Uncategorized

एका कवीच्या डायरीतील काही तुटक नोंदी

काहीतरी येतंय बाहेर आतून… दडवून ठेवलेलं बाहेर येतं अचानक, तेव्हा मोठी गंमत वाटते आणि अजून ते दडवून ठेवावसं वाटतं आत. घेतलेला अनुभव तसाच मांडू पाहतो नागडा तेव्हा दमछाक होते प्रतिभेची. मग कित्येक आठवडे कविता नको नको वाटते. इतकं थकवून घेतल्यावर आणखी काय होणार? उपमा नको वाटतात, शब्द नको वाटतात. मग कादंबरी लिहावीशी वाटते. लिहायला बसल्यावर मात्र लिहायचा फारच कंटाळा येतो. फार म्हणजे फारच. मग कथा लिहावीशी वाटते, छोटीशी. एकदम छोटी. जगातली सर्वात छोटी कथा. आशयघन की काय असते ना तशी. पण त्याचाही भयंकर कंटाळा येतो. (ती नाहीये आता ऐकवायला म्हणून कंटाळा येतोय का आपल्याला?) पण शब्द मनात फेर घालतात. येतात. नाच-नाच नाचतात आणि निघून जातात थकून. मी त्यांना आतच ठेवतो. कागदावर धांगडधिंगा करायला आणत नाही बाहेर. मी काय त्यांचा गुलाम आहे की काय असं ते म्हणतील आणि मी त्यांना आणीन बाहेर! त्यांना म्हणावं आधी अपॉइण्टमेण्ट घ्या. मग बघू… नाहीतर बसा तसेच नाचत. मला थोडा त्रास होईल त्याचा. पण होईल त्रास आणि होईल त्याची सवय. पण तुमच्या तालावर मी नाहीच नाचणार मला आत्ता गाणं ऐकायचंय….
जैसे खुशबू नजर से झू जाए….
कसली ओळ आहे ही. नजरेला गंधाचा अनुभव कसा असेल. च्यामारी गुलजारच्या. गंध डोळ्यांना बिलगला तर काय होईल. त्यांना तो दिसणारच नाही एक तर. कारण त्यांच्याकडे रेटायनामध्ये ती सोयच नाही ना. किंवा दिसतील त्यांना गंध. ओबडधोबड चेह-याचे, भरपूर व्रण असलेले किंवा सोरायसिस झालेले. त्याच्याशी काय. डोळ्यांच्या नाकांनी तो हुंगला की झालं…. कुरूप गंध दिसू नयेत म्हणूनच डोळे बंद होतात का गंध हुंगताना?
तिचा गंध कसा होता? तिचा विचार नकोच आता. मी कवी आहे, आत्ता लिहितो आहे हे सगळं माझ्या ऑफिसात. माझा बॉसने पाहिलं तर काय म्हणेल? का हाकलून देईल? पण आत्ता लिहावसं वाटलं तर लिहिलं पाहिलंच की. म्हणजे शी जोरात लागली की जाण्याशिवाय काहीच पर्याय नसतो…. नाही का?
o o o o
ती ती फक्त ती? कुठे आहे ती? कशी असेल ती? कशाला गेली असेल ती? का गेली असेल ती? मला कंटाळून तर गेली नसेल ना ती? मी जे वाचून दाखवायचो त्यातलं तिला किती कळायचं ठाऊक नाही पण मुकाट ऐकायची माझं सगळं – कविता-बिविता वगैरे. शांतपणे. मध्येच काहीतरी दाद द्यायची एखाद्या ओळीवर किंवा प्रतिमेवर एरवी निश्चलच. एकटक पाहत राहायची माझ्याकडे. भिरभिरत्या डोळ्यांनी. मला पहिल्यांदा फारच विचित्र वाटायचं, पण नंतर सवय झाली त्या नजरेची. तिच्या घरी कोण होतं ठाऊक नाही. पण एकदाच तिने तिच्या काकांशी का बाबांशी बहुतेक ओळख करून दिली होती. बस्स. इतकंच .बहुतेकदा तिच्या घरी कोणीच नसायचंच. एक कविता तिला फारच आवडली एकदा. ती कविता ऐकताना ती काहीच बोलली नाही. पण तिच्या त्या भिरभिरत्या नजरेत विलक्षण ओढ जाणवली मला तेव्हा. कविता वाचल्यावर ती ताडकन उठली आणि तिने अनामिक ओढीने तिचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले की. मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा तिचे डोळे मिटलेले होते. तिची जीभ माझ्या जिभेला भिडू पाहत होती. मला दोन क्षण काय करावं काहीच कळेना. पण एक वीज अशी थरारली की मीपण त्या पुरात सामील झालो. आम्ही सेक्सच्या परमोच्च क्षणावर असताना मला ती म्हणाली, “मला करशील का तुझी कविता?” बस्स. आमच्यात झालेला इतकाच एकमेव पूर्ण वाक्यांचा संवाद. मी काहीच बोललो नाही. ती माझी कविता कशी होईल? बहुतेक ही सरबरली आहे, मला वाटलं. सगळं झाल्यावर थोड्या वेळाने मी तिला म्हणालो नाही होता येणार… आणि तिच्या स्तनांशी लहानग्यासारखा झोपून गेलो. झोपेत खूप वेळ मी तिच्या स्तनांना लुचत होतो आणि ती माझ्या केसांतून मायेने हात फिरवत होती. आमचा संबंध म्हणावा तसा इतकाच आजपर्यंत. त्यानंतर ती कुठे गेली ठाऊक नाही. इतके दिवस मी तिला शोधतोय. इथून त्या काळाच्या माईकवरून आनाऊन्स करू का की कृपया तू जिथे कुठे असशील तिथून निघून ये. मी नवं काहीतरी लिहिलंय असं खोटं-खोटंच काहीतरी सांगावं का?
o o o o
आज डायरीत काहीच लिहावसं वाटत नाहीये. आता मी काय करणार माहीत नाही. पण आत्महत्या करावीशी वाटतेय. पण फाटत्येय तितकीच. कारण त्यासाठी लागणारं धैर्य माझ्याकडे नाही. स्वतःला संपवणं म्हणजे काय खायची गोष्ट असते काय? ती गेली. आता मी कविता कोणला ऐकवायच्या काहीच कळत नाही. ती कुठे गेली असेल. जाताना तिने मला काहीच का सांगितलं नाही. का तिच्या वडिलांना माझ्यावर आणि तिच्यावर संशय आल्याने तिचं गुपचुप लग्न लावून दिलं असेल? मला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही. ती कोण होती, काय होती? फक्त तिला माझ्या कविता आवडायच्या म्हणून मी तिला ऐकवायचो. फक्त तिला… ती गेली आता. कविता पण जाईल का? मग मी करू तरी काय? ती गेली, कविता गेली.. मग माझं काय होईल? जाऊ दे. जास्त विचार नको करायला. त्यापेक्षा आज झोपूयात. तेव्हढाच मेंदूला आराम.
o o o o
आज एक कविता लिहिलीये नवी. पण ऐकवायला कोणीच नाहीये. ती, जिला मी कविता ऐकवायचो ती, गेले काही दिवस कोठे बेपत्ता आहे कुणास ठाऊक? पण त्यामुळे मी भिरभिरलोय. काय करावं कळेनासं झालंय. एकदा वाटलं, कविता फाडून टाकाव्यात. नंतर म्हणलं, आपल्या पोटचं पोर कसं काय मारणार? त्यापेक्षा तिला शोधावं. तिला म्हणूयात एकच कविता ऐक शेवटची. मग मर तुला हवं तिथे. तिला शोधत शहराच्या प्रत्येक रस्त्यावर फिरलो. गल्ली गल्ली पालथी घातली. पण ती नाहीच. चार दिवस तिला शोधत राहिलो… ऑफीसला दांडी झाली. भिका-यासारखा दिसू लागलो. पण परिमाण एकच – तिचं न सापडणं. तिच्यासाठी चार सुट्या झाल्या विदाऊट पे. ती सापडली नाहीच. आता मी काय करू? कोणाला ऐकवू कविता. घरी ऐकवल्या तर वेड्यात काढून हॉस्पिटलमध्ये टाकतील. शहरामध्ये ऐकवल्या, तर वेड्यात काढून दगडांनी चेचून मारतील किंवा फासावर लटकवतील. (प्लेटो, तुझ्या जीन्स आल्यात वाटतं या शहरातल्या माणसांच्या रक्तात.) मी गांजा प्यालो. दारू प्यालो. पुन्हा शोधलं तिला. रस्त्यांवर, झाडांमध्ये. बाजार शोधले. वेश्यावस्त्या शोधल्या. शेवटी दारू गांजा अफीम अफू एकत्र प्यालो. शहरातल्या मोठ्या तळ्यात जीव द्यायला गेलो, तर पाण्यात माझंच प्रतिबिंब दिसलं आणि माझ्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव झाली. मी मी आहे. वेडा आहे किंवा कवी आहे किंवा आणखी काही आहे. आता तिला शोधणं मूर्खपणा असल्याचा मला साक्षात्कार झाला. खिशात कवितांचे कागद होते. मी शहराच्या महत्त्वाच्या चौकात आलो आणि सगळ्या रहदारीला उद्देशून कविता मोठ्याने म्हणू लागलो. माणसांना हे कळलं आणि त्यांनी माझ्यावर दगडफेक सुरू केली. वेडा वेडा असं म्हणू लागले. वाईट म्हणजे कदाचित मी भविष्यकाळात येशू किंवा बुद्ध किंवा आणखी कोणीतरी प्रेषित किंवा तत्वज्ञ वगैरे झालेला असेन…
– प्रणव प्रि. प्र.
(http://mazemuktchintan.blogspot.com/2010/06/blog-post.html)
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *