Uncategorized

परिसंवाद

कसल्याही सेन्सॉरशिपशिवाय विनामूल्य प्रकाशनाची सोय.
चेहरा नसलेल्या वाचकांच्या धारोष्ण प्रतिक्रिया.
देशाच्या सीमा ओलांडून जगभरात सर्वदूर पोचण्याची ताकद.
मराठीतून लिहिणार्‍या-वाचणार्‍या लोकांना ब्लॉग या माध्यमाची ओळख होऊन सुमारे सहा वर्षं झाली, तरीही मराठी सारस्वताला या गोष्टींच्या नवलाईचं अप्रूप वाटणं कमी झालेलं नाही, आणि तरी (किंवा कदाचित त्यामुळेच) हे एक सर्वसामान्य साहित्यव्यवहाराचं माध्यम म्हणून त्याचा सहज स्वीकार – प्रसारही झालेला नाही. म्हटलं तर जुनं, आणि मराठीतल्या आंतरजालीय वावराचा विचार केला तर नवीन असं हे माध्यम. आपापसांतल्या संवादासाठी, मायमराठीतल्या टवाळक्यांसाठी, भाषेशी जोडून घेण्यासाठी, ठरावीक विषयांवर लिहिण्यासाठी, आणि मुख्यत्वे स्वभाषेतून आपली लिहिण्याची खुजली भागवण्यासाठी लोक त्याचा वापर करताहेत.
’आपण सगळे मराठीतून ब्लॉग लिहितो, म्हणून आपण स्वजातीय’ अशी भोंगळ ओळख नाकारण्याचा हाच टप्पा. मराठी भाषा आणि ललित लेखन अशी चौकट आखून घेऊन त्यातून नक्की काय साध्य होऊ शकतं आहे, याची चाचपणी करण्याचाही हाच टप्पा. आणि ब्लॉग म्हणजे निव्वळ दैनंदिनीवजा वैश्विक नोंदी असं नव्हे, ते एका विशिष्ट साध्यासाठीचं साधन असू शकतं, असं आम्ही मानतो, हे जाहीर करण्याचाही हाच टप्पा. ’आपण नक्की का लिहितो?’ सारख्या खोखोला मिळणार्‍या उदंड प्रतिसादातून मंडळी आपली आत्मपरीक्षणाची, विश्लेषणाची आणि भूमिका नक्की करण्याची निकड सिद्ध करत होतीच. या टप्प्यावर आमच्या सहब्लॉगर्सना या माध्यमाविषयी नक्की काय वाटतं आहे, हे जाणून घ्यावंसं आम्हांला वाटलं – म्हणून हा परिसंवादाचा प्रपंच मांडला.
त्यासाठी त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्यांच्या चौकटीच्या आधारे आपापले विचार मांडायची विनंती केली. मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळेच हा परिसंवाद यशस्वी होऊ शकला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. आम्हां संपादकांपैकी कुणी या मंथनात प्रत्यक्ष सहभागी झालेलं वाचकांना दिसणार नाही, पण आमच्यात जी काही घुसळण चालली होती त्याचंच हे फलित आहे. त्यातून काही निष्कर्षवजा संपादकीय सूत्र लिहिणं आम्ही जाणीवपूर्वक टाळलं आहे.
आमच्या ब्लॉगरमित्रांसह आम्ही मांडलेल्या या खेळानं वाचकांनाही विचार करायला प्रवृत्त केलं, तर हा परिसंवाद यशस्वी झाला असं खर्‍या अर्थानं म्हणता येईल.
परिसंवादाची प्रश्नावली

 

(चित्र जालावरून साभार)
१. आपल्या ब्लॉगवरच्या लिखाणाचं काय व्हावं असं तुम्हांला वाटतं?
२. लिहिणं थांबू नये म्हणून तुम्ही काही करता का? काय? का?
३. ब्लॉगपोस्ट्सना तत्काळ आणि थेट प्रतिक्रिया मिळतात. त्यांचा तुमच्या लिहिण्यावर काही परिणाम होतो का? असा परिणाम व्हावा की होऊ नये? कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया तुमच्या लिहिण्यासाठी थेट किंवा आडवळणानं उपकारक ठरतात?
४. आपल्या लिहिण्यातले संदर्भ (परभाषेतील साहित्य, चित्रपट, संगीत, इतर आंतरजालीय दुवे, प्रताधिकार इत्यादी) आणि प्रमाणलेखन अचूक असावं म्हणून तुम्ही काय करता?
५. मराठी ब्लॉग्स हे माध्यम गांभीर्यानं घेण्याइतपत वयात आलं आहे का?
६. त्यात घाट आणि विषय या दोन्ही बाबतीत पुरेसे प्रयोग होताहेत असं तुम्हांला वाटतं का?
७. इतर माध्यमांत सहजी होऊ शकत नाहीत असे काही प्रयोग या माध्यमातून करून पाहावेत, असं तुम्हांला वाटतं का?
८. ब्लॉग या माध्यमाची निवड करण्यामागची तुमचा हेतू काय होता? (उदा. आप्तांशी / स्वभाषेशी संपर्क, लिहिण्याची आणि प्रकाशित करण्याची निकड, स्वतःशी संवाद, इत्यादि)
९. हा हेतू मनाशी धरुन सुरु केलेला ब्लॉग आता कुठे जाऊन पोचला आहे, आहे तिथेच थबकला आहे का वगैरे परिक्षण स्वतःशी तुम्ही कधी करुन पाहिलं आहे कां?
१०. ब्लॉग आणि इतर आंतरजालीय माध्यमं (मुख्यत्वेकरून फोरम्स) यांत तुम्हांला काय फरक जाणवतो? या दोहोंत निवड करताना तुम्ही कोणत्या निकषांवर निवड करता? का? तसंच प्रस्थापित माध्यमांच्या तुलनेत (प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया) ब्लॉगचं काही वेगळेपण तुम्हांला जाणवतं का?
०००
मला लिहावंसं वाटतं, लेखन इतरांना दाखवावंसं वाटतं आणि ते दाखवण्यासाठी ब्लॉग या माध्यमाचा(च) वापर करावासा वाटतो – या तीनही वस्तुस्थिती. प्रत्येकीचं मूळ बर्‍याच काळापासून शोधायचा प्रयत्न करतेय. या ’का’ ला चिकटलेले ’काय’ , ’कसं’, ’कुणाला’, ’किती’ , ’कधी’ – सगळेच प्रश्न ’मी कोण’ ची पिल्लं, आणि म्हणून सगळ्यांचीच उत्तरं अतिशय खाजगी, आणि म्हणूनच अतिशय वैश्विक. पण ही उत्तरं इति-नेतिचा सी-सॉ इतक्यांदा खेळतात की सगळ्यांचं एक ऍव्हरेज ’माहीत नाही, पर्वा नाही; मजा येते, लिहिते’ उत्तर: ठेवणीतलं, तुसडं, सोप्पं, आळशी – तरीही ’शेवटी’ खरं! पण अभिप्रेत असलेल्या विचारमंथनाऐवजी त्यात विरजण टाकणारं हे उत्तर बाजूला झटकायला लावणार्‍या तुमच्या प्रश्नांबद्दल धन्यवाद.
एका प्रश्नाबाबत अजून विवरण मिळालं तर आवडेल: ’मराठी ब्लॉग्ज हे माध्यम गांभीर्यानं घेण्याइतपत वयात आलं आहे का?’
’गांभीर्यानं घेणं’ म्हणजे नक्की काय करणं? कोणी गांभीर्यानं घ्यायचं?
***
[संपादक: प्रश्न रास्त आहे नि त्याचं नेमकं उत्तर आमच्याकडेही नाही, किंबहुना ह्याही पैलूंचा विचार तुझ्या उत्तरात तू करू शकतेस. पण मोघम बोलायचं झालं तर, ’कोणी?’ ह्या प्रश्नाचं उत्तर ’मराठी भाषा-साहित्याच्या बृहद्वर्तुळाने, मराठी विचार-लेखन-वाचन करणार्‍या अमूर्त समूहाने, मराठी सारस्वताने (हे वादग्रस्त आहे, मान्य आहे)’ असं काहीसं म्हणता येईल. म्हणजे साधारण ’ज्यांना मराठीतून लिहिल्या गेलेल्या मजकूरांचं काही पडलंय त्या सर्वांनी’. ‘गांभीर्याने घेणं’ ह्यात एखाद्या माध्यमाला माध्यम म्हणून महत्त्व देणं, त्याची मीमांसा करणं, त्या परिप्रेक्ष्यात त्यावर लिहिल्या गेलेल्या मजकुराला जोखणं, त्याला ‘भाव’ देणं असं काही (अर्थात हे परिपूर्ण नाहीच) अंतर्भूत करता यावं. तूच ठरव तुझी उत्तरं तुझ्या प्रश्नांची नि त्यांच्या चौकटीत मूळ प्रश्न सोडव. उलटप्रश्न करायचा झाला तर दिवाळी अंकांना, पुस्तकांना, ट्विटर अपडेट्सना, वृत्तवाहिन्यांना वगैरे गांभीर्यानं कोण घेतो नि म्हणजे नेमकं काय करतो?]
***
’गांभीर्याने घेतलं जाणं’ या क्रियेचा माध्यमापेक्षा विचारांच्या (किंवा ते मांडणार्‍या व्यक्तीच्या) बाबतीत उल्लेख होणं जास्त सयुक्तिक वाटल्यामुळे मला तो प्रश्न पडला होता. अन्यथा, ’रेषेवरची अक्षरे’ ची निर्मिती , ही प्रश्नावली, लोकसत्तेत प्रकाशित होणारी ब्लॉगांची यादी या गोष्टीच ’मराठी ब्लॉग्ज’ गांभीर्याने घेतले जात असण्याचं द्योतक नाहीयेत का? की स्वत: ब्लॉग न लिहिणार्‍या लोकांकडून हे असे प्रयोग व्हायला हवेत? की वृत्तपत्रं, दिवाळी अंक, नियतकालिकं या मुख्य प्रवाहात मराठी ब्लॉग्ज सामील व्हायला हवेत? का, आणि कसे? (उदा. अमेरिकेतल्या जवळजवळ प्रत्येक राष्ट्रीय वृत्तपत्रातल्या वार्ताहरांचे / स्तंभलेखकांच्या ब्लॉगांचे दुवे त्या वर्तमानपत्रांच्या संकेतस्थळांवर दिलेले असतात.) या प्रश्नांचा विचार करायला इंग्रजी ब्लॉगजगत ही एक आयतीच समांतर, थोरली सृष्टी आहे. आणि टेक्नोरतीवरच्या माहितीनुसार २००४ मध्ये जेव्हा साडेचार सेकंदाला एक या गतीनं इंग्रजी ब्लॉग पोष्टं प्रकाशित होत होती, तेव्हा मराठीत वट्टात साडेचारशे ब्लॉग्जही नसावेत. मराठीब्लॉग्ज.नेट वरच्या संख्येवरून, आजही एकूण मराठी ब्लॉगलेखकांची संख्या दोन हजारांहून अधिक नसेल. निव्वळ संख्येच्या बाबतीत तर मराठी ब्लॉग्ज वयात कसले, पाळण्यातूनही बाहेर पडलेले नाहीत. संख्या-गुणोत्तराच्या बाबतीत तर अजूनच मजेदार स्थिती आहे [Quick google search, year 2008 : English -speaking internet users: ~ 540 million; # of english language blogs: ~ 15 million. Marathi-speaking internet users : ~ 20 million (number seems too big; back-calculated from wiki info about 40% of India’s (then) 50 million internet users , # marathi blogs: 2000]
मराठी समजणारे अगदी दोन कोटी नाहीत तरी पन्नास लाख लोक इन्टरनेट वापरतात असं गृहित धरलं तरी दोन हजार ही संख्या केविलवाणी म्हणावीशी आहे. (एकेकाचे चार चार ब्लॉग्ज वगैरे शक्यता तर सोडूनच देऊयात.) लिखित माध्यम वयात आल्याची अजून एक खूण म्हणजे त्यामार्फत व्यक्त होणार्‍या विचारांचं आणि लेखनप्रकारांचं वैविध्य, त्यांचा विस्तार (सामाजिक / आर्थिक / राजकीय / प्रादेशिक) . इथेही मराठी ब्लॉग्ज (सरासरीनं) तसे संकुचितच आहेत. आणि ब्लॉगर्सचा सरासरी वयोगट, शिक्षणपातळी, सध्याचा व्यवसाय/ हाताशी असलेला वेळ आणि वास्तव्यस्थान ही परिमाणं त्याच्यामागे असतील ना?
पण, मुळात एखादं माध्यम गांभीर्याने घेण्यासाठी ते वयात येण्याची वाट पहायची असते का? लोक माध्यम गांभीर्याने घ्यायला लागतात, त्याचे दाखले द्यायला लागतात आणि एका क्रिटिकल पॉइन्टला लक्षात येतं की अरे! हे वयात आलं – असं नाही का? (या दोन्ही परस्परपूरक गोष्टी आहेत असं वाटतं). उदाहरणार्थ, २००९ पर्यंत योगेश दामले आणि शमा-ए-महफिल वाल्या शर्मिला हे दोनच पत्रकार ’ब्लॉगर’ मला माहिती होते. (अजून असतील; मला माहिती नव्हते.) आत्ता अचानक या वर्षाच्या सुरुवातीपासून , लेखक-पत्रकार-विचारवंतांचे (“ठावकी असलेली” नावं) ब्लॉग्ज इथून-तिथून मिळाले. कविता महाजन, राजीव तांबे, सुनील तांबे, ज्ञानदा देशपांडे वगैरे. या शेवटच्या दोघांनी तर ब्लॉग या माध्यमाचा बर्‍याच गांभीर्याने विचार केलाय असं जाणवलं, आणि ज्ञानदांच्या एका लेखात ’क्राउडसोर्सिंग’च्या विश्लेषणात ब्लॉगला लागू होतील असे बरेच मुद्दे आहेत. ( http://moklik.blogspot.com/, http://dnyanadadeshpande.blogspot.com/)
म्हणजे माध्यम या क्षणीही वयात येतंय + गांभीर्याने घेतलं जातंय. की नाही? व्याख्येचा प्रश्न आहे.
व्हीटीवर कुणी हातात घुसडलेलं पत्रक, सार्वजनिक अस्वच्छतागृहांमधली भित्तीवाक्यं (आठवा: ’शेवंता जित्ती हाय’ – त्या नाटकातच ना, रेल्वेत खरडलेलं हे वाक्य कुणीतरी गांभीर्याने घेतं आणि अख्खं रहस्यनाट्य रंगतं?) , रोग बरे करणार्‍या बाबाजीच्या जाहिराती, ट्वीट्स – कुठलंही माध्यम, कुणीही गांभीर्यानं घेऊ शकतं वेळ असेल तर, किंवा विचार थोडक्यात पण कन्विन्सिंगली मांडला असेल तर, किंवा जिवाजवळचा असेल तर किंवा विश्वसनीय व्यक्तीने लिहिला असेल तर.
नव्याने येणार्‍या प्रत्येक ब्लॉगाची मीमांसा प्रस्थापित मीडियाने करावी, ब्लॉगलेखकांना ’लेखक’ म्हणून भाव द्यावा असं हे होणार, की आधीच लेखक / पत्रकार म्हणून प्रस्थापित असलेल्या लोकांच्या ब्लॉगांना जास्त रहदारी मिळणार? मला दुसरीच शक्यता जास्त दिसते आहे. आणि प्रश्नावलीतल्या एकदम शेवटच्या प्रश्नाचं अंशत: उत्तर हे, की पारंपरिक माध्यमांमध्ये लेखकांचे विचार संपादित केले जातात, लेखक / पत्रकार घोटवला जातो आधी, त्याचं एक ’गूडविल’ तयार होतं आणि मग त्यानं लिहिलेलं काहीही गांभीर्यानं घ्यायला लोक तयार होतात. अमित वर्मासारखे, भारतातले बिनीचे ब्लॉगर – त्यांचा प्रवास उलटा झाला हे खरं, पण तिथेही त्याचे लिखाणातले परिश्रम स्पष्ट दिसतात; स्वत:चा नोकरीधंदा सोडून देऊन पूर्णवेळ लेखक व्हायचा त्यानं घेतलेला निर्णय – ही लिखाणाशी कमिटमेंट आहे; ब्लॉगिंगशी नाही. विचार मांडण्यासाठी ’लिखित शब्द’ हेच प्राथमिक माध्यम आहे; ब्लॉग हे एक प्रसारमाध्यम आहे. स्वत: लेखक आपलं लिखाण गांभीर्यानं घेत असेल तर वाचकाला त्याचा गांभीर्यानं विचार करण्यासाठी माध्यमाच्या स्वरूपाचा फरक पडू नये. आता समजा मला एक अनुवादक म्हणून नोकरी हवी आहे, आणि तिथे मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये माझ्या भाषांतरांच्या ब्लॉग्जची लिंक दिली, तर ती गांभीर्याने घेतली जाईलच की. माझ्या भाषांतरकौशल्याचा तो रास्त नमुना आहे. कदाचित भाषांतरामागची माझी विचारपद्धती, त्यावरच्या वाचकांच्या मतमतांतरांसकट तारीखवार तिथे नोंदलेली असेल. लिखाणाची ’प्रत’ जोखायला बरा मार्ग आहे की हा.
मला वाटतं आपलं लिखाण महत्त्वाचं आहे असं मानून (लेखक आणि संपादक या दोन्ही भूमिका स्वत:च बजावत) ब्लॉग लिहिणारे लोक, ज्या मराठी सारस्वताला “अहो, आम्ही पण आहोत, तुम्ही इथे या, आणि आम्हांला तुमच्यात घ्या” सांगत राहतील त्या सारस्वतातर्फे ब्लॉग नक्कीच गांभीर्याने घेतले जातील. बोथ इन टर्म्स ऑफ कॉण्ट्रिब्यूटिंग टू द ब्लॉग मिडियम ऍज वेल ऍज बीइंग अ क्रिटिक ऑफ इट.
***
आपण कमावलेली, घडवलेली किंवा आपल्याला सापडलेली, आवडलेली एखादी गोष्ट आसपासच्या समविचारी दोस्तांना दाखवायची (आणि त्यांच्याकडून कौतुक करून घ्यायचं) म्हणून मी ब्लॉग सुरू केला होता. इथे-तिथे कुठल्यातरी वहीत लिहिलेल्या गोष्टी सहज हरवतात, तसं होऊ नये आणि सगळं लिखाण एकत्र राहावं असा उप-उद्देश, आणि ’आपण लिहिणार ते चार डोळ्यांना दिसणार त्यामुळे ते अर्धवट/ अपूर्ण न राहण्याची शक्यता वाढेल’ असा आळशीपणाविरुद्धचा कावाही होता. शिवाय स्वत: लिहिलेलं परत वाचायला मला खूप आवडतं. लहानपणी आई-बाबांनी धोशा लावल्यामुळे कधीमधी ’दैनंदिनी’ लिहायचे; आता ती वाचताना खूप करमणूक होते, आणि आपण कसे वाढत, बदलत गेलो ते कळतं. कधी कधी तर ’आपण लहानपणी आत्ताच्यापेक्षा जास्त शहाणा विचार करायचो’ असं वाटून, स्वत:च्याच लहानपणाकडून संस्कार करवून घ्यायची वेळही येते. त्यामुळे ब्लॉगमधून असंच ’पूर्वीच्या आपल्यात’ डोकावता येईल असाही एक विचार होता.
ब्लॉग लिहीत गेले तशी ’लिहिणं’ या क्रियेबद्दलची आणि जोडीनं स्वत:बद्दलची उमज वाढत गेली. डोक्यातले विचार लिहून काढण्यासाठी ’ऊर्मी/ खाज’ यांच्यावरच आपली मुख्य भिस्त असते आणि ती खाज सुटण्यामागे ’शब्दांशी खेळत बसायची इच्छा, भावनांचा निचरा करायची/ विचारांच्या गडबडगुंत्यातून काहीतरी संगतवार मांडणी करायची/ केलेला विचार जपून ठेवायची आत्यंतिक गरज’ ही कारणं असतात हे आधी लक्षात आलं होतं; पण आपण लिहिलेलं इतरांना दाखवलं की खूप गमतीजमती होतात हे ब्लॉगमुळे दिसायला लागलं. एक तर अनपेक्षितपणे, लिहा-वाचायची आवड असलेल्या माझ्या ’ओळखीच्या’ लोकांचं वर्तुळ मोठ्ठं झालं. पसंतीच्या थापेमुळे येणारा हुरूप, कुणी ’आता लिही की’ म्हटल्यावर आलेला चेव अनुभवणं, कधी प्रतिक्रियांची वाट बघणं आणि तशी ती आपण बघतोय हे लक्षात आल्यावर ’मी बुवा स्वत:साठी लिहिते’वाल्या स्वत:च्या डोक्यातल्या प्रतिमेची चेष्टा करणं हे सगळं मस्तच होतं. स्वत: लिहून स्वत:च प्रकाशित करून टाकायचं, यात बाहेरच्या संपादनाची उणीव राहते. पण ती भरून काढणार्‍या (म्हणजे तू हे चुकीचं लिहिलं आहेस, किंवा हे असं नको तसं लिही, तुझ्या शैलीत हे चांगलं आहे किंवा ही उणीव आहे असं सुचवणार्‍या) आणि ’यावरून हे आठवलं / सुचलं’ असं म्हणत वाचकाचा नवा लेखक होतो हे दाखवणार्‍या, मला श्रीमंत करणार्‍या प्रतिक्रिया मिळाल्या तेव्हा या माध्यमाची ताकद कळली. लेखक-वाचक संवाद, चर्चा, वाद घडणं हे किती भारी आहे! ’आपण या गोष्टीवर फारच घोटून विचार केलाय’ असं स्वत:ला वाटत असताना कुणी येऊन एखादं वाक्य लिहावं आणि मग आपला विचार कुठे तोकडा होता हे कळावं, मग अजून वेगळ्या पैलूंनी विचार व्हावा – या सगळ्यात, स्वत:चे पूर्वग्रह बदलून नवे ग्रह (पुन्हा कधीतरी बदलण्यासाठी) मांडण्यात मला खूप गंमत येते. स्वत:चा पुरेसा विचार झालेला नसेल त्या गोष्टी, स्वत:मधले हळवे, इनसिक्युअर्ड भाग जसेच्या तसे ब्लॉगवर न टाकायचा हातराखीवपणा बाळगल्यामुळे मी लिहिलेलं कुणाला आवडलं नाही, की (त्याचं आश्चर्य वाटतं :D, पण) त्या प्रतिक्रियेकडे तटस्थपणे पाहता येतं. सुचवलेला बदल स्वीकारार्ह आहे का याचा विचार करता येतो. मात्र, सहजप्रवृत्तीतून मी जे लिहिते त्यात परखड, ठाम, भूमिकादर्शी विचारांपेक्षा भावना, कल्पना वगैरेंचं पारडं जास्त जड असतं – त्यामुळे त्यात फारसा वाद घालण्यासारखं काही नसावं. आणि खूप जणांशी एकत्र संवाद फुलता ठेवण्यासाठी जो वेळ गुंतवायला लागतो तितका द्यायची सध्या निकड वाटत नसल्यामुळे या (किंवा फोरम्ससारख्या इतर) प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर मी करत नाहीये.
इंग्रजी-मराठी ब्लॉगजगतातूनच स्वत:चं लिखाण गांभीर्यानं घेणार्‍या व्यक्तींशी संपर्क आला आणि मग इतर कलांप्रमाणेच ”लेखनकळा’ हीसुद्धा नुसती उपजत देणगी नाही, तिचाही रियाज़ करावा लागत असणार हा माझा पूर्वीचा संशय बळावला. लिहिणार्‍यांमध्ये कुणी स्वत:ची नैसर्गिक शैली शोधत असतं, शैलीला मुद्दाम वाकवत-वळवत वेगळं काही लिहून पाहात असतं, एकत्र लिहिण्याचे -वाचण्याचे प्रयोग आणि खो-खोंसारखे किंवा या ब्लॉगवरच्या परिसंवादासारखे उपक्रम – या सगळ्यांमुळे ब्लॉगिंगचं एक ’स्वत:च्या बुद्धीला धार लावायला मदत करणारं साधन’ असं रूप डोळ्यासमोर येतंय. त्या संदर्भातलं ब्लॉग या माध्यमाचं मला जाणवणारं अजून एक शक्तिस्थान म्हणजे त्यात एखाद्या व्यक्तीचं लिखाण कसं उत्क्रांत होतंय ते दिसू शकतं. त्या अर्थानं “conducting your education in public” ही एक उत्तम संकल्पना आहे. फक्त, आपलं शिक्षण असं सार्वजनिकरित्या घडू आणि दिसू देताना कुणाकडून आपण काय आणि कसं शिकतो आहोत याचं स्वत:शी नेहमी परीक्षण करत राहायला लागेल; नाहीतर कदाचित विशिष्ट व्यक्ती किंवा कंपूच्या अभिरुचीमध्ये अडकून मग आत्मसंतुष्ट तोच-तोचपणा करत राहण्याचा किंवा धुंडाळता येतील त्या सगळ्या वाटांकडे जायचा प्रयत्न न करण्याचा, साचून राहण्याचा धोका निर्माण होईल. किंवा दुसर्‍या बाजूला, ’हीच माझी वाट आहे’ असं स्वत:चं वैशिष्ट्य सापडून त्या लेखनप्रकारात आणखी प्रगती करत राहता येईल.
०००
मी ब्लॉग लिहिण्यामागे लोकांचे रंजन करणे किंवा माहिती पुरविणे असला काहीही उदात्त हेतू नव्हता. केवळ माझा वेळ चांगला जावा इतकं एकच मामुली उद्दिष्ट होतं. एक काळ असा होता की मला ऑफिसमधे काहीही काम नसायचं. मी दिवसचे दिवस नेट वरची वर्तमानपत्र वाचण्यात घालवायचो आणि लवकरच त्याचा मला प्रचंड कंटाळा आला. त्यातूनच ब्लॉग लिहीण्याचा विचार पुढे आला. मराठीतून ब्लॉग लिहिता येऊ शकतो हे कळल्यावर तर ताबडतोब ब्लॉग संबंधीची बरीचशी माहिती जमवली आणि ब्लॉग उघडला.
कुठलंही काम चालू असताना माझ्या डोक्यात एकीकडे सतत काही तरी घोळत असतं. त्यातून कधी विनोद, कधी छोटंसं विडंबन तर कधी विनोदी प्रसंग असं काहीही सुचतं. बर्‍याच वेळा ते त्यावेळी लिहून न ठेवल्यानं विसरून जातं. त्यातलं जे काही लक्षात राहील ते आणि आलेले अनुभव एकत्र गुंफून काही तरी सुसंगत लिहायचं असा विचार होता. सखोल विचार करून काही विचार प्रवर्तक किंवा हृदयाला भिडणारं असं काही लिहीण्याचा माझा पिंड नाही. मी फक्त हलकं-फुलकं लिहू शकतो.
हा हेतू आत्तापर्यंत बर्‍यापैकी साध्य झाला आहे असं मला वाटतं. ब्लॉग सुरू झाल्यावर मधे एखाद्या गोष्टीबद्दल वा व्यक्तीबद्दल सांगण्याची मला अनावर इच्छा झाली. मग त्या गोष्टीवर/व्यक्तीवर आपोआपच लिखाण झालं. अशा लिखाणात अचूकता येण्यासाठी मी भरपूर नेट सर्च करतो. अशा प्रकारचं लिखाण माझ्या मूळ लिहीण्याच्या संकल्पनेपेक्षा थोडं विसंगत आहे. पण लिहिण्यात वेळ घालवायचा या मूळ उद्देशाशी नाही.
ब्लॉग सुरू करून आता २ वर्ष होऊन गेली आणि एकूण २३ पोस्ट्स होऊन अजूनही ब्लॉग सुरू आहे. सुमारे महिन्या-दीड महिन्याला एक पोस्ट असा वेग आत्तापर्यंत तरी आहे. सध्या तरी मी लिखाण बंद करेन असं वाटत नाही. अजूनही काही ना काही तरी सुचत असतं त्यातून काहीना काही तरी लिहिलं जातं. जेव्हा सुचणं थांबेल तेव्हा आपोआपच लिहिणं बंद होईल.
लोकांनी आपला ब्लॉग डोक्यावर घ्यावा, खूप लोकांनी तो वाचावा, तो पुस्तक स्वरूपात यावा असं काही लोकांना वाटत असेल. पण मला तसं वाटतं नाही, त्या दर्जाचं लेखन मी करतो असं मला मुळीच वाटत नाही. माझं काही लेखन विनोदी सदरात मोडतं, त्यामुळे ते वाचताना वाचकाचे तोंड १ मिलीमीटर जरी फाकले तरी मला समाधान मिळेल.
मी माझ्या ब्लॉगवरचं लेखन मायबोली(http://www.maayboli.com/)वरपण प्रसिद्ध करतो. तिकडे ब्लॉगपेक्षा जास्त प्रतिक्रिया मिळतात. सगळ्यांनाच मिळतात तशा मलाही बर्‍या वाईट प्रतिक्रिया मिळाल्या. चांगल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह वाटला तसंच वाचकांच्या अपेक्षांचं दडपणही आलं. अतिवाईट प्रतिक्रिया मला कधी मिळाल्या नाहीत. काही वेळा प्रतिक्रिया ‘नाही आवडलं’ इतक्या मोघम आणि त्रोटक असतात. ज्यातून काहीही निष्कर्ष काढता येत नाही अशा विसरलेल्याच बर्‍या असतात. पण कमी प्रतिक्रिया मिळाल्या की लिखाण लोकांना फारसं आवडलेलं नाही हे सहज ओळखता येतं. कमी प्रतिक्रिया आल्या की मी अजूनही थोडा खट्टू होतो, पण नंतर हे सगळं माझा वेळ घालवायला मी करतो आहे ते आठवतं आणि नव्या जोमाने पुढचा विचार चालू होतो. काही वेळा वाचकाला तुमच्या लिखाणाचं मर्म किंवा तुमची लिहिण्यामागची भूमिका तितकी उमजत नाही. त्यातून एखादी प्रतिकूल प्रतिक्रिया येऊ शकते. ते खरं तर तुमच्या लिखाणाचं अपयश आहे. प्रतिक्रियेचं विश्लेषण करायची, ती देण्याच्या मागची वाचकाची विचारधारा समजून घ्यायची ताकद हवी. काही प्रतिक्रिया मात्र कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम प्रकारच्या असतात, त्या तुम्हांला पटल्या तर त्यांचा पुढील लिखाण करताना जरूर विचार करावा. तसंच हे पण लक्षात ठेवायला हवं की कुठलंही/कुणाचंही लिखाण सगळ्यांनाच आवडेल असं काही नाही. त्यामुळे फार वाईट वाटून न घेता पुढचं लिखाण करावं या मताचा मी आहे.
सध्या नेटवर खूप मराठी ब्लॉग्ज उपलब्ध आहेत. दिवसेंदिवस ती संख्या वाढतच जाईल. चांगल्या दर्जाचं लिखाण किंवा कलाकृती जशी इतर माध्यमात दुर्लभ आहे तशीच ती या माध्यमातही रहाणार आहे. तसंच एखादी उच्च कलाकृती ब्लॉगमधे येणं हेही काही अनपेक्षित नाही. अगदी उद्याही कुणी तरी उठून उत्तम ब्लॉग लिहू शकतो. त्यामुळे, हे माध्यम गांभीर्यानं घेण्याइतपत वयात आलं आहे की नाही असा नसता विचार करण्यात काही अर्थ नाही. सध्या ब्लॉग वाचक लोकसंख्येच्या मानाने कमी आहेत. जसजसा लोकांचा नेट वावर वाढेल तसतशी वाचकांची संख्या, तसंच या माध्यमात प्रयोग करणार्‍यांची संख्या पण वाढेल.
फोरम हे माध्यम मुख्यत्वेकरून एखाद्या विषयावर चर्चा करायला चांगलं आहे. पण बहुतेक वेळेला चर्चेत तिथल्या सभासदांनाच भाग घेता येतो. मला स्वतःला नेटवर जिकडे तिकडे सभासद होण्याची अजिबात हौस नाही. त्यामुळे मी फोरम्स शक्यतो टाळतोच. मला वाटतं ब्लॉग हे असं एक माध्यम आहे ज्याच्यात ब्लॉगकाराला पाहिजे ते साहित्य/कलाकृती कुणाच्याही संमती शिवाय प्रसिद्ध करण्याचं स्वातंत्र्य आहे. असंच स्वातंत्र्य यूट्युबवर आपल्याला पाहिजे ते व्हिडिओ टाकण्यात आहे म्हणूनच तर त्याचा इतका बोलबाला झालाय. मधे एका डॉक्युमेंटरीत मी ऐकलं की ‘बॉर्न फ्री’ ही कादंबरी प्रसिद्ध करायला जवळ जवळ २० प्रकाशकांनी नकार दिला. शेवटी एक जण तयार झाला म्हणून ती विलक्षण कथा आपल्याला वाचायला मिळाली, त्यावर चित्रपट बनला. अशा घटना ऐकल्या की लेखकाला त्याची मर्जी असेल ते लिहीण्याचं, त्याला वाटेल त्या स्वरूपात आणि त्याला वाटेल तेव्हा प्रसिद्ध करण्याचं स्वातंत्र्य असणं किती महत्त्वाचं आहे ते पटतं.
०००
“तेजु, तू मराठीमें लिख सकती है अरे ब्लॉग,” असं एका मित्राने साधारण ५-६ वर्षांपूर्वी सांगितलं तेव्हा आपल्याला कसलं मस्त वाटलं होतं. अर्धा अर्धा तास लागायचा १० मराठी ओळी टाइप करायला तेव्हा. पण तरी लिहायचो आपण! हेतू वगैरे काही नव्हताच ना आपल्याकडे? “ए, तू ब्लॉग लिहितोस? मग मी पण लिहिणार बा!” म्हणून लिखापढी सुरू केली होती आपण….
“अरे देवा, आपण जे लिहिणारोत ते लोकं वाचणारेत. म्हणजे आपण जरा बरं लिहायला हवं ना…” अश्या काळजीपोटी किती रिव्हीजन्स करून ब्लॉग पोस्ट करायचो आपण… आता आठवल्यावर मज्जा वाटते. पण ठीके ना, आता निदान ब्लॉगवर लिहितो तसं ठीकठाक आपण. आणि काहीही लिहिलं, अगदी जाम फालतू काहीतरी, तरी कमीत कमी ३-४ डझन टाळकी नक्कीच्या नक्कीच वाचतात हे बरं आहे. नाहीतर कोण कशाला ऐकत बसणार होतं माझ्या डोक्यातल्या माणसांच्या बडबडीला?
“मी लिहिते ब्लॉग” हे वाक्य एखाद्या माणसाला इम्प्रेस करण्यासाठी मधूनच टाकतो आपण, पण त्याच्यापलीकडे ब्लॉगचं काय करतो? मधे एका माणसाने ब्लॉग संग्रहित करून पुस्तक छापण्याविषयी विचारलं होतं. पण नाही नं, अजूनही मिडीयांतरावर इतका विश्वास नाही बसते आपला… त्यामुळे ब्लॉगमधल्या लिखाणाचं पुढे काय व्हावं हा जरा प्रश्नच आहे राव अजून तरी!
हल्ली जरा कमीच लिहीतो आपण ना… नाही सुचत जास्त.. किंवा कसं झालं आहे, की सुचतं, पण मग उगाच ह्यापेक्षा चांगल्या शब्दांत मांडू कधीतरी म्हणून आपण ते तसंच कुठल्याश्या अनटायटल्ड डॉक्युमेंटमधे सेव्ह करून ठेवतो… मधेच वाटतं, “तेजुबाई.. लिहायला हवं नियमित.” मग तेजुबाई म्हणते, “हो यार.. लिहायला पाहिजे.” त्यानंतर काम करते, फेसबुक, जीटॉक, ट्विटर वगैरे फिरते आणि कॉम्प्युटर बंद करून झोपून जाते! ह्याहून जास्त कधी काय केल्याचं आठवत नाहीये लिखाण थांबू नये असं वाटल्यावर!
बाकी आपण आळसटलेल्या असलो तरी अनेक लोक सुटल्येत हल्ली मराठी ब्लॉग्सवर. हेवा वाटतो त्यांचा! “क्लास ते मास” वगैरे म्हणणं कायमच जरा कॉण्ट्रोव्हर्शिअल असतं, पण केलाय, झालाय तो प्रवास मराठी ब्लॉगजगताचा… नक्कीच विषय, ठेवण आणि घाटात विविधता आहे, नाविन्य आहे. पण त्यांना प्रयोग म्हणणं कठीण आहे. प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या स्टाइलनेच लिहितो आहे. उद्या ट्युलिप बाठेंसारखं लिहायला लागली ( ती परत लिहायला लागली तरी पुष्कळ आहे.) किंवा गायत्री नातू महेन्द्रकाकांसारखं दररोज लिहायला लागली, तर आपण म्हणू त्याला प्रयोग वगैरे!
आपण तरी कुठे काय करतो प्रयोग-बियोग? मधे ते ऑडिओ ब्लॉग प्रकरण सुरू करुन बंदच केलं की… बाकी विशेष दिवे नाही लावलेले आपण ब्लॉगिंगमधे. त्यामुळे आपण जास्त काही बोलण्याचा आपल्याला तसा हक्क नाही. आणि मला वाटतं मी काहीही लिहील्यावर त्याला गांभीर्याने घेण्याइतपत वयात आलं नाहीये आपलं लिखाण अजून!
आपण “तू लिहितोस तर मीपण,” म्हणून केलेली सुरुवात आता “मी आधी लिहायचे म्हणून मी आत्तापण,” इथवर येऊन थांबल्ये फक्त!
०००
तुम्ही सुचवलेल्या दहा प्रश्नांची (१) वैयक्तिक ब्लॉगबद्दलचे प्रश्न आणि (२) एकंदरीत ब्लॉग ह्या माध्यमाबद्दलचे (वेगळेपणा, शक्तिस्थान, उणिवा) प्रश्न अशी सोयीसाठी विभागणी करून दोन भागांत त्याबद्दल लिहितो.
सुमारे साडेपाच वर्षांपूर्वी जेव्हा मराठी ब्लॉग लिहायला सुरू केलं तेव्हा त्यामागे काहीच हेतू नव्हता. त्याआधी वर्षभर इंग्रजीतून लिहित होतो आणि युनिकोडची सोय उपलब्ध झाल्यामुळे मराठीतही लिहून पाहूया म्हणून हा ब्लॉग सुरु केला. पहिलं वर्षभर आवडलेल्या कविता नोंदवणे आणि फुटकळ नोंदी लिहिण्यातच गेलं. नंतर मात्र लेखनातली वारंवारिता कमी झाली. अनेक विषय सुचले, पण ते लेख प्रत्यक्षात उतरण्यापूर्वी त्यांचा अपमृत्यूही झाला. परंतु लिखाण थांबू नये यासाठी काही एक ठरवून अंमलात आणावं असं कधी वाटलं नाही. त्यातही एकाच विषयावर बेतलेला ब्लॉग असल्यामुळे थोडीफार अनियमितता येणं अपरिहार्य आहे, असंही वाटतं.
ब्लॉगला येणार्‍या प्रतिक्रियांबाबत बोलायचं झालं, तर त्यांच्या संख्येपेक्षा एखाद्या प्रामाणिक प्रतिक्रियेमागचं वजन हळूहळू लक्षात येऊ लागतं. अर्थात स्पष्ट प्रतिक्रिया देणं आणि तिचा तितक्याच मोकळेपणाने स्वीकार केला जाणं, हे उभयपक्षी दुर्मीळ असल्यामुळे हा योग सहसा येत नाही, हा भाग अलाहिदा.
आता ब्लॉग या माध्यमाबद्दल बोलायचं झालं, तर सर्वप्रथम या माध्यमाकडून आपल्या ज्या अपेक्षा आहेत, जे निकष आहेत; ते मुद्रित साहित्यापेक्षा गुणात्मक दृष्टीने निराळे असायला हवेत. मुळात खुलेपणा, ‘जो जे वांछिल तो ते लिहो’ हे इंटरनेटचे मूलतत्त्वच ह्या माध्यमामागे आहे, हे ध्यानी ठेवायला हवं. त्यामुळे ‘अभ्यासे प्रकट व्हावे | नाहीतर झाकोनि असावे |’ हा समर्थांचा उपदेश कृतीत आणणार्‍या एखाद्या विचक्षण ब्लॉगसोबतच केवळ मनात आलं म्हणून, विषय लोकप्रिय आहे म्हणून, नोंदवही म्हणून किंवा चक्क वाङ्‌मयचौर्य म्हणून लिहिले जाणारे ब्लॉग्जही असतील; नव्हे त्यांचं अस्तित्व एका अर्थी हे माध्यम जिवंत, सर्वसमावेशक असल्याचं लक्षण असावं. विशेषतः सुरूवातीच्या काही वर्षांत तरी.
त्या दृष्टीने मराठी ब्लॉग्ज हे माध्यम अजूनही गांभीर्याने घेण्याइतपत वयात आलेलं आहे असं वाटत नाही. मात्र त्याच वेळी, हे विधान करण्यामागे उच्चभ्रू पोझ घेऊन नाक मुरडण्याचाही हेतू नाही. या प्रक्रियेला अजून काही काळ जावा लागेल, असं वाटतं. मात्र अलीकडच्या काही वर्षांत पत्रकार, लेखक, व्यावसायिक छायाचित्रकार आणि ट्रेकर्स, उद्योजक आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणार्‍या व्यक्तींनी आपापले वैशिष्ट्यपूर्ण ब्लॉग्ज सुरु केले आहेत; ही बाब फार महत्त्वाची वाटते. वरील परिच्छेदात लिहिल्याप्रमाणे एकंदरीत अभिरूचीची अधोगती होत चालली आहे असा गळा काढण्यापेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक मराठीत लिहिते कसे होतील, याकडे अधिक लक्ष पुरवलं पाहिजे.
“काही अनुभव बचकेने उचलायचे असतात, तर काही चिमटीने”, असं श्री. म. माट्यांचं एक वाक्य आहे. स्फुटलेखनाचं किंवा वृत्तपत्रीय स्तंभलेखनातल्या हलकेफुलकेपणाचं समर्थन म्हणून लिहिलेलं. थोड्याफार फरकाने हेच वाक्य, वेगळे प्रयोग करण्यावर ब्लॉग ह्या माध्यमाच्या ज्या अंगभूत मर्यादा आहेत, त्यांच्याकडे ते निर्देश करतं असं म्हणता येईल. मुळातच इंटरनेटमुळे लोकांची दीर्घकाळ एखाद्या गोष्टीकडे लक्ष पुरवण्याची सवय कमी होत चालली आहे, असं काहींचं मत आहे. [पहा – द शॅलोज हे पुस्तक (दुवा: http://www.nytimes.com/2010/06/06/books/review/Lehrer-t.html)]. १४० अक्षरांचं बंधन असूनही ट्विटरची वाढती लोकप्रियतादेखील हेच दर्शवते.
असं असलं तरी स्वान्तःसुखाय लिहिणार्‍या ब्लॉगरला लेखनात कितीतरी वेगळे प्रयोग करायचा वाव आहे. त्या मानाने तितके प्रयत्न मराठी ब्लॉगविश्वात होत नाहीत हे खरं आहे, पण ही स्थिती लवकरच पालटेल अशी आशा ज्यांच्याकडून बाळगावी अशी काही मंडळी लिहिती होत आहेत, हेही नसे थोडके.
०००
ही जी काही पाचशे शब्दांपर्यंत शब्दांची भेंडोळी उलगडण्याची मुभा संपादक मंडळाने मला दिली आहे तीच एक मोठी मुष्किल वगळता ब्लॉग या विषयावर लिहायला मजकडे भरभरून मजकूर आहे.
शाळेत बिलकूल गिचमिड प्रकारचे लिखाण आपणां सर्वांहस्ते घडले किंवा घडविले गेले. त्या सर्व लिखाणांत आपणांस केवळ मर्यादा पाळून लिहिण्याखेरीज काहीच शिकवले गेले नाही. म्हणजे पिंग्यांचे एखादे कोंकणवर्णन त्यांनी स्वत: दहावीस पाठपोठ कागदे भरून का लिहिले असेना, आम्हांस मात्र ते दहा ओळींत “रसग्रहण” म्हणून उतरवण्याचे बंधन असे. मुळातून उस चरकात लोटल्यावर चर्र करून जो तयार होतो तसा कांही रस आमच्या बालकाळिजांतून निष्पन्न झाला किंवा कसे याची फिकीर न करता गुरुवर्ग सगळे काही त्रिभुवन दहा ओळींत बसवू पाहे. ..आणि नाही बुवा रस वाटत मनाला, म्हणून आपण पाचेक ओळीच लिहावयाचे ठरवावे तरी पुन्हा दहा ओळींची मर्यादा ठरीवठाशीव..कमी नाही की जास्त नाही..
बरे यंदा पुस्तक छापावे तरी पुन्हा प्रकाशक असेच म्हणणार, “हे बघा पन्नासच पाने होताहेत तुमची..दीडशे रुपये किंमत ठेवायची बुकाची तर पाने निदान दीडशे तरी हवीत हो.. नाहीतर परवडत नाही छपाईखर्च…अजून वाढवा जरा मजकूर.”
तर तळातला मुद्दा असा की मनमोकळे समरसून हवे तेवढे लिखाण करता यावे हा ब्लॉगचा मुख्य फायदा आहे. ब्लॉगांना अतिरिक्त लोकाश्रय लाभण्याचे हेच पहिले कारण दिसते की पाचशे बीचशे शब्दांची मर्यादा घालावयास तेथे कोणी येत नाही.
ब्लॉगांवर मी इमाने इतबारे दोनेक वर्षे लिहित आलो आहे. ब्लॉगवर लिहिताना वयाच्या तिशीत मी एका चांगल्या स्थानी आहे. म्हणजे जुन्याचा सरसकट तिटकारा करून सारी व्यवस्थाच खराब आहे असे खदखदत राह्ण्याइतका मी तरुणही नाही आणि “आजकाल” या शब्दाने सुरुवात करून सा-या नव्याला झोडपण्याइतका म्हाताराही नाही.
त्यातील मुख्य मौज म्हणजे त्यावर मजकडे येणा-या प्रतिक्रिया. पुस्तक लेखादि छापकामावर महिन्या-वर्षाच्या अंतराने येणा-या एखाद्या पोष्टकार्डापेक्षा नाहीपेक्षा बाजारात वाकून लिंबे घेताना “आमच्या लायब्रीत पाहिले हो काल पुस्तक तुमचे..” असे कोण्या काकूंकडून श्रवणी येण्यापेक्षा, इथे ब्लॉगांवर खेचक आणि खोचक दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया सत्वर उमटतात.
“खूप छान”, सुंदर”, शैली आवडली” ही नेहमीची कबुतरे चिमण्या वगैरे वगळता “अमुक खटकले”, “तमुक हे विधान वाचून गंमत वाटली”, “केवळ बोटांना खाज सुटल्यास्तव लिखाण करत राहू नये” वगैरे स्थलांतरित रंगीत पक्षीही कधीमधी येतात.
“आपले हे विधान वाचून गंमत वाटली” म्हणजेच खरे तर आपले हे विधान वाचून अत्यंत राग आला व खिजावायास झाले. जिव्हारी लागले इ.इ.
“तुम्ही माझा लेख नीट वाचलेला दिसत नाही” .. हे शब्द नेहमी प्रतिक्रियेला प्रतिक्रिया म्हणून मूळ लेखकाकडून येतात. यात प्रतिक्रियेतला मुद्दा खोडून काढण्यापेक्षा प्रतिक्रियेच्या लेखकालाच मुळातून अल्पमति सिद्ध करणे जास्त सोपे पडेल असे मूळ लेखकाला वाटलेले असते. म्हणजे ‘लेख नीट समजून घायची अक्कल नाही तुमच्यात आणि आलेत प्रतिक्रिया टाकायला..’ इत्यादि..
मला वाटते की पाचशे शब्दांच्या लेखनमर्यादेची संभाव्य धूळधाण आता समोर दिसू लागली आहे. त्यामुळे मी संपादकमजकुरांकडून आलेल्या टेकूप्रश्नांना टेकणास घेऊन पुढे लिहितो.
आपल्या ब्लॉगवरच्या लिखाणाचे काय व्हावे असे तुम्हांला वाटते? हा एक त्यांतील प्रश्न मला वेधक वाटतो.
लिखाण झाल्यावर अर्थातच वाचकांनी संपूर्ण मजकूर एका बैठकीत वाचावा आणि त्यांस तो पचनी पडावा, पटावा, आवडावा वगैरे ज्या इच्छा मेजवानीस उकडीचे मोदक बनवून झाल्यावर आमच्या आजीस होत असत त्याच..
शिवाय आमचे मोदक संख्येने अनंत आणि टिकाऊ असल्या कारणास्तव अधिकाधिकांनी त्यांस आस्वादावे आणि अधिकाधिक प्रतिक्रियारुपी ढेकर आमचे कानी पडावेत ही इच्छा मागाहून आलीच.
यात एक गोष्ट मान्य करणे गरजेचे आहे की आम्ही लोकांनी वाचावे म्हणून लिहित आहोत. उगीच आम्ही फक्त स्वत:साठी लिहितो वगैरे हे वाचकांच्या पचनी पडणे जरा अवघड जावे.
फक्त स्वत:साठी लिहावयाचा मजकूर फडताळातील रोजनिशीत न लिहिता अनेक सव्यापसव्ये करून तो देवनागरीत टंकून ब्लॉगस्थळांवर उद्वाहित आणि जनतेपुढे प्रकाशित करण्याचा खटाटोप आपण कशास्तव करत आहोत? असा एक अंतर्मुख विचार करून मगच लेखकाने बहिर्मुख व्हावे..
आजोबा जसे आपल्याला आपलेच नाव गुंफून सिंदबादची वगैरे गोष्ट सांगायचे तसे आपण वाचकांस आपल्या लिखाणाच्या आत प्रवेश देऊन मग लिखाण करावे असे माझे म्हणणे. उगीच “विदूषकाला एक पाचूचा आणि एक वाळूचा असे दोन रस्ते अंधाराकडे जाताना दिसले आणि विदूषकाने वाळक्या पानाला प्रश्न केला” असे काहीतरी अगम्य लिहून वाचकांस दूर ठेवू नये. आपल्या लिखाणात वाचकाला तो स्वत: कुठेतरी दिसला तर तो ते लिखाण समजून घेण्याचा यत्न करील. अन्यथा तो कंटाळून वाचन बंद करील किंवा मग काही समजत नाही त्याअर्थी काहीतरी उच्च कोटीचे लिहिले आहे असा फसवा भक्तीभाव धरून बसेल. अगदी प्रतीकात्मक लिहितानाही समजेल असे आणि वाचकाला “बाहेर” न ठेवता लिहिणे फार आवश्यक.
अर्थात लोकांसाठी लिहितो म्हणजे लोकांना हवे ते किंवा आवडेल ते लिहितो असे होणे अगदी साहजिक असले तरी ते टाळण्याकरिता यत्नपराकाष्ठा करणे आवश्यक दिसते.
लोकांना अप्रिय वाटू शकेल असे काही परंतु आपल्या आतल्या आत्मारामाने होकार भरलेले असे ते लिहिताना कचरणे म्हणजे अनर्थाची सुरुवात. आपल्या वाचकांवर असा विश्वास हवा की जे काही होवो वाचक माझ्या विचारांना किमान एकदा तरी आपल्या हृदयात घोळवून पाहतील. माझा मुद्दा पटण्यायोग्य असेल तर तो पटेल अन्यथा त्यावर अप्रिय प्रतिक्रिया येईल. कोणी वाचक अल्पगालिप्रदानाचा अल्पोपाहारही देऊ करेल. परंतु माझा मुद्दा खरा असेल तर तो समोरच्याला पटेपर्यंत पराकाष्ठेने पटवून देणे अन्यथा स्वत:चे मत बदलणे हीच प्रक्रिया व्हायला हवी. तरच ही प्रक्रिया वांझोट्या मैथुनाकडून प्रसवक्षम मंथनाकडे जाईल.
कोणत्याही मतास “हे माझे वैयक्तिक मत..तुमचे वेगळे..” असे प्रत्येकाने म्हटले म्हणजे मग सारे संभव समाप्तीस जातात आणि आपण आपापल्या गुहांमध्ये जाऊन बसावयास मोकळे होतो. ब्लॉगबाहेरील विश्वातही हेच सर्वत्र चाललेले दिसते. अशाने एकमत होण्याच्या मार्गास बोळा बसून मोरी चोंदावी तद्वत अवस्था होते. इतरांच्या मतांविषयी आदर असणेही मान्य..परंतु त्याचे ते मत आपण बदलावे किंवा आपले मत त्याने बदलावे ही प्रक्रिया होणे महत्वाचे आहे. मातीच्या नांगरटीने जमिनीतील पोषक घटक सूक्ष्मजीव गांडुळे आदि वर येऊन ती पिकांस पोषक बनते तद्वतच घटना इथे अपेक्षित आहे.
“आवडले, भन्नाट” आदि प्रतिक्रियांचा उपयोग अधिक ब्लॉगपोस्टे लिहिण्यासाठी जोर येण्याकडे होत असला तरी अर्थपूर्ण वादाची खुमारी काही औरच असते. त्यातून एकमत झाले तर चविष्ट घास गिळून उदरी पोचल्याचे जे एक समाधान असते ते लाभते. नुसत्या चवीने समाधान पावत असते तर बरेच भोजन आपण निव्वळ चर्वणानंतर बाहेर थुंकून दिले असते. असो.
मराठी ब्लॉग्स हे माध्यम गांभीर्याने घेण्याइतपत वयात आले आहे का? असा एक प्रश्न टेकूप्रश्नांमधून उचलून मी काचपट्टीवर तपासणीकरिता घेत आहे. हा मामला गंभीर आहे. कोणतेही माध्यम गांभीर्याने घेण्याइतपत वयात आले आहे का? किंवा कधी आले होते का? असा उच्चीचा प्रश्न मीच उच्चारतो. इच्छा तर खूप आहे की घ्यावेच गांभीर्याने काहीतरी लोकांनी. परंतु इतक्या वर्षांच्या इतिहासात
लोकांनी पुस्तके वाचून, सिनेमे पाहून, नाटकांना जाऊन, टी .व्ही.ला तळावेपर्यंत डोळे लावून असे काय गांभीर्याने घेतले?
कोणत्या माध्यमाने काय बदल घडवला? “मनोरंजन आणि फक्त मनोरंजन” यापलीकडे जाऊन असे काय मोठ्ठे परिवर्तन केले लिखाण किंवा इतर दृकश्राव्य माध्यमांनी? आहे एखादे उदाहरण? घाला कानी जरा माझ्या..
झालेच असतील काही तर फक्त नकारात्मक परिणाम. सकारात्मक नव्हेच. केलाच असेल माध्यमांनी परिणाम तर तो येऊन जाऊन अश्लीलता हिंसाचार वगैरेंमुळे बाल-तरुण पिढीवर वगैरे होणारा. या परिणामांचे जे शाब्दिक लोणचे आपण घालून ठेवले आहे त्यास पाबळी धरली तरी बरणीचे फडके सोडण्यास आपण तयार नाही.
असे वाईट परिणाम बातम्यांमधून दिसत असले तरी माध्यमांना थोपवून ते परिणाम कमी होतील असे बिलकूल वाटत नाही. तोच तो सिनेमा पाहिलेल्या कोटीकोटी प्रेक्षकांतून दहा कंटक असे निघाले की त्यांनी पोलिसांना चौकशीत चित्रपटाचा दाखला दिला. आणि झाली बातमी की “उपरिनिर्दिष्ट चित्रपटापासून प्रेरणा घेऊन दोन तरुणांनी दरोडा घातला..”
दरोडा बलात्कार यांचे एकूण प्रमाण पूर्वीच्या तुलनेत काय आहे? त्यातले किती माध्यमांच्या पगड्यामुळे झाले हे कोण बघत बसणार. द्रौपदीच्या वस्त्रास हात घालण्यापूर्वी दु:शासनाने कोणता चित्रपट पाहिला होता? मुनव्वर शाह, जक्कल सुतारादि अधमांनी अनेक दशकांपूर्वी इंटरनेटवरून युक्त्या शिकून कांड केले का?
आणि घेतलेच लोकांनी काही गांभीर्याने तर पुन्हा याच माध्यमांचा वापर करून विपरीत लोकही आपापले अलकायदाविचार गांभीर्यावस्थेला पोहोचवू लागतील.
तर लिखाणादि मार्गांचे लोकांवर समाजावर वगैरे काही परिणाम होतात का? बरे किती वाईट किती? अशा शंकांच्या समाधानकारक उत्तरांसाठी समाजाची रेकॉर्डे तपासावी लागतील. त्यासाठी मुळात रेकॉर्डे ठेवावी लागतील. काहीच हाती नसताना ऐकीव बातम्यांवर किती विसंबावे आणि किती फेकवाक्ये टाकावीत?
तेव्हा ब्लॉग हे माध्यम मुसमुसत्या सुंदर वयात आहे पण गांभीर्याचे काय ते कठीण आहे एकंदरीत.
शब्दमर्यादेची ऐशी तैशी करून हजारेक शब्दांवर मी उभा आहे. आता मजकूर छापून यावा या अभिलाषेस्तव तो आटोपणे आवश्यक झाले आहे. ब्लॉगमाध्यमाच्या काही छिद्रांवर झटपट नजर टाकून गुंडाळतो.
ब्लॉगवर लेख लिहिला की पहिल्या दोनेक दिवसांतच मराठीब्लॉग्ज डॉट नेट आदींच्या कृपेने त्यास सढळ वाचकभेटी लाभतात. मात्र नंतर पुन:पुन्हा नवनवीन वाचकांपर्यंत पोहोचत राहण्यासाठी असणारे पर्याय अतिमर्यादित आहेत. चारेक दिवसांनंतर ती नोंद किंवा लेख कैलासवासी होतो. पुन्हा कधीच कोणाच्या नजरेत न येण्यासाठी.
ब्लॉगवर एकच वाचक पुन:पुन्हा येण्याचे प्रसंग मला कमीच आढळले. एकेकाळी प्रत्येक नोंद आवर्जून वाचणारे आपले वाचक अचानक इकडे फिरकेनासे होतात. आणि नवीन वाचक असेच थोड्या काळासाठी पुन्हा हजर होऊ लागतात. विशेषत: मध्ये थोडा काळ लिखाणात खंड पडला की झालेच हे सुरु. जुना सारा वाचक वर्ग आपल्यास विस्मृतीच्या कप्प्यात टाकून देतो. हेही साहजिकच म्हणावयाचे.
लिखाणात खंड येण्याचे प्रसंग भयंकरच असतात. लेखावर आलेली एखादी नकोशी तिखट प्रतिक्रिया, नैराश्य, संसारातील त्रिविध तापपीडा यांच्या सहयोगाने लेखन सातत्यात मोठमोठ्या भेगा पडून रुंदावू लागतात. परंतु आपल्या ब्लॉगराज्यात आपल्या वाचकांसोबत वास करण्याचा आनंद इतका लाजवाब असतो की आपापले अमृत मलम किंवा कैलास जीवन शोधून त्या भेगा बुजवल्या जातातच.
केवळ लिहायला काही न सुचल्याने ब्लॉग कायमचा बंद पडत नाही. आयुष्यात इतके काही काही खेळ घडत असतात की महिन्या दोन महिन्यांहून अधिक काळ लेखनबोळा टिकत नाही. कधीतरी पाणी वाहते होतेच राजापूरच्या गंगेसारखे.. एखादा ब्लॉग कायमचा बंद पडला की समजावे की ब्लॉगमालकास आनंदाचे याहूनही मोठे निधान गवसले.
०००
यॉनिंग डॉगचे नीरस पण प्रामाणिक उत्तर असे आहे:
आपल्या ब्लॉगवरच्या लिखाणाचं काय व्हावं असं तुम्हांला वाटतं?
बरेचदा वाटायचे की फेकून द्यावे, हे सर्व आपण लिहिले आहे हे कुणालासुद्धा कळू नये.
मधेच कधी वाटते की – मराठी विकीवर, मराठी भाषेतले ब्लॉगर व त्यांचे लिखाण या सदरात आपले लेखन असावे.
लिहिणं थांबू नये म्हणून तुम्ही काही करता का? काय? का?
काही करत नाही. काही लिहावेसे वाटले तर लिहीतो. कधी मनात नसतानासुद्धा लिहावे लागते.(उदाहरणार्थ खो – lol फॉर मेघना).
ब्लॉगपोस्ट्सना तत्काळ आणि थेट प्रतिक्रिया मिळतात. त्यांचा तुमच्या लिहिण्यावर काही परिणाम होतो का? असा परिणाम व्हावा की होऊ नये? कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया तुमच्या लिहिण्यासाठी थेट किंवा आडवळणानं उपकारक ठरतात?
परिणाम होऊ नये खरे तर पण परिणाम होतो. जरी लोकांचा विचार न करता आपल्याला हवेच ते लिहायचे असे ठरविले तरी काही वेळा सबकॉन्शिअसली पूर्वीच्या प्रतिक्रियांमुळे पोस्ट बदलते. प्रतिक्रियांमुळे पुढे इमेज वगैरे बनत जाते.
मला शक्यतो कधी लिखाणावर टीका करणार्‍या प्रतिक्रिया आल्याच नाही (फॉर विच आय वॉज डाइंग फॉर). अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या असत्या तर कदाचित अजूनही मी उत्साहाने ब्लॉगिंग करत असतो. अर्थात माझा अंदाज असा आहे की प्रत्येक वाचकाला माझ्याबाबतीत ही डझण्ट मीन व्हॉट ही इज रायटिंग असे वाटल्याने लोकं छान असे म्हणून पुढे निघून गेले असावेत.
बहिर्जी नाईक हे भयंकर भारी वाटतात मला. त्यांच्याएवढा खुल्या मनाने टीका स्वीकारणारा ब्लॉगजगतातील माणूस माझ्या पाहण्यात नाही. चांगल्या/वाईट प्रतिक्रियांचा व्यवस्थित विचार करून ते कधी आपल्या लिखाणात/ब्लॉगमधे बदलही करतात.
आपल्या लिहिण्यातले संदर्भ (परभाषेतील साहित्य, चित्रपट, संगीत, इतर आंतरजालीय दुवे, प्रताधिकार इत्यादी) आणि प्रमाणलेखन अचूक असावं म्हणून तुम्ही काय करता?
माझ्या पोस्टसमधे बरेचदा गाण्यांच्या ओळी येतात. लिहीताना त्या आठवल्या तरी पोस्ट प्रसिद्ध करण्यापूर्वी मी गाण्यासंबंधित अथवा इतर(http://www.azlyrics.com/) संकेतस्थळावर जावून ओळी बरोबर आहेत ना याची खात्री करतो.
प्रताधिकार वगैरे मुद्द्यांचा काही घोळ होईल असा अंधुकसा संशयही आला तर मी ते पोस्ट प्रसिद्ध करत नाही.
मराठी ब्लॉग्स हे माध्यम गांभीर्यानं घेण्याइतपत वयात आलं आहे का?
पास.
त्यात घाट आणि विषय या दोन्ही बाबतीत पुरेसे प्रयोग होताहेत असं तुम्हांला वाटतं का?
काही मोजके लोक भाषा/विषयाच्या बाबतीत प्रयोग करतात. तेवढे पुरेसे आहेत का नाही ते सांगू शकत नाही मी, मला कल्पना नाही.
इतर माध्यमांत सहजी होऊ शकत नाहीत असे काही प्रयोग या माध्यमातून करून पाहावेत, असं तुम्हांला वाटतं का?
इतर माध्यमांत सहजी होऊ शकत नाहीत असे काही नाही. ब्लॉगवर जे करता येते ते सर्व काही पुस्तक, सिनेमा, वर्तमानपत्रे यात होऊ शकते.
पण ब्लॉगवर सगळे काही फुकट व पटापट करता येते. काही चुकले तर सगळे उडवून पाटी कोरी करता येते.
ब्लॉग या माध्यमाची निवड करण्यामागची तुमचा हेतू काय होता? (उदा. आप्तांशी / स्वभाषेशी संपर्क, लिहिण्याची आणि प्रकाशित करण्याची निकड, स्वतःशी संवाद, इत्यादि)
ब्लॉग सुरू करतानाचे हेतू –
अ. टोपणनावाखाली थोडीशी प्रसिद्धी मिळवावी.
ब. वेळ घालवणे
क. कधी वाचताना, काही कार्यक्रम बघताना, लोक असे पुस्तक/स्क्रिप्ट का लिहीत नाहीत? असे वाटायचे, ते खरेच आपल्याला जमते का ते बघणे.
हा हेतू मनाशी धरुन सुरु केलेला ब्लॉग आता कुठे जाऊन पोचला आहे, आहे तिथेच थबकला आहे का वगैरे परिक्षण स्वतःशी तुम्ही कधी करुन पाहिलं आहे कां?
एका पॉईंटनंतर ब्लॉगर काही नवीन लिहू शकत नाही कारण तो लेखक नसतो. या मतामुळे आज आपला ब्लॉग मेल्यात का जमा आहे याचे कारण शोधत बसलो नाही मी.
ब्लॉगचं काही वेगळेपण तुम्हांला जाणवतं का?
फोरम्सवर नियमित लिखाण सुरु केले की जनसंपर्क अटळ आहे. बुजऱ्या व्यक्तिंना फोरम्स झेपत नाहीत. ब्लॉगवर कुठलेही सोंग सहज वठू शकते, फोरम्सवर ते अवघड आहे.
०००
आपल्या ब्लॉगवरच्या लिखाणाचं काय व्हावं असं तुम्हांला वाटतं?
खरे सांगायचे तर अजून ठरवले नाहीये. कदाचित भविष्यात ब्लॉगिंगसारखीच एखादी नविन सुविधा येईल की जिथे याचा उपयोग होऊ शकेल. सध्या तरी फक्त लिहीत रहावे असा विचार आहे.
लिहिणं थांबू नये म्हणून तुम्ही काही करता का? काय? का?
मी ठरवून लिहीत नाही. एखादा नवीन अनुभव आला की आपोआप लिहिल्याशिवाय चैन पडत नाही. पण बरेचदा असे होत नाही. तेव्हा लिहायलाच हवे असा माझा अट्टाहास नसतो. वेगवेगळे अनुभव घेत राहिलो तर लिहिणे त्याचे बाय-प्रॉडक्ट म्हणून आपोआप होईल असे मला वाटते. एखादा प्रवास, एखादे पुस्तक, एखादा चित्रपट.. अनुभव कुठल्या प्रकारचा असेल ते सांगता येत नाही. बरेचदा गोष्टी लक्षात येत रहातात आणि लिहायला बसलो की आठवत जातात.
मराठीबरोबरच मी हिंदी आणि इंग्रजी/इटालियन असे आणखी दोन ब्लॉगही सुरू केले होते. ते सध्या बरेच मागे पडले आहेत पण त्यांना चालना मिळावी म्हणून मी विशेष प्रयत्न करत नाहिये.
ब्लॉगपोस्ट्सना तत्काळ आणि थेट प्रतिक्रिया मिळतात. त्यांचा तुमच्या लिहिण्यावर काही परिणाम होतो का? असा परिणाम व्हावा की होऊ नये? कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया तुमच्या लिहिण्यासाठी थेट किंवा आडवळणानं उपकारक ठरतात?
माझ्या ब्लॉगमध्ये जे निरिक्षण आहे त्यानुसार लेख विनोदी असेल तर त्याला अधिक प्रतिक्रिया मिळतात. याउलट वैचारिक लेखांना तुलनेने कमी. पण म्हणून विनोदीच लिहीत रहायचे असे मला जमत नाही. प्रतिक्रियांचा परिणाम व्हावा किंवा नाही हे वैयक्तिक आहे असे वाटते. माझ्यावर होत नसावा असे मला तरी वाटते.
आपल्या लिहिण्यातले संदर्भ (परभाषेतील साहित्य, चित्रपट, संगीत, इतर आंतरजालीय दुवे, प्रताधिकार इत्यादी) आणि प्रमाणलेखन अचूक असावं म्हणून तुम्ही काय करता?
संदर्भ अचूक असावेत याची काळजी नेहेमी घेतो. त्यासाठी आंतरजालावर बरेचदा बराच वेळ घालवावा लागतो. प्रताधिकाराच्या बाबतीत माझी भूमिका थोडी वेगळी आहे. आंतरजालामुळे प्रताधिकाराची संकल्पना बदलायची वेळ आली आहे असे वाटते. उदा. विमानांचा शोध लागण्याआधी अमेरिकेत ज्याच्या मालकीची जमीन त्या जमिनीवरील आकाशही त्याच्याच मालकीचे असा कायदा होता. विमाने उडू लागल्यानंतर हा कायदा बदलावा लागला. यूट्यूबसारख्या सायटींमुळे संगीत, चित्रपट यांच्या प्रताधिकाराचा अर्थ बदलण्याची गरज आहे असे वाटते.
(http://www.youtube.com/watch?v=7Q25-S7jzgs) मात्र याचा अर्थ मराठी ब्लॉगवर जी सरळ ढापाढापी होते ती योग्य आहे असा अजिबात नाही.
मराठी ब्लॉग्स हे माध्यम गांभीर्यानं घेण्याइतपत वयात आलं आहे का?
सांगणे कठीण आहे. ब्लॉगची संख्या भरपूर वाढली आहे हे निश्चित, मात्र यातील वाचनीय ब्लॉग फारच कमी असतात. बहुसंख्य ब्लॉगवर तेच-तेच विषय, त्याच कल्पना सापडतात. माझ्या गूगल रीडर लिस्टमध्ये बहुसंख्य ब्लॉग इंग्रजी आहेत कारण त्यातील वैविध्य भरपूर आहे. मराठी ब्लॉगर्समध्ये जे बहुचर्चित आहेत ते आहेतच पण याखेरीज नवे आणि चांगले ब्लॉगर्स आहेत ते नाहीत कारण ते सापडण्याचा मार्ग नाही.
marathiblogs.net वर बरेचदा १०-१५ पाने धुंडाळूनही वाचण्यासारखे काही सापडत नाही. तेव्हा इंग्रजीशी तुलना करायची झाली तर मराठी ब्लॉग्जना बरीच मजल गाठायची आहे असे वाटते.
त्यात घाट आणि विषय या दोन्ही बाबतीत पुरेसे प्रयोग होताहेत असं तुम्हांला वाटतं का?
नाही. बहुतेक ब्लॉग रोजच्या घडामोडी, कथा किंवा कविता यामध्ये गुरफटलेले आहेत असे वाटते.
यातही आपण पोस्ट लिहीताना वाचकाला खरेच काही नवीन देतो आहोत का याचा विचार फारच कमी लोक करतात. आणि जे प्रथितयश ब्लॉगर्स आहेत ते बरेचदा या ना त्या कारणाने लिहीत नाहीत. परिणामी मराठी ब्लॉग्जमध्ये रोजच्या रोज वाचनीय सापडेलच असे नाही. एकुणात फारच कमी प्रयोग होत आहेत असे वाटते. (इथे परत नवीन चांगले ब्लॉग शोधायचे कसे हा मुद्दा येतो. १०० ब्लॉग शोधल्यावर दोन-तीन वाचनीय मिळणार असतील तर इतकी शोधाशोध करण्याइतका वेळ/शक्ती नाही.)
इतर माध्यमांत सहजी होऊ शकत नाहीत असे काही प्रयोग या माध्यमातून करून पाहावेत, असं तुम्हांला वाटतं का?
इतर माध्यमे म्हणजे त्यात फोरम्स एक असे गृहित धरतो आहे. सुरूवातीला मी एकच लेख ब्लॉग आणि फोरम दोन्ही ठिकाणी प्रकाशित करत असे. पण आजवर मी जितके मराठी फोरम्स पाहिले तिथे सगळीकडे वैयक्तिक हेवेदावे, राजकारण यांचा सुळसुळाट असल्याचे जाणवले. लेख प्रकाशित केल्यानंतर याचा परिणाम त्यावर होत असे.
मग लेख फक्त ब्लॉगवर ठेवायचे असा निर्णय घेतला. काही फोरम अजूनही वापरतो पण तिथे लिखाण शक्यतो नसते. फक्त लेखांना प्रतिक्रिया असतात.
ब्लॉग या माध्यमाची निवड करण्यामागची तुमचा हेतू काय होता? (उदा. आप्तांशी / स्वभाषेशी संपर्क, लिहिण्याची आणि प्रकाशित करण्याची निकड, स्वतःशी संवाद, इत्यादि)
मुद्दाम हेतू मनात धरून निवड केली असे झाले नाही. मराठी आंतरजालाचा शोध लागल्यानंतर लिहावेसे वाटले, ब्लॉग सुरू करायला सोपा आहे हे ही कळले, मग सरळ लिहायला लागलो. यामागे फारसा मोठा हेतू वगैरे नव्हता. मात्र आता याची इतकी सवय झाली आहे की न लिहीणे शक्य होईल असे वाटत नाही.
हा हेतू मनाशी धरुन सुरु केलेला ब्लॉग आता कुठे जाऊन पोचला आहे, आहे तिथेच थबकला आहे का वगैरे परिक्षण स्वतःशी तुम्ही कधी करुन पाहिलं आहे कां?
नाही. मला जेव्हा लिहावेसे वाटतो तेव्हा लिहील्याशिवाय चैन पडत नाही आणि ब्लॉग हे सध्यातरी त्यासाठी उत्कृष्ट माध्यम आहे असे वाटते. पुढे काय होईल सांगता येणार नाही पण सध्या ब्लॉग ज्या स्थितीत आहे त्याबाबत मी समाधानी आहे.
ब्लॉग आणि इतर आंतरजालीय माध्यमं (मुख्यत्वेकरून फोरम्स) यांत तुम्हांला काय फरक जाणवतो? या दोहोंत निवड करताना तुम्ही कोणत्या निकषांवर निवड करता? का? तसंच प्रस्थापित माध्यमांच्या तुलनेत (प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया) ब्लॉगचं काही वेगळेपण तुम्हांला जाणवतं का?
याचे उत्तर काही प्रमाणात क्रमांक सातमध्ये दिले आहे. फोरम्सवर तुमच्या लेखाला ज्या प्रतिक्रिया येतात त्यावर तुमचे नियंत्रण नसते. त्यामुळे बरेचदा “हितचिंतकां” मुळे लेख हायजॅक होणे यासारखे प्रयत्न होतात. त्यामानाने ब्लॉगवर स्पॅमसारख्या प्रतिक्रिया आल्या तर नियंत्रण तुमच्याकडे असते त्यामुळे मला लेखांसाठी ब्लॉग हे माध्यम अधिक आवडते.
ब्लॉग हे माध्यम प्रभावशाली आहे पण त्याचा तसा वापर व्हायला हवा. इंग्रजीत अनेक प्रथितयश लेखक, कलावंत, संशोधक ब्लॉग्जचा प्रभावीपणे वापर करातात. एखादा मानसोपचार तज्ञ मनाच्या गुंतागुंतीबद्दल विचार माडतो किंवा एखादा घर नसलेला (होमलेस) चक्क घर नसताना कसे रहावे, काय अडचणी येतील हे ही सांगतो.
त्या मानाने मराठीत चित्र फारच प्राथमिक आहे असे वाटते.
०००
ब्लॉग सुरू करताना माझा लिखाण जाहीर व्हावं एव्हढाच हेतू होता. ब्लॉग हे माध्यम निवडण्याआधी मी याहू, ऑर्कुटवरच्या कम्युनिटीजवर मी लिहीत होते. पण त्याला पर्सनल टच नव्हता म्हणून ब्लॉग. मी, मला, माझे, माझ्याविषयी आणि माझ्यापुरतं असा पूर्णपणे ’स्व’केंद्रित दृष्टिकोन.
आपल्याला नुसतंच काहीतरी वाटत असतं म्हणजे सुख, दु:ख, ecstacy वगैरे. पण हे नेमकं असं का वाटतंय याचा परामर्श घेणं तितकंच गरजेचं (असं मला वाटतं). मला माझ्या अनुभवांना शब्दात मांडताना त्रास होऊ शकतो कदाचित, पण तो शब्दात लिहीलेला अनुभव कोणालातरी रेडिमेड मिळून जातो, वाचकाला नेमका तेच आणि तसंच वाटत असतं पण नेमकं का आणि कसं हे व्यक्त करता येत नसतं. अशी कोंडी फ़ुटल्यावर वाचकाने दिलेली दाद माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस.
अनुभव, त्यावरच्या प्रतिक्रिया, विचारविमर्ष हे व्यक्तिसापेक्ष असतात आणि त्यामुळेच भिन्न असतात. अशा मतांचं स्वागत जरूर आहे पण त्यामुळे (निदान) आजवर माझ्या लिखाणावर परिणाम झालेला नाही.
एखाद्या अनुभवाबद्दल लिहावंसं वाटतं, एखाद्याबद्दल नाही. लिहिण्यासारखे अनुभव सातत्याने येतीलच असे नाही. त्यामुळे लिखाणात अनियमितता येते, अलबत! चालायचंच. महिन्यावारी बुंदीसारखी पोस्टस पाडली जाऊ शकत नाहीत. ( असं अर्थात पुन्हा मला वाटतं).
ज्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत त्याबद्दल मी खरंच विचार केलेला नाही. त्यामुळे उत्तरं दिलेली नाहीत. तरी क्षमस्व!
०००
आपल्या ब्लॉगवरच्या लिखाणाचं काय व्हावं असं तुम्हांला वाटतं?
प्रत्येक गोष्टीला तिचं असं नशीब असतं. सुरुवातीला मला मराठी लेखनाबद्दल फारसा आत्मविश्वास नव्हता. पण माझी मैत्रीण गायत्री नातू हिच्या आधारामुळे माझं लेखन उभं राहू शकलं. आता त्याला बरेच वाचक मिळाले आहेत. माझं लेखन लोकांना भावतं याचा आनंद निश्चित होतो. पण त्याचं काय व्हावं हे ते लेखन पुढे जाईल तसं आपोआप उलगडेल. 🙂
लिहिणं थांबू नये म्हणून तुम्ही काही करता का? काय? का?
लिहिणं थांबू नये म्हणून नक्कीच प्रयत्न करावे लागतात. मला, “एवढं लिखाण कसं काय जमतं बुवा? अभ्यास करतेस की नाही?” असे टोमणेवजा प्रश्न ब-याचदा विचारले जातात. पण माझा “वेळ मिळत नाही” या सबबीवर अगदीच विश्वास नाही. अवांतर कुठलीही गोष्ट असो. लेखन, वाचन, व्यायाम, स्वयंपाक, या सगळ्यासाठी वेळ काढावा लागतो. आणि उदरनिर्वाहासाठी सगळेच काही ना काही करत असतात, आणि ते आयुष्यभर सगळ्यांनाच करावं लागणार आहे. म्हणून काय आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य महत्वाचं नाही असं थोडी ना आहे? माझ्या कामात मला तासंतास एकटं प्रयोगशाळेत बसावं लागतं. कधी कधी मशीनवर सॅम्पलस लावून मी उत्तराची वाट बघत असताना मला एखादा पोस्ट सुचतो. मग दिवसभराची कामं संपेपर्यंत तो पुढे ढकलावा लागतो. बसमधून घरी येताना, मग घरापर्यंत चालताना तो कसं लिहायचा याचा विचार होतो. भाजी चिरताना त्याच्यात गमती-जमतीची फोडणी घातली जाते. आणि मग भांडी घासताना शेवट कसा करायचा याचा विचार होतो. ही सगळी प्रक्रिया, जोडीला येणारी कामं सुसह्य करते. पोहताना, पळताना, योगासनं करतानादेखील मी लेखनाचा विचार करते. आणि विचार पूर्ण झाला की लिखाण दहा मिनिटात संपतं. पण कधी कधी मात्र प्रतीभादेवीची आराधना करावी लागते. एखादा दुर्मीळ रिकामा दिवस मिळाला की काही लेखन सुचत नाही. मला वाटतं, लेखन ही माझ्या नेहमीच्या आयुष्यातून मी काढलेली एक गोड पळवाट आहे. पण “काल पोस्ट लिहिलास ना? आता आज थेसिसचा हा भाग पूर्ण झालाच पाहिजे”, असं रागवायला मनात कुठेतरी एक आज्जीबाई दडून बसलेली असतेच.
ब्लॉगपोस्ट्सना तत्काळ आणि थेट प्रतिक्रिया मिळतात. त्यांचा तुमच्या लिहिण्यावर काही परिणाम होतो का? असा परिणाम व्हावा की होऊ नये? कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया तुमच्या लिहिण्यासाठी थेट किंवा आडवळणानं उपकारक ठरतात?
सुरुवातीला प्रतिक्रिया मिळण्याचं फार अप्रूप होतं. पण आता तो उत्साह ओसरला आहे. पण मित्र-मैत्रिणींकडून आणि आई-बाबांकडून लेखनाची समीक्षादेखील होते. त्याचा मला फायदा झाला आहे. अर्थात माझे सगळे समीक्षक आधी वाचक असतात. चांगली समीक्षा मनापासून वाचणारा वाचकच करू शकतो. त्यामुळे कुणाचं म्हणणं मनावर घ्यायचं आणि कुणाचं सोडून द्यायचं हे कळायला थोडा वेळ लागला.
मराठी ब्लॉग्स हे माध्यम गांभीर्यानं घेण्याइतपत वयात आलं आहे का?
माझ्या मते काहीही दर्जेदार वाचण्यासाठी कुठल्याही भाषेत तेवढेच प्रयत्न करावे लागतात. मराठी ब्लॉगविश्वात बरेच चांगले मुरलेले लेखक आहेत. माझे आवडते ब्लॉगर्स खूप आहेत. काही उदाहरणे द्यायची झाली तर गायत्री नातू, राजेंद्र क्षीरसागर, चिमण (माझं चा-हाट), धोंडोपंत आपटे, प्रसाद बोकील, नंदन होडावडेकर, अ सेन मॅन आणि मंदार गद्रे.
०००
ब्लॉग सुरू करण्याआधी मायबोली.कॉम या फोरमवर (बहुतांशी कविता) लिहीत होते. कालांतराने त्यातून वैयक्तिक ओळखी होत गेल्या. हळूहळू साहित्यिक आणि वैयक्तिक संबंधांत एकमेकांची (बरीवाईट दोन्ही प्रकारची) भेसळ होते आहे असं वाटायला लागलं. मग काही काळ प्रकाशित करणंच थांबवलं. पूनम( छत्रे)ने या तेव्हा नव्याने लोकप्रिय होऊ घातलेल्या माध्यमाबाबत सुचवलं. ‘मोटिव्हेशन’ म्हणून ट्यूलिपचा ब्लॉग वाचायला दिला. एखाद्याचं चवीने सजवलेलं घर, त्यातल्या मोजक्या पण उंची आणि देखण्या वस्तू (आणि तिथे आग्रहाने मिळालेला नेमक्या प्रमाणात दूध/साखर घातलेला सुगंधी वाफाळता चहा! :D) वगैरे बघून आपलंही घर असावंसं वाटतं तसं झालं. मी दुसर्‍याच दिवशी या ‘साहित्य सहवासा’तला (फुकट!) गाळा घेऊन टाकला! 🙂
पूर्णपणे अनोळखी वाचक मिळण्याची शक्यता हे एक मोठं आमिष होतंच. तसं झालंही.
माझ्या ब्लॉगवर बहुतांशी कविताच आहेत. ‘कवितांचा ब्लॉग हा ब्लॉगच नव्हे’ असा एक मतप्रवाह आहे. तो मला नीटसा कळलेलाच नाही – मान्य होणं अर्थातच दूरच. कारण माझ्या बाबतीत तरी कविता या त्या त्या वेळच्या मनःस्थितीचा आरसाच असतात. हिचकॉक म्हणायचा ‘ड्रामा इज लाइफ, विथ डल् बिट्स कट आऊट.’ ललित फॉर्ममध्ये लिहिलेले बरेच ब्लॉग्ज दिसतातच. कविता ‘डल् बिट्स’ कापून काढण्यातली त्यापुढची पायरी गाठतात, नाही का? (नाही, हा प्रश्न नाहीये. तुम्ही मला ही प्रश्नावली पाठवलीत त्यावरून तुम्ही गद्य-पद्य असा वर्गभेद मानत नाही हे उघड आहे. आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन! :D)
अभिप्रायांचा (इगो तात्पुरता सुखावण्यापलिकडे) माझ्यावर परिणाम होत नाही. त्यानंतरच्या लेखनावर तर नाहीच नाही. कारण माझं लेखन हे बहुतांशी निचरा याच सदरात मोडतं. एखादी भावना/कल्पना/विचार पिच्छा पुरवतोय आणि त्याबद्दल इतर कोणी लिहिलेलं आपल्या वाचनात आलेलं नाही – इतकं पुरतं. ‘लिहिता येणं’ हे एका अर्थी ड्रायव्हिंग येण्यासारखं आहे. त्यात विचार असिमिलेट करता येणं, ते नेमकेपणे उतरवण्याइतकी शब्दसंपत्ती असणं आणि एकूण लिहिलेलं वाचनीय होण्याइतकं आर्टिक्युलेशन – या कालांतराने आपोआप जमणार्‍या बाबी असतात. पण गाडी काढून कुठेतरी जाण्याची उर्मी येणं महत्त्वाचं. उर्मी ठरवून येत नाही, त्यामुळे लेखन करण्यासाठी / न थांबण्यासाठी काही ‘करण्याचा’ प्रश्नच उद्भवत नाही. ड्रायव्हिंग येतं म्हणून एखाद्याने स्वतःला ड्रायव्हर समजायला लागणं जितकं ऍबसर्ड तितकंच लिहिता येतं म्हणून लेखक या रोलशी आयडेण्टिफाय करणं. ते साधनच आहे, साध्य नाही.
एकूणात मराठी ब्लॉगविश्वाबाबत वगैरे मत व्यक्त करण्याइतकी मला त्याची माहिती नाही. आणि खरंतर असं कुठलं जनरलायझेशन शक्य आहे (माध्यमच्या माध्यम वयात आलंय का – वगैरे) असं मला वाटत नाही.
***
Facebook Comments

1 thought on “परिसंवाद”

  1. काय लिहू? हे जे काही विचारमंथन केलं गेलं आहे ते फार ग्रेट आहे. (मी का लिहितो? रादर का लिहित नाहीये?? ह्याच प्रश्नाच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो.) तात्पुरतं येथेच थांबतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *