लिभिंग म्यान्स ह्याबिट


प्रत्येक भाषा म्हणजे एक नवीन देश किंवा प्रांत. तिथले लोक वेगळे, नियम वेगळे, रहाणी वेगळी. सुरुवातीला जुळवून घेणे खूप कठीण जाते, सारख्या चुका, सारखे गोंधळ. पण नेटाने प्रयत्न करत राहिलात तर आधी परक्या वाटणाया लोकांशी नंतर मैत्री होते. अर्थात यातही एक गंमत आहे. बर्‍याच भाषा एकमेकांच्या मैत्रिणी असतात. मैत्रिणी जशा एकमेकींच्या साड्या किंवा मेकअपच्या ११, ००० वस्तू उसन्या घेतात, तसेच या भाषा एकमेकींकडून शब्द उसने घेतात. तसे असेल तर आपले तिथले वास्तव्य जरा सुखाचे होते. एखादा ओळखीचा शब्द भेटला की जिवाभावाचा मित्र भेटल्यासारखे वाटते. "काय राव, तुम्ही इकडे कुठे?" असे त्याला विचारले की गडी खुलतो. मग त्याच्या मदतीने इतरांशी ओळखी होतात, आपले नेटवर्क वाढत जाते.

भारतातील उत्तरेकडच्या भाषांमध्ये मला बंगाली आणि पंजाबी विशेष आवडतात. बंगाली ऐकताना एखादे लहान मूल बोबडे बोलल्यासारखे वाटते. बंगालीमधून काहीही सांगितले तरी गोडच वाटेल. किंबहुना सर्वांनी जर बंगालीतून शिव्या द्यायच्या ठरवल्या तर भांडणेही कमी होतील कदाचित. "कितने शीरीं है तेरे लब केरकीब, गालियां खां के बेमजा न हुआ" असे जे गालिब म्हणतो ते थोडा अर्थ बदलून या भाषेच्या बाबतीत लागू पडायला हरकत नसावी. आता हेच बघा ना, "उन्हाळ्यात घामाबरोबर जंतूही येतात" हे रूक्ष, शासकीय इस्पितळातील फलकावर शोभणारे वाक्य. पण बंगालीमध्ये "गॉरमकॉले, घॉमे शाथे शाथे, जीवाणू आछे" असे म्हटले तर किती गोड वाटते. मनावर कितीही संयम ठेवला, तरी गोडगोड बंगाली शब्दांची मोहिनी पडतेच. बरेचदा संस्कृत शब्द मराठीत उपरे वाटतात, पण बंगालीत मात्र साखरेच्या पाकात दोन-तीन महिने मुरवल्याप्रमाणे गोड लागतात. हिवाळ्याला शीत, उन्हाळ्याला ग्रिशो, पावसाळ्याला बर्षा. चित्रपटाला छॉबी, पैशांना टाका, पावसाला ब्रिष्टी. आणि आमार बाडी म्हटले की थेट पाथेर पांचालीतील अप्पूचे घर डोळ्यापुढे येते.

पंजाबीची गोष्टच वेगळी. दिलखुलास, बेधडक काम आहे ते. आत एक बाहेर एक असला प्रकार नाही. परवा बरेच दिवसांनी दलेर मेहंदीचे बल्ले बल्ले ऐकले तेव्हा हे परत जाणवले. मराठीप्रमाणेच ण वापरल्यामुळे जास्तच जवळीक वाटते. विशेषत: हिंदीतील रोना, खाना असे शब्द रोणा, खाणा अशा किंचित वेगळ्या रूपात येतात तेव्हा मस्त वाटते. "की हाल है सुखिया?", "चंगा जी" असे संवाद ऐकले की शेताच्या कडेला ट्र्याक्टरला टेकून लस्सी पिणारा सुखविंदर आठवतो. पंजाबीशी ओळख झाल्यावर बाबा बुल्ले शाह यांच्या सूफी रचनाही अधिक चांगल्या कळतील अशी आशा आहे.

वो यार है जो खुशबू की तरह
जिसकी जुबां उर्दू की तरह
मेरी शाम रात मेरी कायनात
वो यार मेरा सैंया सैंया

भारतातीलच काय पण जगात जेवढ्या भाषा आहेत त्यात उर्दूची नजाकत आणि तहजीब एकाही भाषेत नसावी. युरोपियन भाषांमध्ये कोरडे औपचारिक बोलता येते पण उर्दूमध्ये हाच औपचारिकपणा आत्मीयतेबरोबर असा बेमालूम मिसळला आहे की क्या कहने! "इस इज्जत-अफजाई के लिए तहे-दिल से शुक्रिया" असे मैफलीच्या सुरूवातीला गुलाम अली त्याच्या मखमली आवाजात म्हणतो तेव्हा एखाद्या तलम रेशमी वस्त्राचा स्पर्श झाल्यासारखे वाटते. तसेच उर्दूमधील -ए- मध्ये घालून दोन शब्द जोडण्याचा प्रकार तर खासच. शहरयारच्या "तनहाई की ये कौनसी मंझिल है रफिको, ता हद्द-ए-नजर एक बयाबान सा क्यूं है" मधील "ता हद्द-ए-नजर" ला दाद द्यावीशी वाटते.

हिंदी खरे तर उर्दूची बहीणच. पण हिंदीच्या बाबतीत कधीकधी अतिपरिचयात‌ अवज्ञा झाल्यासारखे वाटते. मग एखादे वेळेस ‍ -

पर शेख, भुलावा दो उनको जो भोले है
तुमने कुछ ऐसा गोलमाल कर रख्खा था
खुद अपने घर में नही खुदा का राज मिला
मैने काबे का हज कर के भी देख लिया

सारख्या धगधगत्या ओळी, त्याही अमिताभच्या आवाजात, कानावर पडतात आणि हिंदीची खरी ओळख पटते. त्यानंतर अन्जान, समीर आणि कंपनी यांची पाट्याटाकू गीते ऐकली की भवानी तलवारीने मेथीची जुडी चिरायला घेतल्यासारखे वाटते. अर्थात याला इलाज नाही. काळानुसार बदलणारी भाषाच तग धरू शकते. आणि बंबैया हिंदीची वेगळीच मजा आहे. उदा. जावेद जाफरीचे आय ऍम मुमभाय.

इटालियन पहिल्यांदा ऐकले तेव्हा "वा! किती नादमधुर" असे वाटले आणि ते खरेच आहे. के बेल्ला सेराता (किती सुंदर संध्याकाळ) यासारख्या साध्या वाक्यातही शब्दांचे स्वर बराच काळ लांबवता येतात. किंबहुना याच कारणासाठी ऑपेराचा जन्म इटलीमध्ये झाला. बंगालीप्रमाणेच यांना अतिशयोक्तीची फार सवय. नुसती बेल्ला (सुंदर) नाही तर बेल्लीस्सीमा (अतिसुंदर), मग भले ती समोरच्या वाण्याची शकू असो. एखादा रॉबेर्तो दिवसाच्या शेवटी सोनो स्तांको (मी थकलो) असे म्हणण्यापेक्षा सोनो स्तांकीस्सीमो (मी लै लै थकलो) असे म्हणण्याची शक्यता अधिक. गंमत म्हणजे इटालियन शिकताना तिथे स्थायिक झालेले काही जातभाईही भेटले. कधी, कसे तिकडे गेले का तिकडून इकडे आले, कुणास ठाउक. "तू" त्यांच्याकडेही तसाच बिनधास्त वागतो. किंवा कामेरा (कमरा), जोव्हानी (जवानी) हे आपलेच लोक. इटालियनचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या शिव्या अत्यंत डिटेलवार असतात. त्यापुढे आपले माता-भगिनी स्मरण म्हणजे ब्ल्याक लेबलनंतर ताक पिल्यासारखे वाटते.

इटालियन आणि फ्रेंच म्हणजे जवळपास हिंदी आणि मराठी सारखे नाते आहे. बरेच शब्द समान पण व्याकरण वेगळे. फ्रेंच भाषाही कानाला गोड लागते पण हा गोडपणा बंगालीपेक्षा वेगळा आहे. अमेलीमध्ये अमेली आणि जोर्जेत जेव्हा ओठांचा चंबू करत "केस्के व्हू व्हॉये ला, जोर्जेत?" "बॅनू, बॅनू, यपा झ्व्हपा" ("तुला काय दिसते आहे, जोर्जेत?", "नाही, काहीच तर नाही") सारखी वाक्ये बोलतात तेव्हा फ्रेंच भाषेची खरी लज्जत कळते.

मला नेहेमी अनुवाद वाचताना चुकल्या-चुकल्यासारखे वाटते. गद्य असेल तर अडचण नाही, मुराकामी इंग्रजीमधूनच तर वाचला. पण अनुवाद एखाद्या कवितेचा असेल तर मात्र बात कुछ जमी नही असे वाटायला लागते. प्रत्येक भाषेतील काव्यप्रकारांना त्या-त्या भाषेच्या शब्दांची, संस्कृतीची साथ असते. "कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर" किंवा "गिरिया चाहे है खराबी मेरे काशाने की" यांचा अनुवाद कुठल्याही भाषेत करता येईल का?

इंग्रजी लावणी किंवा मराठी ऑपेरा यांचे कसे जमायचे? मर्द मराठीचा रांगडा बाज आणि गझलेची खानदानी नजाकत याचा मेळ बसणे कठीण. आणि बसवायचा झाला तर त्याला असामान्य प्रतिभा हवी, ते येरागबाळ्याचे काम नोहे. बाजरीच्या पिठाची चुलीवरची भाकरीच चांगली लागते, तिचा पिझ्झा केला तर कसे चालणार? इंग्रजी हायकू वाचायला छान वाटतात हे खरे. पण टोक्योतील क्याफेमध्ये हिरव्या चहाचे घुटके घेत, आपले मिचमिचे डोळे आणखी मिचमिचे करून मूळ जपानीत हायकू वाचताना, एखाद्या कोमियामाला जी अनुभूती येईल तिच्या एक शतांशतरी अनुवादात उतरत असेल का? आणि ती उतरली किंवा नाही हे ठरवायचे कुणी आणि कसे?

लगेच गुलजारच्या ’परिचय’मध्ये जितेंद्रला ऐकू येतो तसा सेकंड ट्रॅक सुरू होतो. "काही काय? मग काय आता जपानी शिकणार का? (त्यापेक्षा पोटापाण्याचं बघा काहीतरी!) असे असते तर लोकांनी अनुवाद केलेच नसते." प्वाइंटाचा मुद्दा आहे. पण प्रत्येक काव्यानुवाद वाचताना यात मूळ कवीचे कोणते आणि अनुवादकाचे कोणते, मूळ भाषेचे किती आणि जिच्यात अनुवाद झाला आहे त्या भाषेचे किती अशा नतद्रष्ट शंका मनात रुंजी घालायला लागतात, त्याला आम्ही तरी काय करणार?

हे अर्थातच वैयक्तिक मत आहे. शिरिष पै यांनी हायकू मराठीत आणले, विक्रम सेठने चिनी कविता इंग्रजीत अनुवादित केल्या. (त्यासाठी पठ्ठ्या एका वर्षात चिनी शिकला!) यांच्याबद्दल मी बोलणे म्हणजे मकरंद साळसकरने (सलग दोन वर्षे भोकरवाडी किंग्ज इलेव्हनचा क्याप्टन!) सचिनला स्ट्रेट ड्राइव्हवर "टिप्स" देण्यासारखे आहे. (सचिन, तुझा बॉटमहँड ना, मिडॉनला फेस करतोय, तो अजून स्ट्रेट यायला हवा, प्यारालल टू स्क्वेअर लेग, यू नो.)

तरीही अजूनपर्यंत गीतांजलीचा अनुवाद वाचलेला नाही आणि वाचणारही नाही. वाचलीच तर गुरुदेवांच्या तेजस्वी शब्दांमध्येच वाचेन, नाहीतर नाही असे ठरवले आहे. गोची अशी की त्यासाठी बंगाली लिपीही शिकावी लागेल पण ठीक आहे. (चढणेका हय तो कळसूबाई चढके दाखवो! पर्वती तो हमारे शेजारके सुखटणकर आजोबा भी आरामात चढते हय!)

हे थोडे "खाईन तर तुपाशी" होते आहे पण नाइलाज आहे.

लिभिंग म्यान्स ह्याबिट, डाइज विथ हिम.

--

उपसंहार/उशिरा सुचलेले शहाणपण
निमिष आणि गायत्री यांच्याशी बोलल्यानंतर लेखात एकच बाजू मांडली गेली आहे असे वाटले. काही उत्कृष्ट अनुवादांची उदाहरणेही आहेत ज्यांचा उल्लेख यायला हवा होता. राम पटवर्धन यांचे पाडस किंवा नासदीय सूक्ताचा पं. वसंत देव यांनी केलेला ’सृष्टी से पहले’ हा अनुवाद. इथे अर्थातच अनुवादकर्त्यांची प्रतिभा ठळकपणे दिसते.

- राज

(http://rbk137.blogspot.com/2010/05/blog-post_22.html)
1 comment