निर्माल्य


ढाळले पहा शब्दांचे सर्व फुलोरे
रंगागंधांनी सीमित आशय सारे!
रोकडे मौन वाहीन तुझ्या पायाशी
निर्माल्याच्या साठवू कशाला राशी?

०००

उन्हं अविश्वासाकडे कलायला लागली की बंद होतात तुझ्या मंदिराची दारं
आणि बाहेरच्या वाळवंटात नेमका त्या प्रकाशातच प्रवास शक्य असतो
यालाही हरकत नव्हती,
तेवढा तुझ्या अंगणातल्या पारिजातकाचा दरवळ इथवर पोचला नसता तर बरं झालं असतं..

०००

कालचे तिढे, कालच्याच या पळवाटा
चाकोरीतच भरकटणे अन बोभाटा
ही पिढ्यापिढ्यांची नशा खुज्या त्रिज्येची
रे कुणीतरी परिघाचा काढा काटा!!

०००

भरधाव सोडले अश्व, कापला वारा
धडकेत खुला अज्ञाताचा गाभारा
पोकळीत घुमली हुंकारांची स्तोत्रे
पोकळीच ईश्वर - त्यास अनंत धुमारे!

- स्वाती आंबोळे

http://paarijaat1.blogspot.com/2010_07_01_archive.html
1 comment