Uncategorized

ऊन की बात…

’डी व्हिटॅमिन कमी आहे, सकाळच्या कोवळ्या उन्हात बसत जा’ असा सल्ला जाता जाता डॉक्टरनी दिला .
इथे च्यायला रिकामा वेळ कोणाला आहे असं म्हणून, मी तो येता येता त्याच्याच क्लिनिकच्या डस्टबिनमधे टाकला.
रात्री नवर्‍याला गमतीत डॉक्टरच्या सल्ल्याबद्द्ल सांगायला गेले, तर तो भलताच गंभीर झाला.
“तुला सांगतो , दुर्लक्ष करू नकोस ,परवा ऑफीसमधला जोश्या असाच हसता हसता गेला.”
नवरे कंपनीला अतिशय ऍबसर्ड काहीतरी बरळायची सवय असते हे ठाऊक असूनही घास घशात अडकला.
आणि सर्वानुमते मी ऊन खाण्याचा ठराव पास झाला…..
उठल्यापासून सगळ्यांचं उन्हाच्या कोवळेपणावर च्रर्चासत्र सुरू झालं.
“नक्की जा बरं का उन्हात,” नवरयाने कामाला जाताना अर्ध्या जिन्यातून ओरडून सांगितलं.
आणि शेवटी कंटाळून मी एकदाची कुरकुरत गच्चीत गेले…
गपगुमान मिंटे मोजत खुर्चीत शहाण्यासारखी बसले.
जरा डोळा लागला तो कोवळे ऊन समोर येऊन हसलं…
मी म्हटलं, “आलास बाबा, तुझीच वाट पाहात होते…”
जरा बाजूला आलं नि म्हणालं, “तुझं घर कोणी उन्हात बांधलं?”
[मी म्हटलं,]
“हे आवडलं मला, तुझं स्वत:ला ओळखून असणं…
असलं कसलं तुझं दिवसचे दिवस दुनियेला भाजणं?
बाकी तुला गरम होत नाही, घाम येत नाही?
कधी एकदा पाऊस येतोय असं होत नाही?”
उगाच अवखळ लहान मुलानं चेहरा गंभीर करून बोलावं तसं एक pause घेऊन म्हणालं,
“कम्फर्टेबल असतं गं आपण जसे आहोत तसं असणं…
आधी मला उगाच वाटायचं, ‘पाऊस’ असतो तर किती बरं झालं असतं?
सगळे जण आपली वाट पाहतायत हे फीलिंग किती मस्त…
डॉक्टर्सपासून कवींपर्यंत सगळ्यांनाच तो लागतो.
सगळ्यांच्या लाडाचा वर्षाव त्याच्यावर होतो.
नि तसं बघायला गेले तर ’थंडी’ असणंही माझ्यापेक्षा बरंच.
असं वाटून वाटून, तुला सांगतो, मधे मला फ्रस्ट्रेशन आलं, खरंच…!
सारखं वाटायचं, .आपल्यालाच काय लाइफटाइम निगेटिव्ह रोल प्ले करायला दिलाय?
माझ्या निराश असण्याचा निरोप काउन्सेलरला गेला.
तुला सांगतो, लक्ष कामातून इतकं उडालं होतं…
मे महिन्याचं ऊनसुद्धा जरा अशक्त झाल्यासारखं झालं होतं…
“डी व्हिटॅमिन कमी झाले असणार… कोवळ्या उन्हात बस.” मी तारे तोडले.
माझ्या पीजेनं गंभीर वातावरण जरा लाइट झालं.
“मग पुढे काय?”
“पुढे काय? हं, त्या काउन्सेलरबरोबर सेशन्सवर सेशन्स झाली…
दिलेला रोल पार पाडण्याला ऑप्शन नाही. तर मग तो एन्जॉयच का करू नये हे जुनं शहाणपण परत आलं…”
“अच्छा… हं, तरीच माझ्या नवरयाला कधी नव्हे ते घामोळे झाले…”
“तुला एक भविष्य सांगू का? तू असेच विनोद करत राहिलीस तर लवकरच तुझा डिव्होर्स होईल.
एकदा-दोनदा ठीकाय. रोज कोण इतके पुचाट जोक्स सहन करील?”
[ च्यायला, हे ऊन माझ्याइतकंच आगाऊ आहे.]
“आता काही नाही. अब सब ओके, बॅक टु नॉर्मल.
आता नाही मनात उरलेला कसलाही सल.
नाहीतरी तुम्ही माणसं बोल लावताच थंडीपावसालासुद्धा.
त्यामुळे तुमचं लाडकं होणं हा आता अगदीच गौण मुद्दा.
पाऊससुद्धा मला मस्का मारायला येतो, “यंदा जरा जास्त तापव बघ लोकांना…
त्यानं माझी आठवण काढून उचकी लागावी मला…
ज्याचे त्याचे आपापले इगोज नि आपापले लाड.
असो, आता माझी शिफ्ट संपत आली, तू गुमान खाली जाऊन केर काढ.”
जाता जाता म्हणालं,
“बाकी सांगू नकोस कुणाला आपल्या बोलण्याबद्द्ल.
नि डोळ्यांसाठी रोज एक गाजर ह्यापुढे खात चल.”
चहा घेणार का विचारेन, तोवर मेलं इतकं गरम व्हायला लागलं…
लगोलग खाली उतरून आधी थंडगार पाणी ढोसलं.
रात्री नवर्यानला उत्साहानं माझ्या उन्हाच्या गप्पांबद्दल सांगायला लागले.
ऊन लागलं असणार तुला असं म्हणून त्याने मला ऍज युज्वल गुंडाळून टाकले.
मग म्हणाला, यंदा ऊन जरा जास्तचंय नाही? केव्हा एकदा पाऊस येतोय असं झालंय.
मी जोरात उन्हाची बाजू घेत म्हटलं, काही नाही जास्त. मला डॉक्टरनी कोवळं ऊन खायला सांगितलंय….
– अस्मि
(http://kshitijapalikade.blogspot.com/2010/03/blog-post.html)
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *