Uncategorized

बी. पी. ओ.

इथे या फ्लोअरवर व्हॉईस बेस्ड प्रोजेक्ट कुठलाच नाही. अर्ध्या भागात ई-मेल सपोर्ट आणि अर्ध्या भागात रिमोट असिस्टन्स. म्हणजे सर्वांचं काम स्क्रीनवर, पण कस्टमरशी फोनवर इंटरएक्शन नाहीच.
म्हणून मग इथे एक जबरदस्त बास ब्लास्टरवाला स्पीकर बॉक्स दणादणा एमपीथ्री वाजवत असतो. बाहेरून कोणी आला,, तर डिस्को आहे असंच वाटेल. आम्ही बहुतेक पोरंपोरी कार्गो, चिनो किंवा बर्म्युडामध्ये शिफ्टला येतो. यू. एस. प्रोसेस असल्यामुळे नेहमीच नाईट शिफ्ट. फक्त वेळ बदलते.
म्हणजे संध्याकाळी चार ते रात्री बारा – डे शिफ्ट. त्यात व्हॉल्यूम काहीच नसतो. नुसताच बसून टाईमपास.
रात्री दहा ते सकाळी सात – नाईट शिफ्ट.
रात्री दीड ते सकाळी साडेदहा – ग्रेव्हयार्ड शिफ्ट.
पहाटे चार ते दुपारी एक – ‘सजा-ए-कालापानी’ शिफ्ट.
‘सजा-ए-कालापानी’साठी रात्री दोन वाजल्यापासूनच पिकअपची गाडी घरोघरी यायला सुरुवात होते. पिव्वर येडझव्यासारखे सगळेजण आपापल्या बिल्डींगखाली येऊन रात्री दोन वाजता एकेकटे अंधारात उभे असतात. जस्ट लाईक झोंबी. आणि या शिफ्टच्या लोकांना दुपारी सगळ्यांना सोडत सोडत परत घरी पोचायला संध्याकाळच होते. नींद की मां भैन एक. सजा-ए-कालापानी इज ब्लडी परफेक्ट नेम फॉर इट.
कस्टमरच्या मेल आल्या तरच उत्तर द्यायचं. क्यूमध्ये मेल नसल्या तर बसा चकाट्या पिटत. ऐका एमपीथ्री. बघा यु ट्यूब. आणि उलट कानाच्या क्यूमध्ये मेल हजारांनी आल्या, तर मग मारा बूच आणि बसा मेलला रिप्लाय ठोकत. “काना” हे आमचं मेल हँडलिंग सॉफ्टवेअर आहे. वर्कलोड कितीही असू दे, पण शिफ्टची वेळ संपली की त्या सेकंदाला “काना” मेलबॉक्समध्ये चालू असलेला मेलही परत मेन क्यूमध्ये टाकायचा आणि काना बंद करून चालू पडायचं. बाहेर सुमो वेट करत असतेच. लेट सिटींग-बिटिंग काही नाही. कधी बसलात, तर तुमचा चॉइस आणि त्याच्या सॅलरीच्या डबल ओव्हर टाईम भेंचोत.
भेंचोत हा शब्द इथे कॉमा किंवा कुठलाही पंक्चुएशन मार्क म्हणून घ्यायचा. शिवी नाहीच आहे ती इथे. म्हणजे-
“कॉफी मशीन बंद है क्या भेंचोत”?
“क्या चिकन दबाया कल केएफसी में भेंचोत.”
“अरे तू बीमार था क्या भेंचोत? अब ठीक है ना? दवाई बिवाई लेने का हां भेंचोत.”
“कुर्ता मस्त है रे तेरा भेंचोत. गायत्री मंत्र है क्या? किधर मिला? फॅब इंडिया?”
बॉस म्हणून काही प्रकारच नाही. टीम लीडर आणि टीम मॅनेजर तर आपल्यातलेच एक. कधी कधी यू. एस. वरून डायरेक्टर जरी आला तरी त्याला “हाय डेव्ह” म्हणून आम्ही सगळे हाक मारतो.
फ्लर्टिंग आणि ब्रीदिंग इथे एकच. म्हणजे टंच पोरी आणि चमडी पोरं ठासून भरलेली.
“सो कॅन वी डू इट टुनाईट?” असं फालतूगिरीमध्ये कोणी पोरगा कोणत्यातरी पोरीला विचारतो आणि पोरगी “शाडा SS प सॅम,” म्हणून त्याला कुल्ल्यावर फटका देऊन हसत पुढे जाते. हे ऐकून मला एकच वाटतं की अरे यार उलट्या लटकलेल्या वट्वाघुळासारखं आपलं उलटं लाईफ आहे आणि तू तिला “टुनाईट” काय विचारतोयस? “कॅन वी डू इट टुडे?” असं विचार ना.
थोड्या दिवसांपूर्वी मंथली पार्टी चालू होती. आम्ही शिफ्टच्यामध्ये अर्ध्या तासाचा ब्रेक घेऊन पार्टीत आलो होतो. आम्ही म्हणजे मी आणि विली. विली जोन्स. डीजे रंगात आला होता.
मी आणि विली क्लीव्हेजेस मोजत आणि क्लीव्हेज रेटिंग करत उभे होतो. ऑन द स्केल ऑफ वन टू टेन. “वन,” “थ्री,” “ओ SS ह शिट! एट!” असं रूलप्रमाणे टेनच्या आत रेटिंग देणं चाललं होतं. मधेच कंट्रोल सुटून मी सिंडीला वीस दिले तेव्हा विली चवताळला आणि त्याने लॉराला फिफ्टी दिले.
वी आर लाईक दॅट ओन्ली. वी विल कूल डाऊन व्हेन वी गेट कूलंट.
विली मला म्हणाला, “फक मॅन, बियर क्यू नाही रखते यार इधर. सडेला पार्टी साला.”
मी म्हटलं, “अबे नीचे देख तोंद तेरी. नगारा बना हुआ है. और चले बियर मारने. टेल मी द ट्रुथ विली. व्हेन डिड यु लास्ट सी युअर वी वी? दिखता है क्या साले कुत्ते तुझे खुद के पेट के नीचे का कुछ? “
“गॅरी शाडाप यू बास्टर्ड,” विली मला म्हणाला.
बाय द वे. गॅरी ग्रीन, विली जोन्स, सिंडी रॉस वगैरे ही आमची खरी नावं अर्थातच नाहीत. मी गॅरी म्हणजे गिरीश राजे. आणि विली म्हणजे विलास उचगावकर. सिंडी म्हणजे संध्या चिल्लाळ. यूएस प्रोसेसमध्ये आम्हांला कंपल्सरी इंग्लिश नेम्स घ्यावी लागतात. अमेरिकन्स कान्ट आयडेंटिफाय विथ इंडियन नेम्स. म्हणून.
विलीला आपलं उचगावकर हे आडनाव अजिबात आवडत नाही. मग तो एक्सेंटमध्ये उच्चगाऑनकर असं काहीतरी म्हणतो. सेम वे संध्याला चिल्लाळ या नावाची इतकी शरम आहे की ती त्याचा उच्चार चिलॉल असा करते. तेही अगदी नाईलाज झाला तर.
एक जबरदस्त इश्यू म्हणजे इंडियन अक्सेंट. आम्ही ई-मेल प्रोसेसमध्ये असल्यामुळे आम्हांला अमेरिकन अक्सेंट शिकायला लागत नाही. व्हॉईस प्रोसेसमध्ये मात्र ब-याचदा अमेरिकन कस्टमर इथल्या इंडियन्सचा अक्सेंट ओळखतात आणि जबरदस्त शिव्या घालतात. क्लीअरकट सांगतात की “आय वांट एन अमेरिकन गाय टू हेल्प मी. आय नो यु आर ब्लडी बास्टर्ड इंडियन्स टेकिंग अवर जॉब्स.”
एखादा तर अडूनच बसतो, की मला तुझ्या अमेरिकन बॉसशी जोडून दे. मग आमच्या व्हॉईस टीमची पोरं तो कॉल त्यांच्या टीम मॅनेजरला ट्रान्स्फर करतात. तो टीम मॅनेजर आहे निक गेलर, म्हणजे निखिल गुळवणी. पण त्याला अमेरिकन अक्सेंटचा खूप एक्सपीरीयन्स आहे. तो करतो बरोबर हँडल. सॉरी-बिरी म्हणून.
मग ज्याच्या इंडियन अक्सेंटमुळे हे प्रकरण झालं त्याला कधीकधी अमेरिकन अक्सेंट रिफ्रेशर ट्रेनिंगला पाठवतात. परत असं इंडियन म्हणून पकडलं जाऊ नये म्हणून.
भरकटलो पुन्हा.
तर मी आणि विली पार्टीची मजा बघत उभे होतो. तेवढ्यात शनाया, म्हणजे सोनिया अग्रवाल एकदम पार्टीत घुसली. ती ख्रिससोबत आली होती. ख्रिस म्हणजे कृष्णा, किंवा ‘क्रिश्ना’ गोरक्षकर. मराठी पोराला शनाया पटली याचा आम्हांला अभिमान वाटावा की दु:ख असा प्रश्न पडला होता.
“आयला. पीछे से पकडने का मन हो रहा है यार!”, शनायाकडे पहात विली फुरफुरला. साला उचगावकर असूनही नेहमी हिंदीच फाडतो साला.
“विलास उचगावकर. होल्ड युअर हॉर्सेस,” विलीला आवरायचं असलं, जमिनीवर आणायचं असलं किंवा त्याचे चढलेले टकीला शॉट उतरवायचे असले की मी मुद्दाम त्याचं लाजिरवाणं इंडियन पूर्ण नाव घेऊन बोलतो. सोनियानं स्पघेटी टॉप घातला होता. ओह शिट. शी हॅड नॉट लेफ्ट एनिथिंग टू इमॅजिनेशन.
आमचा थर्टी मिनिट्सचा ब्रेक संपायला दहा मिनिटं बाकी होती. लॉनवर पार्टी फुल्ल झगमगत होती. तेवढ्यात शनाया आमच्या बाजूला येऊन भिंतीला टेकून धपापत्या छातीनं (उफ मा!) उभी राहिली. थोडाच वेळ, पण जोरात नाचून ती दमली होती. डीजेनं ऐका दाजीबाचा रिमिक्स लावला. माझी आणि विलीची पावलं वाजायला लागली. मला तर नाशिक ढोल रिदमवर करतात तसा झांगडू डान्स करण्याचा मूड आला.
मग मी आणि विली सुरू झालो. दाजीबा… दाजीबा… दाजीबा…
“ओह फ- फिश!”, शनाया चीत्कारली. तोंडातून गळायला आलेला “फक” ऐन वेळी गिळायला आमच्या पोरी त्याचा “फिश” करतात.
“व्हॉट?” मी विचारलं.
“क्या थकेला गाना लगाया है यार. कान्ट ही पुटऑन सम इंग्लिश ट्रॅक? क्या सस्तावाला मर्राटी डीजे लेके आये है. शिट.”
आम्ही दोघे नाशिकढोल नाच थांबवून उभे राहिलो. आयला, आमचा कचरा झाला होता.
मग मराठी माणूस म्हणून मी थोडा भडकलो. पण जवानी अंगात भरलेल्या, स्पघेटी टॉप घातलेल्या, घामाने भिजलेल्या, धपापत्या उराच्या पोरीवर कोणत्याही पॉइन्टवरून किती चिडणार? आय मीन, पाण्यात बुडवलेला सिगारेट लायटर किती पेटणार?
“ठीक ही तो है साँग,” मी कसंतरी एवढंच बोललो. दॅट वॉज मॅक्झिमम प्रोटेस्ट आय कुड शो. आपले “प्रोस्टेट” जोपर्यंत तरुण आहेत, तोपर्यंत पोरींसमोर नो “प्रोटेस्ट”.
“कम ऑन डियर. व्हॉट सडा हुआ गाना ही इज प्लेईंग यार,” शनाया हिंग्लिशमध्ये बोलली. तिचे ओठ ग्लॉसी होते. पिघळलेल्या टोब्लेरॉन चोकलेटसारखे. मलाही मग विलीसारखंच काय काय व्हायला लागलं. मराठीचा पॉइन्ट विरघळून गेला. असेही आम्ही काय आणि किती मराठी होतो की शनायाशी त्यावरून भांडावं?
खुद फूल को भंवर क्या बताये की कौनसी खुशबू बिखेरे…?
माझ्या खिशातून माझा नवा कोरा आयफोन हँडसेट दिसत होता. एकदम लेटेस्ट पीस.
“ओह,” शनाया आयफोन बघून एक्साईट झाली आणि माझ्याजवळ येत म्हणाली, “कॅन आय हॅव्ह अ लूक एट धिस वन?”
“कॅन आय हॅव्ह अ लूक ऍट धिस स्तन?”, तिच्याच टोनमध्ये -हाईम केल्यासारखा माझ्या कानाला लागून विली खुसफुसला.
आता विलीला वेळेत आवरलं नाही, तर हेल वॉज गोना ब्रेक लूज. अशीही माझ्या आयफोनमध्ये फारच हॉट पिक्स होती. शनायाला दिला असता आणि ती फोनच्या मेन्यूत शिरली असती, तर मोठी सिच्युएशन तयार झाली असती.
मला या आयफोनची एवढीच एक कटकट झाली होती की फ्लोअरवरचा जो तो पोरगा आणि पोरगी तो बघायला मागायचे. आणि थोडा वेळ तो द्यायला लागायचा. मागणारी पोरगी असली की तेवढा वेळ टेन्शन हे असायचं की ते एक्स रेटेड विडीओज तिने बघितले तर? आणि आणि कोणी बघेल या टेन्शनपायी ते डिलीट करायचीही माझी इच्छा नव्हती. व्हाय कान्ट पीपल रिस्पेक्ट अदर्स प्रायव्हसी?
आता कल्टी मारायला हवी होती.
“ओह शिट. अवर ब्रेक इज ओव्हर,” मी विलीला ओरडून म्हटलं. आणि त्याला खेचत घेऊन फ्लोअरवर पळालो.
त्यानंतर थोडया वेळाने शनायाचाही थर्टी मिनिट ब्रेक संपला आणि तीही फ्लोअरवर आली.
मी ऑलरेडी कानात घुसलो होतो. “काना”च्या क्यूमध्ये पाचशे मेल पेंडिंग होत्या. एएचटी, एव्हरेज हँडलिंग टाईम पर मेल, सहा मिनिटं असायला हवा. तो दहा मिनिटांवर पोचला होता.
“श्वेता, श्वेता. टेक इट ईझी. कूल इट.” अचानक शनायाचा आवाज माझ्या कानात घुसला आणि “काना”तून माझं लक्ष उडालं. श्वेता महागावकर एकदम साधी पोरगी आहे. श्वेताचं अमेरिकन नाव बेटी कॉकर आहे. तिची सिम्प्लिसिटी बघून नेहमीच मला असं वाटतं की ती इथे बी.पी.ओ.मधे यायला फिट नाहीये. तशीही ती नवीनच जॉईन झालीय. मी वळून आरएच्या फ्लोअरकडे बघितलं, तर श्वेता हुंदके देत होती आणि तिने स्वत:चा चेहरा हाताने झाकून घेतला होता. मग मी उठून तिच्या डेस्कजवळ गेलो. शनायाही तिथेच उभी होती. झालं होतं काय की, श्वेता एका कस्टमरचा इश्यू रीमोट असिस्टन्सने रीझॉल्व्ह करत होती. त्या माणसाचा डेस्कटॉप तिच्या समोर उघडला होता. त्या डेस्कटॉपवर खूपच पोर्नोग्राफिक वॉलपेपर होता. ट्रिपल एक्स मूव्हीतला स्क्रीनशॉट मारल्यासारखा. एक्चुअली बोथ देअर ऑर्गन्स वेअर व्हिजिबल. आणि आरए सोफ्ट्वेअरच्या चॅट विन्डोमधे कस्टमरचा प्रश्न होता. “हे बेटी. होप यू डोन्ट माईन्ड माय वॉलपेपर.”
ही सरळ सरळ सेक्शुअल हॅरॅशमेन्ट होती. काही वेळेला असे कस्टमर पोरींच्या वाट्याला येतात. पण श्वेतासारखीला हे सहन होणं शक्यच नव्हतं. शनायानं श्वेताला ब्रिफली जवळ घेतलं. मग तिला उठायला सांगून तिची सीट घेतली आणि त्या कस्टमरला हॅन्डल करायला सुरुवात केली. “प्लीज बी इन्फॉर्म्ड दॅट धिस इज अ प्रोफेशनल कॉन्वर्सेशन. आय रीक्वेस्ट यू टू रिमूव्ह द कन्टेन्ट फ्रॉम युअर डेस्कटॉप. धिस विल एनेबल मी टू असिस्ट यू फर्दर.”
शनायानं खूपच प्रोफेशनली हॅन्डल केलं होतं. त्या प्रसंगामुळे शनायाबद्दल माझ्या मनात एकदम रिस्पेक्ट कम अट्रॅक्शन तयार झालं. मी आणि विलीनं तिला स्पेसिफिकली कॉमेंट दिली, “शी इज सो प्रोफेशनल”.
मग ती मनातून खूष झाली आणि जास्त मैत्री सुरू झाली.
नंतर आठवड्याच्या आतच म्हणजे खूपच थोड्या काळाच्या स्पॅनमध्ये शनायानं मला आणि विलीला आपल्या याहूमेसेंजर आणि बाकी सगळ्या चॅटमध्ये इन्क्लूड केलं. तेवढीच आमची प्रोग्रेस.
काम चालू असतानाही आम्ही त्यावर मधेच गप्पा मारायचोच. एएचटी गेला खड्ड्यात. शनाया – सोनिया तुमच्याशी चॅट करतेय आणि तुम्ही कसली एएचटीसोबत झक मारताय.
माफक फ्लर्टिंग आणि इव्हन नॉनव्हेज जोक्सही चालायचे चॅटवर. मग विली चेकाळायचा.
त्यानंतर आठ दिवसांतच आम्ही एका प्रायव्हेट पार्टीला गेलो. वीकएंडला लोड जरा कमी असल्यामुळे शिफ्ट अड्जेस्ट करून जमलं. पूर्ण टीम कधीच एकत्र बाहेर पार्टी करू शकत नाही. फक्त एक “बाय इन्व्हिटेशन” ग्रुप आहे. तो करतो अश्या पार्ट्या. विलीच्या पीपल नेट्वर्किंग स्किलमुळे त्याला अशा पार्ट्यांना नेहमीच बोलावतात. आणि मला तो घेऊन जातो.
पार्टी सिटीपासून खूपच लांब होती. तिथे पोचायला रात्र झाली. पण तरीही फोनचं कव्हरेज फुल होतं. जीपीआरएससुद्धा तिथे चालत असल्यामुळे मी मस्तपैकी सर्फिंग करत टाईमपास केला. बरेच लोक ऑन द वे टल्ली झालेलेच होते. मी तिथे पोचल्याबरोबर खटाखट माझे नेहमीचे तीन आरसी लार्ज लावले आणि गम्मत बघत बसलो.
तुमचं इंटेन्शन धुंद होण्याचं आहे ना? मग तीन लार्ज पेग आरसी किंवा तुमची आवडती कोणतीही ४२ टक्के अल्कोहोलवाली दारू घट घट घट करून घ्या. आणि मागे रेलून एन्जॉय करा. उगीच दारूचा स्वाद कसा, ती “नोज”ला कशी वाटते, आरोमा कसा आहे, पॅलेटवर कसा फील देते का, ड्राय आहे का, फूड पेअरिंग विथ अल्कोहोल, असली प्रोफेशनल “टेस्टर”सारखी नाटकं करू नका. दारू कडूच असणार. तिचा उपयोग झिंगायला होतो. तो तसा करा. आणि तीन म्हणजे तीनच. कारण मला माहीत आहे की याहून एक थेंब जरी जास्त घेतला तरी सगळ्या हाय मूडचं गटार होणार. मग मळमळ, उलट्या आणि दुस-या दिवसापर्यंत अंगात कचकच.
कोणीतरी म्हटलंय ना की चित्र काढताना राईट टाईमला ब्रश खाली ठेवण्यात खरी गम्मत. मग नुसतं ते चित्र बघत राहायचं. रंग भरून झाले तरी परत परत ब्रश फिरवत राहून नुसताच बरबटा होतो.
पार्टी जिथे होती ते कोणाचं तरी फार्म हाउस होतं. मस्त मेंटेन केलेलं होतं. तिथे मी पहिल्यांदाच पोरापोरींना एलएसडी घेताना बघितलं. आधी मला वाटलं की ते शुगर क्यूब का बरं खातायत? चकणा तिखट लागला असेल. शुगर क्यूब मधून एलएसडी ड्रॉप्स घेतात हे मला त्याआधी माहीत नव्हतं. आय मीन, मी इतका बावळट अजूनही आहे. मला त्यांच्या ड्रग्ज घेण्याच्या पद्धती लक्षात येत नाहीत. ब्रेकमध्ये बी.पी.ओ. बिल्डींगच्या बाजूला असलेल्या मोडक्या मिलच्या आडोशांना पोरं स्मोक करतात. मी एकदा अशा ग्रुपमध्ये जाऊन उभा होतो. आणि स्टाईल म्हणून एक पफ मागितला. तेव्हा माझ्या हातात सिगारेट देताना सगळे फिसफिसत हसले. एक जण म्हणाला, “संभालके गॅरी ग्रीन. नही तो गॅरी रेड बन जायेगा.” मग मला कळलं की ते हॅश घेताहेत. मी आधी थोडा दचकलो. पण नंतर ते खूपच कॉमन असल्याचं लक्षात आलं आणि त्यात काही इल्लिगल वाटेनासं झालं.
तर त्या पार्टीत शनायाही होतीच. ती अशा ठिकाणी असतेच. आणि तिच्यासारख्या सेक्सी पोरी असतात म्हणून विली तिथे जाण्यात इन्टरेस्टेड असतो. जवळ-जवळ सर्वांनी दारूशिवाय काहीतरी एक्स्ट्रा घेतलंच होतं. मेजॉरीटी एलएसडी. कुठून स्टॉक मिळवतात काय माहीत. काही अनोळखी चेहरे दिसत होते. तेच या एलएसडीचे सोर्सेस असणार. शनाया एकदम कोप-यात जाऊन गप्प बसली होती. डोळे अर्धे मिटलेले आणि ओठांवर थोडीशी स्माईल. तिनं शुगर क्यूब घेतला होता. हॅल्यूसिनेट व्हायला आत्ताच सुरुवात झाली असणार.
मी तिच्या जवळ गेलो. लालचुटूक मिनिस्कर्ट आणि तोही वर सरकलेला. डोकं मस्त हवेत उडायला लागलं होतं. पण मला तिच्याशी ड्रग्जवर बोलायचं नव्हतं. उगीच मूडचा बेसनलाडू कुस्करला गेला असता.
एरोस्मिथचं “लिव्हिंग ऑन दि एज” लागलं होतं. त्यात लीड सिंगर “त्यात्यात्यात्याSSS” करून ओकल्यासारखा मस्त किंचाळत होता. एकूण मूडशी मॅचिंग गाणं होतं.
मी शनायाला म्हटलं, “आय लाईक एरोस्मिथ.”
ती म्हणाली, ”ओह. डोन्ट टेल मी. आय ल्लव्ह एरोस्मिथ. देअर साँग्ज आर माय लाईफ… येस्स. आय एम लिव्हिंग ऑन दि एज… या… आव.” ती खूप हाय व्हायला लागली होती.
“मेरे पास इस गाने का एमपीथ्री है. चाहिये तुझे?” शनाया मला म्हणाली.
ओह शिट. शनाया वॉज गिव्हिंग मी समथिंग. काही का असेना.
“शुअर. दे, दे ना,” मी म्हणालो.
“तेरा फोन दे इधर. मैं ट्रान्स्फर करके देती हूं. ब्लूटूथ ऑन कर.”
रिफ्लेक्सनं फोन खिशातून बाहेर तर काढला आणि मी पुन्हा अडखळलो. फोन कसा द्यायचा? हॉट पिक्स. मेन्यू. विडीओज. ते हिनं बघितले तर?
“दे ना यार. स्लो बम!”
तिनं माझ्या हातातून माझा फोन ओढून घेतला. तिनं तिचा ग्लास माझ्या हातात दिला आणि मग एकदम माझ्या कानाला लागून म्हणाली, “हे डियर. आय एम गॉन. आय एम नॉट एबल टु स्टँड अप. मेरे लिये ये भरके लायेगा क्या स्वीट हार्ट…”
आयला. बसल्या जागी दारू हवी म्हणून स्वीटहार्ट? मी चुपचाप ग्लास घेऊन चालू पडलो. टेबलजवळ गेल्यावर लक्षात आलं की या पाघळण्याच्या नादात मी तिच्या ग्लासात नेमकं काय भरून आणायचं ते विचारायचं विसरलो होतो. मी परत शनाया जवळ गेलो आणि विचारलं, “व्हॉट विल यु हॅव्ह?”
“स्मरनॉफ,” ती म्हणाली. पण तिचं सगळं लक्ष फोनमध्ये.
“आय एम ट्रान्सफरिंग द साँग टु यू. ब्लूटूथ पासवर्ड है क्या?”
“हां. वन टू थ्री फोर. डालो,” माझे पासवर्ड फालतूच असतात. मी परत जाऊन तिच्या ग्लासात व्होडका आणि स्प्राईट भरून आणलं आणि तिला दिलं. तेवढ्यात मुतायला लागली म्हणून टॉयलेट शोधत गेलो. ते कुठेतरी फार्म हाउसच्या मागच्या बाजूला होतं. आणि तिथे गेल्यावर एक गायीएवढ्या आकाराचा कुत्रा माझ्याकडे रोखून बघायला लागला. त्यानं एकदाच “भाफ्फ” केलं. तेवढ्यामुळे बाहेर पडू पाहणारं लिक्विड पुन्हा किडनीपर्यंत आत गेलं. मी टॉयलेटचा नाद सोडून दिला आणि अंधारात कुठेतरी गवतात पाणी घालून आलो. परत आलो तेव्हा शनायानं माझा फोन परत दिला. तिचं नाक लाल झालं होतं.
मी मग बोलता बोलता तिच्याशी गंमतीच्या टोनमध्ये तिच्या बॉयफ्रेंडचा विषय काढला.
“हाऊ इज इट गोइंग विथ गोरक्षकर?”, अशा वेळी मी नेहमी मूळ नावं वापरतो. आडनाव शक्यतो.
“ही इज सन ऑफ अ बिच,” ती किंचाळली. आणि एकदम भानावर आल्यासारखी होऊन म्हणाली, “सॉरी यार. नेव्हर माईंड. आय थिंक आय एम टू हाय नाऊ.”
मी एकदम दचकलोच होतो. गोरक्षकर आणि एकदम “सन ऑफ अ बिच.”
गॉसिप मटेरियल मिळालं होतं. आता विलीला शोधायला हवं होतं. मी झुलत झुलत विलीला शोधून काढलं. मग रात्र गप्पांमध्ये मस्त गेली कारण रात्रभर पुरेल असा विषय मिळाला होता.
परत आल्यावर चार दिवस त्याच चर्चेत गेले. सोनिया आणि गोरक्षकरचा प्रॉबेबल ब्रेक अप. सन ऑफ बिच का म्हणाली ती एकदम?
चारही दिवस शनाया आलीच नाही. त्यातले पहिले दोन दिवस तिचे विकली ऑफ होते. पण नंतरही दोन दिवस दांडीच मारली तिनं. बहुतेक खूपच हँगओव्हर असणार. नंतर मला न्यूज कळली की गोरक्षकर आणि शनाया एकत्रच राहतात. फ्लॅट शेअर करून. बराच पोचलेला आहे गोरक्षकर साला. आणि पण एक कळलं की झोपेच्या खूप जास्त गोळ्या घेतल्यामुळे शनाया अनकॉन्शस झाली होती. एका ड्रगच्या नशेत असलं की दुसरं ड्रग किंवा झोपेच्या गोळ्या घेण्यावरचा कंट्रोल सुटणं हे कॉमन आहे. कॉलसेन्टर्समध्ये अधून मधून असं होताना दिसतंच. असेही दिवसा झोप येण्यासाठी आम्ही सगळेच कसल्या ना कसल्या गोळ्या घेत असतोच.
गोरक्षकरने तिला ऍडमिट वगैरे करून धावपळ केली होती. म्हणून तोही आला नव्हता इतके दिवस. म्हणजे खरंच प्रेम करतो आहे साला तिच्यावर. मग सन ऑफ अ बिच कशाला म्हणाली त्याला?
जाऊ दे च्यामारी.
पार्टीनंतर पाचव्याच दिवशी मला आमचा अमेरिकन साईट मॅनेजर जोएल दिसला. सोबत डेव्ह होताच आणि शिवाय एक इंडियन गोरा घारा तरुण होता. ते सगळेच डेव्हच्या केबिनमध्ये शिरले.
पाचच मिनिटांत मला टी.एल. येऊन म्हणाला, “जा. डेव्ह बुला रहा है तुझे.”
मला डेव्हनं बोलावलंय? असं याआधी कधीच झालेलं नाही. मी खूपच गोंधळून आत गेलो.
डेव्हनं मला बसायला सांगितलं. त्या तरुणाकडे हात दाखवत तो म्हणाला, “मीट मिस्टर साथे. ही इज इन सायबर सेल ऑफ फुलीझ.”
साथे म्हणजे “साठे” असणार. साठे नावाचा माणूस पोलिसात? पहिल्यांदाच ऐकत होतो. आणि काय भानगड झाली होती तेच कळत नव्हतं. पोलीस म्हटलं की आपली फाटतेच थोडीशी.
“गॅरी. ग्विर्रीश. राईट?”, डेव्हनं विचारलं.
“येस,” मी हळूच म्हणालो.
“ग्विर्रीश. लिसन. देअर हॅज बीन अ ह्यूज थेफ्ट ऑफ कस्टमर क्रेडीट कार्ड डेटा फ्रॉम धिस ब्रांच.”
“ओह,” मी धक्का बसलेला दाखवला. न्यूज वाईटच होती. पण मलाच विश्वासात घेऊन का सांगताहेत ते कळेना.
“द एक्सेलशीट विथ ऑल डेटा हॅज बीन सेंट आउट फ्रॉम युअर पर्सनल ई-मेल आय डी.”
मला एकदम थरथरल्यासारखं व्हायला लागलं. “व्हॉट???” म्हणून ओरडायचं होतं… पण घसा इतका कोरडा झाला की जीभ तोंडात हलेचना. एकदम पॅरेलाइज झाल्याचा फील आला.
“गिरीश राजे साहेब, हा तुमचाच फोन नंबर आहे ना?”, साठे एक चिठ्ठी पुढे करत म्हणाला. तो माझाच नंबर होता.
“तुमच्याच आयफोनवरून ही मेल गेली आहे. मेलच्या शेवटी सेंट फ्रॉम आयफोन असा रिमार्क आहे. आणि आयपी ट्रेस तुमचाच फोन दाखवतोय,” साठे म्हणाला.
मला एकदम अंधारल्यासारखं व्हायला लागलं. मी डेव्हशी बोलणं विसरून गेलो आणि साठेला म्हटलं, ”सर, मी खरंच असल्या भानगडीत नाही पडत हो कधी. मलाच शॉक बसलाय आता. मला आता काहीच कळत नाहीये.”
जोएल नुसताच ऐकत बसला होता.
डेव्हला आणि जोएलला मी बोललेलं काहीच कळत नव्हतं आणि साठेला ते ऐकून काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे मी आणखीन खचत चाललो होतो.
“साहेब, तुम्हाला आता कस्टडीत घ्यायला लागेल. काळजी करू नका. चौकशीत काय ते आपण बघू. घरी फोन करायचा असेल, तर इथूनच करा,” बोलता बोलता त्यानं माझ्या खिशातला आयफोन काढून घेतला आणि एका खिशातून प्लास्टिक पिशवी काढून त्यात ठेवला. त्यात खूप इल्लिगल एक्स रेटेड व्हिडीओज होते. माझी पुरती वाट लागली होती. आय वॉज इन डीप शिट.
“लावा फोन घरी,” साठे परत म्हणाला.
“घरी कोणी नाही. मी एकटाच राहतो इथे भाड्याचा फ्लॅट घेऊन.”
“आई वडील कुठे असतात?”
“पुण्याला.”
“ठीक आहे. नंतर कळवा त्यांना. फोन लावायला देऊ आम्ही तुम्हांला नंतर.”
मी पूर्ण हादरलो होतो. नक्कीच स्वप्न असणार होतं. पुन्हा पुन्हा हाताला चावून, चिमटा काढूनही जाग आली नाही. हे तेव्हा कळलं की हे भिकारचोट सत्य होतं.
”साहेब, ओ साठेसाहेब,” मी सायकोसारखा थरथरत परत परत म्हणायला लागलो. पुढे काहीच सुचेना.
“चला लवकर आता.”
माझ्या डोक्यात झमकन काहीतरी आलं होतं.
“साठेसाहेब,” मी ओरडलो,
“शनाया. सोनिया. सोनिया अग्रवाल म्हणून एक मुलगी आहे. तिनं घेतला होता माझा फोन बराच वेळ. ती लीव्हवर आहे. ती आली की तुम्हांला हे क्लीअर होईल.”
जोएल आणि डेव्ह एकदम माझ्याकडे बघायला लागले. त्यांना फक्त “सोनिया अग्रवाल” आणि “लीव्ह” एवढेच शब्द कळले असणार. जोएल एकदम खुर्चीतून उठून उभा राहिला.
साठे काहीतरी म्हणणार होता, त्या आधीच जोएल बोलला, “व्हॉट आर यू सेयिंग? फ्लीझ यूज ईंग्लीश.”
“जोएल. सोनिया अग्रवाल इस इन आरए टीम. शी हॅड बॉरोड माय फोन फॉर क्वाईट सम टाईम. शी मस्ट बी बीहाईन्ड धिस शिट. प्लीज वेट टील शी इज बॅक फ्रॉम लीव्ह,” मी जवळ जवळ रडत म्हणालो. मग डेव्हकडे वळून आशेने पुढे म्हटलं, “डेव्ह. पोलीस इज अरेस्टिंग मी. माय करियर विल बी रुइन्ड. प्लीज स्टॉप हिम.”
डेव्ह एकदम मला म्हणाला, “सॉरी ग्विर्रीश. धिस इझ सिरीयस ऑफेन्स… आय खान्ट इंटरफेअर विथ फुलीझ.”
मग एक पॉझ घेऊन तो पुढे म्हणाला, “लूक ग्विर्रीश. आय एम ओन्ली सस्पेन्डींग यू नाव. डोन्ट वार्री. आय हॅव्ह आल्वेझ हर्ड गुड अबाउट यू. इफ यू आर फाउंड ख्लीन इन दिस, आय विल रीस्टोर यू विथ ऑनर.”
यात धीर येण्यासारखं काही नव्हतं पण तरी मला उगीचच बरं वाटलं.
आता साठेसोबत बाहेर जाण्याचं संकट होतं. मी एकदम शिफ्टच्यामध्ये उठून गेल्यामुळे आता फ्लोअरवर चर्चा होणार होतीच.
”कीप इन थाच मिस्टर साथे,” डेव्ह म्हणाला. कानात फिल्टर बसवल्यासारखे आवाज बारीक ऐकू येत होते.
पाय लटपटत होते. तसाच साठेबरोबर निघालो.
साठे क्वालीस गाडी घेऊन आला होता. त्या गाडीतून त्याच्या ऑफिसपर्यंत जाताना त्याने मला धीरच दिला. त्यानंच मला सांगितलं की माझ्या फोनवरून फक्त मेल गेली आहे. पण तो क्रेडीट कार्ड डेटा हॅकिंग करून मिळवल्याचा काही पुरावा अजून मिळाला नसल्यामुळे आयटीए सेक्शन ६६ मला लावला जाणार नाही. फक्त “डिसक्लोजर ऑफ इन्फोर्मेशन इन ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट” म्हणून सेक्शन ७२ लावला जाईल. आणि गेल्याच वर्षी झालेल्या अमेंडमेंटमुळे हे दोन्ही ऑफेन्स बेलेबल झाले आहेत. त्यामुळे जामीन मिळवता येईल.
मला खूपच धीर आला. साली हीच घाण एका वर्षांपूर्वी झाली असती, तर मला जामीनसुद्धा मिळाला नसता. बरबाद झालो असतो. आत्ताही तसा झालो होतोच. पण जेलमध्ये तारखेची वाट बघत सडण्यापेक्षा हे बरं.
साठेच्या ऑफिसमध्येच एक खोली होती. तीच कस्टडी.
सायबर सेल इतर डिपार्टमेंट्सपेक्षा नवीन असल्यामुळे मुळातलं ऑफिस पोलीस स्टेशन किंवा जेल म्हणून बनवलं नव्हतं. त्या दाखवलेल्या खोलीत मी बसलो. एरव्ही ऐकलेला पोलिसी खाक्या कुठे दिसत नव्हता. ऑफिस बरंच सोफिस्टीकेटेड होतं. पण शेवटी मी अंडर अरेस्ट होतो. आणि हा फील माझ्या मनाचं शेण करायला पुरेसा होता.
मला जेव्हा फोन लावायला चान्स दिला तेव्हा मी आई बाबांना काही सांगितलंच नाही. फक्त माझा फोन हरवलाय आणि आठवडाभर तरी मी अनरीचेबल असेन असं सांगितलं. त्यांना सांगून खूपच शॉक बसला असता आणि मी त्यांना उशिरा झालो असल्यामुळे दोघेही माझ्या वयाच्या मानाने आता खूपच म्हातारे आहेत. म्हणजे सत्तरीत. ते तशीही खूप धावपळ करू शकले नसतेच.
मी फक्त विलीला सगळं सांगितलं. त्याला भेटायला बोलावलं.
विली माझ्या अरेस्टचं ऐकून चांगलाच हादरला होता. तो त्याची शिफ्ट कम्प्लीट झाल्यावर बिनझोपेचा तसाच लाल डोळे घेऊन सायबर सेलच्या ऑफिसात आला. त्याला मी म्हटलं, ”विली, नंतर सगळं बोलायला वेळ मिळेल. फक्त माझ्या बेलची सोय कर काहीतरी.”
मग विली त्या एका दिवसातच काहीतरी सेटिंग करून एका वकिलाला घेऊन आला आणि बहुतेक त्याच्या बाबांकडून पैशाची सोय करून जामीन भरला. स्वत: जामीन म्हणून सही केली. साला ‘लफड्यात कशाला पडा’ म्हणून मागे नाही हटला. माझे डोळे त्याची दोस्ती बघून भरूनच आले एकदम.
त्या मधल्या एका दिवसभरात माझी साठेनं समोर बसून बरीच चौकशी केली. मुख्यत: हा डेटा माझ्या फोनवर कसा आला याची. पण माझ्याकडे उत्तर नव्हतं. पण मला आता केवळ साठेच्या चांगुलपणामुळे आणि जामिनाच्या आशेमुळे लॉजिकल विचार करण्याएवढं भान आलं होतं.
मग मी शांत होऊन काहीतरी सिक्वेन्स लागतोय का ते बघायला लागलो.
मी हे काम केलेलं नाही हे मला स्वत:ला नक्की माहीत असल्यामुळे आता कोणीतरी मला यूज केलंय हे दिसत होतंच.
तसं बघितलं, तर मी माझा आयफोन गेल्या महिन्यात घेतल्यापासून फ्लोअरवरच्या जवळ जवळ प्रत्येकाला थोडा वेळ तरी बघायला दिलाच होता. त्यामुळे कोणी नक्की तो तसा वापरला ते कळायला मार्ग नव्हता. पण शनायावर डायरेक्ट संशय मी बोलून दाखवला होता.
मीच साठेला विचारलं, “कधी पाठवला गेला डेटा ती डेट आणि वेळ सांगाल का प्लीज. मी आठवतोय.”
साठे म्हणाला.”सॉरी राजेसाहेब.ते नाही सांगू शकत आम्ही तुम्हाला. कॉन्फीडेन्शियल आहे हो ते. तुम्हीच आम्हांला सांगा ना.”
काहीच क्लू मिळत नाही म्हटल्यावर मग मी एकदम ब्लँक झालो. मला रात्री शिफ्टमधून उठवून आणल्यामुळे अर्थातच दोन दिवसांची झोप राहिली होती. डोकं जाम होऊन बंद पडलं होतं. मग मी विचार दुस-या दिवशी करायचं ठरवलं.
बेलवर सुटून बाहेर रस्त्यावर आल्यावर विलीला बराच वेळ घट्ट मिठी मारली. मग त्याच्यासोबत माझ्या रूमवर गेलो. बेडवर कधी पडलो आणि कधी झोपलो ते अजूनही आठवत नाही.
जेव्हा केव्हा जाग आली तेव्हा दुपार होती. मग एकेक लक्षात आलं. मी बेलवर सुटलोय. जरी बाहेर आलो असलो तरी केसची चौकशी अजून चालूच राहणार आणि जेव्हा लागेल तेव्हा पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे. माझ्याकडे फोन नाहीये तो अजून पोलिसांच्याच ताब्यात आहे. त्यावर अश्लील कंटेंट आहे. त्यावरच या गलिच्छ डेटा थेफ्ट स्कॅमचे क्लूज आहेत आणि ते मला बघायला मिळणार नाहीयेत. आणि मला मरणाची भूक लागलीय.
मग मी लडखडत जिना उतरून खाली गेलो आणि समोरच्या सत्कारमधून एक उत्तप्पा पार्सल करून घेतला. मला घरात परत येऊन तोंड लपवायचं होतं. बाहेर जगात कोणालाच काही माहीत नसूनही मी क्रिमिनल बनलो होतो. सगळं जग आपल्या बाहेर नसतंच. ते आपल्या नजरेच्याच आत असतं हे पुन्हा नीट कळलं.
उत्तप्पा खाता खाता एकदम मेंदू परत चालू झाला धक्का स्टार्ट झाल्यासारखा.
मुळात माझ्या फोनवर हा डेटा आधी नक्कीच नव्हता. म्हणजे तो पहिल्यांदा माझ्या फोनवर कुठल्यातरी पद्धतीनं लोड केला गेला आणि मग माझ्या फोनवरच्या मेलबॉक्स मधून पाठवला गेला. माझ्या मेलबॉक्समधून का? तर अर्थात स्वत: कुठे अडकायला नको म्हणून.
माझ्या फोनवर एखादी फाईल लोड करायची म्हणजेच ती मला ई-मेलनं पाठवायला पाहिजे. पण मग यात ओरिजिनल ई-मेल पाठवणारा अडकणारच. तो कसा क्लीन राहील?
म्हणजे एक तर यूएसबी केबलनं पी.सी. टू फोन फाईल ट्रान्सफर केली पाहिजे. म्हणजेच ती आधी कुठल्यातरी पी.सी. वर असली पाहिजे. पण यूएसबी केबलनं इतर कोणीही माझा फोन पी.सी.ला कनेक्ट करणं आणि तेही मला न कळता हे मला शक्य वाटेना.
मग राहिलं ब्लूटूथ. कोणाच्या फोनवर ती फाईल असेल, तर फोन टू फोन ट्रान्सफर पटकन होईल. आणि एकदा तशी ट्रान्स्फर झाली की त्याच फाईलला सेंड व्हाया ई-मेल असा ऑप्शन सिलेक्ट करून ती मेलमध्ये अटॅच करून पाठवता येईल. कारण माझी फोनमधली मेल नेहमीच ओपन असते. पासवर्ड सेव्ह करून ठेवलाय म्हणून.
ब्लूटूथचा माझा पासवर्ड साधाच आहे. वन टू थ्री फोर.
ब्लूटूथ वन टू थ्री फोर. ओह शिट… शनायाने एमपीथ्री ट्रान्स्फर करायला फोन घेतला होता. मी तीन आरसी पिऊन तिला पासवर्ड दिला होता, वरून व्होडका भरून दिली होती आणि मुतायला गेलो होतो आरामात.
भेंSSSSचोत.
म्हणजे मला गट फिलिंगने आलेला शनायाचा डाऊट बरोबरच होता.
मी लगेचच बाईक काढली आणि विलीकडे गेलो. दुपार असल्यामुळे तो मिड्नाईट स्लीपमध्ये होता. त्याला काही लाज न ठेवता उठवलं. तो धडपडत उठून मला ब्लँक लूक देत बसला.
“विली… शनाया हॅज डन ऑल धिस शिट. ब्लडी बिच.”
“क्या हुआ? ठीक से बतायेगा भेंचोत?”, विलीनं विचारलं.
“अरे, उस दिन वो वीकेंड पार्टी में उसने मेरा फोन लिया था, एमपीथ्री देने के लिये. मैं तभ्भी सोच रहा था की ब्लूटूथ से फाईल देने के लिये ये मेरा फोन अपने हाथ में क्यू ले रही है? ब्लूटूथ का पासवर्ड भी दिया था मैने उसको.”
“पासवर्ड दिया? अबे चमडी साले! तूने खुद की खोल के दे दी? पिव्व्वर येडझवा आहेस. शहाणपणाची अजिबात भेसळ नाही रे तुझ्यात,” उचगावकर पहिल्यांदाच मराठीत बोलला.
“अरे, मीपण थोडा हाय होतो यार. इट्स जस्ट अ ब्लूटूथ पासवर्ड. बँकिंग पासवर्ड तो नही था. आणि तुलापण हा वीकनेस आहेच ना? कुड यू रेझिस्ट हर दॅट नाईट?”
मग त्याला काही बोलता येईना.
विलीने मग एक मोठ्ठं काम केलं. ते म्हणजे एचआरला फोन करून स्वत:साठी सरळ आजचा दिवस लीव्ह सांगितली.
आता आधी शनायाला गाठायला हवं होतं. ती खरंच असलं इल्लिगल काम करत असेल? ती सेक्सी आहे. कधी कधी थोडी चीपही वाटते. पण क्रिमिनल?
ती त्या दिवशी गोरक्षकरला ”सन ऑफ अ बिच” म्हणाली. जस्ट माझा मोबाईल परत दिल्यावर. ओह. म्हणजे तो भडवा गोरक्षकर तिला फोर्स करतोय हे सगळं करायला. ही इज युजिंग हर. आणि तिनं मला यूज केलं? एकदम कडू कडू काहीतरी घशात आलं. सगळा वेळ ती माझ्याकडे बळीचा बकरा म्हणून बघत होती. माझा फोन कसा मिळवता येईल तेच बघत होती आणि मी भाद्रपदातल्या कुत्र्यासारखा पाघळलो होतो नुसताच.
तिलाही नक्कीच गोरक्षकरने खूप प्रेशर आणलं असणार. तिचा उपयोग करून डेटा मिळवायला. तसे कस्टमर क्रेडीट कार्ड डीटेल्स आमच्या पूर्ण टीममध्ये कोणालाही मिळू शकतात कारण सगळेच जण कधी ना कधी ऑर्डर एन्टर करतातच सिस्टीममधे. शनाया जरी आरएला टीमलीडर म्हणून सपोर्ट करत असली तरी तीही ऑन लाईन ऑर्डर प्रोसेस करायची. त्यात कस्टमरकडून आलेले सिक्युअर्ड क्रेडीट कार्ड डीटेल्स ती ऑर्डरफॉर्ममध्ये भरायची. तेव्हा ती हातानं डीटेल्स लिहून घेत असणार. म्हणजे मग एकदम सेफ. ऑफिसच्या सिस्टीममध्ये कुठे फाईल बनवायलाच नको. नंतर लिहून घेतलेली डीटेल्स तिच्या फोनवरच्या मोबाईल एक्सेल वर्कशीटमध्ये हातानेच टाईप करून एंटर करत असणार. ओह शिट! नो कॉपी पेस्ट एनीव्हेअर.
शनाया तिचा फोन उचलत नव्हती. आम्हांला अजून तिचं घर कुठे आहे ते माहीत नव्हतं. आमच्या पिकअप रूटवर असतं, तर नक्की माहीत झालं असतं. आताही एखाद्या ड्रायव्हरकडून ते कळलं असतं. पण आधीच दोन्ही पाय लफड्यात फसले होते. शनाया आणि गोरक्षकरचं झोपेच्या गोळ्या प्रकरण गाजत होतंच. त्यात तो ड्रायव्हर उगीच डाउट खाऊन भोचकपणा करत बसला असता. सगळी प्रकरणं आधी ड्रायव्हरना कळतात.
मी मग गोरक्षकरलाच धरायचं ठरवलं. विलीनं ऑफिसात एक-दोन फोन फिरवले आणि कळलं की गोरक्षकरही अजून रजेवरून परत आलेलाच नाहीये.
अर्थात गोरक्षकर शनायाच्याच सोबत राहतो. त्यामुळे घर माहीत नाहीच. पण तो सुट्टी असली की रोज संध्याकाळी झोप संपवून पोतदार ब्रिजच्या खाली असलेल्या चायनीज गाडीवर खायला येतो. ते मला माहीत होतं. घरही तिथेच जवळ असणार कुठेतरी.
संध्याकाळी बाईक काढून मी एकटाच चायनीज गाडीवर गेलो.
एक तास टाईमपास झाल्यावर गोरक्षकर त्याची बाईक लावताना दिसला. मी धावत त्याच्याकडे गेलो. त्याला धरला. माझा कंट्रोल सुटला होता. त्याची कॉलर पकडून मी त्याला म्हटलं, “साल्या भडव्या, तुझ्या धंद्यात मला मरवतोस. माझी मारतोस भिकारचोट?”
तो मला म्हणाला, “रस्त्यात कशाला तमाशा करतो? माझ्या रूमवर जाऊ या.”
आयचा घो! हा एकदम नीट शांतपणे बोलत असल्यामुळे मला पुढे मारामारीच करता येईना. जर त्याच्या रूमवर गेलो आणि तिथे शनाया असेल तर मला काहीच बोलता येणार नव्हतं. ते सेफही वाटेना.
“इथेच सांग मला सगळं. नाहीतर विलासच्या घरी चल,” मी ऑप्शन दिला.
“चल मग. इथे रस्त्यात नको,” म्हणून बाईकला किक मारून गोरक्षकर माझ्या मागोमाग विलीच्या घरी आला. विली नेहमीप्रमाणे गुगल सर्फ करत बसला होता. सतरा चॅट एप्लिकेशन नेहमीप्रमाणे उघडी होती.
मग आवरून धरलेला माझा कंट्रोल परत सुटला. मी गोरक्षकरवर ओरडलो.
“तुझ्या धंद्यात मला मरवतोस काय रे?”
गोरक्षकर मला म्हणाला, “कसला धंदा माझा?”
“कुत्र्या, इथे गाडीन तुला ज्यादा शाणा बनलास तर,” मी म्हणालो.
मग माझ्या लक्षात आलं की मी खूप जोरात ओरडत होतो.
“शनाया तुला सन ऑफ बिच म्हणत होती भाड्या. आणि तिनंच माझ्या फोनवरून मेल पाठवलाय, सीसी डेटाचा. मी अरेस्ट झालो तुझ्यामुळे. तिच्यावर प्रेशर टाकतोस आणि डर्टी जॉब करून घेतोस हरामी साला.”
“थांब राजा,” गोरक्षकर म्हणाला. “ती मला सन ऑफ अ बिच म्हणाली असेल, तर ते यासाठी की मी तिला डेटा लीक करायला देत नव्हतो. मीच तिला म्हटलं होतं की तिनं असलं इल्लिगल काम केलं, तर मी तिच्यासोबत राहणार नाही म्हणून.”
“क्या बात करता है?”, मी खूप हैराण झालो होतो.
”त्या तुमच्या फार्म हाऊस पार्टीहून आल्यावर शनाया दोन दिवस शुद्धीतच नव्हती. मग हॉस्पिटलाईझ केलं आणि जरा सोबर झाली तेव्हा घरी आणली. त्यानंतर तिनं मला सांगितलं की तिनं तुझ्या फोनवरून ती कस्टमर डेटाची मेल पाठवली म्हणून. तिला नंतर खूप गिल्टी वाटत होतं की तुला यात खूप त्रास होईल.”
“मग?”
“आमचं मोठंच भांडण झालं. इतक्यांदा तिला वॉर्न करूनही ती असली इल्लिगल लफडी पैशासाठी करते, म्हणून मी तिला ब्लडी गोल्ड डिगर म्हणालो. देन शी स्लॅप्ड मी. मग मी तिथून निघूनच गेलो. तेव्हापासून तिच्याकडे घरी गेलोच नाही. तीन चार दिवस हॉटेलमधे रूम घेऊन राहतोय.”
तेवढ्यात विलीच्या पीसी मधून ठकठक असा आवाज आला. आम्ही दचकून बघितलं, तर त्यावर याहू मेसेंजरचा पॉपअप आला होता, “सोनिया इज नाऊ ऑनलाईन.”
आम्ही तिघे एकदम बघत राहिलो. काय करायचं सुचेना. मग थरथरत्या हातानं विलीनं टाईप केलं, “हाय.”
पलीकडून काहीच उत्तर नाही.
विलीनं परत “हाय शनाया” म्हटलं.
नो रिप्लाय.
मग त्यानं तिला बझ करून “प्लीज कॉल मी…!!!”, “अर्जंट!”, असे खूप मेसेज पाठवल्यावर शनायाचा रिप्लाय आला, “हाय.”
“हे सोनिया, वुई आर वरीड अबाउट यू. व्हेअर आर यू?” विली.
“आय एम अंडर ट्रीमेंडस स्ट्रेस. आय एम हायडिंग फ्रॉम वर्ल्ड.” शनाया.
“वॉट हॅपंड.टेल मी. मे बी आय विल बी ऑफ सम हेल्प.” विली.
“आय एम बीइंग थ्रेटंड टू डिस्क्लोज कस्टमर सीसी डेटा.” शनाया.
“WTF. कौन कर रहा है ये?” विली.
“व्हॉट? आय एम नॉट गेटिंग यू.” शनाया.
“WTF. हू इज डूइंग धिस टू यू??”- विली
“स्वेअर यू वोन्ट टेल एनी वन.” -शनाया.
“शुअर डियर. टेल मी…” विली.
“इट्स गॅरी.” शनाया.
मी जागीच हादरलो. शनाया सरळ माझं नाव घेत होती. विली आणि गोरक्षकर माझ्याकडे बघायला लागले. आम्ही सगळेच भोन्चक्के झालो होतो.
“WTF… तू उसके प्रेशर में क्यू आ रही है? ”, विली तरीही सावध राहून शनायाला म्हणाला.
“व्हॉट? कान्ट रीड हिंदी इन रोमन विली. टू अपसेटिंग,” शनाया.
“ओके. व्हाय आर यू कमिंग अंडर हिज प्रेशर?” विली.
“विली, ही इज थ्रेटनिंग टू सर्क्युलेट एमएमएस क्लिप ऑफ मी.” शनाया.
“शिट. हाऊ डज ही हॅव्ह युअर व्हिडीओ क्लिप?” विली.
“क्रिस शॉट द क्लिप ऑन हिज मोबाईल व्हाईल वुई वेअर मेकिंग लव्ह. देन इट समहाऊ लीक्ड आउट. शिट आय एम सो अशेम्ड ऑफ मायसेल्फ.”
च्यायला “क्रिस” तर माझ्या बाजूलाच बसलेला होता. आम्ही अर्थातच चमकून त्याच्याकडे बघितलं. तो शॉक झालेला दिसत होता.
“शिट. लायर. कसला व्हिडीओ? बकतेय ती काहीपण. परत नशेत आहे वाटतं,” गोरक्षकर ओरडला.
भेंचोत. जाम गटारघाण प्लॉट केलंय हिनं मला आणि आता गोरक्षकरलापण मारतेय त्यात.
गोरक्षकरपण यात आल्यामुळे मला विचित्र बरं वाटलं. मी एकटाच व्हिक्टिम नव्हतो.
पण मला वाटलं त्यापेक्षा हे खूप जास्त होतं आणि मला स्पेसिफिक टार्गेट बनवलं जात होतं. हे कळून मला एकदम खूप भीती वाटली. एकदम घाम यायला लागला तो थांबेनाच.
एक तर ती स्वत:हून हे करतेय, किंवा अंडर प्रेशर.
गोरक्षकर ती निरखून चॅट बघत राहिला.
मग एकदम ओरडला, ”गिरीश… चल झपकन माझ्या सोबत.”
“कुठे?”, मी विचारलं.
“शनायाच्या फ्लॅटवर.माझ्याकडे चावी आहे,” आणि दरवाजातून बाहेर पडता पडता तो विलीला म्हणाला, “कीप चॅटिंग विथ हर. कीप हर बिझी.”
गोरक्षकर मला त्याच्या बाईकवर मागे बसवून खरोखर डेंजरस स्पीडने गल्ल्या गल्ल्यांतून ड्राईव्ह करत एका जुन्या बिल्डींग समोर आला. मी वाटेत खूपदा त्याला काय काय विचारत होतो. पण त्याला ऐकू येत नव्हतं.
बिल्डींगला लिफ्ट नव्हती. आम्ही धापा टाकत तीन मजले चढलो.
“काय करायचंय रे इथे आता?”, मी धापा टाकत त्याला विचारलं.
गोरक्षकर म्हणाला, “ती चॅट करणारी शनाया नाहीये. शी मस्ट बी इन ट्रबल.”
एक मोठा श्वास घेऊन गोरक्षकरने लॅचमधे किल्ली घातली.आतली दरवाजाची चेन लावलेली होती. सगळा जोर लावून गोरक्षकरने दार ढकललं. चेन उखडली गेली आणि दार पूर्ण उघडलं.
भपकन घाणेरडा वास आला…
आम्ही दोघे आत शिरलो.वन रूम आणि बहुतेक आत किचन असलेल्या त्या फ्लॅटमधे मी बघितलेलं जे काही होतं ते मी एकदाच सांगणार आहे. परत सांगू शकणार नाही.
बेडवर शनाया पडली होती. ती शनायाची नुसती बॉडी होती हे तिचे डोळे बघूनच भसकन कळत होतं. अगदी बधीर मनालाही कळत होतं. आणि ती डिकंपोज व्हायला सुरुवात झाली होती. वास पसरला होता त्यावरून. भेसूर दिसत होती आणि पडली होती वेडीवाकडी. बाजूला जमिनीवर रिकामी सिरींज सुईसकट पडली होती.
आणि टेबलवर तिचा पी.सी. चालू होता. त्याच्या समोर जोएल बसला होता. आमच्याकडे आ करून बघत.
तो नक्कीच कसल्यातरी अमलाखाली होता. आणि समोर स्क्रीनवर याहू चॅट उघडी होती. दोनच पावलं पुढे टाकली आणि दिसलं की चॅट विंडोमधे विलीचा प्रश्न होता,
“शनाया, आर यु देअर? कीप टॉकींग.”
गोरक्षकरकडे बघितलं, तर तो शनायाकडेच एकटक बघत होता. त्याचे डोळे भरले होते.
जोएल एकदम “शी हॅज ओव्हरडन ड्रग्ज मॅन,” असं काहीतरी बरळत उठला. आणि गोरक्षकरने त्याच्यावर उडी मारून त्याला जमिनीवर दाबून धरला.
“खाली जा. लेफ्ट साईडने पाच मिनिटं ड्राईव्ह कर. पोतदार नगर पोलीस स्टेशन दिसेल. तू जा आणि पोलीस घेऊन ये तिथूनच,” गोरक्षकर म्हणाला.
“आपण फोन लावूया ना पोलीसला,” मला नीट बोलताही येत नव्हतं.
“फोनवर जास्त वेळ जाईल. जा लवकर,” गोरक्षकर माझ्यावर ओरडला
तेवढ्यात जोएल परत बरळला, ”यू विल पे फोर धिस,” असं काहीतरी.
“शट अप. ऑर आय विल किल यू फॉर धिस यू बास्टर्ड,” गोरक्षकर किंचाळला.
मी बधीरपणे खाली येऊन बाईक काढली…
पोलीस वगैरे आल्यावर त्यांनी आधी बिल्डींगमधून बाहेर जाण्याची वाट ब्लॉक करायला एक कॉन्स्टेबल उभा केला. मग त्याच्यासोबत मी खालीच थांबलो. परत वर जायची माझी हिम्मत नव्हती.
नंतर गोरक्षकरलाही मी एकदम दोन दुस-या दिवशी भेटलो. आम्हांला स्टेटमेंट घ्यायला पोलिसांनी बोलावलं तिथे. तिथेच साठेलापण बोलावलेलं होतं. ते सगळं झाल्यावर मी गोरक्षकरला विचारलं, “तुला काय झालं एकदम ती चॅट बघून?”
तेव्हा त्यानं मला सांगितलं, ”त्या चॅटमधे तुला अडकवण्याचं इंटेन्शन क्लीअर दिसत होतं. आणि मी तर शनायाला तिने या कामासाठी तुझा फोन वापरला म्हणून इतकी गिल्टी झालेली बघितली होती की इट वॉज इम्पॉसिबल की ती तुला यात अजून जास्त अडकवेल. मग पुढे जेव्हा एमएमएस क्लिपचं काहीतरी नॉन एक्झीस्टिंग ती बोलली तेव्हा आय बिकेम शुअर. आणि नीट बघितलंस? विलीनं त्या पूर्ण चॅटमधे “कौन कर रहा है ये?” आणि ” तू उसके प्रेशर में क्यू आ रही है?” अशी दोन वाक्यं हिंदीत विचारली होती. आणि शनायाला तेवढीच दोन कळली नव्हती. शी सेड ’शी कान्ट रीड हिंदी इन रोमन. टू अपसेटिंग.’ मी तिच्यासोबत एकत्र रूम शेअर केलीय यार. हिंदी शब्द रोमनमधे टाईप करून चॅट करण्याची स्वत: शनायालाही सवय होती. ती अपसेट कशी होईल? मग माझ्या लक्षात आलं की हिंदी न येणारं कोणीतरी तिच्या नावानं चॅट करतंय. एंड आय वॉज टेरीफाईड, बीकॉज जोएल वॉज रीसेंटली सीइंग हर. एक दोन महिन्यांपूर्वीच कधीतरी तिने त्याला फ्लॅटची तिसरी चावी दिली होती. आणि हे फक्त मला माहीत आहे.”
गोरक्षकर थांबू शकत नव्हता. त्यालाही बोलून सगळं साठलेलं बाहेर काढायचं होतं. तो बांध फुटल्यासारखा बोलत राहिला.
“ती गेल्या महिन्याभरातच म्हणायला लागली होती की शी इज प्रोबेबली गेटिंग यूएस व्हिसा. समबडी इज गोइंग टू हेल्प हर. जोएलनं तिला यूएस प्रोजेक्टवर नेण्याचं प्रॉमिस करून या डेटाथेफ्टमधे अडकवलं. ऑफ कोर्स शी वॉज एट फॉल्ट. मी तिला त्यातून वाचवू शकलो नाही. कारण शी वॉज ऑलरेडी इंव्होल्व्ड विथ जोएल.”
जोएलच्या स्टेटमेंटमधे त्याने कबूल केलं की त्याला इंडियात आल्यावर सुरुवातीला स्वत:साठी ड्रग्ज मिळत नव्हते. तेव्हा ड्रगचे सोर्स भेटवण्यासाठी शनायाने त्याला मदत केली होती. त्याच वेळी त्यांची ओळख झाली आणि वाढत गेली. शनायाची आउट ऑफ कंट्रोल लाईफ स्टाईल ओळखून मग त्याने शनायाला यूएस प्रोजेक्टवर पाठवण्याच्या मोहात पाडलं आणि तिला डेटा थेफ्टसाठी तयार केलं. त्याला आफ्रिकन देशांमध्ये आणि इव्हन भारतातही क्रेडीट कार्ड डेटा विकून खूप मोठी रक्कम मिळत होती. डेव्हच्या केबिनमधे माझ्या बोलण्यात शनायाचं नाव ऐकून तो अपसेट झाला. त्याने तिच्या घरी जाऊन रात्रभर तिला ब्रेनवॉश केलं. पण ती आधीच गिल्टी होती आणि आता मला अरेस्ट झाली हे कुठून तरी कळल्यामुळे तिला एकदम खूपच अपसेट वाटायला लागलं. ती जेव्हा बाहेर जाऊन क्राईम कन्फेस करण्याच्या मूडमधे दिसली तेव्हा त्यानं ”ओके. वुई विल हेल्प गॅरी टुमॉरो,” असं तिला सांगून टेम्पररी शांत केलं. मग त्याच्याकडच्या हेरोईनचं ५०० एमजीचं इंजेक्शन दिलं. ते नेहमीच ड्रग एकत्र घेत असल्यामुळे तिनेही काही रेझिस्ट केलं नाही. तो तिच्यासाठी लीथल डोस होता.कारण तिनं पूर्वी ते कधी घेतलं नव्हतं. ती ड्रग अडिक्ट असल्याचं सगळ्यांना माहीत असल्यामुळे तिचा आवाज बंद करायचा हा ऑप्शन त्याला सेफ वाटला होता.
शनाया तशी लगेच गेली, तरी तिची डेथ झाल्याची खात्री करायला त्याने वाट पाहिली. मग त्याच्या एकदम लक्षात आल्यामुळे तिच्या पीसीमधे अजून कसला किंमती डेटा आणि त्याला अडकवणारे क्लूज नाहीत ना ते शोधत आणि बाहेर जायची सेफ वेळ बघत तो दुस-या दिवशीही तिथेच थांबला. अनसेफ असूनही. कारण एकदा तिथून बाहेर गेल्यावर आणि बॉडी डिस्कव्हर झाल्यावर परत तिथे येता येणार नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं. प्रत्येक फोल्डर आणि फाईल त्यानं उघडून बघितली. तिच्या अकाउंटवर पुन्हा पुन्हा लॉगिन करून लोकांशी चॅट करत राहिला. शनाया जगात नसतानाही तिच्या फ्रेंडसना तिचे मेसेज जात होते. तो तिथे तिच्या रूममधे असेपर्यंत त्याला बाहेरच्या जगासाठी शनाया जिवंत रहायला हवी होती. एकदा दोनदा कुणीतरी बेल वाजवली तेव्हा त्याने अर्थातच दार उघडलं नाही. पण मग मात्र तो अस्वस्थ झाला. नंतर दुर्गंधी असह्य झाली तेव्हा तिचा पी.सी. फॉर्मॅट करून कोणालाही न दिसता रात्रीच्या अंधारात तिथून निघण्याचा त्याचा प्लॅन होता.
आता जोएल पूर्ण अडकला होता. आणि आता हेरोईनची मोठी क्वांटिटी बाळगल्याचा चार्जसुद्धा त्याच्यावर ठेवला जाणार होता.
माझा आयफोन मला परत मिळाला. त्यातल्या अश्लील पिक्स पोलिसांनी बघितल्या असणारच. पण त्यांनी त्या बाबतीत मला काही विचारलं का नाही हे त्यांना विचारायचा मूर्खपणा मी करणं शक्य नाही. आयफोन आता घरीच ड्रॉवरमधे पडलाय.
डेव्हनं प्रॉमिस केल्याप्रमाणे मला “रीस्टोअर विथ ऑनर” केलंय. मी अजूनही त्याच फ्लोअरवर एम पी थ्रीच्या दणदणाटात ”काना”त घुसून काम करत बसतो.
काना बंद पडला की अत्यानंद होऊन “कांटा लगा…” च्या चालीवर “काना हगा…”, म्हणून विली तसाच “नाशिकढोल” नाचतो.
फरक एवढाच छोटासा की आता माझ्या खिशात पंधराशे रुपयाचा नोकिया 1280 असतो. त्यात फक्त फोन येतो आणि फोन जातो. बस. ब्लू टूथ, एम्पेग, एमएमएस, जीपीआरएस. काही नाही त्यात. सेफ वाटतं एकदम.
– नचिकेत
(http://gnachiket.wordpress.com/2010/08/27/%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%93-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4/)
Facebook Comments

6 thoughts on “बी. पी. ओ.”

  1. नचिकेत ची कथा सॉलिड आणि खऱ्यासारखी आहे.
    ती पुन्हा छापल्याबद्दल, मी एक वाचक म्हणून तुमच्या दिवाळी अंकाचे आभार मानतो.

  2. ही कमेंट प्रकाशित का होत नाहीये काही केल्या कळत नाही-
    Anonymous said:
    Thought I would comment and say neat theme, did you make it for yourself? It's really awesome!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *