Uncategorized

पोस्टमार्टेम २

“बोला! काय म्हणता?” शांतपणे डोळे रोखून त्यांनी मला विचारलं. ह्या माणसाच्या एकंदर व्यक्तिमत्वावरूनच हा उत्तम मानसोपचारतज्ज्ञ असणार हे माझ्या लक्षात आलं. आत्मविश्वासपूर्ण आणि दिलासादायक असा स्वर आणि एक वेगळाच प्रेझेन्स होता त्या माणसाकडे. हसरा, तजेलदार चेहरा आणि वयानं लागलेला चष्मा आणि कानाजवळचे पांढरे झालेले केस. मी त्यांना माझ्या वकिली नजरेनं निरखून पाहत होतो,तेवढ्यात ते पुन्हा म्हणाले, “काय काम काढलंत? ऍडव्होकेट भोळे म्हणाले, तसंच काही महत्त्वाचं काम आहे.”
आता मी त्यांच्यावर नजर रोखली अन्‌ म्हणालो, “माझ्या बहिणीला, नलिनी मुळेला, तुम्ही कसे ओळखता?”
त्यांच्या चेहर्‍याच्या रेषांची सूक्ष्म हालचाल मी टिपली, “डॉक्टर-पेशंट कॉन्फिडेन्शिऍलिटी.” एवढंच ते ठासून म्हणाले आणि त्यांनी एक स्मितहास्य केलं.
“तिनं तुम्हाला मरण्यापूर्वी काहीतरी कुरियरनं पाठवलं ते काय होतं?” मी रागानं विचारलं. मी सहसा साक्षीदारांच्या उलटतपासण्यांच्या वेळीही कधीही रागावत नाही. त्यानं केस बिघडू शकते. पण इथे काहीतरी वेगळंच घडत होतं. माझं मलाच एकीकडे आश्चर्य वाटत होतं.
“डॉक्टर-पेशंट..” त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत मी उठून त्यांच्या बाजूस गेलो आण कोटाच्या खिशातून माझी छोटी लायसन्स्‍ड गन काढली आणि त्यांच्या बरगड्यांवर लावली.
“कुरियरनं काय पाठवलं हे त्यात येत नाही, आणि जरी येत असेल तरी बर्‍या बोलानं ते मला द्या आणि सगळं खरं खरं सांगा. नाही तर तुमचा खून करूनही निर्दोष सुटण्याइतपत चांगला बचाव वकील मी निश्चितच आहे.” माझ्या डायलॉगमधला फिल्मीपणा आणि फोलपणा माझा मलाच कळत होता, पण फासे मी टाकून बसलो होतो आणि आता जे दान मिळेल त्यातनं जिंकायचा प्रयत्न करणं एवढंच हातात होतं.
“यू आर एग्झॅक्टली हाऊ शी डिस्क्राईब्ड. तिच्याबाबत प्रचंड हळवे आणि प्रोटेक्टिव्ह.” त्यांनी एका ड्रॉवरला चावी लावून तो उघडला आणि एक डायरी काढून टेबलावर ठेवली. “बाय द वे, बंदुकीचं सेफ्टी कॅच ऑन आहे.”
मी एकदम वरमलो.
“इट्स ओके मिस्टर मुळे. तुम्ही रोज जशा लोकांमध्ये वावरता, त्या मानानं तुमची प्रतिक्रिया सामान्य आहे. फक्त एक गोष्ट, इथले सगळे सेशन्स व्हिडिओ-रेकॉर्ड होतात, तेव्हा तुम्ही कसेही केस जिंकू शकणार नाही.” ते डोळे मिचकावत म्हणाले.
मी ओशाळवाणं हसलो. मी पहिलं पान उलटून पाहिलं. नलूच्या हस्ताक्षरात तिचं नाव लिहिलेलं होतं.डायरी पाच वर्षं जुनी होती.
मी डायरी उचलली तेवढ्यात डॉक्टर म्हणाले, “एक मिनीट, मिस्टर मुळे. ती डायरी वाचण्याअगोदर मला तुमच्याशी काही बोलायचंय.”
“बोलावं तर लागणारच आहे.”
“तसं नाही. ही बंदूक ठेवून, दोन माणसांसारखं.” त्यांचा आवाज जेन्युईन वाटला मला आणि डोळ्यांतले भावही. वकिली करताना एवढं नक्कीच वाचायला शिकलो होतो. मी टेबलाच्या पलीकडे गेलो आणि डायरी समोर ठेवून त्यावर बंदूक ठेवली आणि त्यांच्याकडे पाहू लागलो. त्यांनी टेबलावरच्या जगमधून पाणी ग्लासात ओतून ग्लासभर प्यायलं, एक ग्लास भरून माझ्यासमोर ठेवलं आणि मग माझ्याकडे पाहून बोलू लागले, “मिस्टर मुळे, आर यू अ होमोफोबिक?”
“व्हॉट द फ… ह्या प्रश्नाचा इथे काय संबंध?”
“काम डाऊन मिस्टर मुळे, इथे संबंध आहे ह्या सगळ्याचा.”
“तो कसा काय?” मी रागानं विचारलं.
“तुमची बहिण समलैंगिक होती. शी वॉज अ लेस्बियन. होमोसेक्श्युअल.”
डॉक्टरांचा प्रत्येक शब्द तप्त शिशासारखा कानात शिरत होता. माझी नलू. होमोसेक्श्युअल.
“डॉक्टर, तुम्ही काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला?” मी ताडकन उठून उभा राहिलो.
“म्हणून मी म्हणालो की, आपण दोन माणसांसारखं बोलायला हवं.” डॉक्टर माझ्याकडे पाहत म्हणाले. मीथोडा विचार करून खाली बसलो. अन्‌ ग्लासातलं पाणी प्यायलं.
“हे सगळं तिच्या डायरीत आहे?”
“मी तिची डायरी वाचलेली नाहीये. तिनं ती फक्त माझ्याकडे सेफ ठेवण्यासाठी दिली होती.”
“म्हणजे तुम्हाला माहीत होतं की ती आत्महत्या करणार आहे?” माझा आवाज परत चढला.
“नाही. मला ती एवढंच म्हणाली की तिला ती डायरी घरात ठेवायची भीती वाटते, कारण कुणाच्या नजरेला ती पडली तर अवघड होईल.”
“मग तिनं जाळून टाकायला हवी होती.”
“नाही. एक दिवस, ती सांगेल तेव्हा, मी ही तुम्हाला द्यावी असं ती मला म्हणाली होती.”
“मला?” मी विचारात पडलो. ‘मी खरंच होमोफोबिक आहे. टेक्निकली. माझ्या मते होमोसेक्श्युऍलिटी ही विकृती आहे. आजार आहे एक प्रकारचा आणि अशा लोकांना, अशा संबंधांना समाजमान्यता देण्याच्या मी अगदी विरोधात आहे. मग ही डायरी मला…
कदाचित ती मरणार आहे हे तिला ठाऊकच होतं, म्हणून तिनं अशी थाप मारली असेल डॉक्टरांना.
“पण तुम्ही डायरी वाचलीच नाहीत, तर तुम्हाला कसं ठाऊक?”
“ती माझी पेशंट होती.
ओह राईट! माझं डोकंपण ना! म्हणूनच तर ती डॉक्टरांना ओळखत असणार. पण ह्या डॉक्टरांची पेशंट म्हणजे नलू इथे येत होती. अन्‌ मला न भेटताच जातही होती?
“मिस्टर मुळे. तुमच्या होमोफोबिक नेचरमुळे. तुमचे त्यावरचे लेख वाचून ती खूप घाबरली होती. तीतुम्हाला आदर्श मानायची आणि तुम्ही कधीच चुकणार नाही ही तिची श्रद्धा होती. त्यामुळे स्वतःची होमोसेक्श्युऍलिटी कळल्यावर तिला वाटलं की, ही विकृती आहे. हा मानसिक आजार आहे. त्यामुळे तिनं स्वतःच्या गावापासून दूर इथे यायचं ठरवलं. अन्‌ कधी काही गडबड झाली, तर तुम्ही ह्याच शहरात आहात ह्या आधारानं ती इथे आली आणि मला भेटली.”
मी सुन्न झालो होतो.
“मी तिला नीट समजावलं की ही विकृती नाही, हा आजार नाही. हे नैसर्गिक आहे. भिन्नलैंगिकतेइतकंचनैसर्गिक.”
“काहीच्या काही काय बोलता डॉक्टर. तुम्ही तिची अजून दिशाभूल केलीत? तिला प्रोत्साहन दिलंत?” माझापारा पुन्हा चढू लागला होता.
“मिस्टर मुळे. आय नो इट इज डिफिकल्ट टू ऍक्सेप्ट. बट दीज आर फॅक्ट्स. समलैंगिकता ही नैसर्गिक आहे. आणि फक्त माणसांतच नाही, तर प्राण्यांच्या इतर जातींमध्येही समलैंगिकता आढळते. देअर इज नथिंग वन कॅन डू अबाऊट इट.”
माझं डोकं गरगरायला लागलं होतं.
“डॉक्टर, जर समलैंगिकता ही विकृती नसेल, तर काही लोक, जे मी बरे झालेले पाहिलेत, ते कसं?”
“काही जण उभयलैंगिक असतात. ते लोक समाजमान्य संबंध ठेवून स्वतःची दुसरी बाजू झाकून टाकतात.पण दुर्दैवानं काही जीवांना तो पर्यायही नसतो. नलिनी वॉज वन ऑफ देम.”
“पण डॉक्टर मी स्वतः…” अन्‌ मी एकदम थांबलो.
“तुम्ही? काय तुम्ही?” डॉक्टरांनी आश्वासक स्वरात विचारलं.
“मी नुकताच कॉलेजात गेलो असताना, माझ्या एका मित्रासोबत मी एकदा…”
“काय?”
“आम्ही एकमेकांच्या शरीराला स्पर्श केला होता.”
“मग?”
“मग काय? मला ते फारच विचित्र वाटलं. त्यानं एक-दोनदा पुन्हा प्रयत्नही केला होता. मी पुन्हा तसं होऊ दिलं नाही. त्याच्याबद्दल मला विचित्र आकर्षण वाटायचं, पण पुढे पुढे मला जाणवलं की मला कुठल्याच पुरुषाबद्दल तसं आकर्षण जाणवत नाही. मी बरा झालो.”
“तुमच्या मित्राबद्दल जास्त सांगाल का?”
“तो थोडासा फेमिनिन होता. त्याच्या आईसारखे बरेच हावभाव होते त्याचे. मला त्या विचित्र वयात त्याच्या आईबद्दल खूप आकर्षण वाटायचं.”
“हं.” डॉक्टर विचार करत म्हणाले, “आणि त्यानंतर तुम्हाला कधीच कुठल्याही पुरूषाबद्दल आकर्षण वाटलं नाही?”
“कधीच नाही.”
“हे असे अनुभव बरीच मुलं पौगंडावस्थेत घेतात. स्वतःच्या शरीराबद्दल आणि हार्मोन्समधल्या घडणार्‍या बदलांमुळे लैंगिकतेबद्दल उत्सुकता निर्माण होते. उद्दीपित होणार्‍या लैंगिक भावनांचं नक्की काय करायचं हे कळत नाही. मग योग्य लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे मुलं असले प्रयोग करतात. तुमच्यात्याच्याबद्दलच्या आकर्षणाला बरेच कंगोरे होते. तुम्हाला त्याच्या आईबद्दल वाटणारं आकर्षण हाही एक फॅक्टर असावा. त्यामुळे तुम्ही कधीच सम किंवा उभय लैंगिक नव्हतात. तुम्हाला फक्त तसं वाटलं होतं त्यावेळी. त्यामुळे तुम्ही ‘बरे’ होण्याचा काही प्रश्नच नव्हता.”
मी विचारात पडलो होतो.
डॉक्टर पुढे बोलू लागले. “समलैंगिकतेचे अजून कुठले अनुभव आले का तुम्हाला? लहानपणी वगैरे?”
“लहान असताना ट्रेनमध्ये, बसमध्ये कधी कधी काही विकृत माणसं नको तिथे हात लावायची, त्याचीकिळस यायची. मोठा झाल्यावरही एक ओळखीचा विवाहित मनुष्य उगाच कारण नसताना माझा हात हातात घ्यायचा आणि खूपच विचित्र वाटायचं, घृणा यायची त्याची. मी त्याच्याशी बोलणं सोडून दिलं नंतर.”
“हं. समलैंगिकतेशी ओळख कशी झाली तुमची?”
मी थोडा विचार केला. “लहान असताना मी एका मासिकात एक विचित्र कथा वाचली होती. एक शाळेतला मुलगा. ड्रग्जच्या विळख्यात अडकल्यानं शाळेच्या प्यूनकडून त्याचं शोषण होत असतं. त्यालाही त्या शरीरसंबंधांमध्ये त्रास होत नसतो. पण ह्या सगळ्यामुळे त्याचं बालपण कसं नासतं ह्याची ती कथा होती.त्या पात्राचं नाव मी कधीच विसरू शकत नाही – अनिमिष.”
“अजून काही वाचलं होतं का?”
“हो, अजून एक कथा होती. ज्यामध्ये एका मुलावर पौगंडावस्थेत बलात्कार होतो, पण त्याला त्यातून आनंद मिळाल्यासारखं वाटतं. मग तो मोठा होतो, तसतसं त्याला आपण समलैंगिक असल्याची जाणीव होते आणि त्याची शोकांतिका होती.”
“हं. काही सायंटिफिक वाचलंय?”
“नाही. एकदोनदा प्रयत्न केलेला, पण मला ते भंकस वाटतं.”
“हं. एकंदरीत तुमचा संबंध, कथेतून किंवा प्रत्यक्ष, आजपर्यंत केवळ विकृत लोकांशीच आलाय. आणित्यात तुम्ही घेतलेला मित्रासोबतचा अनुभव, ह्यामुळे तुमच्या मनात पूर्वग्रह आहे. केवळ सेक्श्युअल ओरिएंटेशन वेगळं असलेली नॉर्मल, विकृत नसलेली, माणसंही आहेत जगात. किंबहुना तीच जास्त आहेत.पण जगानं मान्यता न दिल्यानं ती लपून राहतात. आतल्याआत कुढत राहतात. नलिनी त्यांपैकीच होती.कुणालाच काही सांगण्याची तिची हिंमत नव्हती.”
मी रात्री उशिरा घरी पोचलो आणि कुणाशीच काही न बोलता थेट नलूच्या खोलीत गेलो आणि दार लावून घेतलं. फोनवर त्या दिवशीही मनीषाचे चार मिस्ड कॉल्स होते. मी फोन स्विच ऑफ केला आणि नलूची डायरी उघडली.
सकाळपासून माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. नलूची डायरी वाचून ठेवली आणि मला झोपच येईना.तिला कधीच मुलांबद्दल न वाटलेलं शारीरिक आकर्षण, त्यामुळे जाणवत असलेलं वैचित्र्य. कुणालाच न सांगू शकल्यानं येत चाललेला एकाकीपणा. मग मुलींबद्दल वाटू लागलेलं आकर्षण. अन्‌ ह्या डायरीत वारंवार माझा उल्लेख होता. ‘हे दादाला कसं सांगू?’ म्हणून. मग मला आठवू लागलं की एकदोनदा मी आलेलो असताना तिनं माझ्यासोबत समलैंगिकतेचा विषय हळूच काढला होता. पण मी ‘हे फडतूस अन्‌ विकृत विषय सोड गं पिल्लू. चांगलं बोलू की काहीतरी.’ असं म्हणून विषय बदलल्याचं मला आठवलं. तिचीतडफड वाचताना अश्रूंची नुसती धार लागली होती. गेलं वर्ष तर तिच्या प्रत्येक शब्दांत वेदना होती.आई-बाबा, दादा ह्यांना काय वाटेल, त्यांची समाजात किती बदनामी होईल. हेच फक्त. माझ्या नलूनं आमच्यामुळे आत्महत्या केली? मला इतका त्रास होत होता की, त्या दिवशी पहिल्यांदा मी सकाळी दाढी न करताच घराबाहेर पडलो. पोलीस स्टेशनात जाऊन मी तपास अधिकार्‍यांना भेटलो.
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *