Uncategorized

प्रस्तावना

‘मराठी ब्लॉग व साहित्य’ अशा ढोबळ चौकटीत काम करणार्‍या ‘रेषेवरची अक्षरे’चं हे तिसरं वर्ष. ही ढोबळ चौकट सुस्पष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही पहिल्या अंकाच्या (वर्ष २००८) प्रस्तावनेमध्ये केला होता. आम्ही त्यात म्हटलं होतं, की आजवरच्या मराठी ब्लॉगनोंदींपैकी काही सर्वोत्तम नोंदी एकत्र करून प्रकाशित केल्या जाव्यात, हा एकमेव हेतू ह्या संकलनाच्या मूळ कल्पनेमागे आहे. हे करताना लेखन पूर्णतः मूळ लेखकाचं असण्यापासून काही विषयांवरील नोंदी वगळण्यापर्यंत काही निकषदेखील आम्ही ठरवले होते. ब्लॉगनोंदींना असणार्‍या वैयक्तिकतेच्या अपरिहार्य स्पर्शाची दखल घेतानाच त्यापल्याड जाऊन व्यक्ती-स्थळ-काल ह्यांच्या मर्यादा ओलांडू शकेल अशाच लेखनाचा विचार आम्ही प्रामुख्याने करत आलो आहोत. आम्ही ठरवलेले निकष, स्वत:वर संपादक म्हणून घातलेली बंधनं, आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी एका मर्यादेपलीकडे डोकावू नयेत म्हणून केलेला अट्टाहास, आणि संपूर्ण वर्षभर मराठी ब्लॉगविश्वातील लेखनाची आपापसांत केलेली चर्चा व त्या मंथनातून आपल्या उपक्रमाबाबत आमच्या विचारांत येत गेलेला नेमकेपणा ह्या सर्वांमधून आम्ही लेखनाच्या दर्ज्याचं परिमाण अधिकाधिक वस्तुनिष्ठ करण्याचा प्रयत्न केला आहे व करत राहूच. हे सगळं पुन्हा एकदा सांगण्याचं कारण केवळ ‘रेषेवरची अक्षरे’शी ओळख नसणार्‍यांना ती व्हावी एवढंच नाही. मराठी ब्लॉगविश्वाकडे गांभीर्याने पाहून त्यामधील लेखनाची ‘मराठीतून लिहिणं’ ह्या पल्याड जाऊन भाषानिरपेक्ष सकस लेखनाशी सांगड घालण्याचा ‘रेषेवरची अक्षरे’च्या माध्यमातून केलेला जाणीवपूर्वक व प्रामाणिक प्रयत्नही त्यानिमित्ताने आम्ही अधोरेखित करू इच्छितो.
मराठी अस्मितेप्रति (वास्तव वा अवास्तव) संवेदनशील होऊन तिची पुनर्मांडणी वा पुनरुच्चार केला जाण्याचा व मराठी ब्लॉगविश्वाच्या विस्ताराचा काळ समांतर आहे. आंतरजालावर आधारित सोशल नेटवर्किंग वेगाने फैलावण्याचा काळही हाच आहे. ह्या गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे का, हा संशोधनाचा विषय असला तरीही ब्लॉगविश्वावर त्याचा बरावाईट परिणाम होणं स्वाभाविक आहे. ह्या दोन्ही गोष्टींचा संबंध आपली ‘ओळख’ पुनर्निधारित करण्याशी आहे. ह्या दोन्ही गोष्टींच्या योग्यायोग्यतेविषयी कोणतीही शेरेबाजी टाळतानाच ब्लॉग ह्या माध्यमाद्वारे आपली व आपल्या लेखनाची स्वतंत्र व प्रगल्भ ओळख (अगदी फक्त स्वत:च्या पातळीवरसुद्धा) जपणार्‍या वा असू इच्छिणार्‍यांचं ‘रेषेवरची अक्षरे’ हा उपक्रम नेहमीच स्वागत करेल, हे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो, आणि त्यांना ’रेषेवरची अक्षरे’सारख्या उपक्रमातून प्रोत्साहन मिळेल, अशी आशा करतो.
आम्हांला आमच्याआमच्यातच वेळोवेळी पडत गेलेल्या प्रश्नांमधून ठेचकाळत आम्ही मागील वर्षीच्या अंकाशी आलो, तेव्हा आम्ही ब्लॉग ह्या गोष्टीकडे एक संवादाचं, संपर्काचं, साहित्यप्रसाराचं माध्यम म्हणून पाहू लागलो. त्या माध्यमाचा विचार केला, त्याच्या वेगळेपणाचा विचार केला. त्यावर प्रकाशित होणार्‍या मजकूराच्या वर्गीकरणाचा घाट घातला. मराठीतून ब्लॉग लिहिणारे लोक केवळ ब्लॉगर आहेत, लेखक आहेत, लेखक होण्यास इच्छुक आहेत, की कसं असेही प्रश्न पाडून घेतले. आमच्या घुसळणीतून काही नीटसं हाती येईना, तेव्हा आम्ही काही निवडक ब्लॉगर मंडळींना त्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रश्नांना त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित परिसंवादात्मक विभाग ह्या अंकात आपल्याला वाचायला मिळेल. आमच्या प्रश्नांना गांभीर्याने घेऊन आवर्जून प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.
यंदाच्या अंकासाठी आम्ही सुमारे ११० मराठी ब्लॉगांवरील ०१ ऑगस्ट २००९ ते ३१ ऑगस्ट २०१० ह्या कालावधीत प्रकाशित झालेल्या नोंदींचा विचार केला. त्यामधून वेचलेल्या नोंदींपैकी ज्यांच्या प्रकाशनासाठी संबंधित लेखकांची संमती मिळू शकली, त्या नोंदी आम्ही आपल्यापुढे ठेवत आहोत. आपली नोंद प्रकाशित करण्यासाठी संमती देणार्‍या सर्व ब्लॉगलेखकांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. अंक कसा वाटला ते जरूर कळवा. आपलं प्रोत्साहन, बर्‍यावाईट प्रतिक्रिया आवश्यकच असतात. कृपया त्या आमच्यापर्यंत पोचू द्यात. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
रेषेवरची अक्षरे २०१०
Facebook Comments

1 thought on “प्रस्तावना”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *