प्रतिनिधी


रेन ट्रीच्या झाडांवर लांबून पाहताना लुकलुकणार्‍या दिव्यांसारखी दिसणारी तुर्रेदार फुलं ऐटीत झाडांच्या टोकांवर पाणदिव्यांसारखी तरंगत असल्याचा भास होतो... शिरीषाच्या झाडाची एक कमाल वाटते मला, मंद रंगाच्या गुलाबी झुपक्यांनिशी त्याच्या वेंधाळ फांद्या वार्‍यानिशी हलतात, तेव्हा कुठे त्याची फुलं पटकन नजरेत येतात. एरवी आकर्षून घेणारा रंग, पाकळ्या, असा अलंकारिक जामानिमा नसला तरी शिरीषफुलांचं असणं निव्वळ आवडतं. साने गुरुजींच्या बालकथांपैकी एका पुस्तकात शिरीषाच्या फुलांचा एक छान संदर्भ होता. तेव्हापासून आजतागायत शिरीषाच्या फुलांचं आकर्षण तस्संच आहे.

त्याच्या सावलीतच बसलेल्या असतात त्या दोघी.

भुर्याय रंगाचा पिनोफर आणि त्यात त्याहून जरा फिक्कट शर्ट, तोही निळीच्या रंगाने निळकट झालेला. निळसर-मळकट अशीच झाक आहे त्या रंगात. त्यांच्या रंगात बेमालूम मिसळून गेलेली. भुरकट केसांच्या घट्ट वेण्यांना काळ्या रिबिनी आणि फुलपाखरी पेड. एक जराशी सावळी, दुसरी गव्हाळ. भेळेच्या पुडक्यात एकच ओलसर पुरी बुडवून खात - खिदळत त्यांची दुपार सटकते.

एकाच शाळेतल्या-आळीतल्या मैत्रिणी. दोघी शाळा सुटल्यानंतर ठरावीक घरातली दुपारची कामं आवरण्यासाठी निघतात. शिकण्याची हौस अशी फार नाही. पिना, रंगीत रिबिनी, क्लिप्स, टिकल्या, यांचा मात्र भारी शौक. दिवसभर डोक्यावर घेतलेलं फडकं - तेच दुपारी तोंडावर घेऊन गाडीच्या चाकाजवळ किंवा जवळच्या झाडाखालीच लवंडलेल्या गाडीवाल्याच्या गाडीवर त्यांचं असं आगळंवेगळं विंडो-शॉपिंग सुरू असतं. गाडीवाल्यालाही सवय झालेली असते… आताशा तो त्यांना हटकतही नाही.

त्यांच्या गप्पांतून त्यांची माय, कुठल्यातरी शेठाणीकडे काम करते... तिच्याकडच्या शेल्फमधल्या वस्तू… तिच्या डायनिंग टेबलवरची क्रीम्स... असे बरेच स्वप्नाळू तुकडे ऐकू येतात.
त्यात एखादी रस्त्यातून जाणारी, गोरीपान, जीन्स-टी शर्ट घातलेली अशी मॉडर्न मुलगी दिसली की, तिच्या जराही लव नसलेल्या त्वचेबद्दल, ड्रेसबद्दल त्यांच्या मनात एक टवटवीत कुतूहल जागं होतं. मोठ्या, पापणीदार डोळ्यांतून ते आपसूक बाहेर पडतं.
आपली मोठी बहीण आय-ब्रो करणं कुठून-कशी शिकली, एका बाईच्या पार्लरमध्ये काम करताना जुन्या म्हणून कचर्‍यात टाकून दिलेल्या रंगीत बाटल्यांमधलं क्रीम आणून ते कसं आठवडाभर पुरवून वापरलं हे सांगताना त्यांच्यापैकी एकीच्या कोरीव भुवया खाली-वर होतात.

त्यातली एक लग्नाळू वयाची. तिच्या आईने चार घरी कामं करताना तिचा विषय काढला, तर ही चेहर्‍यावर कावरेबावरे भाव घेऊन कोपर्‍यात उभी. मोठ्या बहिणीचा संसार, तिचा नवरा... न जाणो कितीक जखमांची आठव दाटून आली असेल… पण चेहर्‍यावर लग्न या शब्दासरशी कायम एक प्रश्नचिन्ह!

अबोध जाणिवांपलीकडे उत्तरं शोधणारे आपले आपणच. त्यांची उत्तरं कोणत्याही पुस्तकात सापडणार नाहीत किंवा शाळेत बाईही सांगणार नाहीत अशी मनातली निरगाठ पक्की करत जगणारी तीही एक.

त्या दोघी फक्त प्रतिकं. चालती-बोलती. त्यांच्यासारख्या बर्‍याच, किंवा त्यांच्याप्रमाणे बरेच.

त्या दोघी तसेच ’ते’ही. त्यांना काही शिरीषाचं झाड भावणारं नाही. पण सावलीसाठी आसुसलेलं शरीर आणि झाड ही सामाईक बाब.
निबर झालेल्या झाडाच्या खोडांसारखे, बोटाच्या पेरांतून मस्ती, रग असा परिस्थितीजन्य मेळ जमून आलेले पोरगेले तरुण. पोरसवदा वय म्हणावं, तर चांगली वस्तर्‍याने भादरलेली मिशी. एकाने केलं म्हणून दुसर्‍याने वडिलांच्या ब्लेडने आहे-नाही ते सगळंच सफाचट केलेलं. असं वर्गात गेलं की मुलींच्या बेंचवरुन खसखस ऐकू येते. आपल्या दिसण्याची दखल घेतली जाते असा समज करून वेड्या वयातलं पौरुष मिशीपासून कानापर्यंत पसरतं. तेच चारचौघात सर ओरडले की अपमान या नव्या जाणिवेमागून बाहेर पडू पाहतं. कानशिलं गरम झाली की कुणीतरी मागून कुजबुजतं, “ए सावत्याचे कान बघ. सशासारखे लाल! खि: खी:.” लाजेच्या उशीखाली तोंड लपवावं तर मुलगी समजून खिदळतील.

अशा अनेक संमिश्र भावनांच्या पालव्या फुटून झाड फोफावत जातं. नुसतंच…

पुस्तकांची हौस असो वा नसो, तरी बाईंविषयी त्यांना अतोनात प्रेम असतं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हमखास एखादा गुलाबाचा गुच्छ, स्वत: तयार केलेलं ग्रीटिंग, एकदा तर बाईंना द्यायला गुलाब मिळालं नाही म्हणून त्यानं हारवाल्याकडून निशिगंधाच्या फुलांचे दांडे घेऊन तेच बदामाच्या पानात गुंडाळून दिलेले. त्यांची भाषा वारली, आदिवासी पाड्यातली. पटकन कळली-नाही कळली तरी डोळे बोलके. पूर्ण गावभर शिव्या देत फिरलं तरी बाईंसमोर मोघम शिव्या द्यायच्या. शिव्या पूर्णपणे बंद करणं अवघड, कारण जिभेला वळणच तसं.
कधी पाण्याच्या टाकीत शिवांबू, कधी छपरावरची कौलं गायब. असे एक ना अनेक खेळ. कुणी इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअर करण्यात एक्स्पर्ट, कुणाचं गॅरेज, तर कुणाच्या बाबांची वडापावची गाडी.
एखाद्याला पेपर टाकताना लाज वाटते, कुणी मुद्दाम बाईंच्या घरी पेपर टाकतो असं अभिमानाने सांगतो. एखादा कार्यकर्ता असतो. पक्ष-अपक्ष आहे की नाही हेही ठाउक नसतं. एखादा नुसत्याच मारामार्‍या करायला मिळतात म्हणून जातो. गॅरेजमध्ये काम करतो सांगण्यापेक्षा चारचौघांत सांगण्यासारखी असते कार्यकर्त्याची पदवी.

माणूस वाढत कुठे जातो? तो फोफावत जातो... जन्माची मुळं मातीत आणि बाह्यांग आकाशाकडे. फोफावण्याची हौस फिटत नाही. पालवी नसलेल्या झाडाच्या फांद्यानाही.

त्यांच्या असण्यात स्त्री-पुरुष, मुलगा-मुलगी असं वेगळं प्रतिनिधित्व करण्याची गरज भासत नाही. ती-ती त्यांच्या-त्यांच्या आयुष्यातली पात्रं. प्रत्येकाची कथा आहे. कथेच्या मध्यभागी ते आहेत किंवा नाहीतही.
पण त्यांच्या कथांशी, आयुष्याशी माझ्यातल्या एका गुणसूत्राची नाळ जोडलेली असावी.
विचारांनी? भावनांनी?
...
असेल. आहे म्हणण्याइतकं ठाम फार काही नाही, म्हटल्यानं अधोरेखित केल्याचं चोरटं समाधान मिळेल असंही नाही.
तळ्याकाठी बसलेल्या विस्कटलेल्या केसांच्या बुढ्ढ्यासारखे माझेही विचार विस्कटत, पसरत जावेत. त्याला ’भीष्म’ कल्पनेसारखा अंत नसावा.
आपण इथे नसतो तर कुठे असतो असे संन्यासी विचार एक चांगला कॅन्व्हास उभा करतात. डोंगरावर, किंवा एखाद्या गावात भटकताना छपरा-कौलाच्या शाळेत शिकवताना असं कल्पनाशक्ती काहीबाही रंगवत जाते. पण असं फिरताना रापलेल्या केसांची, त्वचेची काळजी मी केली असती? (!)

होsss...
तेवढे कॉशस आहोत आपण आपल्याबाबतीत. पण औटघटकेच्या चिंतेवर सहज मात केली असती. काय टिपिकल मुलगीपणाचं लक्षण आहे... असं म्हणून!

गावच का... ओसाडच का... इथेही अडचणीत असणारे लोक आहेत, इथेही बर्‍याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. मग गावच डोळ्यासमोर उभं राहण्याचं कारण काय? विचार मनात आला... त्यासरशी खल करून झाला.
स्वत:चंच स्वत:ला हसू आलं. आपलेही विचार स्वप्नाळू आहेत त्या दोघींसारखेच.
झगडा सावलीसाठीच... फरक फक्त देण्या-घेण्यात आहे.

- सखी

(http://raajhans.blogspot.com/2009/10/blog-post.html)
Post a Comment