इट जस्ट कुड हॅव बीन हिज मास्टरपीस


आज खरं तर मी ब्लॉगविश्वातल्या वास्तव्यामुळे माझ्या भाषेवर पडलेल्या प्रभावावर आणि होणार्‍या दूरगामी परिणामांवर साधक-बाधक चर्चा करणार होतो. पण झालं असं की, अचानकच रस्त्यावर चालता चालता क्वेंटिन टॅरँटिनो दिसला. म्हणजे मी असा रस्त्यानं चाललो होतो. तेव्हा रस्त्यावरच्या एका कॅफेच्या समोरच मांडलेल्या एका टेबलाशेजारच्या खुर्चीत बसून तो कॉफी भुरकत होता. मी हर्षोल्हासाने ओरडलो, "आयला, टॅरँटिनो!"

त्याची नजर एकदम माझ्याकडे गेली, "गप्प तुझ्या...ओरडतो कसला, देईन एक थोतरीत ठेऊन." हो. हे चक्क टॅरँटिनो म्हणाला. विश्वास नाही बसत ना! माझा पण नाही बसला. पण मग त्यानं मला त्याच्यासमोर बसायची खूण केली आणि म्हणाला, "टेकवा बूड." मग खुर्चीत बसता बसता माझा विश्वासही बसला.

मी काही बोलायच्या आत तो म्हणाला, "हे बघ, इथे मला अजून कुणी ओळखलं नाही, तू कसं काय ओळखलंस? आणि हो आता ओळखलंयस ते ठीक, बोंबलून बभ्रा करू नकोस."

माझा बोलण्यासाठी उघडलेला आ तसाच वासलेला राहिला.

"अरे हो, तू संभ्रमात पडला असशील नाही का! अरे, मी शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवायचा विचार करतोय. त्याच्या रिसर्चसाठी मी मराठी शिकतोय!" तो डोळे मिचकावत म्हणाला. मी स्वतःला चिमटा काढणार, एव्हढ्यात त्याने अस्खलित इटालियनमध्ये आतल्या वेटरला ऑर्डर दिली, "उन कफ्फे!"

"अरे काही बोलशील की नाही? यू आर माय गेस्ट." त्याच्या शेवटच्या वाक्यात अमेरिकन ऍक्सेंट आली आणि माझा उठत असलेला विश्वास पुन्हा बसला.

"नाही, मी एकदम ऑस्ट्रक आहे, यू सी."

"तिच्यायला, आम्ही लोक जितकं इंग्लिश बोलत नसू, तितकं तुम्ही मराठीत घोळून वापरता की रे!" तो.

"तुम्ही, पुणे सातार्‍याकडच्या कुणाकडून शिकलेले दिसता मराठी!"

"हू नोज, बीसाईड्स व्हॉट्स डिफरन्स डज इट मेक, ऍज लाँग ऍज आय कॅन कम्युनिकेट. धत्, तू मधेच इंग्लिश शब्द वापरून माझं बेअरिंग घालवलंस."

मी एक दीर्घ श्वास घेतला. "पण तुम्ही.."

"एक मिनिट भावा, तू म्हण. ते तुम्ही वगैरे जाम जड होतं!"

"कोल्हापूर. हंड्रेड पर्सेंट!"

"च्यायला, तू अजून तिथेच अडकलायस काय? विचारतो मी उद्या माझ्या ट्यूटरला."

"बरं, मी काय म्हणतो, तू खरंच शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवणार आहेस?"

"मग काय झक मारायला मराठी शिकतोय मी?" तो थोडा खवळला.

"नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला." एव्हढ्यात माझी एस्प्रेसो आली. "म्हणजे, माझा विश्वास बसत नाहीय अजून, बाकी काही नाही."

"का? विश्वास न बसायला काय झालं? मी हिटलरसारख्या राक्षसावर सिनेमा बनवू शकतो, तर शिवाजी महाराजांसारख्या महान नेत्यावर नाही बनवू शकत?"

"पण 'इन्ग्लोरियस बास्टर्डस' हिटलरवर कुठे होता?"

"पण हासुद्धा शिवाजी महाराजांचा बॅकड्रॉप घेऊनच बनवणार आहे मी! मी कधीच बायोपिक बनवत नाही. त्या काळाच्या बॅकड्रॉपवर एक फिक्शनल स्टोरी बनवणार!"

"झकास!" मी कॉफीचा कप तोंडाला लावला.

"पण मला एक कळत नाही, मेक्सिकन स्टँडऑफचा कन्सेप्ट मी तलवारी घेऊन कसा एग्झिक्यूट करू!"

मी एका कडू घोटाबरोबर कॉफी संपवली. "मेक्सिकन स्टँडऑफ? शिवाजी महाराजांच्या काळात?"

"यप्प."

"बघ बाबा. एक आयडिया आहे तशी! आदिलशाह, निजामशाह आणि औरंगजेबाचे सरदार किंवा स्वतः तेच एकमेकांवर तलवारी रोखून उभे आहेत, असं काहीसं दाखवता येईल."

तो विचारात गढल्यागत वाटला. "पण एग्झिक्यूट कसा होईल?"

"ह्म्म. म्हणजे बघ, एकजण बाजूच्याचा डावा हात तोडेल, तो त्याच्या बाजूच्याचा, असं करत सगळ्यांचे एकएक हात तुटतील."

"मग, तलवारी तश्याच राहतील ना बे!"

"नागपूरकर आहे वाटतं!"

"तुझ्यायला, उद्या विचारून सांगतो म्हटलं ना तुला!"

"सॉरी! हां, तलवारी राहतील ते खरं, मग असं करू ना, डाव्या हाताऐवजी डायरेक्ट मुंडकंच उडवू देत एकामेकांचं!"

"गुड आयडिया! पण एक मिनिट, मुंडकं उडवल्यावर तो पुढच्याचं कसं उडवेल!"

"स्प्लिट सेकंड्स मध्ये रे! आणि तसेही आमच्यात बिनामुंडक्याचे सरदार लढतात ह्याचे पुरावे आहेत!"

"ओके! एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलास तू! बिना मेक्सिकन स्टँडऑफ, मला सिनेमा परिपूर्ण वाटतच नाही!"

"पण तू एग्झॅक्टली काय दाखवणार आहेस! म्हणजे, ’इन्ग्लोरियस’ बास्टर्डसमध्ये कशी पूर्ण फिक्शनल स्टोरी होती. त्याटाईप का?"

"नाही, म्हणजे एव्हढीपण विअर्डली फिक्शनल नसेल! इतिहास बदलणारी वगैरे तर बिलकुल नसेल."

"दॅट्स बेटर, आमच्या इथे इतिहास बदलणारं काहीच चालत नाही. तुझ्या स्टोरीत तसं काही असल्याची कुणाला भनक जरी लागली असती ना, सिनेमावर बॅन लागला असता. चार-दोन बसा जळल्या असत्या. आणि तुला मदत करणार्‍या इंडियन लोकांच्या घरावर दगडफेक झाली असती."

"कैच्याकै!"

"तू गुगल बझवरही येतोस का अधूनमधून?"

"तुला विषय फालतू भरकटवायची वाईट खोड आहे!"

"सॉरी अगेन! अरे, खरंच असं होतं आमच्यात. शिवाजी महाराज हे आमचं सर्वोच्च दैवत आहेत आणि त्याचा अपमान आम्ही सहन करून घेत नाही!"

"अरे पण अपमानास्पद काहीच दाखवणार नाही उगाच. आणि समजा मी काही ऑब्जेक्शनेबल दाखवलंच, तरी त्याची शिक्षा मला रिसर्चला मदत करणार्‍यांना का?"

"त्याला उत्तर नाही. कुणालातरी मारायचं ते असं. बाकी ते एका विशिष्ट उच्च म्हणवल्या जाणार्‍या जातीचे असतील, तर बेस्टच. मग तर चौकात फोडतील त्यांना. एनीवे, तू स्टोरी काय घेतोयस एग्झॅक्टली!"

"कसं आहे, एक मावळा आणि एक मुघल शिपाई दोघेजण जंगलात हरवलेत."

"म्हणजे चॅप्टर वन."

"येस. द लॉस्ट सेपॉय! ते दोघे वेगवेगळे हरवलेत. आणि मग ते मार्गक्रमण करतात, जंगली श्वापदांपासून वाचतात आणि थोड्या वेळाने एकमेकांसमोर येतात. मुघल सैनिक भाला टाकून दयेची भीक मागायला लागतो. मावळाही मोठ्या मनाने माफ करतो आणि दोघे रात्रीसाठी एकत्र आसरा शोधायला लागतात. एन्ड ऑफ चॅप्टर वन!"

"ब्रिलियंट."

"थँक्स. मग दुसरा चॅप्टर. द स्पाय! शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी एक हेर शोधून काढलाय, ज्यामुळे पुढे होणार्‍या मोठ्या घातपाताची खबर लागलीय! त्याला दरबारात राजांसमोर हजर केलं गेलंय! शिवाजी महाराज तिथे त्याच्याशी एकदम सहानूभूतीपूर्वक बोलतात. त्याची पार्श्वभूमी, कुठल्या परिस्थितीमुळे त्यानं हे केलं, हे सगळं त्यांच्या महान ग्रेस(कवी नव्हे)ने विचारतात आणि मोठ्या मनाने त्याला माफही करतात, तेही आता ते सांगतील ती माहिती शत्रूपर्यंत पोहोचवायच्या बोलीवर."

"ऑसम."

"चॅप्टर थ्री. मचाण. ते दोन हरवलेले सैनिक मचाणावर बसलेत. त्यांनी रात्रीसाठी मचाणाचा आश्रय घेतलाय. मावळ्याजवळ असलेली थोडीशी दारू आणि मुघल शिपायाजवळ असलेला हुक्का आपापसात शेअर करत ते दोघे चर्चा करताहेत."

"यार, हा तुझा फेव्हरेट टेवल सिक्वेन्स येतोय. तू नेहमी वापरतोस. ’रिझर्व्हॉयर डॉग’मध्ये स्टार्टिंगचा "टिप, वेटर आणि लाईक अ व्हर्जिन",”पल्प फिक्शन’मध्ये तर मुबलक होते आणि”इन्ग्लोरियस’मध्ये "बेसमेंट बार"चा सीन."

"तू साला माझे पिक्चर सही स्टडी करतो हां. तुझ्याशी ही चर्चा करून मी चुकलो नाहीये."

"थँक्स!" मी एकदम लाजलो.

"तर ते दोघे बोलत बसलेत. हळूहळू नशेचा अंमल चढायला लागलाय. त्यांची चर्चा लावणी, तमाशा इथपासून सुरू होऊन ती पार घोडेस्वारीचे फाईन पॉईंट्स इथवर येते. मग एकदम त्यांची गाडी, शिकारीवर पोहोचते. तेव्हा दोघे जण आपले एक एक पराक्रम सांगायला लागतात. इथे आपण त्या दोघांच्या स्टोरीजचं पिक्चरायजेशन त्यांच्या नजरेतून करायचं! मग अचानक खर्‍याखुर्‍या वाघाची डरकाळी ऐकू येते. आता मावळा म्हणतो आपण एक खेळ खेळूया!"

"क्लास ऍक्ट! इथेच चॅप्टर फिनिश?"

"नाही, मावळा म्हणतो, 'हे बघ आपण खाली उतरायचं आणि एक सरळ रेषेत चालायचं. ज्याला जास्त नशा झालाय, तो खालीच थांबणार आणि वाघाची शिकार करून दाखवणार!' मुघल सैनिक म्हणतो ठीक! ते दोघेजण खाली उतरतात आणि मावळा एक दगड आणून रेष ओढतो. ऍपॅरन्टली मावळा जास्त झिंगलेला दिसतोय. कारण रेष वाकडी येते. मुघल सैनिक थोडासा गालातच हसतो आणि म्हणतो,' हट, ही बघ सरळ रेष' आणि एक दोरी काढून जमिनीवर ठेवतो. मावळा म्हणतो 'ठीक!' चॅप्टर फिनिश!"

"आता?"

"चॅप्टर फोर. द रिटालियेशन! शिवाजी महाराज आपल्या सल्लागार मंडळाबरोबर बसून मसलत करताहेत. फितुरीबद्दल घ्यायची नवी भूमिका आणि फितुरीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सगळ्या सैनिकांपासून सगळ्याच रयतेच्या बर्‍या-वाईट परिस्थितीबद्दल एक साधक बाधक चर्चा होते. डिटेल्स आपण काही बखरी पाहून डायलॉग रायटरबरोबर वर्क आऊट करू. मग ते पुढे आत्ताच्या सिच्युएशनची चर्चा करतात. ह्या पकडल्या गेलेल्या फितुराकडून कशा प्रकारे शत्रूला चुकीची माहिती पुरवायची, जेणेकरून महाराज आहेत ह्या मिषाने त्यांनी एका मोर्च्यावर गाफील समजून हल्ला करावा आणि मग चहूबाजूंनी दडून बसलेल्या मावळ्यांनी त्यांच्या पूर्ण तुकडीला कसं नेस्तनाबूत करायचं ह्याची पूर्ण नकाशासकट चर्चा होते. प्लॅन बनतो. मग महाराज जुलुमाने धर्मांतरित झालेल्यांना पुन्हा धर्मात घेण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देतात आणि निघतात. त्यांच्या करारी चेहर्‍यावरच फेडिंग स्क्रीन! चॅप्टर फिनिश!"

"बेस्ट! हे मला ’पल्प फिक्शन’ आणि ’इन्ग्लोरिअस’मध्ये जसा एक सामाजिक टच वाटतो त्या स्टाईल दिसतंय, मस्तच! बाय द वे, ’इन्ग्लोरिअस’मधला किंग काँगचा पंच जबराट होता!"

"थँक्स. चॅप्टर फाईव्ह. द गेम. मावळा हळूहळू शांतपणे दोरीच्या कडेकडेने बरोब्बर सरळ रेषेत चालतो आणि विजयी मुद्रेने मुघल सैनिकाकडे पाहतो. तो चिंतेत पडतो. आता तो दोरीच्या दिशेने थोडासा भेलकांडत जायला लागतो एव्हढ्यात मागून आवाज येतो. "लाहौल विला कुवत, तूने शराब पी रख्खी है!"

दोघेही बिचकून कोण बोललं म्हणून पाहतात, तर दुसरा एक मुघल सैनिक विस्कटलेल्या कपड्यांनिशी उभा असतो.

"अरे सय्यद तू. तू भी खो गया था क्या?" मावळ्याचा हात आपसूकच कंबरेच्या खंजिराकडे जातो.

तो आधीचा सैनिक म्हणतो, "अरे कुछ नही डर मत, ये कुछ नहीं करेगा!"

"क्यूं नही? जरूर करूंगा. तू इस काफिर के साथ बैठके शराब पी रहा है, और मैं कुछ नहीं करूंगा?"

"अबे तू कौनसा पाक़ साफ़ है? तू भी तो उस कोठे पे जाता है, तो शराब में धुत होके गिरता है! दूसरे दिन सडक से उठाना पडता है तुझे!"

"तो उसमें क्या, उस कोठे पे तो सभी लोग जाते हैं!" आता हे कोण बोलिले बोला, म्हणून सगळ्यांनी वळून पाहिलं तर दोन कलाकारासारखे दिसणारे लोक उभे होते.

"आपकी तारीफ?" एक मुघल शिपाई विचारतो.

"मैं आदिलशाह के दरबार से हूं और ये जनाब निजामशाह के दरबार से, हम दोनो मुशायरे के लिये मुघल सल्तनत में आये थे! हमें धोखे से मारने की कोशिश की गयी और हम दोनो जान बचाके जंगल में आ गये।"

"तो हम से डर नहीं लगता?"

"नहीं, तुम दोनो तो इतने हत्यारबंद नही हो और वैसे भी, तुम भी फंसे हुए लगते हो।"

"तो क्या हुआ, सल्तनत के दुश्मन हमारे दुश्मन!"

"मेक्सिकन स्टँडऑफ!!!" मी अशक्य उत्साहात ओरडलो. आजूबाजूच्या टेबलवरचे, रस्त्याने चालणारे लोकही माझ्याकडे पाहू लागले. क्वेंटिनही ओशाळला. मग मीही ओशाळलो.

"सॉरी, पुढे?"

"मग काय, मावळा सिच्युएशन बघतो आणि चटकन झाडावर चढतो. मनात म्हणतो, 'नशीब, मी नशा चढल्याचं नुसतं नाटक करत होतो.' खाली हे पब्लिक एकमेकांची मुंडकी उडवतं. त्या शायर लोकांकडेही खंजीर असतात. थोड्या वेळाने वाघ येतो आणि शांतपणे जेवायला लागतो. वरती मावळा घोरत असतो."

"ऑसम! आता चॅप्टर सिक्स?"

"यप्प. अजून एक-एक कॉफी मागवतो थांब." मग तो "दुए कफ्फे!" म्हणाला आणि पुढे,

"चॅप्टर सिक्स. द फेल्ड ऍम्बुश! मुघल सरदार दिलावर खां च्या तंबूत चर्चा चाललीय. त्यांना त्यांच्या नवा हेर भिकाजी सुळे उर्फ बिलावल शाह कडून महाराजांच्या एका छुप्या मोहिमेची खबर लागलीय. ते डिस्कस करताहेत की महाराज असलेल्या ह्या छोट्याश्या मोर्चावर कसं फुल थ्रॉटल आक्रमण करून त्यांना नेस्तनाबूत करायचं."

"वॉर सिक्वेन्सेस येणार वाटतं शेवटी."

"येस्स, नेव्हर ट्राईड दॅट बिफोर, प्रत्येक सिनेमात नवं काहीतरी, यू सी. तेपण गोरिल्ला वॉरफेयर मजा येणार फुल. हां, तर पुढे, दिलावर आपल्या पब्लिकला सांगतो, "आणि इथेच तो 'पहाड का चुव्वा सिवाजी खत्म.'"

"एक मिनिट, एक मिनिट. हे चालायचं नाही. शिवाजी महाराजांना शिवी देऊ शकत नाही."

"अरे, पण शत्रू काय पोवाडे गाणार त्यांचे? त्यांच्या कारवायांमुळे मुघल किती फ्रस्ट्रेट झाले होते, ते रिफ्लेक्ट नको व्हायला? अरे, आम्ही तर सिनेमात निगर वगैरे शब्दपण वापरतो रेसिस्ट कॅरॅक्टर दाखवण्यासाठी. इट्स क्वाईट ऑब्व्हियस!"

"अरे राजा, तिथे ऑब्व्हियस असेल रे! आमच्यात नाही चालणार. संभाजी ब्रिगेड म्हणेल की महाराजांचा अपमान झालाय. थिएटर्सवर दगडफेक होईल. तुझा तो शिक्षक, त्याच्या घरावर हल्ला होईल. माझी जात तर मला सॉफ्ट टार्गेट बनवते."

"अरे पण शिवाजी महाराज जातीपातीच्या पलीकडे होते."

"होते. आता नाहीयेत. त्यांना एका जातीनं हायजॅक केलंय. बाकीच्या जाती फक्त त्यांचे अपमानच करतात. आणि परदेशी लोकांनी तर बोलायचंच नाही, बरं का? रिसर्च वगैरे करायचाच नाही. ज्या आम्हांला मान्य गोष्टी आहेत त्याच सत्य! जे सोयीचं तोच इतिहास!"

"राहिलं तर मग."

"अरे असं कसं, काढून टाक ना तो डायलॉग."

"असा कसा काढू. इट इस नेसेसरी. मी असा सिनेमा नाही बनवू शकत, स्क्रिप्ट कॉम्प्रोमाईज करून. तुला माहितीय, माझी प्रत्येक फ्रेम बोलते."

"अरे पण..." एव्हढ्यात माझा सेलफोन वाजायला लागला. मी खिशात शोधायला लागलो. मला मिळेना. आणि मला एकदम जाग आली. अलार्म वाजत होता. सकाळचे ६ वाजले होते. आकाशवाणीची शेवटची सभा संपली होती.

मी मनाशीच म्हटलं, "इट जस्ट कुड हॅव बीन हिज मास्टरपीस!"

- विद्याधर नीळकंठ भिसे

(http://thebabaprophet.blogspot.com/2010/07/blog-post_25.html)
2 comments