Uncategorized

प्रस्तावना

‘मराठी ब्लॉग व साहित्य’ अशा ढोबळ चौकटीत काम करणार्‍या ‘रेषेवरची अक्षरे’चं हे तिसरं वर्ष. ही ढोबळ चौकट सुस्पष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही पहिल्या अंकाच्या (वर्ष २००८) प्रस्तावनेमध्ये केला होता. आम्ही त्यात म्हटलं होतं, की आजवरच्या मराठी ब्लॉगनोंदींपैकी काही सर्वोत्तम नोंदी एकत्र करून प्रकाशित केल्या जाव्यात, हा एकमेव हेतू ह्या संकलनाच्या मूळ कल्पनेमागे आहे. हे करताना लेखन पूर्णतः मूळ लेखकाचं असण्यापासून काही विषयांवरील नोंदी वगळण्यापर्यंत काही निकषदेखील आम्ही ठरवले होते. ब्लॉगनोंदींना असणार्‍या वैयक्तिकतेच्या अपरिहार्य स्पर्शाची दखल घेतानाच त्यापल्याड जाऊन व्यक्ती-स्थळ-काल ह्यांच्या मर्यादा ओलांडू शकेल अशाच लेखनाचा विचार आम्ही प्रामुख्याने करत आलो आहोत. आम्ही ठरवलेले निकष, स्वत:वर संपादक म्हणून घातलेली बंधनं, आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी एका मर्यादेपलीकडे डोकावू नयेत म्हणून केलेला अट्टाहास, आणि संपूर्ण वर्षभर मराठी ब्लॉगविश्वातील लेखनाची आपापसांत केलेली चर्चा व त्या मंथनातून आपल्या उपक्रमाबाबत आमच्या विचारांत येत गेलेला नेमकेपणा ह्या सर्वांमधून आम्ही लेखनाच्या दर्ज्याचं परिमाण अधिकाधिक वस्तुनिष्ठ करण्याचा प्रयत्न केला आहे व करत राहूच. हे सगळं पुन्हा एकदा सांगण्याचं कारण केवळ ‘रेषेवरची अक्षरे’शी ओळख नसणार्‍यांना ती व्हावी एवढंच नाही. मराठी ब्लॉगविश्वाकडे गांभीर्याने पाहून त्यामधील लेखनाची ‘मराठीतून लिहिणं’ ह्या पल्याड जाऊन भाषानिरपेक्ष सकस लेखनाशी सांगड घालण्याचा ‘रेषेवरची अक्षरे’च्या माध्यमातून केलेला जाणीवपूर्वक व प्रामाणिक प्रयत्नही त्यानिमित्ताने आम्ही अधोरेखित करू इच्छितो.
मराठी अस्मितेप्रति (वास्तव वा अवास्तव) संवेदनशील होऊन तिची पुनर्मांडणी वा पुनरुच्चार केला जाण्याचा व मराठी ब्लॉगविश्वाच्या विस्ताराचा काळ समांतर आहे. आंतरजालावर आधारित सोशल नेटवर्किंग वेगाने फैलावण्याचा काळही हाच आहे. ह्या गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे का, हा संशोधनाचा विषय असला तरीही ब्लॉगविश्वावर त्याचा बरावाईट परिणाम होणं स्वाभाविक आहे. ह्या दोन्ही गोष्टींचा संबंध आपली ‘ओळख’ पुनर्निधारित करण्याशी आहे. ह्या दोन्ही गोष्टींच्या योग्यायोग्यतेविषयी कोणतीही शेरेबाजी टाळतानाच ब्लॉग ह्या माध्यमाद्वारे आपली व आपल्या लेखनाची स्वतंत्र व प्रगल्भ ओळख (अगदी फक्त स्वत:च्या पातळीवरसुद्धा) जपणार्‍या वा असू इच्छिणार्‍यांचं ‘रेषेवरची अक्षरे’ हा उपक्रम नेहमीच स्वागत करेल, हे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो, आणि त्यांना ’रेषेवरची अक्षरे’सारख्या उपक्रमातून प्रोत्साहन मिळेल, अशी आशा करतो.
आम्हांला आमच्याआमच्यातच वेळोवेळी पडत गेलेल्या प्रश्नांमधून ठेचकाळत आम्ही मागील वर्षीच्या अंकाशी आलो, तेव्हा आम्ही ब्लॉग ह्या गोष्टीकडे एक संवादाचं, संपर्काचं, साहित्यप्रसाराचं माध्यम म्हणून पाहू लागलो. त्या माध्यमाचा विचार केला, त्याच्या वेगळेपणाचा विचार केला. त्यावर प्रकाशित होणार्‍या मजकूराच्या वर्गीकरणाचा घाट घातला. मराठीतून ब्लॉग लिहिणारे लोक केवळ ब्लॉगर आहेत, लेखक आहेत, लेखक होण्यास इच्छुक आहेत, की कसं असेही प्रश्न पाडून घेतले. आमच्या घुसळणीतून काही नीटसं हाती येईना, तेव्हा आम्ही काही निवडक ब्लॉगर मंडळींना त्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रश्नांना त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित परिसंवादात्मक विभाग ह्या अंकात आपल्याला वाचायला मिळेल. आमच्या प्रश्नांना गांभीर्याने घेऊन आवर्जून प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.
यंदाच्या अंकासाठी आम्ही सुमारे ११० मराठी ब्लॉगांवरील ०१ ऑगस्ट २००९ ते ३१ ऑगस्ट २०१० ह्या कालावधीत प्रकाशित झालेल्या नोंदींचा विचार केला. त्यामधून वेचलेल्या नोंदींपैकी ज्यांच्या प्रकाशनासाठी संबंधित लेखकांची संमती मिळू शकली, त्या नोंदी आम्ही आपल्यापुढे ठेवत आहोत. आपली नोंद प्रकाशित करण्यासाठी संमती देणार्‍या सर्व ब्लॉगलेखकांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. अंक कसा वाटला ते जरूर कळवा. आपलं प्रोत्साहन, बर्‍यावाईट प्रतिक्रिया आवश्यकच असतात. कृपया त्या आमच्यापर्यंत पोचू द्यात. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
रेषेवरची अक्षरे २०१०
Uncategorized

माझ्या प्रियकराची प्रेयसी

ती होय, ती माझ्या प्रियकराची प्रेयसी.
होय होय, प्रेयसीच.
तिच्याच नसण्याचा गंध आमच्या रोमॅण्टिक रात्रीला.
तिच्याच हसण्याचे बंध आमच्यातल्या मॅच्युअर्ड मैत्रीला.
छे! जेलसी? काहीही काय!
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
ती माझ्या प्रियकराची प्रेयसी!
बस.
तो कविता लिहून वहीचं पान उलटून टाकतो. पण कविता अजून संपलेली नाही, हे त्याला पक्कं ठाऊक आहे. तसा तो शब्दाचा पक्का. म्हणजे वचन पाळणारा वगैरे भंपक अर्थानं नव्हे. शब्दाचा पक्का, म्हणजे पक्का लेखक. कविता लिहिणं थांबलं, म्हणजे कविता संपत नाही. ती आपल्यापासून पुरती तुटावी लागते, हे त्याला पक्कं ठाऊक. तर अजून कविता संपलेली नाही. संपेपर्यंत चिंता नाही. संपेपर्यंत सुटका नाही. ओव्हर ऍण्ड आउट. बॅक टू आयुष्य.
तर तशा त्याला बघून काकू नेहमी खुशालतात. ’तुझी मैत्रीण गेलीय बाहेर, पण माझ्याशी मार की गप्पा,’ असं म्हणून नव्या पुस्तकांवर वगैरे त्याला यथास्थित पकवतात. पण परवा ’काकू, पोरीचं शिक्षण झालं आणि ती ऑलरेडी वयात आलीय म्हटल्यावर लग्न करून द्यायलाच हवं का लगेच,’ असं त्यानं काहीश्या बेसावधपणे विचारलं, तेव्हा ’हो. हवंच’ हे त्यांचं उत्तर आणि ’हवंच’नंतरचा ठळक टायपातला पण अदृश्य पूर्णविराम त्यानं ऐकला आणि त्याच्या डोक्यात सर्रकन काहीतरी हललं. तसं कळेल त्याला उपरोधिक आणि नाही त्याला निर्मळ वाटेलसं आपलं हातखंडा हसू हसत त्यानं तो क्षण सहज खिशात घातला खरा. पण ’घशात काहीतरी टोचल्यासारखं वाटतंय’ची नोंद त्याला तेव्हा घ्यावी लागलीच आहे.
मैत्रीण त्याची प्रेयसी नव्हे. तोही मैत्रिणीचा प्रियकर वगैरे नव्हे. ते तसले ’प्यार – मोहोब्बत – दोस्ती’वाले करण जोहरी फण्डे त्यानं आणि मैत्रिणीनं कटाक्षानं लांब ठेवलेले. त्याचं लेखक असणं; ती तिच्या बॉयफ्रेंडशी भांडून, वैतागून पार रडकुंडीला आली की तिला बाईकवरून सुसाट घुमवणं; तिला अजून नीट पेटवता येत नाही, पण मनापासून आवडते म्हणून खास प्रसंगी हातात बापानं चॉकलेट ठेवावं तशी तिच्या हातात सिगरेट पेटवून देणं; व्यासापासून तुकारामपर्यंतचा तिचा इतिहास वेळोवेळी घोटवून घोटवून, दर भांडणात कोट्स, कथा आणि किस्से तोंडावर फेकून पक्का करून घेणं; स्वत:चा काही कारणानं भडका उडाला की तिला फोन करून सुमारे तीन मिनिटं अवाक्षरही न बोलता फक्त आपला श्वास काबूत आणत राहणं… हे सगळं आणि असलं बरंच त्यांच्यामधलं शेअरिंग. बरंच बोलून, बरंच न बोलता. पण त्यांच्या इतर माणसांशी असलेल्या नात्यांवर छाया पडत राहावी इतकं आणि असं अथांग. हे सगळं वजा करून ती तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंडशी काय आणि कसं बोलत असेल, हा चिवट प्रश्न या आठवड्यात त्याला कितव्यांदातरी पडतो. या वेळच्या तिच्या बॉयफ्रेंडबद्दल त्यांच्यात तसं विशेष बोलणं झालेलं नाही. म्हणजे नेहमीसारखी चर्चा इत्यादी घडलेली नाही. पण चर्चा न घडताही, नेहमीचंच बोलत असल्याच्या आविर्भावात कळत नकळत मैत्रीण त्याच्याबद्दल पुरेसं बोललेली आहे. आपली भिवई नकळत उंचावते आहे हे त्याला जाणवून, किंचित आश्चर्यानं पण सफाईदारपणे, त्यानं विषय बदलूनही. हे निराळं आहे याचीही नोंद त्याला तेव्हा घ्यावी लागलीच आहे.
तो अस्वस्थ होऊन खांदे उडवतो आणि मनात उगवलेले शब्द कागदावर रुजवत जातो. त्याला इतकंच करणं शक्य आहे. बस.
ती चांगले मुलींसारखे ठसठशीत झुमके घालणारी,
थोडी लाडीक, थोडी निर्बुद्ध, बरीच भित्री.
पण विलक्षण उत्कट. विलक्षण नशीबवान. विलक्षण ’बाई’.
तिच्या ’बाई’पणातच माझ्या प्रियकराच्या पौरुषाच्या पहिल्यावहिल्या पाऊलखुणा.
त्याच्या काहीश्या परिपक्व शहाण्या आणि पुष्कळदा सेक्सी टकलावर तिच्यासोबतच्या प्रेमभंगाच्या खुणा.
तिला कशी स्वीकारू?
आणि तिला कशी नाकारू?
ती माझ्या प्रियकराची पहिली प्रेयसी.
कविता संपत नाही. एरवी यावरून फ्रस्टेट होऊन त्यानं मैत्रिणीशी हमखास वादळी भांडण उकरून काढलं असतं. पण या वेळी नाही. स्वत:तून जणू निराळा होऊन, एखाद्या अनुभवी सुईणीसारखा एकाच वेळी सराईतपणे नाजूक आणि कुशलपणे निर्दय होत तो कविता वेगळी होताना निरखतो आहे.
आज मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला भेटायचं आहे. वर वर बिनधास्त असल्याचं दर्शवत खिदळणारी मैत्रीण त्याच्या प्रत्येक प्रतिक्रियेकडे घारीच्या नजरेनं पाहत असणार हे त्याला ठाऊक आहे. सगळे प्रश्नं, सगळी गुपितं, सगळे पराकोटीचे वैताग, सगळ्या नव्हाळीच्या कविता निरागसपणे त्याच्या पुढ्यात आणून टाकणारी मैत्रीण. त्याच्या निष्प्राण सराईत शब्दांना एका नापसंतीच्या कटाक्षासरशी मोडीत काढून त्याला चकित करणारी त्याची धिटुकली जाणकार मैत्रीण. तिच्या सगळ्या प्रतिक्रिया आता म्हटलं तर त्याच्या नजरेतल्या पसंतीदर्शक छटेवर अवलंबून आहेत.
इथे त्याला जबाबदारीच्या जाणिवेनं पोटात एकदम खड्डा पडल्यासारखं होतं.
पण म्हटलं तर बॉयफ्रेंडला त्याला भेटण्यासाठी आणते आहे म्हणतानाच तिनं पसंती-नापसंतीचे सगळे पूल एकटीनंच पार केले असल्याचंही उघड आहे.
इथे त्याला एकदम आउट होऊन मैदानाच्या बाहेर बसल्यासारखं हेल्पलेस वाटतं.
असले जीवघेणे झोके घेत तो त्या दोघांना भेटतो. सराईतपणे बेअरिंग सांभाळून असला, तरी त्याला तारेवरून चालणारी डोंबारीण असल्याचा फील येतो आहे, हे मैत्रिणीपासून लपत नाहीच. पण त्याला चकित करण्याची आपली नेहमीची लकब वापरून ती नेत्रपल्लवीतून सहजपणे उलटा त्यालाच धीर देते. बघता बघता बॉयफ्रेंडशी हॉवर्ड रोआर्कबद्दल जिव्हाळ्यानं बोलण्याइतकी कम्फर्ट लेव्हल त्यांच्यात येते, ती नक्की कुणामुळे -त्याच्यामुळे, तिच्यामुळे की बॉयफ्रेंडमुळे – ते त्याला कळेनासं होतं.
काही भांडणं. हे मैत्रिणीचं नेहमीचंच. काही वादळी जीवघेणी भांडणं. हेही नेहमीचंच. पण त्याच्यापासून अलगद वेगळ्या, निर्लेप होत गेलेल्या काही भेटी. कधी तिचं कासावीस होऊन त्याच्याकडे येणं, पण अवाक्षराचेही तपशील न देणं. काही असंबद्ध प्रश्न विचारणं. कधी चक्क मुलींसारखं लाजणं. हे मात्र नेहमीसारखं नाही. नाहीच. ’ये की एकदा. बर्‍याच दिवसांत आला नाहीस,’ काकूंचा आग्रहाचा फोन. घरदार लग्नाच्या आणि बोलणी करण्याच्या आणि तारखा-मेन्यू ठरवण्याच्या कल्लोळात दंग. स्वत:च्याच इच्छेविरुद्ध त्याला वाटलेलं परकेपण आणि ते नीटच समजून सगळ्या भाऊगर्दीतही त्याला अजिबात एकटं न सोडणारे मैत्रीण आणि बॉयफ्रेंड.
ती परकी इत्यादी होत गेलेली नाही हे स्वत:लाच पटवून देताना त्याला भयानकच कष्ट पडतात. त्या परवा आलेल्या बॉयफ्रेंडला आपण इतक्या चटकन आपल्यात स्वीकारलं की काय, या प्रश्नाला उत्तर देतानाही तितकेच कष्ट पडतात. पण त्याला आरपार वाचणारी तिची धारदार नजर पाहिल्यावर, ती तितकी लांब गेलेली नाही, हे त्याला मान्य करावंच लागतं. चिडचिडीचा / आत्मपीडनाचा / आत्मकरुणेचा एक रस्ता बंद. रस्ते बंद होऊन कोंडीत सापडलं की त्याला नेहमी येतं, तसं अनावर हसू येऊ लागलेलं. कविता संपत आली आहे की काय? कुणास ठाऊक. तो खुशालतो आणि धुमसतोही.
ओव्हर ऍण्ड आउट. बॅक टू कविता.
कधीकधी हिरवाचार संताप उभा राहतोही माझ्या डोळ्यांत, नाही असं नाही.
सगळीभर असलेले तिच्या बोटांचे ठसे पाहून मला असुरक्षित वाटतं, अजूनही वाटतं काहीबाही.
कन्फेस करण्यासारखं काही, काही मी स्वत:पाशीही कबूल करणार नाही…
पण
ती काही त्याच्यापासून निराळी नाही.
त्याच्या आजच्या असण्यात तिच्या ’काल’ची माती मिसळलेली आहे, हे मला विसरून चालणार नाही.
जेलसी?
छे हो, अजिबात नाही.
ती माझ्या प्रियकराची माजी प्रेयसी, बाकी काही नाही!
– मेघना भुस्कुटे
(http://meghanabhuskute.blogspot.com/2009/08/blog-post_10.html)
Uncategorized

आरं गोयिंदा रं गोपाला

थोडंसं हरवल्यासारखं वाटतंय कालपासून. मित्रांचे “गोविंदा आला रे…” इथपासून ते “श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे..”पर्यंतचे जीटॉकचे स्टेटस मनाला हुरहुर लावत आहेत. एरव्ही “हॅप्पी जन्माष्टमी”सारख्या विनाकारण आंग्ळाललेल्या ओळी ऑरकुटच्या खरडवहीत पाहून डोकं सणकलं असतं. पण आता तसं काहीच वाटत नाहीये. जे काही लिहिलं आहे त्यामागची भावना महत्त्वाची एव्हढंच जाणवत आहे. मनात कुठेतरी खोलवर आवाज येतोय…
आरं गोयिंदा रं गोपाला
येस्वदेच्या तान्या बाला
आज उपास. उद्या धयांडी. लय मजा येईल. मी तं बाबा आगदी मदल्या सुट्टीतच पलुन आलो शालेतना. मं त्यात काय झाला. सगली पोरा आली. पन च्यायला घरची मानसा पन आशी हायेत ना. आदी शालेतना पलुन आलो म्हनून शिया दिलं आनि आता म्हनतात काय उपास काय संद्याकाली हाय. आता आलाच हायेस तं वाईच ढॉराना फिरवून आन. मया आनि दिन्याला कदीच सांगत नाय. कदीपन मनाच सांगतात. का तं मी म्हॉटा पॉरगा हाय म्हनून. मी म्हॉटा आनि त्ये काय बारीक हायेत काय. मया फकस्त येक वर्शानी बारीक आनि दिन्या दोन वर्शानी. आनि परत काय झाला का मनाच वराडतात. त्या दॉगाना कायीच बोलत नाय. जावदे. न्हेतो ढॉराना. लय लांब नाय न्हेनार. वाईच बोडनीवरना पानी दाकवुन आनीन. मंग संद्याकाली नविन बॉड्या आनि चड्ड्या. आनि मग गोयंदो…
आज मी जर कुणाशी या भाषेत बोललो तर लोक मला वेडयात काढतील . पण अगदी दहावी होईपर्यंत मी याच भाषेत सार्यां शी बोलत असे. पुढे अकरावीला आल्यानंतर मात्र ठरवून शुद्ध (?) मराठी बोलायला सुरुवात केली. नाही म्हणायला मी आईशी आजही याच भाषेत बोलतो, अगदी “आये कशी हायेस” अशी सुरुवात करून…
आनली येगदाची ढॉरा फिरवून. आता जरा टायमान बाबा गोरेगावशी येतील. मंग नविन बॉडी आनि चड्डी घातली का द्यावलात जायाचा…
“आरं जरा धीर-दम हाय का नाय? जरा खा-प्या आनि मंग जा द्यावलात.”
“मी तं मंगाशीच खल्ला ढॉरांकडना आल्यावर.”
“जा पन कालोकात फिरू नुकॉ. इचूकाटा हाजार हाय. उगंच सनासुदीचं याप लावाल आमच्या मांगं.”
मी बाबा व्हो म्हनायची पन वाट बगत नाय. त्याज्याआदीच संत्याकडं जातो. संत्या माज्या म्हॉटया आकाचा पोरगा. माज्यापेक्षा वायीच म्हॉटा हाय. वायीच म्हंजे फकस्त चार-पाच म्हयन्यांनी.
संत्या आनि मी द्यावलात जातो. मस्त लायटींग बियटींग केलेली आस्ते. लाउसपिक्चर लावलेला आसतो. बारकी पॉरा द्यावलाच्या आंगनात लंगडी-बिंगडी खेलत आस्तात. आमीपन त्यांच्यात जातो आनि ज्याम मजा करतो. जरा नव साडेनव वाजलं का म्होटी मान्सा यायाला सुरवात व्हते. धा वाजलं का भजन चालू व्हतो. आमी पॉरा तरीपन खेलतच आस्तो. मंग कुनीतरी याकादा म्हॉटा मानूस भजनातना उटून येतो आनि पॉरांवर वराडतो.
“काय रे कार्ट्यानो, तुमाना कलत नाय काय? द्यावाधर्माचा भजेन चालू हाय. जरा गप बसावा, त्या काय नाय. नुसती आपली खिदाललेत.”
आसा कुनी वराडला का पॉरा आजुन खिदालतात. आता भजेनपन रंगात आलेला आसतो. ते आबंग-बिबंग खतम व्हऊन आता जरा संगीत भजन चालू झालेला आस्तो. तुकारामबुवा येगदम रंगात येवून गायीत आस्तात. संगीत-भजनाला वानी ढोलकी आनि तब्ला आसा वाजवतात ना. काय सांगू. तुकारामबुवा मग तो किश्नाचा गाना चालू करतात. आम्ही सगली पॉरा ख्यालना बंद करुन भजनात येवून बसतो.
सुर्ये उगवला, प्रकास पडला, आडवा डोंगर…आडवा डोंगर तयाला माजा नमस्कार
सुर्ये उगवला, प्रकास पडला, आडवा डोंगर…आनि गोकुलमदयी किश्न जनमला आठवा आव्तार…
वान्यांचा तबला टीन टीन टीन टीन वाजायला लागतो. सगलं भजनी येग्दम रंगात येवून टाली वाजवीत आस्तात. आमी पॉरा तं काय यिचारुच नुका…
बारा-साडेबारा वाजायला आलं का भजन बंद करतात. कारन आता किश्नजन्माचा टाईम झालेला आस्तो. तुकारामबुवा मग जन्माची पोती वाचायला सुरवात करतात. आतापरत भजनाच्या आवाजान येग्दम भिनकून ग्येलेला देउल चिडीच्याप व्हतो. जन्माची पोती म्हन्जे आमचं बाबा जो हारीईजय वाचतात ना, त्याजाच येक आदयाय ज्याच्यामदी किश्न जन्माला येतो. पोती आशा ब्येतान चालु केलेली आसतात का किश्नजन्माचा म्हुर्ताला वाचन संपल. म्हुर्त जवल येतो. वाचन संपतो. तुकारामबुवा “गोपालकिश्न म्हाराज की जय” आसा बोल्तात आनि किश्नजन्म होतो…
“गोयंदो…” कुनी लाव्ह्या फेकतो.
“गोयंदो…” कुनी गुलाल फेकतो.
कुनी जोराजोरान देवलातली घंटी वाजवतो. सगली लोकां आनंदान उडया मारतात. मंग देवाला पालन्यात घालतात. आनि मग एकेकजन देवाचा दर्शन घ्यायाला रांगत फुडं सराकतात.
“द्येव घ्या कुनी, द्येव घ्या कुनी…” तुकारामबुवा बोलत आसतात.
“द्येव घ्या कुनी, द्येव घ्या कुनी…” बाकीची सगली लोका म्होट्यानी बोलतात.
“आयता आला घरच्या घरी,” परत तुकारामबुवा बोलतात.
“आयता आला घरच्या घरी,” लोक परत त्यांच्या पाटीवर बोलतात.
आमीपन सगली देवाचा दर्शन घेवून बाबांसोबत घरी येतो. आये केलीच्या पानावर सगल्याना ज्येवायला वाडते. मस्त पाच-सा भाज्या, भजी-बिजी केलेली आसतात उपासासाटी…
दुसर्याग दिवशी धयांडी. आमी सगली पॉरा सकाली ढॉरांकडं जातो. बारा वाजता ढॉरा घरी आनतो. हिकडं द्येवलात धयांडीची तयारी चालू आसते. मंग आस्ती आस्ती खेल चालू व्हतात. आग्दी त्या हारीयीजयात किश्न आनि गोपाल जसं खेलतात ना तसंच. मना बाकी काय खेलता येत नाय, पन फुय फुय खेलायला जाम मजा येते. वानी आगदी जोराजोरात ढोलकी वाजवतात. दोन दोन पॉरांच्या जॉड्या फुय फुय ख्येलतात. आदी आर्दी लोका म्हनतात, “फुय फुय फुय फुय फुगडी गं, तुमी आमी दॉगा ख्येलू गं” मग परत आर्दी लॉका तसाच म्हनतात, “फुय फुय फुय फुय फुगडी गं तुमी आमी दॉगा ख्येलू गं”. मना आजुन येक खेल आवडतो. सगली लोका आसा घोल रींगान करून उबी र्हादतात. आनि मग एक मानुस बय बनतो. बय म्हनजे आये. जुनी लोका आयेला बय म्हनतात. आनि दुसरा कुनीतरी त्या बयची लेक म्हंजे पोर्गी व्हतो. बय रींगनातल्या येकेकाच्या हाताखलना चालत जाते. पोर्गी तिज्या पाटोपाट.
“बय मी यतो,” पोर्गी म्हन्ते.
“नुको गं लेकी,” बय म्हन्ते.
“बय मी यतो,” परत पोर्गी म्हन्ते.
“लुगडं देतो,” बय पोरीने आपल्या पाटीवर येव नाय म्हनून लुगडा द्यायचा कबूल करते. पन पोर्गी काय आयकत नाय. तिजा आपला चालूच.
“बय मी यतो.” आसा मग पोल्का, नत, पाटल्या, चंद्रहार म्हनत म्हनत बय आनि लेक लोकांच्या रिंगनात फिरत र्हापतात. शेवटी बय जवा लेकीला न्हवरा देतो म्हनते, तवा खेल संपतो…
आता खेल संपतात. लोका धयांडीच्या तयारीला लागतात. जास्त उंच नाय बांदत. दोन तीन थरच आसतात. धयांडी बांदतात. थर रचतात. धयांडी फुटते आनि परत येगदा गोयंदो गोयंदो चालू व्हतो…
तो सगला झाला का सगली लोका हातात हात गुतवून रांगत पानी घ्यायला जायाला लागतात… सगली म्हॉट्या म्हॉट्यान म्हनत आसतात…
आरं गोयिंदा रं गोपाला
येस्वदेच्या तान्या बाला
मी चटकन भानावर आलो. मानवी मन किती अजब आहे ना. मी आता या क्षणी जरी कॅलिफोर्नियामध्ये एका बलाड्य अमेरिकन पेट्रोल कंपनीच्या वातानुकूलीत कार्यालयात बसलो असलो, तरी काही क्षणांपूर्वी मी माझ्या मातीत, माझ्या बालपणात हरवून गेलो होतो. मी अर्धवट राहिलेली ईमेल पूर्ण करण्यासाठी कीबोर्ड बडवायला सुरुवात केली, ’प्लीज लेट अस नो, इफ यू नीड फर्दर असिस्टन्स’ असं सवयीनुसार टंकलं आणि आउटलुकचं सेंड बटन दाबलं…
– सतीश गावडे
(http://beyondarman.blogspot.com/2009/08/blog-post.html)
Uncategorized

रेघांमागून

केस पिंजारलेले ते दोघं-चौघं (माड)
घाईनं आंघोळी उरकून घेतात
कुंपणाशी राखणीला बसलेली म्हातारी (भिंत)
हिरवं लुसलुशीत इरलं अंगभर ओढून घेते.
फाटकाशी पाठीत कुबड काढून ओणावलेला तो (प्राजक्त)
उभ्याउभ्याच आळस दिल्यासारखा करतो
ओल्या रस्त्याच्या कडेला फतकल मारून बसलेली फुलवाली (कोरांटी)
आपली मळकट छत्री झटकते
पागोळ्य़ांतून मारलेल्या उभ्या रेघांमागून हे सगळं बघत
मी दारात उभा असतो
आणि
माझं मन एखाद्या वांड मुलासारखं
प्रत्येक थेंबात उड्या मारून पाणी उडवत राहतं
जेव्हा श्रावण माझ्या घरी पाहुणा म्हणून येतो.
– प्रसाद बोकील
(http://prasadik.blogspot.com/2009/09/blog-post_14.html)
Uncategorized

केवळ दु:खच

गर्द तमातून पुढ्यात येते
अंधुक धुसर धुरकट काही
माग तयाचा शोधू जाता
परि ते हाती गवसत नाही
अदृश्यातून खुणावते ते
सतत निरंतर हाका देते
अनाकार भेसूर काहीसे
खोल तळाशी जन्मा येते
गहिरा अनवट गोफ तयाचा
हलके हलके आणिक पिळते
अगम्य वाटा अतर्क्य भविष्ये
ज्यातून केवळ दु:खच गळते
– क्षिप्रा
(http://kshiprasuniverse.blogspot.com/2009/10/blog-post.html)
Uncategorized

प्रतिनिधी

रेन ट्रीच्या झाडांवर लांबून पाहताना लुकलुकणार्‍या दिव्यांसारखी दिसणारी तुर्रेदार फुलं ऐटीत झाडांच्या टोकांवर पाणदिव्यांसारखी तरंगत असल्याचा भास होतो… शिरीषाच्या झाडाची एक कमाल वाटते मला, मंद रंगाच्या गुलाबी झुपक्यांनिशी त्याच्या वेंधाळ फांद्या वार्‍यानिशी हलतात, तेव्हा कुठे त्याची फुलं पटकन नजरेत येतात. एरवी आकर्षून घेणारा रंग, पाकळ्या, असा अलंकारिक जामानिमा नसला तरी शिरीषफुलांचं असणं निव्वळ आवडतं. साने गुरुजींच्या बालकथांपैकी एका पुस्तकात शिरीषाच्या फुलांचा एक छान संदर्भ होता. तेव्हापासून आजतागायत शिरीषाच्या फुलांचं आकर्षण तस्संच आहे.
त्याच्या सावलीतच बसलेल्या असतात त्या दोघी.
भुर्याय रंगाचा पिनोफर आणि त्यात त्याहून जरा फिक्कट शर्ट, तोही निळीच्या रंगाने निळकट झालेला. निळसर-मळकट अशीच झाक आहे त्या रंगात. त्यांच्या रंगात बेमालूम मिसळून गेलेली. भुरकट केसांच्या घट्ट वेण्यांना काळ्या रिबिनी आणि फुलपाखरी पेड. एक जराशी सावळी, दुसरी गव्हाळ. भेळेच्या पुडक्यात एकच ओलसर पुरी बुडवून खात – खिदळत त्यांची दुपार सटकते.
एकाच शाळेतल्या-आळीतल्या मैत्रिणी. दोघी शाळा सुटल्यानंतर ठरावीक घरातली दुपारची कामं आवरण्यासाठी निघतात. शिकण्याची हौस अशी फार नाही. पिना, रंगीत रिबिनी, क्लिप्स, टिकल्या, यांचा मात्र भारी शौक. दिवसभर डोक्यावर घेतलेलं फडकं – तेच दुपारी तोंडावर घेऊन गाडीच्या चाकाजवळ किंवा जवळच्या झाडाखालीच लवंडलेल्या गाडीवाल्याच्या गाडीवर त्यांचं असं आगळंवेगळं विंडो-शॉपिंग सुरू असतं. गाडीवाल्यालाही सवय झालेली असते… आताशा तो त्यांना हटकतही नाही.
त्यांच्या गप्पांतून त्यांची माय, कुठल्यातरी शेठाणीकडे काम करते… तिच्याकडच्या शेल्फमधल्या वस्तू… तिच्या डायनिंग टेबलवरची क्रीम्स… असे बरेच स्वप्नाळू तुकडे ऐकू येतात.
त्यात एखादी रस्त्यातून जाणारी, गोरीपान, जीन्स-टी शर्ट घातलेली अशी मॉडर्न मुलगी दिसली की, तिच्या जराही लव नसलेल्या त्वचेबद्दल, ड्रेसबद्दल त्यांच्या मनात एक टवटवीत कुतूहल जागं होतं. मोठ्या, पापणीदार डोळ्यांतून ते आपसूक बाहेर पडतं.
आपली मोठी बहीण आय-ब्रो करणं कुठून-कशी शिकली, एका बाईच्या पार्लरमध्ये काम करताना जुन्या म्हणून कचर्‍यात टाकून दिलेल्या रंगीत बाटल्यांमधलं क्रीम आणून ते कसं आठवडाभर पुरवून वापरलं हे सांगताना त्यांच्यापैकी एकीच्या कोरीव भुवया खाली-वर होतात.
त्यातली एक लग्नाळू वयाची. तिच्या आईने चार घरी कामं करताना तिचा विषय काढला, तर ही चेहर्‍यावर कावरेबावरे भाव घेऊन कोपर्‍यात उभी. मोठ्या बहिणीचा संसार, तिचा नवरा… न जाणो कितीक जखमांची आठव दाटून आली असेल… पण चेहर्‍यावर लग्न या शब्दासरशी कायम एक प्रश्नचिन्ह!
अबोध जाणिवांपलीकडे उत्तरं शोधणारे आपले आपणच. त्यांची उत्तरं कोणत्याही पुस्तकात सापडणार नाहीत किंवा शाळेत बाईही सांगणार नाहीत अशी मनातली निरगाठ पक्की करत जगणारी तीही एक.
त्या दोघी फक्त प्रतिकं. चालती-बोलती. त्यांच्यासारख्या बर्‍याच, किंवा त्यांच्याप्रमाणे बरेच.
त्या दोघी तसेच ’ते’ही. त्यांना काही शिरीषाचं झाड भावणारं नाही. पण सावलीसाठी आसुसलेलं शरीर आणि झाड ही सामाईक बाब.
निबर झालेल्या झाडाच्या खोडांसारखे, बोटाच्या पेरांतून मस्ती, रग असा परिस्थितीजन्य मेळ जमून आलेले पोरगेले तरुण. पोरसवदा वय म्हणावं, तर चांगली वस्तर्‍याने भादरलेली मिशी. एकाने केलं म्हणून दुसर्‍याने वडिलांच्या ब्लेडने आहे-नाही ते सगळंच सफाचट केलेलं. असं वर्गात गेलं की मुलींच्या बेंचवरुन खसखस ऐकू येते. आपल्या दिसण्याची दखल घेतली जाते असा समज करून वेड्या वयातलं पौरुष मिशीपासून कानापर्यंत पसरतं. तेच चारचौघात सर ओरडले की अपमान या नव्या जाणिवेमागून बाहेर पडू पाहतं. कानशिलं गरम झाली की कुणीतरी मागून कुजबुजतं, “ए सावत्याचे कान बघ. सशासारखे लाल! खि: खी:.” लाजेच्या उशीखाली तोंड लपवावं तर मुलगी समजून खिदळतील.
अशा अनेक संमिश्र भावनांच्या पालव्या फुटून झाड फोफावत जातं. नुसतंच…
पुस्तकांची हौस असो वा नसो, तरी बाईंविषयी त्यांना अतोनात प्रेम असतं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हमखास एखादा गुलाबाचा गुच्छ, स्वत: तयार केलेलं ग्रीटिंग, एकदा तर बाईंना द्यायला गुलाब मिळालं नाही म्हणून त्यानं हारवाल्याकडून निशिगंधाच्या फुलांचे दांडे घेऊन तेच बदामाच्या पानात गुंडाळून दिलेले. त्यांची भाषा वारली, आदिवासी पाड्यातली. पटकन कळली-नाही कळली तरी डोळे बोलके. पूर्ण गावभर शिव्या देत फिरलं तरी बाईंसमोर मोघम शिव्या द्यायच्या. शिव्या पूर्णपणे बंद करणं अवघड, कारण जिभेला वळणच तसं.
कधी पाण्याच्या टाकीत शिवांबू, कधी छपरावरची कौलं गायब. असे एक ना अनेक खेळ. कुणी इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअर करण्यात एक्स्पर्ट, कुणाचं गॅरेज, तर कुणाच्या बाबांची वडापावची गाडी.
एखाद्याला पेपर टाकताना लाज वाटते, कुणी मुद्दाम बाईंच्या घरी पेपर टाकतो असं अभिमानाने सांगतो. एखादा कार्यकर्ता असतो. पक्ष-अपक्ष आहे की नाही हेही ठाउक नसतं. एखादा नुसत्याच मारामार्‍या करायला मिळतात म्हणून जातो. गॅरेजमध्ये काम करतो सांगण्यापेक्षा चारचौघांत सांगण्यासारखी असते कार्यकर्त्याची पदवी.
माणूस वाढत कुठे जातो? तो फोफावत जातो… जन्माची मुळं मातीत आणि बाह्यांग आकाशाकडे. फोफावण्याची हौस फिटत नाही. पालवी नसलेल्या झाडाच्या फांद्यानाही.
त्यांच्या असण्यात स्त्री-पुरुष, मुलगा-मुलगी असं वेगळं प्रतिनिधित्व करण्याची गरज भासत नाही. ती-ती त्यांच्या-त्यांच्या आयुष्यातली पात्रं. प्रत्येकाची कथा आहे. कथेच्या मध्यभागी ते आहेत किंवा नाहीतही.
पण त्यांच्या कथांशी, आयुष्याशी माझ्यातल्या एका गुणसूत्राची नाळ जोडलेली असावी.
विचारांनी? भावनांनी?
असेल. आहे म्हणण्याइतकं ठाम फार काही नाही, म्हटल्यानं अधोरेखित केल्याचं चोरटं समाधान मिळेल असंही नाही.
तळ्याकाठी बसलेल्या विस्कटलेल्या केसांच्या बुढ्ढ्यासारखे माझेही विचार विस्कटत, पसरत जावेत. त्याला ’भीष्म’ कल्पनेसारखा अंत नसावा.
आपण इथे नसतो तर कुठे असतो असे संन्यासी विचार एक चांगला कॅन्व्हास उभा करतात. डोंगरावर, किंवा एखाद्या गावात भटकताना छपरा-कौलाच्या शाळेत शिकवताना असं कल्पनाशक्ती काहीबाही रंगवत जाते. पण असं फिरताना रापलेल्या केसांची, त्वचेची काळजी मी केली असती? (!)
होsss…
तेवढे कॉशस आहोत आपण आपल्याबाबतीत. पण औटघटकेच्या चिंतेवर सहज मात केली असती. काय टिपिकल मुलगीपणाचं लक्षण आहे… असं म्हणून!
गावच का… ओसाडच का… इथेही अडचणीत असणारे लोक आहेत, इथेही बर्‍याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. मग गावच डोळ्यासमोर उभं राहण्याचं कारण काय? विचार मनात आला… त्यासरशी खल करून झाला.
स्वत:चंच स्वत:ला हसू आलं. आपलेही विचार स्वप्नाळू आहेत त्या दोघींसारखेच.
झगडा सावलीसाठीच… फरक फक्त देण्या-घेण्यात आहे.
– सखी
(http://raajhans.blogspot.com/2009/10/blog-post.html)
Uncategorized

आर्तव

गं,
आज निवांत बसलोय अंगणात. तू करायचीस तसा वाफाळता दुधाचा चहा घेऊन. तुझ्या लाडक्या – आपल्या लाडक्या – मातीच्या लेकरांकडे बघत.
किती वेडीयेत ती! दर वर्षी हाच खेळ खेळायचा.. उन्हाळा सरला की असंख्य रंगांत पानं रंगवून आरास मांडायची. ती पाहून आम्ही ठार वेडे होणार. मातीबाईंच्या शाळेत रोज एकसारखा हिरवा गणवेश घालून जाणारी ही पोरं शरदाच्या त्या स्नेहसंमेलनात ओळखूही येत नाहीत. आपल्याच गल्लीतल्या ह्या नेहमीच्या दोस्तांचे चेहरे अवेळीच आलेल्या रंगपंचमीला किती निराळेच दिसतात! असं मनसोक्त खेळून झालं आणि हिवाळा जवळ आला की मग अल्लद ते रंग काढून ठेवायचे.. हुडहुडी भरायला लागली, की पानांची अंगडी-टोपडी आईकडे सोपवायची आणि थंडी उघड्या अंगानं, बोडक्या माथ्यानं काढायची – कुठून सुचतं हे?
मग सावकाश वसंताची चाहूल लागली की नव्या नवरीसारखं नटायचं, नव्या भिडूबरोबर भातुकली मांडायची. ती सजवायला हजारानी फुलं फुलवायची. त्यांच्यावर ती फुलांचं नाव सांगणारी पाखरं येणार, वेडे भुंगे घोंघावणार, मधचोख्या पक्षी भिरभिरणार.. त्यात कधी पाकळ्या गळणार, कुठल्या कळ्या कोमेजणार, पानं चुरगळणार, देठं मुडपणार.. पण खुळ्या फुलांना त्याचं काही नाही. उलट ती वेडी या सगळ्यांबरोबर नाचणार, नाचणार..
मग वा-याचा हात धरून तारुण्याचं गूज एकमेकांना सांगणार आणि तशातच एक दिवस त्यांची रसरशीत फळं होणार. दूरदेशातले कोणसेसे पक्षी येऊन त्यांवर ताव मारणार. कधीमधी त्यांच्या चोचींतून, पोटांमधून टणटणीत बिया कुठेकुठे जाऊन पडणार. मग उन्हाळ्यात जमीन खरपूस भाजून निघणार, त्यात त्या ताडताड तडकणार. आता त्यातल्या कितीतरी तडकतच नसतील, नुसत्या मातीमोल पडून राहात असतील – पण असल्या शंका त्यांना सतावत नसाव्यात.
मुळातच इवलं-इवलं मोजून काही करणं त्यांना पसंत नसावं. वाया जाणं, पडून राहणं, मातीमोल होणं – हे ही आम्हा गरिबांच्याच डोक्यातलं. एकामागून एक येत जाणा-या ह्या ऋतुचक्राचा कुठलाही कंटाळा येत नाही त्यांना. सगळं कसं नेमून दिल्याप्रमाणे चालू. गुदस्त सालासारखं ह्या साली. आखून दिल्यासारखं असलं तरी किती मनस्वी दिसतं सगळं.. मदमस्त वा-याबरोबर मोकाट खेळणा-या ढगांसारखं. (उगाच नाही गुरुदेवांनी म्हटलंय – पाखरं आणि ढग एकमेकांचा हेवा करतात म्हणून!) खळखळवेड वाहण्या-या झ-यालाही भौतिकीचे नियम असतातच की. म्हणावं तर बांधलेले आहेत हे सगळे, म्हणावं तर नाहीत. ती आखणी, ते नियम त्यांच्या पायांच्या बेड्या नाही होऊ शकत, पैंजणं होऊन जातात.
आणि ही झाडं-फुलं-फळं त्या सगळ्या भरडत्रासातून कशी विनातक्रार जातात! उन्हाच्या झळा झेलायच्या, गारठलेल्या अंगांनी थंडी काढायची, नव्या पालवीच्या वसंतवेणा सोसायच्या.. चक्रमेनिक्रमेण जगणं चालू. सगळ्याभर पसरलेल्या विराट विश्वाशी कसं घट्ट नातं आहे ना त्यांचं – गोल गोल फिरणारा कालसर्प, तसंच गोलाकार जगत जाणारी ही सगळी..
तुझ्यासारखीला त्यांचं हे जगणं इतकं सहज आणि उत्कटपणे समजत होतं, ह्यात काहीच नवल नाही वाटत आता. ही झाडं जशी त्यांच्या अंगाखांद्यांवर आवर्तकारी विश्वाचं छोटं रूप खेळवतात, तशीच तू – अक्षरश: स्वत:च्या आत वर्षानुवर्षं आर्तवचक्र वागवणारी. निसर्गाची चक्रीयता तुला मुद्दाम वेगळी थोडीच समजावून घ्यायला लागणार होती? कसं वाटायचं गं? नव्या जिवाला जन्म द्यायची शक्ती आपल्याच आत आहे हे पुरेपूर उमजल्यावर? हातांनी काहीबाही अचेतन वस्तू बनवायचा आनंद तेवढा मला माहीत.. पण सजीव, सचेतन, परिपूर्ण व्यक्तींची आई होताना कसं वाटलं असेल? कदाचित आम्हा पामरांना कधीच नाही कळायचं ते. मुळात कुठल्या सोशीक चक्राशी फारसा संबंधच नसतो आमचा. ना आर्तवचक्र, ना प्रसूतिवेणा. एखादा पाण्याचा हौद हळूहळू भरावा, एवढा एक भरल्यावर त्याचा नळ धो धो वाहत राहावा आणि मग पाणी सावकाश आटून जावं, तसे फुस्स संपून जातो आम्ही. एखाद्या सरळ ओढून संपणा-या रेघेसारखे, फार तर बाणासारखे.. चाकासारखे आवर्ती नाही.
.. मजाच आहे. तू होतीस तेव्हा तुझ्या डोळ्यांतून झाडं-फुलं दिसत-उमगत गेली, आता त्यांच्यामधून तू आकळत जातेयस.
पुढचा आवर्त कधी?
– मंदार गद्रे
(http://gunjaarava.blogspot.com/2010/01/blog-post.html)
Uncategorized

इस शहर में ना अपना ठिकाना रहा

तो. त्याने खांद्याला सॅक अडकवली. दाराला कुलूप लावलं. उरलेल्या दोन जड बॅगा हातात घेतल्या आणि खाली उतरला. खालच्या मजल्यावरच्या कुलकर्णी काकूंकडे किल्ल्या दिल्या. काकू अगदी मनापासून हसल्या आणि त्याला म्हणाल्या, “येत जा हो अधूनमधून… घर नाही असं समजू नको, सरळ आमच्याकडे यायचं. हक्काने ये हो.” बिल्डींगमधून बाहेर पडताना त्याला हसू आलं. गेल्या २ वर्षात, तो इथे आल्यापासून एकदाही काकू इतकं हसून बोलल्या नव्हत्या त्याच्याशी. पद्धत म्हणून किती गोष्टी अश्याच करतो आपण. काकू म्हणाल्या, “ये”… तो म्हणाला, “येईन”. त्याला हे मनात पक्कं ठाऊक होतं… हे शहर परत नाहीच आणि ही बिल्डिंग त्याहून नाही. आता इथे कशाला परत यायचं?
गल्लीच्या टोकावरच्या देवळाबाहेर तो थांबला. हा देव नवसाला पावतो म्हणतात, पण ह्या देवाकडे त्याने कधीच काही मागितलं नव्हतं, ह्या देवाने दिलं नव्हतं. कित्ती काय झालं दोन वर्षांत. ४ सेमिस्टर्स, असंख्य प्रोजेक्ट्स, एक प्रेमप्रकरण, २ जॉब इंटरव्यूज आणि काय काय… पण ह्या देवाचा संबंध नाही आला कशाशीच! तो जेव्हा जेव्हा ह्या देवळात आला, तेव्हा तेव्हा त्याने कायम “वक्रतुंड महाकाय” म्हण्ट्लं. आज त्याला गंमत वाटली त्याच्याच वागण्याची. त्याने प्रयत्न केला ह्या देवाचा श्लोक आठवायचा, पण त्याला रामरक्षाच आठवत होती. नंतर धूज घालताना त्याला “उडाला उडाला कपि तो उडाला” आठवलं. पण त्याला काही हा श्लोक विशेष आवडला नाही.
चालत चालत तो बस स्टॉपवर आला. आजवर एकदाही तो इथे आला नव्हता. त्याला ह्या शहरातल्या बसेस नाही आवडायच्या. धुळकट्ट, मळलेल्या, गर्दीने भरलेल्या, कधीही वेळेवर न येणा-या, खिळखिळ्या… आणि त्यातून त्याला कधीच नीट बसायला मिळायचं नाही आणि धड उभंही राहता यायचं नाही. तरी आज तो इथे यून उभा राहिला. स्टेशनला जाणा-या ३ बसेस त्याने सोडल्या, कारण त्यात गर्दी होती भरपूरो. त्याने आज ठरवलं होतं गर्दी नसलेल्या बसमधून मी बसून जाणार. चौथ्या बसमधे चढला आणि त्याला जागा मिळाली. त्याच्या शेजारच्या बाकावरच्या मुलीने मोजून सहावेळा त्याच्याकडे वळून पाहिलं. “व्हॉट इज इट? माय पोस्ट-ब्रेक-अप ग्लो ऑर इज इट माय ब्लॅक शर्ट?” त्याने विचार करत बाहेर पाहिलं.
पोस्ट-ब्रेक-अप ग्लो… त्याला हसू आलं. ह्याच सिग्नलवरुन डावीकडे गेल्यावर कॉफीशॉप लागतं. तिथेच यादवच्या बाईकवर बसून ते अश्या काही आर्बिट गोष्टींवर बोलत बसायचे. दोन वर्षांत तिथे येणारे बरेच चेहरे त्याच्या ओळखीचे झाले होते. तिथे कोणी कॉफी प्यायला येत नसत. तिथे आल्यावर गप्पा मारताना काहीतरी म्हणून लोक कॉफी घ्यायचे. मग तरी इकडेच का यायचे? यादव म्हणायचा तसं – “इथे फक्त नावाला महत्व आहे. आय थिंक धिस इज द मोस्ट ब्रॅण्ड-कॉन्शस सिटी… तुमच्या पॅटीस, श्रीखंडापासून बायकांचे परकर, मुलांची शाळेची दप्तरं… सगळ्याला ह्या शहरात ब्रॅण्ड्स आहेत”. त्याला यादव आवडायचा. यादवच्या ह्या विचारमौक्तिकांच्या बदल्यात तो त्याला कॉलेजचे प्रोजेक्टस करून द्यायचा. यादव त्याच्या रुमवर पडीक असायचा, पण स्वतःच्या घरी त्याला दोनदाच बोलवलं यादवनं. शहराचं नाव राखलं त्यानं!
प्रेमप्रकरणात यादवने मदत केली होती त्याला. “साले, इश्क-विश्क तेरे बस की बात नही… अभी छोड दे.. बादमे रोयेगा भाई…”आज त्याला तिची आठवण यायला हवी होती, पण नव्हती येत. तो मुद्दामहून तिच्याबद्दल विचार करायचा प्रयत्न करत होता. पण त्याला नेहेमीसारखं ग्लूमी वाटत नव्हतं आणि त्याला तसं आज मनापासून वाटून घ्यायचं होतं. स्टेशनवर उतरला. ह्या शहराबद्दलचा तिटकारा इथपासूनच सुरू झाला होता २ वर्षांपूर्वी. लायनीने उभे असणारे बिर्याणीवाले त्याला नाही आवडायचे. स्टेशनमधे आल्यावर त्याने नेहेमीच्या टपरीवरचा चहा घेतला आणि बसला.
दर शुक्रवारी दुपारी तो इथे यायचा घरी जाण्यासाठी. सोमवारी पहाटे घरून निघायचा. सोमवारी घरून निघताना त्याला जे वाटायचं, ते आज इथून घरी जाताना वाटतं आहे म्हणून त्याला थोडं विचित्र वाटलं. स्टेशनवर जोरात रेडिओ लागला होता. नीट मराठी येत असून मुद्दाम अशुद्ध मराठी बोलणारी आरजे त्याच्या कायम डोक्यात जायची. ते एकमेव रेडिओ स्टेशन होतं तो इथे आला तेव्हा. “मी जात्ये गोव्याला माज्या हॉलिडेजसाठी… पण माय डिअर लिसनर्स, आय विल मिस यू… एन्‌ आय विल मिस धिस ऑसम सिटी, पण २ वीक्समधे रीटर्न येईन…” ती बोलत होती, तो ऐकत होता. त्याने विचार केला, “मिस धिस सिटी? आपण काय मिस करणार? मला हे शहर नाही आवडत, कधीच नाही आवडलं, मी काय मिस करणार? ” तो हसला आणि ट्रेनमधे चढला..
शहर असं नाही. पण माझी रुम नक्कीच मिस करेन. किचनमधून दिसणारी नदी… यादव नाला म्हणतो त्याला! इथली थंडी, इण्डीड मोस्ट रोमॅण्टिक विण्टर्स ह्या शहरात होते. कॉलेज, प्रोजेक्ट्स, यादव… नक्कीच मिस करेन. कॉफी, कुलकर्णी काका-काकू त्याच्या बाल्कनीत उभं राहून गप्पा मारायचे आणि आपण ते शांत उभं राहून ऐकायचो, ते पण मिस करेन… देऊळ, आणि त्यातल्या नवसाच्या घंटा… आपण मागितलं नाही कधी, पण मागितलं तर दिलं असतं त्याने, इतकी ओळख होती आता त्याच्याकडे… इथले दाबेलीवाले, इथले रिक्षावाले, इथल्या बेशिस्त ट्रॅफिकमधली शिस्त, मराठीपण आणि मराठीपण “प्रिटेण्ड” करणारी रेडिओ स्टेशन्स… तो अजून नवीन गोष्टींचा विचार करत होता.
त्याला हे शहर आवडायचं नाही. अजिबात नाही… आणि ह्या शहराचं न आवडणंच तो सर्वात जास्त मिस करणार होता.
घाटात ट्रेन आली. बोगद्यातून ट्रेन बाहेर आली. नेटवर्क परत आल्यावर त्याचा मोबाईल वायब्रेट झाला. त्याने मोबाईल काढला, पटपट कॉल लावला.. ” यादव.. यू वेअर राइट. डॅम यू. आय हेट युअर सिटी. आय रिअली हेट इट. बट यू नो व्हॉट? आय विल मिस धिस ब्लडी सिटी ऑफ युअर्स. नो, नॉट यू, साले. युअर सिटी…”
– जास्वंदी
(http://jaswandi.blogspot.com/2009/11/blog-post.html)
Uncategorized

आम्ही गडकरी

“सकाळी साडे-चारला तयार राहावे,” असा हाय-कमांडचा आदेश आल्यापासून जराशी उत्सुकता होतीच, पण सकाळी सॅम्या आणि राखुंड्या आपापल्या जांभया आवरीत मलाच विचारायला लागले – ’कुठे जायचे?’ करून, तेव्हा तर ती आणखीनच वाढली. असा प्लॅन कुणाला आधीच नाही सांगितला की आपले महत्व वाढते, असे वाटते का काय या माकडाला? असू देत बुवा…
पाचच मिनिटात पहाटेच्या शांततेला चरे पाडत आपली बायको दामटवत के.डी हजर झाला. कुठल्यातरी चांगल्या स्वप्नातून उठून यायला लागलं असलं पाहिजे त्याला, आपण काहीतरी गौप्यस्फ़ोट करणार आहोत हे देखील विसरला तो. गाडी माझ्याकडे देऊन स्वप्न कंटीन्यू करत तो पिलीयनवर खुशाल पेंगायला लागला, तेव्हा गाडी सुरिइ करत अजून सुषुम्नावस्थेत असलेल्या के.डी ला विचारले, “कुठे घ्यायची हे सांगणार आहेस की…”
“मळवलीला घे-लोहगडला जायचेय.”
“जी हुजूर.”
गाडी माझ्या हातात मिळाल्यावर तो नारायणपेठेला १८० चकरा मार म्हणाला असता तरी मी मारल्या असत्या.
के.डी ची बॉक्सर पळवणं हा माझ्या आवडीचा भाग आहे. सॅम्या आणि राखुंड्या पल्सारवर होते. ही गाडी मला कधी झेपली नाही. मला खालून वरपर्यंत मोजून काढलं तरी मी ५-३ च्या पुढे नाही जाणार. टांग मारून मी पल्सारवर बसले जरी, तरी पल्सारवर वाळत टाकल्यासारखी दिसते. चला… अशी लोंबकळत एखादवेळेस चालवलीच मी ती गाडी… पेलायला नको? मरू देत. मी त्या प्रकरणाच्या वाटेला जातच नाही. ’डेफिनेटली मेल’ आहे? हो बाबा, असू देत…
तर – गावातून बाहेर पडून जरा निवांत रस्ता मिळाला की गाडी ८०पर्यंत दामटायची.एखाद्या रीबॉकच्या जोड्याला किंवा टॉमी हिफ्लिइजरच्या जॅकेटला मागे टाकायचे. मग ते पोरगं चेकाळून मला गाठणार आणि मी गाडी चालवतेय हे लक्षात आल्यावर “साल्या! एका पोरीने पळवले तुला!” हे त्याच्या पाठीवर लटकलेल्याचे उद्गार तर नेहमीचेच! आजही मला नेहमीपेक्षा बरेच कॅचेस मिळाल्यावर त्याच्या बायकोला आज मी नेहमीपेक्षा बराच वेळ पिदववतेय हे के.डी.च्या लक्षात आले आणि तो जरा ’जे’ व्हायला लागला. मग कामशेतच्या पुढे गाडी त्याच्याकडे दिली. तोपर्यंत किती वाजले होते ठाऊक नाही, पण माझ्या पोटात कपभर चहा आणि बिस्किटे वाजले होते. मागच्या वेळी भोरला खाल्लेली लालभडक तर्रीवाली मिसळ आठवली. आई गं! पहिल्याच घासात तिने मला चांगलाच इंगा दाखवला होता. मीपण ती हट्टाने संपवून तिचे आफ्टर- इफेक्ट्स म्हणून दोन्ही गालांवर पिंपल्स मिरवत हिंडले होते. रामनाथच्यपण तोंडात मारेल अशा जहाल मिसळीचे इफेक्ट्स कुठे भलतीकडेच दिसण्यापेक्षा असे दिसलेले कधीही बरे, नाही का?
तर – एवढ्या पहाटे कोणी कुत्रंसुद्धा रस्त्यावर नव्हतं – हॉटेल्स उघडी असण्याची शक्यताच सोडून द्यायची. मग एका साखरझोपेत असलेया टपरीवाल्याला बाबापुता करत उठवले आणि चहा करायला लावला. चार बिस्किटांच्या पुश्यांचा फन्ना केला तेव्हा कुठे माणसात आल्यासारखं वाटलं. आणि मग भरल्या पोटाने पिलीयनवर बसून आवडीचा उद्योग सुरू केला, अखंड बडबड!
आज ’आवाजतोड’ खेळायचे ठरले. चिठ्ठ्या टाकून एका गाडीने एक गाणे/पद्य आणि दुसर्या गाडीने दुसरे घ्यायचे आणि जोरजोरात सुरू व्हायचे. जी पार्टी त्या वाढत्या आवाजात आपले गाणे विसरून दुसर्या पार्टीचे गाणे म्हणायला लागेल ती हरली. (कानात बोटं घालायची परवानगी नाही). या वेळी आम्हांला आलेलं ’भीमरूपी’ आणि राखुंड्याला ’गणपतीस्तोत्र’! सॅम्याने ’न च विघ्नं भयं तस्य’ करता करता ’वाढता वाढता वाढे’शी कधी फुगडी घालायला सुरुवात केली हे त्याचे त्यालाच कळले नाही. माझ्यासारखा बुलंद आवाज असताना आमची सरशी होणार हे तर उघडच! (शिवमहिम्न आलं की मात्र माझी दांडी उडते). आम्ही गाडी थेट लोहगडाच्या पायथ्याशी न्यायची ठरवली आणि मनात ईश्वराचे स्मरण करत अशक्य कच्च्या रस्त्यावरून हाणली गाडी. सकाळो-सकाळीच के.डी. कशाने पिसाळला होता काय ठाऊक! माझ्या डोक्याएवढ्या मोठ्या मोठ्या दगडांवरून गाडी हाणत होता. गाडी वेगवेगळ्या कोनांमधून अंगात आल्यासारखी गंमत-गंमत करत चालली होती. माझी मागे बसून जाम तंतरली होती. मी जर मागच्या मागे बदाककन पडले असते तर निदान ३ आठवडे पाय वर करून पडावं लागलं असतं खास! घरून चपला पडल्या असत्या त्या वेगळ्याच.
आमचे मोठे आवाज. त्यात हसण्यात डायरेक्ट साताच्या वरचेच मजले! त्यामुळे आम्ही आलो की लोकं ’ते आले… ते आले… ते आले बरं का…!’ अशाच आविर्भावात आम्हांला बघतच राहतात. या वेळीही काही वेगळं नाहीच घडलं. तसं पाहायला गेलो तर आम्ही आहोतच चार नमुने!
ढुंगणावर ’ली’चा पॅच, पायात ऍडीडासचे जोडे आणि शर्टात ’वेस्ट्साईड’ शिवाय बात नाही असा थाट. “हर फ़िक्र को धुवे में” करत दु:ख- काळज्यांना श्शूss करण्यासाठी फकाफका सिगरेट्स ओढणारा तो राखुंड्या! के.डी. – बीयरचे आत्यंतिक प्रेम पोटाच्या वळणदार ’ट’ मधून झळकत असलेले. कमरेला वाघाचे कातडे गुंडाळले आणि हातात खाटकाची सुरी दिली तर ’पिशी मावशी आणि तिची भुतावळ ’ किंवा तत्सम नाटकामध्ये बच्चेकंपनीला घाबरवण्यासाठी कामी येणारा मनुष्य! सॅम्या त्यातल्या त्यात शहाणे कोकरू. त्याचा तो शर्टाच्या वरच्या बटणापाशी हनुवटी खोचून घडीघडी”अंतर्मुख टिंब टिंब’ का कायसे होण्याचा तापदायक प्रकार सोडला, तर शहाणुलं बाळ आहे ते. आणि शेवटी ’मी’! खांद्यावर शर्टचे आढे पडलेय – त्याची गुडघ्याखाली येणारी दोन टोकं पोटापाशी आवळून बांधली आहेत असा अवतार. त्यामुळे मी मौजे पारलई मुकाम पोस्ट वाडे-बुद्रुकवरून तडकाफडकी ट्रान्सफर होऊन नेसत्या वस्त्रांशिवाय लोहगडावर रिपोर्टींग करायला आलेय असे कोणाला वाटले तर त्यात त्याची काहीही चूक नाही.
गडावर अजून वर्दळ चालू व्हायची होती. आमच्याही आधी गडावर येऊन पोहोचलेला ’सह्यमित्र’चा एक निकॉन डी-८० पालथा पडून ’कलरफुल ग्रासहॉपर’चा फोटो घेत होता.(असं त्यानेच मला नंतर सांगितलं). ’रंगीत टोळ’ म्हणायला काही हरकत नव्हती. पण एका गालाला माती लागलेल्या अवतारात तो भलताच गोड दिसत होता. त्यामुळे छोड दिया.
आमच्यातला के.डी. लोहगडावर अनेक वेळा नाचून बागडून गेलेला. त्यामुळे त्याला गड पाठ. तो झोपेत चालत जरी गेला असता तरी अलगड विंचूकाटा माचीवर जाऊन पोहोचला असता. मग काय, जिवंत झरेच बघ, आवाज कसा घुमतोय हे बघायला घसा ताणूनच काय ओरड… क्यॅयच्या क्यॅय चालले होते. १२ वाजेपर्यंत आम्ही काहीही न खाता-पिता इकडेच चढ, त्याच बोळकांडयातून घूस असे प्रकार करत होतो. डोक्यावर सूर्य आग ओकायला लागला होता, पिण्याचे पाणी संपले होते आणि त्यात हा मंबाजी आम्हाला वाट्टेल तसा पिदवत होता. आम्ही त्याच्या मागे पाय ओढत चाललो होतो. के.डीवर काय वर्षानुवर्षे किटण चढलेले. त्यामुळे त्याला कवचकुंडले मिळाल्यासारखीच. पण आम्ही मात्र करपत होतो. माझ्या पोटात खाडखूड सुरू झाली होती. विंचुकाट्यावर जाऊन खायचं हा के.डी.चा आग्रह होता( तिकडे काय पंगत बसणार होती? सातयेडं नायतर…) पण भूक लागल्यावर मी दोन पावलं जरी चालले तरी हवा गेल्यासारखी पिळपिळीत होते हे या बाबाजीला कुठे सांगणार? त्यामुळे त्याच्या बॅगेतल्या बिस्किटाच्या पुड्यासाठी मी ’बाजा लव्ह (लव्ह्सपण नाही) उर्मी’ असं चितारलेल्या कातळाखाली बैठा सत्याग्रह सुरू केला. आणि मारी टोपी…
मी तिथे अशी फतकल मारून बसलेली असताना नेमका कोण येऊन टपकावा? झुल्फ़ी? दिवाळीच्या आधी नारायण पेठेत हा छानदार मिशी आणि खांद्यापर्यंत केस असलेला पल्सार-डी.टी.एस.वाला दिसलेला. हा परत नारायण पेठेत दिसेल म्हणून बंदुक्षणी चहावाल्यांच्या लोखंडी बेंचला पोक आणलेलं मी. अशा मुलाने मला असा मांडा ठोकून भूक भूक करताना पाहावं? या तिघा नालायकांचं हसणं उकळत होतं. तेपण महा इब्लिस कार्टं! मला त्या कातळाखाली अस खुडूक करून बसलेलं पाहून तो फटाका फुटावा तसा हसला आणि आपल्या ग्रुपबरोबर निघून गेला. तेच मिशीत हसणे. मला ’प्रिय’ची सडकून आठवण आली. त्याला हे मी जेव्हा सांगेन तेव्हा तो याहून किलर स्माईल देऊन माझा खुर्दा करणार नक्की. उंची, मिशी आणि बुलेट ही माझी ३ ऑब्सेशन्स. आणि हीच माझा एक दिवस घात करतील ही शरीची शापवाणी आमच्या अख्ख्या मित्रमंडळात फेमस आहे. पण तिच्याकडे कोण लक्ष देतेय? ती चिचुंद्री आहे.
अशा रितीने मी माझी पोटपूजा उरकून घेतल्यावर आली ती सुप्रसिद्ध विंचुकाटा माची आणि तिच्या सुरुवातीलाच असणारा तो फेफरे आणणारा रॉक-पॅच. हे तिघं खारीसारखे सुर्रकन उतरून माझी मजा बघायला पायथ्याशी उभे राहिले. आमची सुरुवात तर चांगलीच झाली. पण मध्यावर आल्यावर हरे रामा हरे कृष्णा! बोटं ठेवता येतील एवढ्या जागेत एक पाय रोवून दुसरा ठेवू तर कुठे, या विवंचनेत मी मधल्या मध्ये लोंबकळत पडले होते आणि हे खाली पाद्रीबाबाच्या मख्खपणे उभे. मी तोल जाऊन पडले असते तर मला उठवायचे कष्टही न घेता ही लोकं ’टुझी माला डया येटे. आमेन,” असं म्हणून सर्व मिळून सहा पायांवर चालते होतील असं वाटायला लागलं. शेवटी एकदाचं माझं सुखरूप लँडिंग झालं आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. एक रेबॅनपण “स्स..हा!” म्हणून सुस्कारल्याचं बघितलं मी! रॉकपॅच उतरत असले म्हणून काय झालं? आमचं लक्ष असतं म्हटलं! माझ्यामागून रॉकपॅच उतरताना मुलींचे ’ मॅडी, मला भिती वाटते’, ’राज, मी पडणारेय …आऊछ!’ असे चीत्कार उठत होते. काही विचारू नका. मी मुलीसारखी ट्रीटमेंट ना कधी मागितली, ना या लोकांनी मला कधी दिली. फार फार तर त्यांच्यासारख्या अनुभवी ट्रेकर्समध्ये लिंबू-टिंबू म्हणून थोडा पेशन्स ठेवतात झाले!
विंचुकाटा माचीवर आल्यावर सॅम्याला जोर चढला. फोटो-बिटो ही सॅम्याची खास कुरणं. इकडेच वळ, तिकडेच बघ, अशीच वाक असं करून आम्हाला यथेच्छ त्रास देऊन झाला. दिवाळीत बाटलीतून चुकून सुटलेल्या रॉकेटसारखा सॅम्या त्या पूर्ण माचीभर सैरावैरा पळत होता, ते त्याच्याकडे उगीच पापण्यांची पिटपिट करत बघत असलेल्या पिवळ्या स्कार्फसाठी हे न समजायला आम्ही काय अगदीच ’हे’ नव्हतो. फोटो-बिटो काढून झाले आणि आम्ही एक २-रूम किचन गुहा गाठली. पथारी पसरली. तिकडे दर्ग्यावर पोरांनी ’आहुम आहुम’ वर धिंगाणा चालवलेला असताना आम्ही मात्र तिथल्या गुहेत बसून झाकीर ऐकत होतो. पळापळीचे सार्थक म्हणतात ते हेच असावे कदाचित!
मी तर आहेच विचित्र, पण माझे मित्रपण माझ्यासारखेच. जगाच्या भाषेत त्यांना ’विअर्डोज’ म्हणतात आणि माझ्या भाषेत ’टोळभैरव!’ (पुन्हा टोळ? आह! निकॉन डी८०!)! प्रत्येक जण हसून साजरं करत असला तरी प्रत्येकाला काही ना काही दु:ख आहेच आणि आमच्यापैकी प्रत्येकाला ते माहीत आहे.
राखुंड्याचं एफेम (फ्लुइड मेकॅनिक्स) सुटत नाहीये, के.डी.ला प्रेसवरचे मशीन त्रास देतेय प्लस त्याच्या लग्नाचं घाटतेय, सॅमीला केतकी उर्फ केटी खापिटलीने डिच केलेय. माझा एमपिइथ्री खराब झालाय, ’द हिंदू’चा रेट वाढलाय , माझा भारताचा नकाशा कितीही प्रयत्न केला तरी कडबोळीसारखाच येतो… माझ्या दु:खाची कारणे हजार! आणि प्रवास हा दु:खावर हमखास उतारा असतो. त्यामुळे सगळ्यांच्या दु:खाचा म.सा.वि. एका लिमिटपुढे गेला की एखाद्या रविवारी जमायचे आणि वाट फुटेल तिथे गाड्या सोडायच्या. लागेल तो गड पकडायचा आणि घ्यायचा चढायला हा उपक्रम!
माझे कालच ’भ.’शी जोरदार भांडण झालेय, ’प्रिय’ ’आऊट ऑफ टाऊन’ आणि ’आऊट ऑफ रेंज’ आहे, उद्या सॅमीच्या नव्या प्रेमभंगाचे सुतक पाळायला लागणारेय दिसतेय, राखुंड्याचा आत्ताच फोन आला. वाईट्ट्ट वैतागला होता तो. म्हणाला, “मने, लेट्स गो टू रायगड.”
मला काय? चला.
– श्रद्धा भोवड
(http://shabd-pat.blogspot.com/2009/11/blog-post.html)
Uncategorized

मशिनगन मुथ्थु: लामचा आणिक जवळचा

प्रथा- मद्रासेत ग्रॅज्युएट, मुंबईत नोकरी, मद्रासेत लग्न, मुंबईत पोरं, मद्रासेत सांबार, मुंबईत वडा, मुंबई, मद्रास, मुंबई, मद्रास, मुंबई, मद्रास, मुंबईत रिटायर, मद्रासेत हर्ट, फुलस्टॉप.
गीत- सोलोमन ग्रॅन्डे । बॉर्न ऑन सन्डे । डाईड ऑन सन्डे
रीत- नवाला ओठ सीलबंद करणारी गोडगट्ट कॉफी, बुडाला डिंक, आध्यात्मिक चेहर्या नं फाईली रिचवणं
वर्ष- चौदावे
प्रगतीची दिशा- ऊर्ध्व
संस्कार- बाबा वाक्यम् प्रमाणम्. साहेबाबाचं वाक्य पूर्ण होण्याआधी निदान चार वेळा “यास्स्सार” होकारार्थी मान हलली नाही तर घोर पातक
नाव- मुथ्थु- यास्सार मुथ्थु
यास्सार मुथ्थुचा बायोडाटा हा असाच राहाता, पण साहेबा बरोबर त्याचे ग्रहही बदलले. नव्या साहेबांनी जुनं ते कसं चूक, सांगत भानामतीत बिब्ब्याच्या फुल्या माराव्यात तशी मुथ्थुवर फुली मारली. मुख्य डिपार्टमेन्टमधून हलवून मुथ्थुला त्यांनी सिस्टम्सवर टाकलं. क्वालिफिकेशन हेच की मुथ्थुला टाईपिंग येतं. त्याच वेळी कंपनीत ईआरपी लावायची टूम आली. आयटी कंपनीतली नुक्तीच एमबीए झालेली पोरं कोकाटे फाडफाड इंग्रजी बोलत मुथ्थुला त्याच्याच कामाची माहिती नव्यानं देऊ लागली. प्रश्नोत्तरं झाली, फ्लो डायग्रॅम झाले, बिझनेस प्रोसेस झाल्या, वर्कशॉप झालं आणि तीच तीच माहिती मुथ्थुच्या कानावर परत परत आदळत राहीली. आपल्याकडून माहिती घ्यायची आणि ती परत आपल्यालाच सांगायची यासाठी कंपनी दर माणशी तासागणिक हजारात पैसे मोजते कळल्यावर मुथ्थुची ऍसिडीक जळजळ झाली. डोळ्यातले ससे आणि पोटातली फुलपाखरं रस्सम्‌च्या फुरक्यासोबत गिळून मुथ्थुनं सोबतच्या बिझनेस ऍनॅलिस्ट पोराला आपला बायोडाटा आणि एक प्रश्नचिन्ह दिलं. रेफरल बोनसचं गणित हलवून बळकट करत ऍनॅलिस्टानं दमदार होकार भरला आणि एकच वैधानिक इशारा दिला, “सॅप को सॅप मत बोलना, एस ए पी बोलना.”
बाम्बेतून पुनेला बदलून जाताना मुथ्थु, भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्ता उर्फ भानु आणि मुलांना अनुक्रमे साहसी आणि रोमांचकारक, काहीच नाही आणि बोअर वाटलं.
ऑफीसचा पहिलाच दिवस. लोकलमधल्या मादक धक्क्यांऐवजी नीटसं बसमधे बसून मुथ्थु बाहेरची गंमत बघत राहिला. हिरवीकंच शेतं, खणाखणांचे वाडे, तुळशी वृंदावन, गोठे आणि गोठ्यातल्या सज्जड गाई म्हशी!जिथं शेतं नव्हती तिथं शेतं विकून आलेली फटफटी आणि भाड्यानं लावायला आणलेली पांढरी इण्डिका दारासमोर उभी होती. मुथ्थुनं ग्रामीण भारत इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहीला. हिंजवडीच्या अद्भुत पुलाजवळून त्याची बस कुंथत कशीबशी निघाली.
ऑफीस! रम्य ते ऑफीस! आजूबाजूला कुणी नाही हे बघून मुथ्थुनं मद्रासीत ऑफीस! रम्य ते ऑफीस! आशयाचं गाणं म्हणून टाकलं. खाण्यापासून धुण्यापर्यंतच्या साऱ्या सोई चकचकीत, स्वच्छ आणि ऑटोमॅटीक. स्वतःहून उघडणार्याआ खतरा दारातून मुथ्थु आत जातो तर स्वागताला मुथ्थुचा होणारा साहेब! कॅप्युसिनोचे मंद घुटके घेत साहेब मुथ्थुला कंपनीबद्दल, स्वतःबद्दल सांगत होते. मुथ्थुचं तिथं येणं किती महत्त्वाचं आहे आणि मुथ्थुवर किती मोठ्या जबाबदाऱ्या त्यांना टाकायच्या आहेत ते ऐकल्यावर मुथ्थुनं नाक फुगवून डोळ्यात आलेलं पाणी निग्रहानं मागं फिरवलं.
“आय विल गीव्ह माय लाईफ फॉर कंपनी सार,” जॉईन होऊन तास न होतो तो मुथ्थुनं बालशिवाजीच्या आवेशात छाती फुगवून वचन दिलं.
“माझी हीच अपेक्षा आहे मुथ्थु. आणि एक, नो सर इन धिस कंपनी. माझं नाव सिद्धराम, सो कॉल मी सिद.”
नव्या आत्मविश्वासानं मुथ्थु आरश्याला सामोरा गेला. “माझं नाव मुथ्थयास्वामी नटराजन, कॉल मी मुथ्थु.” उत्क्रांतीदरम्यान शेपूट गळाल्याचा माणसाला झाला असेल, तेव्हढाच आनंद मुथ्थुला आपल्या नावामागचं यास्सार गळाल्याचा झाला. मनाशी बडबड करणारा मुथ्थु बघून भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्ता दारामागून खुदकन हसली तेव्हा मुथ्थुला सॉलीड रोमॅन्टीक वाटलं.
सिदनं एस ओ एस देऊन शनिवारी मिटींग बोलावली आणि भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्ताचं दोसा पीठ फसफसून उतू गेलं. जड पावलांनी मुथ्थु सिदच्या शेजारच्या खुर्चीत जाऊन बसला.
“तुम्हां सगळ्यांना शनिवारी इथे बोलावल्याबद्दल मी आधी तुमची माफी मागतो. पण एक मोठी फार्मा कंपनी पुढच्या आठवड्यात इथे येणार आहे. आपल्या सेल्सच्या माणसांनी आपल्या क्षमतांना नेहमीप्रमाणं थोडसं फुगवूनच सांगीतल आहे, पण ते ठीक. आता गंमत अशी आहे की फार्मात एस ए पी वर काम केलेलं आपल्याकडं कुणीच नाही! वेट अ मिनीट,” सिदनं नाट्यमय पॉज घेत खुर्ची मुथ्थुकडं वळवली. “मी माझ्या या नव्या मित्राला कसा विसरलो? मुथ्थ, आहा, मुथ्थुच! मित्रांनो आपल्याकडे या क्षेत्रातला चौदा वर्षांचा सॉलीड अनुभव असणारा मुथ्थु आहे. तो हे प्रपोजल प्रेझेन्टेशन लीड करेल. संचारसिंग मुथ्थुला मदत करेल.” मुथ्थुनं सिदच्या पापण्यांवर हल्कंच झुलून घेतलं.
पूर्वजन्मीचे सूर जुळल्यागत संचारसिंग उर्फ सॅन्चो मुथ्थुकडं बघून मंद हसला.
सिदनं मूठ ठेबलावर आपटत मिटींग संपल्याचा इशारा केला, “नो नीड टू टेल, तुमच्यासाठी पिज्जा आणि कोक आज माझ्याकडून.”
फार्मा कंपनीतून अर्धा डझन लोक आले होते. सिदनं ओळखपाळख, जुजबी प्रश्नोत्तरं हाताळली आणि मोठा आवंढा गिळून मुथ्थुच्या हातात सूत्रं दिली. मुथ्थुच्या पोटातल्या फुलपाखरांनी हाहाःकार माजवला होता. मुथ्थुनं कानोसा घेतला, बाहेर त्यांचा आवाज येत नव्हता.
“अमेरिकेतली फार्मा इंडस्ट्री एफडीएच्या नियमांनुसार चालते. ओके. द्धुफ़्ध एव्हेवेवोक्फ़ोप्विउफ़्व्दोइद्ज्व्द देद्फ़्जुद्व्हिव्फ़िह्व. ओके. स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर (एसओपी). ओके ह्द्लिचैद एओव्हुव्द्फ़ द्फ़्धदिहिद दोक्वध च्दोकुदह्द्द दिफ़्पिज्व्फ़्व दफ़्जु. ओके. जी एक्स पी, एक्स इज रिप्लेसेबल. सो इट कॅन बी गुड क्लिनिकल प्रॅक्टीसेस, गुड मॅन्युफॅक्टरींग प्रॅक्टीसेस ओके.औद उह्ध्ज्द्फ़्ज द्फ़िज्र;फ़्ज्म्क्द्फ़ श्टडॆःऊ खऒझःआघ्ड्य़ॆघ्ड ऒळ्ख्घःडघ्टूड्ट ड्ण्झ्डीड्झेहेफ़्ग्ज फ़्ह्फ़्फ़ ओके टाईम ऍन्ड डेट स्टॅम्प इन एस ए पी ओके………………ओके ओके ओके ओके ओके”
पाऊण एक तास मुथ्थु सारा अनुभव पणाला लावून ज्या पॅशननं बोलत होता, आलेले पाहुणे गिऱ्हाईकच होऊन गेले. ठासून भरलेल्या बाराच्या बंदुकीगत मुथ्थुचं एकदम ओके प्रेझेन्टेशन ऐकून सिद संचारसिंगच्या कानात पुटपुटला, “ये तो एकदम मशिनगन मुथ्थु है.” संचारसिंगाला मुथ्थुचं नवं नाव भारी आवडलं.
प्रेझेन्टेशन संपेस्तोवर मुथ्थु वात्रट सिन्हाच्या भाषेत सांगायचं तर ब्लॅडर-फुल झाला होता. घाई असली तरी मुथ्थु तरंगत वॉशरुमकडे निघाला. तिथं भेटलेल्या एका चकचकीत माणसानं शिष्टाचार म्हणून मुथ्थुला नमस्कार घातला. शिष्टाचाराचाच एक भाग म्हणून विचारलेल्या साध्या प्रश्नाला मुथ्थुनं लांबडं उत्तर दिलं.
“तुम्ही काय करता?” मुथ्थुचा निरागस प्रश्न.
“मी मॅनेजमेन्ट बघतो.”
“ओह, म्हणजे तुम्ही डिलीव्हरीत नाही तर… मी आहे.”
चकचकीत माणूस मिश्कीलपणे म्हणाला, “माझं नाव के के राव. यू साऊंड इन्टरेस्टींग ऍन्ड पॅशनेट अबाऊट धीस कंपनी. तुमच्या काही सूचना असतील तर मला नक्की कळवा.” रावसाहेबांनी आपलं कार्ड मुथ्थुच्या हातात दिलं.
“आपण आपल्या क्लायंटच्या अमक्याचं तमकं केलं पाहिजे.” आपण अत्यंत वायफळ सूचना केली हे जाणवूनही मुथ्थुनं रेटून नेलं.
रावांनी मुथ्थुच्या हातातल्या कार्डाकडे खूण करून मेल करं असं सुचवलं आणि घाईघाईत राव बाहेर पडले.
के के राव, चेअरमन डायरेक्टर हे कार्डावर चारेक वेळा वाचल्यावर मुथ्थुच्या डोक्याचा बधीरपणा जरा कमी झाला.
राउण्ड: ०
मोड: डेमो
तुमचं कोड नेम: मशिनगन मुथ्थु
स्टार्ट…
हिंजवडीच्या कोपऱ्यावर नेहमीपेक्षा जास्तच बशी तुंबल्यात. तुंब्याच्या दुसऱ्या टोकाला कसलासा मोर्चा आहे. पांढऱ्या शुभ्र कपड्यातला एक अक्कडबाज मिशीवाला मोर्च्याचं पुढारीपण करतोय. बशींच्या तुंबडखान्यात वैतागलेला मुथ्थु नकळत मोर्च्यातल्या लोकांसोबत चालू लागला. ’नही चलेगी,’ ’युवानेत्यांचा,’ ’माननीय नेत्यांचा’इत्यादिच्या गजरात दिंडी हिंजवडीच्या डोंगर पायथ्याशी पोचली. उजाड माळरान, त्यावर छोटसं स्टेज, स्टेजवर नेहमीचेच यशस्वी महापुरुषांचे फोटो, पाचपन्नास उघडेनागडे गावकरी आणि साऱ्या वातावरणाला घुं घुं पार्श्वसंगीत देणाऱ्या डोंगरावरच्या महाकाय पवनचक्क्या. अक्कडबाज उठला आणि माईक बघून सुटला
“… हा या मातीचा अपमान आहे. त्यांनी ऊस लावला, सहकारी कारखाने काढले, हिंडायला बोलेरो गाड्या आणल्या. मित्रांनो, आणि आपल्या उरावर या पवनचक्क्या आणून बसवल्या. यांच्या आवाजांनी म्हातारी माणसं, लहान मुलं शांतपणे झोपू शकत नाहीत, गाई-म्हशींनी दूध देणं बंद केलय, मला आतली पक्की खबर मिळालीए की या राक्षसी पवनचक्क्यांमुळे भूकंपही होतात. बघा, यांची ही मोठमोठाली पाती कशी ढगांना पिंजून ठेवताहेत. ढगात पाऊस जमणार कुठून? पाऊस नाही आला तर ऊस नाही, कारखाने नाहीत आणि बोलेरो गाड्याही नाहीत… “
मुथ्थु झाडाखाली उभं राहून ऐकत होता.
“Fortune is arranging matters for us better than we could have shaped our desires ourselves, for look there, friend Sancho Panza, where thirty or more monstrous giants present themselves, all of whom I mean to engage in battle and slay, and with whose spoils we shall begin to make our fortunes; for this is righteous warfare, and it is God’s good service to sweep so evil a breed from off the face of the earth…Though ye flourish more arms than the giant Briareus, ye have to reckon with me”
“…मित्रांनो शत्रू ओळखायला शिका. आणि एकदा हे युद्ध म्हटलं की शत्रूला क्षमा नाही…”
अक्कडबाजाचं इतकं स्फूर्तिदायक भाषण ऐकून लोकांचे बाहू फुरफुरू लागले, ज्यांना पैसे देऊन आणलं होतं त्यांची स्वामिनिष्ठा जागी झाली.
आणि गावकऱ्यांनी पवनचक्क्यांवर आक्रमण केलं.
राउण्ड: १
मोड: नवसाक्षर
तुमचं कोड नेम: मशिनगन मुथ्थु
स्टार्ट…
मुथ्थुच्या जोरदार पीचमुळं प्रोजेक्ट आला असं मुथ्थुचं मत असतं. सिदनं नेहमीसारखी शनिवारी एसओएस मिटींग बोलावलेली असते. भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्तानं दोसा पीठ भिजवणं बंद केलेलं असतं.
“मित्रांनो,” सिद शनिवारच्या सॉस मिटींगमधे जेव्हा अशी सुरुवात करतो, तेव्हा काही तरी घोळ असतो हे सगळ्यांना अनुभवानं कळून चुकलंय. “आनंदाची बातमी अशी की आपल्याला फार्माचा प्रोजेक्ट जवळजवळ मिळालाचंय. आता मला चिंताय ती लोकांची. निदान पन्नास-साठ लोकांच्या प्रोफाईल्स क्लायंटला पाठवायच्या आहेत. आणि मुथ्थु सोडला तर फार्मात काम केलेला आपल्याकडं कुणीच नाही. पण आपण काही वर्षांपूर्वी एका खताच्या कंपनीसाठी काम केलं होतं. आपल्याला त्या टीमची प्रोफाईल बदलून दाखवता येईल. मुथ्थु, प्रोफाईल मधे काय टाकायचं हे फक्त तूच सांगू शकशील. म्हणून तू आणि संचारसिंग यावर काम कराल.”
“पण खत वेगळं औषध वेगळं. असं कसं करणार?” मुथ्थुचा भाबडा प्रश्न. कुणीच जोरात हसून खुर्चीतून पडत नाही.
“दोन्हीकडं केमिकलचं प्रोसेसिंग तर असतं आणि काय? हे फार महत्त्वाचंय मुथ्थु. आणि तुला हा प्रोजेक्ट लीड करायचाय, त्यामुळे तू तुझी टीम निवडण्याचं काम आत्तापासून करू शकतोस- संध्याकाळपर्यंत.” सिदनं मधात बुडवून काढा दिला.
पण हे पाप आहे. जे नाही ते आहे कसं म्हणायचं? It is easy to see that thou art not used to this business of adventures; those are giants; and if thou art afraid, away with thee out of this and betake thyself to prayer while I engage them in fierce and unequal combat” या क्षणी मला लढू दे हे युद्ध माझ्याच विवेकबुद्धीशी. वेळ आली की स्वतःशीच पत्करेन मी शत्रुत्व.
झोपाळलेल्या डोळ्यांचा संचारसिंग रिज्युम मॅनेजरमधून साठेक रिज्युमे घेऊन येईपर्यंत मुथ्थुनं काही ड्राफ्ट प्रोफाईल करून ठेवल्या.
“संचारसिंग, जेमतेम चारेक लोकांनी खताच्या प्रोजेक्टवर काम केलंय. उरलेल्या प्रोफाईल्स कशा काय मॅन्युप्युलेट करायच्या बाबा?”
“मला सॅन्चो म्हटलं तरी चालेल. हे चार लोक ऑन-साईटला होते असं दाखवू आणि उरलेले ऑफ-शोअर. ऑफ-शोअरच्या लोकांना रिक्वायरमेन्ट आणि डिझाईनशी काही देणं-घेणं नसतं. त्यामुळे त्यांचा डोमेनचा अनुभव कमी दाखवू. त्यांचं काम ब्ल्यूप्रिंट घ्यायची आणि कॉनफिग हाणायचं.”
“सॅन्चो, मित्रा, हे काम तू नीटपणे करशील, तर माझ्या राज्यातलं अर्धं राज्य मी तुला देईन.”
मुथ्थु आणि सॅन्चो मनापासून हसले.
दिवसाखेर कंपनीकडं दीडेक हजार माणूस-तासांचा फार्मातला अनुभव तयार झाला.
मिशन सक्सेसफुल
निकाल- मशिनगन मुथ्थु: ० सिस्टीम: १
राउण्ड: २
मोड: नवसाक्षर
तुमचं कोड नेम: मशिनगन मुथ्थु
स्टार्ट…
मुथ्थुनं मरमरून अफलातून ब्ल्यू-प्रिंट करून दिली. डलसिनिआ, ऑनसाईट क्लायंट पीएमनं, मुक्तपणे मुथ्थुचं कौतुक करणारा मेल पाठवला. मुथ्थुच्या सांगण्यावरून तिनं ठरल्यापेक्षा जास्त स्कोप मान्य केला.
मुथ्थुनं केकेला डलसिनिआचा मेल आणि जास्तीचं बिलींग कसं वाढवायचं यावर काही सूचना मेल केल्या. आणि हुर्रे, मुथ्थुला केकेचा अभिनंदन आणि आभाराचा मेल लगेच आला. मुथ्थुनं केकेच्या मेलचा प्रिंटाऊट डलसिनिआच्या मेलच्या प्रिन्टाऊटखाली क्युबिकलमधे डकवून टाकला.
फुकट खाऊनपिऊन जाड्या झालेल्या माणसागत मुथ्थुचा प्रोजेक्ट भुसभुशीत वाढला. डलसिनिआचा मुथ्थुवरचा विश्वास बघून सिदनं इकडची तिकडची चार पोरं उगाच त्या प्रोजेक्टला चिटकवली.
टीम वाढत चालली तशी लोकांची अनोळखही वाढत चालली. डलसिनिआनं पुढाकार घेऊन गीव्ह फेस टू व्हॉईसची टूम काढली. ऑनसाईटहुन टीमचा फोटो, नाव-गाव, छंद वगैरे आले. मुथ्थुनं डलसिनिआचा फोटो डोळे भरून पाहून घेतला.
for her hairs are gold, her forehead Elysian fields, her eyebrows rainbows, her eyes suns, her cheeks roses, her lips coral, her teeth pearls, her neck alabaster, her bosom marble, her hands ivory, her fairness snow, and what modesty conceals from sight such, I think and imagine, as rational reflection can only extol, not compare
सॅन्चोनं कुणी न सांगताच मुथ्थुच्या मनातली खळबळ ओळखली.
“All right Sancho Panza, you’re a squire. How does a squire squire?”
” Well, first, I ride behind him. Then he fights. And then I pick him up off the ground”
परत एक युद्ध! माझंच माझ्याचं प्रतिमेशी. कंटाळलो आहे पाहून आरश्यातला तोच तो आंबलेला चेहरा. नवनिर्मितीची करेन म्हणतो सुरुवात स्वतःच्या विनाशापासून.
सॅन्चोच्या सांगण्यावरून मुथ्थुनं विशीतली मिशी तिशीत उडवली आणि अंगाला कवटाळणारा गर्द हिरवा टी ज् घालून फोटो काढला.
मुछमुंडा मुथ्थु पाहून भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्तानं सासऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी सत्यनारायण घातला.
दबक्या आवाजातल्या ’मुथ्थु तो सुरीसाबसे राज बन गया’टाईप कॉमेन्ट्स ऐकूनही मुथ्थु खचला नाही.
डलसिनिआचे संदर्भ मुथ्थुला गोंधळात पाडत होते. जे गद्धेपंचविशीत झालं नव्हतं, ते आता होत होतं.
It is imperative each knight has a lady; a knight without a lady is a body without a soul. To whom would he dedicate his conquests? What visions sustain him when he sallies forth to do battle with evil and with giants?
फोटोबरोबर माहिती पाठवताना मात्र मुथ्थु जाम गडबडला. तासभर विचार करूनही त्याला छंदाच्या रकान्यात काय लिहावं कळत नव्हतं. शेवटी त्यानं NA लिहून टाकलं.
मिशन सक्सेसफुल
निकाल- मशिनगन मुथ्थु: ० सिस्टीम: २
राउण्ड: ३
मोड: नवसाक्षर
तुमचं कोड नेम: मशिनगन मुथ्थु
स्टार्ट…
मुथ्थुचा प्रोजेक्ट ऐन भरात असतानाच अडचणींचे डोंगर उभे राहू लागले. आठ-दहा चांगली पोरं मधेच दुसऱ्या कंपनीत गेली. सिदनं परस्पर चार लीड दुसऱ्या प्रोजेक्टसाठी वळवून घेतली. ज्यांच्याकडे व्हीसा होता त्यांची अचानक लग्नं किंवा बाळंतपणं किंवा आजारपणं निघाली. बिजनेस व्हीसावर लोकांना काम करायला लावून तर मुथ्थुनं पापाची परिसीमाच गाठली! प्रोजेक्टचं मार्जिन घसरायलागलं, तसं अननुभवी माणसं प्रोजेक्टवर आली. त्यांच्या चुका झाकता झाकता मुथ्थु उसवत चालला. मुथ्थुसाठी हे नवं होतं.
त्याच्या प्रोजेक्टची उडालेली लक्तरं त्यानं क्रमवार लिहून काढली आणि भविष्यात असं होऊ नये म्हणून काय करता येईल हेही लिहून केकेला मेल पाठवून दिला.
मुथ्थुनं सॅन्चोला मूलभूत प्रश्न टाकला.
हे कसले युद्ध? मीच जिंकतो आहे, मीच हरतो आहे. कुणालाही दिसत नसतो शत्रू, जश्या मांत्रिकी प्रभावाखाली राक्षसांच्या झाल्या होत्या पवनचक्क्या. मी, जणू माझ्या कामाचा सरदार, उभा आहे चिलखत घालून, उभा आहे तलवार घेऊन न दिसणाऱ्या शत्रूशी लढायला. या युद्धात रक्त नाही, या युद्धात सैन्य नाही, आहेत ते फक्त प्रश्न आणि अदृष्य काही शत्रू. You know what the worst crime of all is? Being born. For that you get punished your whole life.
सॅन्चोसाठी मुळात तो प्रश्नच नव्हता.
Dying is such a waste of good health.
मिशन सक्सेसफुल
निकाल- मशिनगन मुथ्थु: ० सिस्टीम: ३
गेम ओव्हर
केकेच्या अर्धा डझन सेक्रेटरीपैकी एकानं केकेचा मेलबॉक्स उघडला. ज्यांना आभाराच्या आणि अभिनंदनाच्या मेल पाठवायच्या त्यांना खुणा केल्या आणि बाकी मेल शिफ्ट डीलीट करून टाकल्या.
For me alone was Don Quixote born, and I for him. I give him to you.
– संवेद
(http://samvedg.blogspot.com/2010/03/blog-post.html)