Uncategorized

कवितेचं नामशेष होत जाणं

एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक तर संपलं. कशासाठी लक्षात राहतील ही दहा वर्षं? जगाच्या स्मृतीत जसे 9/11, त्सुनामी, ओबामाची निवडणूक, डॉलीचा क्लोन राहिले – तशी कशासाठी लक्षात राहतील ही पहिली दहा वर्षं? म्हणजे उदाहरणार्थ, मराठी भाषेसाठी, मराठी साहित्यासाठी या दहा वर्षांत काय झालं? मराठी कवितेसाठी हे दशक कशासाठी लक्षात राहील? लाडक्या कवींच्या मृत्यूमुळे की मराठी कवितेच्याच नष्ट होण्याच्या प्रक्रियेमुळे?
अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, अरुण काळे, भुजंग मेश्राम या कवींच्या जाण्यानंच लक्षात राहणार का गेलं दशक? की सकस मराठी कवितेच्या दुर्मीळ होत जाण्यानं?
हे सगळं मनात झरझर आलं कारण नामदेव ढसाळांचं ‘निर्वाणाअगोदरची पीडा’ वाचलं म्हणून. ज्यांच्या कवितेनी झोप उडवली, घसा कडजहर केला, ‘छबुकलं दारिद्र्य’ ज्यांनी लिहिली, ज्यांच्या कवितेतल्या उद्रेकानं काळजात काहिली पेरली, त्या नामदेव ढसाळांनी या दशकात जी कविता लिहिलीय, ती या दशकालाच साजेशी आहे. फ्रॅगमेंटेड. ढसाळांची कविता जिथे जाऊ शकते तिथे न जाणारी. यात ढसाळांचे कित्येक तुकडे विखुरलेयत – त्यांचं आजारपण, ‘विलासराव देशमुख, पतंगराव कदम, सुशीलकुमार शिंदे’- अशी अर्पण पत्रिका, मल्लिकाबरोबर लिहिलेल्या ‘गोमू संगतीनं’ दोन कविता – अनेक नामदेव ढसाळांनी ही ‘निर्वाणाअगोदरची पीडा’ प्रत्यक्षात आणलीय. त्यात एक ढसाळ, गेल्या दशकातल्या मृत कवींचे मृत्यू जिव्हारी लागलेले ढसाळही आहेत. म्हणजे यात त्यांच्या चित्रे-कोलटकरांच्यावरच्या साठीच्या कविताही आहेत.
गेल्या दशकातल्या कवितेच्या वैराणपणाचं दुखरं कारण मला वाटतंय, ते म्हणजे पोस्ट मॉडर्न, पोस्ट इंडस्ट्रियल, पोस्ट सर्व काही, फ्रॅगमेंटेड अस्तित्व. गेल्या दशकात ज्यांनी कवितासदृश काही लिहिलं त्यांनी या एका कालरेषेवर वेगवेगळी आयुष्यं, एकाच वेळी जगण्याचा अट्टाहास नोंदवलाय. परंतु तो अट्टाहास आणि त्याच्या नोंदी म्हणजे कविता नाही हे त्या कवितासदृश लेखकांनाही मनातून कळलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कविता सदृश लेखनाची कडवट टीका करण्यात हशील नाही.
चिरीमिरी, भिजकी वही, अभुज माड, ग्लोबलचं गावकूस, नंतर आलेले लोक – या दशकातला महत्त्वाच्या कविता जरी 2000 नंतर छापलेल्या असल्या तरी बहुतेक आधी लिहिल्या गेलेल्या आहेत. (कदाचित अरुण काळयांच्या काही कवितांचा सन्माननीय अपवाद वगळता.)
सध्याची फॅशनेबल चाल म्हणजे सा-या दुखण्याचं निदान ‘सुमारांची सद्दी’ या ढोबळ कॉईनेजनं करायचं. मला ते पटत नाही. सर्व काळात सदासर्वदा सुमार कवी असतातच… पण सदासर्वकाळ सळसळत खरी कविताही लिहिली जात असते. त्या कवितेचं या दशकात काय झालं?
मला रॅण्डम असं वाटतं – की जितकं इंटरनेट, फेसबुक, मोबाईल फोन, टेक्स्ट मेसेजिंग, व्हर्च्युअल अस्तित्व वाढतंय, तितकी एकसंध व्यक्तिमत्त्वच नामशेष होतायत. प्रत्येक जण जेवताना टीव्ही बघतोय, टीव्ही बघताना फोन घेतोय, फोनवर ऐकताना एसएमएस पाठवतोय, मेल चेक करतोय, इन्टेन्स फिलिंग जगणं आणि ते भावोत्कट पानांवर/स्क्रीनवर उतरवणं क्रमश: दुर्मीळ होतंय. किंवा एकच व्यक्तिमत्त्व कवी, राजकारणी, प्राध्यापक अशा पन्नास भूमिका निभावतंय. यातून कविता कशी निर्माण होणार?
कालच एका कवितासदृश लेखनात प्रियकराशी बोलताना टीव्ही बघणारी बाई दिसल्यावर तर या हायपोथेसिसला बळकटीच मिळाली. मग वाटलं, अरुण कोलटकरांनी अशा मॉडर्निटीला कायम अंतरावर ठेवलं म्हणूनच तो माणूस खरी कविता लिहू शकला का काय? फेसबुकवरचं व्हर्च्युअल अस्तित्व, टिङ्कटरवरचे मतामतांचे गलबले, हजारो इच्छांची टोकं विणता विणता ‘वामांगी’ सारखी कविता शक्य तरी होईल का?
किंवा मला अत्यंत आवडणा-या मराठीतल्या दोन कवयित्री – सुचिन्हा भागवत, जिनं आपलं अस्तित्व आणि त्याच्या गुंतागुंतीला दुस्तर आयडेंटिटीतून दूर ढकललंय आणि मेघना पेठे, जिच्या व्हर्च्युअल मिडिआतल्या मौनानं मला कायम चकित केलंय – या दोन्ही व्यक्ती जिवंत, सळसळत्या कविता का लिहू शकतायत? मेघनाची अर्थात ‘मी नाय साला तुझी बायको होणार’ ही एकमेव कविता या दशकातली आहे – पण ती महत्त्वाची मानावी इतकी ऐतिहासिक आहे.
एकीकडून जगणं तपासत जाताना पोस्ट इंडस्ट्रियल जगण्याची कंपल्शन्स जशी लक्षात येतायत – तितकी कवितेच्या दुर्भिक्ष्याची ओळख नव्यानं व्हायला लागलीय. कवितेसारखं दिसणारं बरंच काही लिहिलं जातंय – पण त्या कविता नाहीत. निखळ कवितेसाठी व्हर्च्युअल प्रलोभनांना दूर ढकलायचं किंवा निदान कवितेपुरतं तरी त्यांना दूर ढकलून आपण दुसरंच व्हायचं – अशा स्ट्रेटेजीज लक्षात येतायत. कदाचित म्हणूनच सकस मराठी कवितेचं केंद्र आता वेगळया गावांकडे सरकायला लागलंय. जरी पुरस्कारांना तिथपर्यंत पोचायला वेळ लागणार असला तरी.
अरिझोनातला मध्ययुगीन जपानी कवितेचा प्रोफेसर फोर्ड यांचा वर्ग मला आठवतोय. धर्म आणि कला अशी फारकत न झालेला जपानी कवितेचा तो काळ. कवी तिथे त्याच्या पूर्ण झेन असण्यात उमलून यायचा. प्रोफेसर फोर्ड त्या कविता शिकवताना माणसाचं विखुरलेपण आणि एकसंघ होण्याची तगमग ह्याबद्दल सांगायचे. संस्कृती जगण्याच्या निरगाठींची उत्तरं कशी कवितेत शोधते याचं फोर्डगुरूजींचं प्रवचन मला अजून आठवतंय. हायकू आणि बुद्धाला उमजलेली नित्यशून्यता यांचं नातं अधिक लक्षात येतं.
सकस कवितेचं नामशेष होत जाणं म्हणजेच सकस ‘मी’ नावाच्या भूमीचं पूर्ण खालसा होणं. ती निरगाठ न उकलताच – त्याचं शंभर निरगाठींसकट तगमगत राहाणं. ग्लोबलच्या गावकुसात ‘कविता’ मरण्याचं कारण हेच आहे का काय?
माझ्या लाडक्या कवींच्या नसण्यानं – म्हणजे विंदा, चित्रे, कोलटकर, अरुण काळे, भुजंग मेश्राम यांच्या नसण्यानं हे शतक सुरू झालंय – या नंतर? मराठी भाषेला युनिकोडमध्ये जगवताना कवितेच्या नसण्याकडं कोणाचंच लक्ष जाणार नाहीये का काय? की भाषा जगवताना कवितेचा सायलेंट मृत्यू हा इश्चेनिया आम्ही मान्य केलाय? बहुधा.
‘निर्वाणाअगोदरच्या पीडे’मध्ये ढसाळांचे फ्रॅगमेंट म्हणतंय, तसंच म्हणावं लागेल मग कदाचित, ”किती कडू असतं, हतबल माणसाचं जगणं” – आणि हतबल वर्तमानात कवितेनं ठार नामशेष होत जाणं.
– ज्ञानदा देशपांडे
(http://dnyanadadeshpande.blogspot.com/2010/05/blog-post_27.html)
Facebook Comments

2 thoughts on “कवितेचं नामशेष होत जाणं”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *