तुकडे 1.2.3.


1.
हरवले सगळे जण
धुरळ्यात हरवले.
तू बघ तू.
अगं तू हो तूच.
दिसत नाहीस मला
डोळ्यांवर धुळीचे कण बसताहेत
बहुतेक जाड आवरण होईल.
काय म्हणतेस
ऑनलाइन येऊ...
चालेल. येतो.
चॅटिंग करू आपण, कमेंटा टाकू एकमेकांवर.
मारू गप्पा अदृश्यातून अदृश्यात.
इथे मुखवटे लावलेले कळत नाहीत.
पण हा धुरळा कोणी उडवलाय की
आपोआपच उडलाय याचा विचार कधी करू या आपण.
का विचार करण्यासारखी ही गोष्टच नाहीये.
का एकूणच विचार करणे चांगले नाही
अशा धुरळ्याच्या दिवसात.
का असा धुरळा नेहमीच उठत असतो ठराविक कालावधीने.
2.
आठवणी डम्प करून
सुटका करून घ्यायला हवी.
शांतपणे पाहता येईल आतले चित्र.
अनुभवांची थरथरणारी जेली
घेता येईल हातावर.
आठवणी अनुभव यातला फरक तो कायः
भरपूर मळमळ सहन केल्यावर
आठवणींमधले अनुभव दिसतात.
3.
अनुभव पाहत रहा.
त्यांना बाहेर काढण्याची घाई नको.
बाहेर आणल्यावरच
होत नाही अनुभवांचे सार्थक.
सांगण्यापेक्षा सांगता येणारे बरेच असते
तेव्हा शब्दांचे गर्भाशय पुरत नाही.
आणि
अनिश्चित कालावधीने बाहेर आलेच बाळ
तरी ते वाटते निरर्थक.
- प्रणव सखदेव
Post a Comment