Uncategorized

बुद्ध

“देव म्हणजे कोण? देव म्हणजे काय?
देव म्हणजे हे का? देव म्हणजे ते का?”
“देव म्हणजे हे नव्हे. देव म्हणजे तेही नव्हे.
तर्काच्या कसोटीवर जो कार्यकारणभाव स्पष्ट करता येतो, तो देव नक्कीच नव्हे.
सध्याच्या आकलनानुरूप जे स्पष्ट करता येत नाही, तिकडे देव असू शकतो.”
“म्हणजे असेलच.”
“असंही म्हणता येणार नाही.
संपूर्ण अतर्क्यापासून सुरू झालेला प्रवास आज इथवर आला आहे.
तर्क्य रोज वाढते आहे, अतर्क्य रोज घटते आहे.”
“म्हणजे नेहमीच काहीतरी अतर्क्यसे उरेलच.”
“तसे काही उरलेच नाही, असे तर्काला सिद्ध करावेच लागेल.”
“असे कधी होईल?”
“ज्याचा कार्यकारणभाव मला कधीच स्पष्ट करता येणार नाही,
जे मला कधीच समजून घेता येणार नाही,
असे मानवी बुद्धिमत्तेच्या पल्याड ह्या जगात काहीतरी आहे,
ह्या धारणेचा समूळ लय होईल तेव्हा.”
“हा माज आहे. मानवाच्या आकलनाबाहेरही काही असेलच – जसा की देव”
“अतर्क्याच्या मागे असणाऱ्या अशा अद्भुत शक्तींचं अस्तित्त्व
तुमच्या बुद्धिमत्तेचं फलित आहे, ते तुमच्या आकलनाबाहेर कसं असेल?”
“अं?”
“मृगासनावर बसून उपासना करणारा मनुष्येतर प्राणिवर्य पाहण्यात नाही.
वाघाला बोकडाचा बळी दगडावर चढवताना कुणी पाहिल्याचे ऐकिवात नाही.
देवाच्या अस्तित्त्वावर इतका ठाम विश्वास असणारा दुसरा प्राणी ऐकिवात नाही.
आज जे आकलनाबाहेर आहे, त्यातलेच काही उद्या आत असेल.
जे आत आहे, त्याला ते सुधारेल, अधिक सुस्पष्ट करेल.
आकलनाच्या कक्षा नित्य नूतनाचा स्वीकार करत सनातन वाढत आहेत.
ह्या विस्ताराला क्षय व लय नाही,
विस्ताराच्या अंताचे भय नाही
कारण, विस्ताराच्या अंतापलीकडे काही असणे संभवत नाही
उत्पत्ती-स्थिती-लयाच्या चक्रातून ते मुक्त आहे.
हे शाश्वत आहे.
सध्या आपले नसणे आकलनीय आहे, आपले असणे संदिग्ध आहे
पण तसे उद्या असेलच असे नाही.
ते तसे उद्या नसावे, ह्यासाठी हे ध्यानात घेतले पाहिजे की
आपण आज आहोत तसे उद्या नसणार,
आपली बुद्धी धारण करणारा हा देह पुन्हा नसणार,
जर संक्रमित व जतन केली नाही, तर ही बुद्धीही उद्या नसणार.
तिच्या संक्रमणाची व जतनाची
तसे करू शकणार्‍या प्रत्येक मानवाच्या,
म्हणजे अर्थातच सर्वच जन्माला येणार्‍या माणसांच्या अंतापर्यंत कल्याणाची
व पर्यायाने स्वहस्तेच हिंसेने युद्धून तिला आपल्यासह नष्ट न करण्याची
सामूहिक जबाबदारी आपल्यावर आहे.”
– ए सेन मॅन
(http://asanemanthinks.blogspot.com/2010/08/blog-post.html)
Facebook Comments

1 thought on “बुद्ध”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *