आम्ही गडकरी


"सकाळी साडे-चारला तयार राहावे," असा हाय-कमांडचा आदेश आल्यापासून जराशी उत्सुकता होतीच, पण सकाळी सॅम्या आणि राखुंड्या आपापल्या जांभया आवरीत मलाच विचारायला लागले – ’कुठे जायचे?’ करून, तेव्हा तर ती आणखीनच वाढली. असा प्लॅन कुणाला आधीच नाही सांगितला की आपले महत्व वाढते, असे वाटते का काय या माकडाला? असू देत बुवा…
पाचच मिनिटात पहाटेच्या शांततेला चरे पाडत आपली बायको दामटवत के.डी हजर झाला. कुठल्यातरी चांगल्या स्वप्नातून उठून यायला लागलं असलं पाहिजे त्याला, आपण काहीतरी गौप्यस्फ़ोट करणार आहोत हे देखील विसरला तो. गाडी माझ्याकडे देऊन स्वप्न कंटीन्यू करत तो पिलीयनवर खुशाल पेंगायला लागला, तेव्हा गाडी सुरिइ करत अजून सुषुम्नावस्थेत असलेल्या के.डी ला विचारले, "कुठे घ्यायची हे सांगणार आहेस की..."
"मळवलीला घे-लोहगडला जायचेय."
"जी हुजूर."
गाडी माझ्या हातात मिळाल्यावर तो नारायणपेठेला १८० चकरा मार म्हणाला असता तरी मी मारल्या असत्या.

के.डी ची बॉक्सर पळवणं हा माझ्या आवडीचा भाग आहे. सॅम्या आणि राखुंड्या पल्सारवर होते. ही गाडी मला कधी झेपली नाही. मला खालून वरपर्यंत मोजून काढलं तरी मी ५-३ च्या पुढे नाही जाणार. टांग मारून मी पल्सारवर बसले जरी, तरी पल्सारवर वाळत टाकल्यासारखी दिसते. चला... अशी लोंबकळत एखादवेळेस चालवलीच मी ती गाडी... पेलायला नको? मरू देत. मी त्या प्रकरणाच्या वाटेला जातच नाही. ’डेफिनेटली मेल' आहे? हो बाबा, असू देत…

तर - गावातून बाहेर पडून जरा निवांत रस्ता मिळाला की गाडी ८०पर्यंत दामटायची.एखाद्या रीबॉकच्या जोड्याला किंवा टॉमी हिफ्लिइजरच्या जॅकेटला मागे टाकायचे. मग ते पोरगं चेकाळून मला गाठणार आणि मी गाडी चालवतेय हे लक्षात आल्यावर "साल्या! एका पोरीने पळवले तुला!" हे त्याच्या पाठीवर लटकलेल्याचे उद्गार तर नेहमीचेच! आजही मला नेहमीपेक्षा बरेच कॅचेस मिळाल्यावर त्याच्या बायकोला आज मी नेहमीपेक्षा बराच वेळ पिदववतेय हे के.डी.च्या लक्षात आले आणि तो जरा ’जे’ व्हायला लागला. मग कामशेतच्या पुढे गाडी त्याच्याकडे दिली. तोपर्यंत किती वाजले होते ठाऊक नाही, पण माझ्या पोटात कपभर चहा आणि बिस्किटे वाजले होते. मागच्या वेळी भोरला खाल्लेली लालभडक तर्रीवाली मिसळ आठवली. आई गं! पहिल्याच घासात तिने मला चांगलाच इंगा दाखवला होता. मीपण ती हट्टाने संपवून तिचे आफ्टर- इफेक्ट्स म्हणून दोन्ही गालांवर पिंपल्स मिरवत हिंडले होते. रामनाथच्यपण तोंडात मारेल अशा जहाल मिसळीचे इफेक्ट्स कुठे भलतीकडेच दिसण्यापेक्षा असे दिसलेले कधीही बरे, नाही का?
तर - एवढ्या पहाटे कोणी कुत्रंसुद्धा रस्त्यावर नव्हतं - हॉटेल्स उघडी असण्याची शक्यताच सोडून द्यायची. मग एका साखरझोपेत असलेया टपरीवाल्याला बाबापुता करत उठवले आणि चहा करायला लावला. चार बिस्किटांच्या पुश्यांचा फन्ना केला तेव्हा कुठे माणसात आल्यासारखं वाटलं. आणि मग भरल्या पोटाने पिलीयनवर बसून आवडीचा उद्योग सुरू केला, अखंड बडबड!

आज ’आवाजतोड’ खेळायचे ठरले. चिठ्ठ्या टाकून एका गाडीने एक गाणे/पद्य आणि दुसर्या गाडीने दुसरे घ्यायचे आणि जोरजोरात सुरू व्हायचे. जी पार्टी त्या वाढत्या आवाजात आपले गाणे विसरून दुसर्या पार्टीचे गाणे म्हणायला लागेल ती हरली. (कानात बोटं घालायची परवानगी नाही). या वेळी आम्हांला आलेलं ’भीमरूपी’ आणि राखुंड्याला ’गणपतीस्तोत्र'! सॅम्याने ’न च विघ्नं भयं तस्य’ करता करता ’वाढता वाढता वाढे’शी कधी फुगडी घालायला सुरुवात केली हे त्याचे त्यालाच कळले नाही. माझ्यासारखा बुलंद आवाज असताना आमची सरशी होणार हे तर उघडच! (शिवमहिम्न आलं की मात्र माझी दांडी उडते). आम्ही गाडी थेट लोहगडाच्या पायथ्याशी न्यायची ठरवली आणि मनात ईश्वराचे स्मरण करत अशक्य कच्च्या रस्त्यावरून हाणली गाडी. सकाळो-सकाळीच के.डी. कशाने पिसाळला होता काय ठाऊक! माझ्या डोक्याएवढ्या मोठ्या मोठ्या दगडांवरून गाडी हाणत होता. गाडी वेगवेगळ्या कोनांमधून अंगात आल्यासारखी गंमत-गंमत करत चालली होती. माझी मागे बसून जाम तंतरली होती. मी जर मागच्या मागे बदाककन पडले असते तर निदान ३ आठवडे पाय वर करून पडावं लागलं असतं खास! घरून चपला पडल्या असत्या त्या वेगळ्याच.

आमचे मोठे आवाज. त्यात हसण्यात डायरेक्ट साताच्या वरचेच मजले! त्यामुळे आम्ही आलो की लोकं ’ते आले... ते आले… ते आले बरं का...!’ अशाच आविर्भावात आम्हांला बघतच राहतात. या वेळीही काही वेगळं नाहीच घडलं. तसं पाहायला गेलो तर आम्ही आहोतच चार नमुने!

ढुंगणावर ’ली’चा पॅच, पायात ऍडीडासचे जोडे आणि शर्टात ’वेस्ट्साईड’ शिवाय बात नाही असा थाट. "हर फ़िक्र को धुवे में" करत दु:ख- काळज्यांना श्शूss करण्यासाठी फकाफका सिगरेट्स ओढणारा तो राखुंड्या! के.डी. - बीयरचे आत्यंतिक प्रेम पोटाच्या वळणदार ’ट’ मधून झळकत असलेले. कमरेला वाघाचे कातडे गुंडाळले आणि हातात खाटकाची सुरी दिली तर ’पिशी मावशी आणि तिची भुतावळ ’ किंवा तत्सम नाटकामध्ये बच्चेकंपनीला घाबरवण्यासाठी कामी येणारा मनुष्य! सॅम्या त्यातल्या त्यात शहाणे कोकरू. त्याचा तो शर्टाच्या वरच्या बटणापाशी हनुवटी खोचून घडीघडी”अंतर्मुख टिंब टिंब’ का कायसे होण्याचा तापदायक प्रकार सोडला, तर शहाणुलं बाळ आहे ते. आणि शेवटी ’मी’! खांद्यावर शर्टचे आढे पडलेय - त्याची गुडघ्याखाली येणारी दोन टोकं पोटापाशी आवळून बांधली आहेत असा अवतार. त्यामुळे मी मौजे पारलई मुकाम पोस्ट वाडे-बुद्रुकवरून तडकाफडकी ट्रान्सफर होऊन नेसत्या वस्त्रांशिवाय लोहगडावर रिपोर्टींग करायला आलेय असे कोणाला वाटले तर त्यात त्याची काहीही चूक नाही.

गडावर अजून वर्दळ चालू व्हायची होती. आमच्याही आधी गडावर येऊन पोहोचलेला ’सह्यमित्र’चा एक निकॉन डी-८० पालथा पडून ’कलरफुल ग्रासहॉपर’चा फोटो घेत होता.(असं त्यानेच मला नंतर सांगितलं). ’रंगीत टोळ’ म्हणायला काही हरकत नव्हती. पण एका गालाला माती लागलेल्या अवतारात तो भलताच गोड दिसत होता. त्यामुळे छोड दिया.

आमच्यातला के.डी. लोहगडावर अनेक वेळा नाचून बागडून गेलेला. त्यामुळे त्याला गड पाठ. तो झोपेत चालत जरी गेला असता तरी अलगड विंचूकाटा माचीवर जाऊन पोहोचला असता. मग काय, जिवंत झरेच बघ, आवाज कसा घुमतोय हे बघायला घसा ताणूनच काय ओरड… क्यॅयच्या क्यॅय चालले होते. १२ वाजेपर्यंत आम्ही काहीही न खाता-पिता इकडेच चढ, त्याच बोळकांडयातून घूस असे प्रकार करत होतो. डोक्यावर सूर्य आग ओकायला लागला होता, पिण्याचे पाणी संपले होते आणि त्यात हा मंबाजी आम्हाला वाट्टेल तसा पिदवत होता. आम्ही त्याच्या मागे पाय ओढत चाललो होतो. के.डीवर काय वर्षानुवर्षे किटण चढलेले. त्यामुळे त्याला कवचकुंडले मिळाल्यासारखीच. पण आम्ही मात्र करपत होतो. माझ्या पोटात खाडखूड सुरू झाली होती. विंचुकाट्यावर जाऊन खायचं हा के.डी.चा आग्रह होता( तिकडे काय पंगत बसणार होती? सातयेडं नायतर…) पण भूक लागल्यावर मी दोन पावलं जरी चालले तरी हवा गेल्यासारखी पिळपिळीत होते हे या बाबाजीला कुठे सांगणार? त्यामुळे त्याच्या बॅगेतल्या बिस्किटाच्या पुड्यासाठी मी ’बाजा लव्ह (लव्ह्सपण नाही) उर्मी’ असं चितारलेल्या कातळाखाली बैठा सत्याग्रह सुरू केला. आणि मारी टोपी…

मी तिथे अशी फतकल मारून बसलेली असताना नेमका कोण येऊन टपकावा? झुल्फ़ी? दिवाळीच्या आधी नारायण पेठेत हा छानदार मिशी आणि खांद्यापर्यंत केस असलेला पल्सार-डी.टी.एस.वाला दिसलेला. हा परत नारायण पेठेत दिसेल म्हणून बंदुक्षणी चहावाल्यांच्या लोखंडी बेंचला पोक आणलेलं मी. अशा मुलाने मला असा मांडा ठोकून भूक भूक करताना पाहावं? या तिघा नालायकांचं हसणं उकळत होतं. तेपण महा इब्लिस कार्टं! मला त्या कातळाखाली अस खुडूक करून बसलेलं पाहून तो फटाका फुटावा तसा हसला आणि आपल्या ग्रुपबरोबर निघून गेला. तेच मिशीत हसणे. मला ’प्रिय’ची सडकून आठवण आली. त्याला हे मी जेव्हा सांगेन तेव्हा तो याहून किलर स्माईल देऊन माझा खुर्दा करणार नक्की. उंची, मिशी आणि बुलेट ही माझी ३ ऑब्सेशन्स. आणि हीच माझा एक दिवस घात करतील ही शरीची शापवाणी आमच्या अख्ख्या मित्रमंडळात फेमस आहे. पण तिच्याकडे कोण लक्ष देतेय? ती चिचुंद्री आहे.

अशा रितीने मी माझी पोटपूजा उरकून घेतल्यावर आली ती सुप्रसिद्ध विंचुकाटा माची आणि तिच्या सुरुवातीलाच असणारा तो फेफरे आणणारा रॉक-पॅच. हे तिघं खारीसारखे सुर्रकन उतरून माझी मजा बघायला पायथ्याशी उभे राहिले. आमची सुरुवात तर चांगलीच झाली. पण मध्यावर आल्यावर हरे रामा हरे कृष्णा! बोटं ठेवता येतील एवढ्या जागेत एक पाय रोवून दुसरा ठेवू तर कुठे, या विवंचनेत मी मधल्या मध्ये लोंबकळत पडले होते आणि हे खाली पाद्रीबाबाच्या मख्खपणे उभे. मी तोल जाऊन पडले असते तर मला उठवायचे कष्टही न घेता ही लोकं ’टुझी माला डया येटे. आमेन," असं म्हणून सर्व मिळून सहा पायांवर चालते होतील असं वाटायला लागलं. शेवटी एकदाचं माझं सुखरूप लँडिंग झालं आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. एक रेबॅनपण "स्स..हा!" म्हणून सुस्कारल्याचं बघितलं मी! रॉकपॅच उतरत असले म्हणून काय झालं? आमचं लक्ष असतं म्हटलं! माझ्यामागून रॉकपॅच उतरताना मुलींचे ’ मॅडी, मला भिती वाटते’, ’राज, मी पडणारेय ...आऊछ!’ असे चीत्कार उठत होते. काही विचारू नका. मी मुलीसारखी ट्रीटमेंट ना कधी मागितली, ना या लोकांनी मला कधी दिली. फार फार तर त्यांच्यासारख्या अनुभवी ट्रेकर्समध्ये लिंबू-टिंबू म्हणून थोडा पेशन्स ठेवतात झाले!

विंचुकाटा माचीवर आल्यावर सॅम्याला जोर चढला. फोटो-बिटो ही सॅम्याची खास कुरणं. इकडेच वळ, तिकडेच बघ, अशीच वाक असं करून आम्हाला यथेच्छ त्रास देऊन झाला. दिवाळीत बाटलीतून चुकून सुटलेल्या रॉकेटसारखा सॅम्या त्या पूर्ण माचीभर सैरावैरा पळत होता, ते त्याच्याकडे उगीच पापण्यांची पिटपिट करत बघत असलेल्या पिवळ्या स्कार्फसाठी हे न समजायला आम्ही काय अगदीच ’हे’ नव्हतो. फोटो-बिटो काढून झाले आणि आम्ही एक २-रूम किचन गुहा गाठली. पथारी पसरली. तिकडे दर्ग्यावर पोरांनी ’आहुम आहुम’ वर धिंगाणा चालवलेला असताना आम्ही मात्र तिथल्या गुहेत बसून झाकीर ऐकत होतो. पळापळीचे सार्थक म्हणतात ते हेच असावे कदाचित!

मी तर आहेच विचित्र, पण माझे मित्रपण माझ्यासारखेच. जगाच्या भाषेत त्यांना ’विअर्डोज’ म्हणतात आणि माझ्या भाषेत ’टोळभैरव!’ (पुन्हा टोळ? आह! निकॉन डी८०!)! प्रत्येक जण हसून साजरं करत असला तरी प्रत्येकाला काही ना काही दु:ख आहेच आणि आमच्यापैकी प्रत्येकाला ते माहीत आहे.

राखुंड्याचं एफेम (फ्लुइड मेकॅनिक्स) सुटत नाहीये, के.डी.ला प्रेसवरचे मशीन त्रास देतेय प्लस त्याच्या लग्नाचं घाटतेय, सॅमीला केतकी उर्फ केटी खापिटलीने डिच केलेय. माझा एमपिइथ्री खराब झालाय, ’द हिंदू’चा रेट वाढलाय , माझा भारताचा नकाशा कितीही प्रयत्न केला तरी कडबोळीसारखाच येतो… माझ्या दु:खाची कारणे हजार! आणि प्रवास हा दु:खावर हमखास उतारा असतो. त्यामुळे सगळ्यांच्या दु:खाचा म.सा.वि. एका लिमिटपुढे गेला की एखाद्या रविवारी जमायचे आणि वाट फुटेल तिथे गाड्या सोडायच्या. लागेल तो गड पकडायचा आणि घ्यायचा चढायला हा उपक्रम!

माझे कालच ’भ.’शी जोरदार भांडण झालेय, ’प्रिय’ ’आऊट ऑफ टाऊन’ आणि ’आऊट ऑफ रेंज’ आहे, उद्या सॅमीच्या नव्या प्रेमभंगाचे सुतक पाळायला लागणारेय दिसतेय, राखुंड्याचा आत्ताच फोन आला. वाईट्ट्ट वैतागला होता तो. म्हणाला, "मने, लेट्स गो टू रायगड."
मला काय? चला.

- श्रद्धा भोवड

(http://shabd-pat.blogspot.com/2009/11/blog-post.html)
Post a Comment