला परोपरीनं समजावूनही तिला पटत नव्हतं. तिनं मृत्यूच्या दिवशीही मला फोन केला होता, की माझ्या दादाशी असं नको वागूस म्हणून.” आता मला फोन रेकॉर्ड्समधल्या ओळखीच्या नंबरचं रहस्य उलगडलं.
“हम्म… मग आता काय, माझ्या नलूनं माझ्यामुळे आत्महत्या केली हे सांगून तू मला टोचणी द्यायला आलीयेस का?”
“नाही. उलट आता तरी तू तुझा दृष्टिकोन बदल ही विनंती करायला आलेय. कारण जर गुन्हेगार कुणी असेल तर मी आहे असं मला वाटतंय.”
“झाली विनंती करून? आता जाऊ शकतेस तू. कोत्या विचारांच्या माणसाबरोबर जास्त वेळ घालवू नकोस.”
मनीषा उठून निघून गेली. ती मला तेव्हाही का आवडत होती हे मला कळत नाही.
मी नलूची डायरी समोर घेतली आणि एक निश्वास सोडला.
‘नलू, तू कशामुळे हे पाऊल उचललंस ते कदाचित मला कधीच कळणार नाही. पण माझ्यात एवढी ताकद नाही की, तुझं सत्य मी जगासमोर आणू शकेन. जिवंतपणीही तुझी घुसमट दूर करायला मी तुझ्या कामी येऊ शकलो नाही, पण तुझ्या मृत्यूनंतरही मी फक्त तू कायम त्या कोशातच कशी राहशील ह्याचीच खबरदारी घेतोय. माझ्यासारखा क्षूद्र आणि दुबळा माणूस तर नाहीच, पण असा हतबल भाऊ अन्‌ बापही कुणी नसेल. आता तुझ्या सत्याचं ओझं वागवत आयुष्य काढायचंय पिल्ला. पण एक गोष्ट मात्र नक्की करेन मी. तुझ्यासारख्यांबद्दलचा आकस मात्र नक्कीच काढून टाकलाय मी मनातून. आता स्वच्छ नजरेनं जग बघायचं ठरवलंय. जिथे असशील तिथून पाहतच असशील तुझ्या दादाला. जमलं तर माफ कर. अन्‌तशीच एक मिठी दादासाठी पाठव.
– तुझाच दादा!’
डायरीच्या शेवटच्या पानावर मी हे पत्र खरडलं आणि मग ती डायरी जाळून टाकली. नलूच्या अस्थींसोबत तिच्या डायरीची राखही मी गंगार्पण केली.
– विद्याधर भिसे
Facebook Comments

1 thought on “पोस्टमार्टेम ३”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *