Uncategorized

हानोवरमध्ये बघण्यासारखं

ऑफिसच्या कामानिमित्त थोडया दिवसांसाठी हानोवरला आले आहे. रोज दिवसभर कामच चालतं, त्यामुळे गावात फेरफटका मारला नव्हता. काल ती संधी मिळाली.
हानोवरला पर्यटक फारसे येत नाहीत. पर्यटकांनी आवर्जून यावं असं इथे काहीच नाही. पण चुकूनमाकून कुणी आलंच, तर त्यांना आपलं गाव बघता यावं, म्हणून हानोवरच्या सगळ्या प्रेक्षणीय जागी घेऊन जाणारा एक लाल पट्टा रस्त्यावर आखला आहे. मुख्य रेल्वे स्टेशनपासून सुरुवात करून गावातली सगळी प्रेक्षणीय स्थळं बघून पुन्हा स्टेशनवर आणून सोडणारी ही चार – साडेचार किलोमीटरची वाट आहे. काल या वाटेवरून हानोवरमध्ये भटकले. सगळ्यात दुष्टपणा म्हणजे जिथून ही वाट सुरू होते, तिथेच नेमकं काही बांधकाम चालू आहे, आणि रस्त्यावर कुठेच लाल पट्टा नाही. पंधरा मिनिटं शोधल्यावर पुढे तो पट्टा सापडाला. काही वैशिष्ठ्यपूर्ण वास्तुरचना, जुनी चर्च, ज्यूंचं स्मारक असं बघत बघत टाऊन हॉलला पोहोचले. अतिशय सुंदर वास्तू आहे ही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इथे बांधकाम सुरू करण्यापूर्वी दलदल होती – तिथे भराव घालून त्यावर देखणी इमारत बांधली आहे. घुमटाच्या वरून शहराचं विहंगम दृष्य बघायला मिळावं, म्हणून वर घेऊन जाणारी खास लिफ्ट आहे. घुमटाच्या सौंदर्याला बाहेरून किंवा आतून बाधा न आणता आपल्याला चाळीस मीटरपेक्षा जास्त उंच नेणारी ही लिफ्ट घुमटाच्या आकाराप्रमाणे वळत, १५ अंशात तिरपी वर जाते (जर्मन इंजिनियरिंग!), आणि आपण जमिनीपासून सुमारे १०० मीटर उंचीवर येऊन पोहोचतो. वरून दिसणारं गावाचं विहंगम दृष्य खासच.
नवा टाऊन हॉल वगळता अगदी आवर्जून बघायला म्हणून जावं, असं इथे फारसं काही नाही. साधं गावासारखं गाव. तरीही त्याचा खरा चेहेरा दिसल्यावर एखादं गाव तुम्हाला आवडून जातं. काल असंच झालं. ‘लाल वाटेवरून’ जाता जाता पायाचे तुकडे पडायची वेळ आली होती. सहा तास भटकून झालं होतं, आणि आता नवं काही बघायला डोळे, कॅमेरा, पाय उत्सुक नव्हते. हवा फारशी उबदार नव्हती. थोडक्यात, छान कुठेतरी बसून कॉफी घ्यावी असा मूड होता. आता अश्या वेळी मस्त टेबल बघून रस्त्यावरच्या कॅफेमध्ये बसायचं, का ‘काफे टू गो’ घ्यायची? तंद्रीमध्ये ‘काफे टू गो’ ऑर्डर केली, आणि आता कुठे निवांत बसायला मिळणार म्हणून स्वतःवरच वैतागले. सुदैवाने मार्केट चर्चशेजारी वार्‍यापासून आडोश्याला एक बाक होता. तिथे बसकण मारली, आणि कॉफी प्यायले. शेजारीच उघड्यावर एक पुस्तकांचं कपाट होतं. मी तिथे १५-२० मिनिटं बसले असेन. तेवढया वेळात एक काकू पुस्तकं बघून गेल्या. एक तरूण छानसं स्माईल देत आला, एक पुस्तक ठेवून दुसरं घेऊन गेला, एक जोडगोळी येऊन पुस्तकं बघून गेली. कसली पुस्तकं आहेत म्हणून मी ही डोकावले. आत डॅफ्ने ड्यू मॉरिएची कातडी बांधणीमधली जुनी ‘रेबेका’ होती. फ्रेड्रिक फोरसिथ होता. काही कॉम्प्युटरविषयक पुस्तकं होती. नवी, जुनी, वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं. एक कपाट भरून. बाजाराच्या चौकात ठेवलेली. कपाटावर लिहिलं आहे,
“हे आपल्या शहरातलं पुस्तकांचं कपाट आहे. तुम्ही इथली पुस्तकं कधीही घेऊ शकता, स्वतः शोधू शकता. तुम्ही इथली पुस्तकं वाचा. त्यासाठी ती घरी न्यायला काहीच हरकत नाही. इथलं पुस्तक घेऊन तुमच्याकडचं दुसरं पुस्तक त्याच्याजागी आणून ठेवू शकता. तुम्हाला ते आवर्जून वाचावंसं वाटलं, म्हणजे ते नक्कीच इतरांनीही वाचण्यासारखं आहे. तेंव्हा तुमचं वाचून झाल्यावर इतरांना वाचायला ते परत कपाटात ठेवायला विसरू नका. तुमच्याकडे भरपूर पुस्तकं असतील, आणि तुम्ही ती इथे आणून ठेवू इच्छित असाल, तर या कपाटात मावतील एवढीच पुस्तकं ठेवा.”
मी हानोवरच्या प्रेमात पडले आहे. कारण इथे असं पुस्तकांचं कपाट आहे, आणि त्याचा वापर करणारी माणसं आहेत. टाऊन हॉलच्या घुमटाच्या शंभर मीटर उंचीवरून दिसणार्‍या देखाव्याइतकंच पाच फुटावरून बघितलेलं हे जुनं कपाटही मनोहर आहे.
– गौरी
(http://mokale-aakash.blogspot.com/2010/07/blog-post_25.html)
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *