Uncategorized

आरं गोयिंदा रं गोपाला

थोडंसं हरवल्यासारखं वाटतंय कालपासून. मित्रांचे “गोविंदा आला रे…” इथपासून ते “श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे..”पर्यंतचे जीटॉकचे स्टेटस मनाला हुरहुर लावत आहेत. एरव्ही “हॅप्पी जन्माष्टमी”सारख्या विनाकारण आंग्ळाललेल्या ओळी ऑरकुटच्या खरडवहीत पाहून डोकं सणकलं असतं. पण आता तसं काहीच वाटत नाहीये. जे काही लिहिलं आहे त्यामागची भावना महत्त्वाची एव्हढंच जाणवत आहे. मनात कुठेतरी खोलवर आवाज येतोय…
आरं गोयिंदा रं गोपाला
येस्वदेच्या तान्या बाला
आज उपास. उद्या धयांडी. लय मजा येईल. मी तं बाबा आगदी मदल्या सुट्टीतच पलुन आलो शालेतना. मं त्यात काय झाला. सगली पोरा आली. पन च्यायला घरची मानसा पन आशी हायेत ना. आदी शालेतना पलुन आलो म्हनून शिया दिलं आनि आता म्हनतात काय उपास काय संद्याकाली हाय. आता आलाच हायेस तं वाईच ढॉराना फिरवून आन. मया आनि दिन्याला कदीच सांगत नाय. कदीपन मनाच सांगतात. का तं मी म्हॉटा पॉरगा हाय म्हनून. मी म्हॉटा आनि त्ये काय बारीक हायेत काय. मया फकस्त येक वर्शानी बारीक आनि दिन्या दोन वर्शानी. आनि परत काय झाला का मनाच वराडतात. त्या दॉगाना कायीच बोलत नाय. जावदे. न्हेतो ढॉराना. लय लांब नाय न्हेनार. वाईच बोडनीवरना पानी दाकवुन आनीन. मंग संद्याकाली नविन बॉड्या आनि चड्ड्या. आनि मग गोयंदो…
आज मी जर कुणाशी या भाषेत बोललो तर लोक मला वेडयात काढतील . पण अगदी दहावी होईपर्यंत मी याच भाषेत सार्यां शी बोलत असे. पुढे अकरावीला आल्यानंतर मात्र ठरवून शुद्ध (?) मराठी बोलायला सुरुवात केली. नाही म्हणायला मी आईशी आजही याच भाषेत बोलतो, अगदी “आये कशी हायेस” अशी सुरुवात करून…
आनली येगदाची ढॉरा फिरवून. आता जरा टायमान बाबा गोरेगावशी येतील. मंग नविन बॉडी आनि चड्डी घातली का द्यावलात जायाचा…
“आरं जरा धीर-दम हाय का नाय? जरा खा-प्या आनि मंग जा द्यावलात.”
“मी तं मंगाशीच खल्ला ढॉरांकडना आल्यावर.”
“जा पन कालोकात फिरू नुकॉ. इचूकाटा हाजार हाय. उगंच सनासुदीचं याप लावाल आमच्या मांगं.”
मी बाबा व्हो म्हनायची पन वाट बगत नाय. त्याज्याआदीच संत्याकडं जातो. संत्या माज्या म्हॉटया आकाचा पोरगा. माज्यापेक्षा वायीच म्हॉटा हाय. वायीच म्हंजे फकस्त चार-पाच म्हयन्यांनी.
संत्या आनि मी द्यावलात जातो. मस्त लायटींग बियटींग केलेली आस्ते. लाउसपिक्चर लावलेला आसतो. बारकी पॉरा द्यावलाच्या आंगनात लंगडी-बिंगडी खेलत आस्तात. आमीपन त्यांच्यात जातो आनि ज्याम मजा करतो. जरा नव साडेनव वाजलं का म्होटी मान्सा यायाला सुरवात व्हते. धा वाजलं का भजन चालू व्हतो. आमी पॉरा तरीपन खेलतच आस्तो. मंग कुनीतरी याकादा म्हॉटा मानूस भजनातना उटून येतो आनि पॉरांवर वराडतो.
“काय रे कार्ट्यानो, तुमाना कलत नाय काय? द्यावाधर्माचा भजेन चालू हाय. जरा गप बसावा, त्या काय नाय. नुसती आपली खिदाललेत.”
आसा कुनी वराडला का पॉरा आजुन खिदालतात. आता भजेनपन रंगात आलेला आसतो. ते आबंग-बिबंग खतम व्हऊन आता जरा संगीत भजन चालू झालेला आस्तो. तुकारामबुवा येगदम रंगात येवून गायीत आस्तात. संगीत-भजनाला वानी ढोलकी आनि तब्ला आसा वाजवतात ना. काय सांगू. तुकारामबुवा मग तो किश्नाचा गाना चालू करतात. आम्ही सगली पॉरा ख्यालना बंद करुन भजनात येवून बसतो.
सुर्ये उगवला, प्रकास पडला, आडवा डोंगर…आडवा डोंगर तयाला माजा नमस्कार
सुर्ये उगवला, प्रकास पडला, आडवा डोंगर…आनि गोकुलमदयी किश्न जनमला आठवा आव्तार…
वान्यांचा तबला टीन टीन टीन टीन वाजायला लागतो. सगलं भजनी येग्दम रंगात येवून टाली वाजवीत आस्तात. आमी पॉरा तं काय यिचारुच नुका…
बारा-साडेबारा वाजायला आलं का भजन बंद करतात. कारन आता किश्नजन्माचा टाईम झालेला आस्तो. तुकारामबुवा मग जन्माची पोती वाचायला सुरवात करतात. आतापरत भजनाच्या आवाजान येग्दम भिनकून ग्येलेला देउल चिडीच्याप व्हतो. जन्माची पोती म्हन्जे आमचं बाबा जो हारीईजय वाचतात ना, त्याजाच येक आदयाय ज्याच्यामदी किश्न जन्माला येतो. पोती आशा ब्येतान चालु केलेली आसतात का किश्नजन्माचा म्हुर्ताला वाचन संपल. म्हुर्त जवल येतो. वाचन संपतो. तुकारामबुवा “गोपालकिश्न म्हाराज की जय” आसा बोल्तात आनि किश्नजन्म होतो…
“गोयंदो…” कुनी लाव्ह्या फेकतो.
“गोयंदो…” कुनी गुलाल फेकतो.
कुनी जोराजोरान देवलातली घंटी वाजवतो. सगली लोकां आनंदान उडया मारतात. मंग देवाला पालन्यात घालतात. आनि मग एकेकजन देवाचा दर्शन घ्यायाला रांगत फुडं सराकतात.
“द्येव घ्या कुनी, द्येव घ्या कुनी…” तुकारामबुवा बोलत आसतात.
“द्येव घ्या कुनी, द्येव घ्या कुनी…” बाकीची सगली लोका म्होट्यानी बोलतात.
“आयता आला घरच्या घरी,” परत तुकारामबुवा बोलतात.
“आयता आला घरच्या घरी,” लोक परत त्यांच्या पाटीवर बोलतात.
आमीपन सगली देवाचा दर्शन घेवून बाबांसोबत घरी येतो. आये केलीच्या पानावर सगल्याना ज्येवायला वाडते. मस्त पाच-सा भाज्या, भजी-बिजी केलेली आसतात उपासासाटी…
दुसर्याग दिवशी धयांडी. आमी सगली पॉरा सकाली ढॉरांकडं जातो. बारा वाजता ढॉरा घरी आनतो. हिकडं द्येवलात धयांडीची तयारी चालू आसते. मंग आस्ती आस्ती खेल चालू व्हतात. आग्दी त्या हारीयीजयात किश्न आनि गोपाल जसं खेलतात ना तसंच. मना बाकी काय खेलता येत नाय, पन फुय फुय खेलायला जाम मजा येते. वानी आगदी जोराजोरात ढोलकी वाजवतात. दोन दोन पॉरांच्या जॉड्या फुय फुय ख्येलतात. आदी आर्दी लोका म्हनतात, “फुय फुय फुय फुय फुगडी गं, तुमी आमी दॉगा ख्येलू गं” मग परत आर्दी लॉका तसाच म्हनतात, “फुय फुय फुय फुय फुगडी गं तुमी आमी दॉगा ख्येलू गं”. मना आजुन येक खेल आवडतो. सगली लोका आसा घोल रींगान करून उबी र्हादतात. आनि मग एक मानुस बय बनतो. बय म्हनजे आये. जुनी लोका आयेला बय म्हनतात. आनि दुसरा कुनीतरी त्या बयची लेक म्हंजे पोर्गी व्हतो. बय रींगनातल्या येकेकाच्या हाताखलना चालत जाते. पोर्गी तिज्या पाटोपाट.
“बय मी यतो,” पोर्गी म्हन्ते.
“नुको गं लेकी,” बय म्हन्ते.
“बय मी यतो,” परत पोर्गी म्हन्ते.
“लुगडं देतो,” बय पोरीने आपल्या पाटीवर येव नाय म्हनून लुगडा द्यायचा कबूल करते. पन पोर्गी काय आयकत नाय. तिजा आपला चालूच.
“बय मी यतो.” आसा मग पोल्का, नत, पाटल्या, चंद्रहार म्हनत म्हनत बय आनि लेक लोकांच्या रिंगनात फिरत र्हापतात. शेवटी बय जवा लेकीला न्हवरा देतो म्हनते, तवा खेल संपतो…
आता खेल संपतात. लोका धयांडीच्या तयारीला लागतात. जास्त उंच नाय बांदत. दोन तीन थरच आसतात. धयांडी बांदतात. थर रचतात. धयांडी फुटते आनि परत येगदा गोयंदो गोयंदो चालू व्हतो…
तो सगला झाला का सगली लोका हातात हात गुतवून रांगत पानी घ्यायला जायाला लागतात… सगली म्हॉट्या म्हॉट्यान म्हनत आसतात…
आरं गोयिंदा रं गोपाला
येस्वदेच्या तान्या बाला
मी चटकन भानावर आलो. मानवी मन किती अजब आहे ना. मी आता या क्षणी जरी कॅलिफोर्नियामध्ये एका बलाड्य अमेरिकन पेट्रोल कंपनीच्या वातानुकूलीत कार्यालयात बसलो असलो, तरी काही क्षणांपूर्वी मी माझ्या मातीत, माझ्या बालपणात हरवून गेलो होतो. मी अर्धवट राहिलेली ईमेल पूर्ण करण्यासाठी कीबोर्ड बडवायला सुरुवात केली, ’प्लीज लेट अस नो, इफ यू नीड फर्दर असिस्टन्स’ असं सवयीनुसार टंकलं आणि आउटलुकचं सेंड बटन दाबलं…
– सतीश गावडे
(http://beyondarman.blogspot.com/2009/08/blog-post.html)
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *