Uncategorized

सहभोजन

सर्वांनी मिळून बाहेर जेवायला जाणे हा आमच्या घरातील अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. “धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय” या वाक्प्रचाराचं ते आमच्याकडलं उत्तम उदाहरण आहे. बाहेर जेवायला जाण्याच्या आमच्या ह्या कार्यक्रमात अनेक नानाविध वादांचा आणि भांडणांचा समावेश असतो.
सर्वात पहिला वाद म्हणजे ’कुठे जायचं?’ हा! या विषयावर एकमत न होण्याचं कारण म्हणजे प्रत्येकाला दर वेळी वेगवेगळं काहीतरी खायचं असतं. कुणाला चायनीज, कुणाला थाळी, कुणाला सामिष, कुणाला सीझलर… एक ना दोन! आमच्या कुटुंबातल्या सगळ्यांना हवा तो पदार्थ एकाच ठिकाणी मिळू शकेल असं हॉटेल या भूतलावर अजून यायचंय. आता एकदा वाद सुरू झाला की मूळ विषय सुटायला फारसा वेळ लागत नाही. मग भूतकाळातल्या संपूर्णपणे असंबद्ध गोष्टींवर एकमेकांशी अर्धा-पाऊण तास तावातावाने भांडण होतं. इतकी बाष्फळ बडबड केल्याने सगळ्याना भूक लागते आणि मग गाडी पुन्हा मूळ विषयाकडे वळते. सरतेशेवटी त्या दिवशी ज्या व्यक्तीचा आवाज सगळ्यात मोठा निघेल त्याचं म्हणणं ऐकलं जाऊन हॉटेल निश्चित होतं. बहुतांशी वेळा तो आवाज स्त्रीवर्गापैकी कोणाचातरी असतो हे जाणकारांस वेगळे सांगायला नकोच. मग एकमेकांना आवरायला लागणार्‍या वेळेबद्दल ताशेरे ओढले जातात आणि सभा बरखास्त होऊन सगळे आपापल्या खोल्यांमधे तयार व्हायला जातात.
खरं तर पूर्वीपासून असं नव्हतं. लहानपणी आम्ही, म्हणजे आइ, बाबा, मी आणि माझा मोठा भाऊ, या विषयावर इतके भांडायचो नाही. तेव्हा सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे हॉटेलात जाणे ही क्रिया ’चैन’ या प्रकारात मोडायची, ’गरज’ या प्रकारात नाही. हॉटेलची आणि तिथे गेल्यावर ऑर्डर करायच्या गोष्टींची निवड ही ’बजेट’ या एकाच गोष्टीवर अवलंबून असायची. आता काळ बदलला, परिस्थितीही थोडी बदलली. आम्हाला आमची स्वतंत्र मतं आली (म्हणचे आइ-बाबांच्या भाषेत आम्हांला “शिंग फुटली”). आमच्या लग्नानंतर मतभेदांत भर घालायला पूर्णपणे वेगळ्या मतप्रवाहांच्या व्यक्तींचा कुटुंबात समावेश झाला. त्यामुळे हॉटेलच्या निवडीत आता घरापासूनचं अंतर, तिथे मिळणार्‍या गोष्टींचं नाविन्य, तिथे जागा मिळायला लागणारा वेळ अशा अनेक बाबींनी गोंधळात भर घातली आहे.
पण ह्या गोष्टी बदलल्या असल्या तरी लहानपणच्या काही सवयी मात्र आता कायम तशाच राहतील. उदाहरणार्थ हॉटेलात सॅलड-रायता अथवा मसाला पापड हे पदार्थ कधीही ऑर्डर करायचे नाहीत. याचं सरळ साधं कारण म्हणजे उगाचच “इटालियन”, “रशियन”, “ग्रिन” अशा नावाची सॅलड्स शेवटी फक्त ताटलीत नीटशा रचलेल्या गाजर-काकडी-टमाट्याच्या चकत्याच असतात असं आइचं ठाम मत होतं. आणि त्यासाठी अथवा पापडावर भिरभिरलेल्या कांदा-कोथिंबिरीसाठी किंवा दह्यात साखर आणि बुंदी कालवलेल्या रायत्यासाठी उजव्या रकान्यातला आकडा कधीही योग्य किंमत दर्शवू शकत नाही हे आमच्या मनावर बिंबवलं गेलं आहे. तशीच दुसरी गोष्ट म्हणजे आइसक्रीम. हॉटेलात मिळणारं आइसक्रीम हे बाहेर दुकानात मिळणार्‍या आइसक्रीमपेक्षा महाग असल्याने ते तिथे न खाता जेवणानंतर दुसर्‍या एखाद्या दुकानात जाऊन खायचं. या गोष्टींची मला आणि माझ्या भावाला इतकी सवय झाली आहे की हॉटेलात वेटरने सॅलड-रायता-पापड-आइसक्रीम हे शब्द उच्चारायला सुरुवात करताच आमच्या मेंदूकडून मानेला आपोआप संकेत जाऊन आमची मान क्षणार्धात नकारार्थी हलायला लागते.
हॉटेलच्या निवडीसंदर्भातला वाद ही निव्वळ सुरुवात असते. तिथे गेल्यावर ऑर्डर काय करायचं हा पुढचा वादाचा मुद्दा. ऑर्डर करताना आमच्यातला प्रत्येक जण वेगवेगळ्या भयगंडाने पछाडलेला असतो. मी आणि भाऊ ऑर्डर कमी तर पडणार नाही ना ह्या भीतीने, आमेच्या सहचारिणी ऑर्डर जास्त होऊन उरणार तर नाही ना या भीतीने, आइ बिल जास्त होणार नाही ना या भीतीने, तर बाबांना कढीपत्ता आवडत नसल्याने पदार्थात कढीपत्ता तर नसेल ना या भीतीने ते पछाडलेले असतात. त्यांची ही भिती या थराला पोचली आहे की इटालियन पास्ता ऑर्डर करतानाही त्यात कढीपत्ता नसतो ना याची ते वेटरला विचारून खात्री करून घेतात. स्त्रीवर्गाचं लक्ष आपण काय ऑर्डर करायचं यापेक्षा आपले नवरे काय खाताहेत याकडे जास्त असतं. इतकं खाल्यानेच आमची वजनं कशी “भरमसाठ” वाढली आहेत याची जाणीव पहिला घास तोंडात जाण्याआधीच आम्हाला करून दिली जाते. किमान त्या विचाराने तरी खाल्लेलं अन्न अंगी लागणार नाही अशी वेडी आशा त्यांना वाटत असावी. ह्या सगळ्या गोंधळात वेटरच्या स्मरणशक्तीनुरूप काहीतरी ऑर्डर दिली जाते. जणू हे सगळं कमी आहे की आता यात तिसर्‍या पिढीच्या मतांचीही भर पडली आहे. माझी पुतणी आता काय खायचं याबद्दल स्वत:चं मत असण्याइतकी मोठी झाली आहे. हल्ली हे वय ४ वर्षे असतं हे इथं नमूद करायला पाहिजे. तिला काय पाहिजे हे जरी माहित असलं तरी कुठे काय मिळतं हे तिला कळत नाही आणि त्यामुळे अतिशय चमत्कारिक प्रसंगांना आम्हांला तोंडी जावं लागतं. एकदा आम्ही “फक्त शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीय थाळी मिळेल” अशा अस्सल ठिकाणी गेलो आणि सगळ्यांसाठी थाळी सांगितली. आपल्याला न विचारता ऑर्डर दिल्याचा तिला राग आल्याने ती एकदम खुर्चीवर उभी राहून “मला चिकन लॉलिपॉप पाहिजे….” असं ती मोठ्याने ओरडून वेटरला सांगायला लागली. चिकन हा शब्द त्या ठिकाणी पहिल्यांदाच उच्चारला गेला असावा, कारण तो कानावर पडताच तिथल्या एक-दोन वेटर्सच्या हातातली भांडी गळून खाली पडली, एखाद्याला चक्कर आल्यासारखंदेखील वाटलं. तरी नशिबाने गल्ल्यावर बसलेल्या सत्तरीपलीकडल्या आजोबांना कमी ऐकू येत असल्याने त्यांना हे कळलं नाही. नाहीतर त्या जागीच त्यांच्या तोंडाला फेस येऊन डोळ्यांना कायमची ऊर्ध्व लागली असती.
एकदा सांगितलेले पदार्थ आले की स्त्रीवर्गाकडून त्याची चव, त्याची पाककृती, त्याची अवाजवी किंमत , तोच पदार्थ आपण घरी कसा अजून चांगला करु शकतो, तो पदार्थ इथल्यापेक्षा अमुक एका ठिकाणी कसा चांगला असतो इत्यादी विषयांवर टिप्पणी होते. घरी केलेल्या एखाद्या पदार्थाबद्दल आपण मत व्यक्त करायला गेलो असता “पानातल्या अन्नाला नावं ठेवू नयेत” ही आपल्याला दिली गेलेली शिकवण इथे सोयीस्करपणे नजरेआड केली जाते. सरतेशेवटी ठरल्याप्रमाणे “हे पहा किती उरलंय, तरी सांगत होते”, “इतकी टीप कशाला द्यायला पाहिजे” ह्या विषयांवर वक्तव्य करून “आपण सगळ्यांनी यापुढे एकत्र हॉटेलात जायलाच नको ना,” असा ठराव पास करून आम्ही घरी यायला निघतो.
काही दिवस असेच जातात, नवीन वर्षाच्या निश्चयांप्रमाणे हा ठरावपण लगेच बारगळतो. उगाचच एखादं क्षुल्लक कारण काढून त्यानिमित्त बाहेर जेवायला जायचा प्रस्ताव कुणीतरी मांडतं आणि २ मजले खाली ऐकू जाइल अशा आवाजांत आमच्या भविष्यातला हास्यकारक अशा अजून एका आठवणीची जोरदार सुरुवात होते.
– अमोल पळशीकर
(http://palshikar.blogspot.com/2010_04_01_archive.html)
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *