ह्या बंदिस्त ए. सी. रूमची शपथ !

ह्या बंदिस्त ए. सी. रूमची शपथ ! बाहेर पडणा-या पावसात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. म्हणजे ... माझ्या अत्यंत तरल मनाला पाऊस पाहिला की हटकून कुणाची तरी आठवण नको यायला वगैरेसारखा हा काव्यात्मक निषेध नाहीये. आय ऍम जस्ट नॉट इंटरेस्टेड. एवढ्या तप्त धरणीवर ह्या सरी उपकार केल्यासारख्या येऊन जाणार आणि आपण उगाचच हरखलेले चेहरे वर करून "आहे आहे! कुठेतरी अजून न्याय आहे," म्हणत ओंजळभर लाटांवर हेलकावे खाणार ह्यासारखा विनोद नाही. (मला इथे अपमान म्हणायचं आहे). विशेषत: दुष्काळ अंगवळणी पडत चाललेला असताना आलेल्या ह्या लहरी सरींना क्रूर थट्टा का म्हणू नये???

कधीतरी सगळं "लहर" ह्याच सदरात मोडणार अशी भीती होतीच. आपला जन्म म्हणजे कुणालातरी न थोपवता आलेली लहर (सौमित्र ह्याला आईबापाचा बहर म्हणतो- टायपो असणार!) आपलं शिक्षण म्हणजेसुद्धा कुणालातरी नातेवाईकांना, शेजा-यांना खिजवायची आलेली लहर, लग्न म्हणजे काही ऑप्शन्सपैकी एखादा निवडून रिस्क घेण्याची लहर आणि पुढील सारे सोपस्कार म्हणजे दोन लहरींची एकमेकांशी चाललेली चढाओढ. कमिटमेंट ह्या गोंडस नावाखाली सर्रास खपवल्या आणि खपवून घेतल्या जाणा-या लहरी. पिरियड!

नाही म्हणायला एक कविता येत जात असते आयुष्यात, जिने निदान आपला स्वभाव लहरी आहे हे कधीच लपवलं नाही. तिला भिजवायचं असतं म्हणून ती येते, बरसायचा कंटाळा आला म्हणून निघून जाते... कधी चिंब भिजवून, कधी अर्ध्यामुर्ध्या कोरड्या, विनोदी अवस्थेत ठेवून. येणार म्हणून आश्वासन नाही, जाते म्हणून धमकी नाही. किमान तिची अनिश्चितता निश्चित आहे. तिच्या अशाश्वत, क्षणभंगुर निळाईइतकं सुंदर आणि तिच्या सावळत जाण्याइतकं शाश्वत काही नाही.

हे त्या निळाईच्या आशेने आहे? की सावळण्याच्या आशंकेने??? माहीत नाही.स्वघोषित लहरींच्या येण्या- न येण्यातलं सुख सारखंच.

एक किनारे पे तुम हो और एक किनारे पे हम हैं
वक्त को बहते देख रहे हैं ... यह मंजर भी क्या कम है।

ऍंड बिफोर आय साईन ऑफ... ह्या बंदिस्त ए. सी रूमची शपथ! मला कुणाचीही आठवण येत नाहीये.

वैभव जोशी

http://runaanubandh.blogspot.com/2009_07_01_archive.html
2 comments