चल तर जाऊ...

हे कृष्णसखे,
आवर गं आवर तुझे अश्रू. यमुनेला पूर कसा अनावर झालाय बघ. वासरं अगदी कासावीस झालीत. आयांच्या मानेखाली तोंड खुपसून भीती लपवण्याचा प्रयत्न करतायत. हा पूर आवरायला तो नाही गं इथे कुठे. एका करंगळीवर अख्खा दुःखाचा डोंगर लीलया पेलणारा तो नाही येणार आता. बेईमान, आता कसा डोंगरायेवढं दुःख तुझ्या पदराशी बांधून गेलाय. तू तर कधी कुंतीसारखं दुःख मागितलं नव्हतंस! किंबहुना तू तर कधी काही मागितलंच नव्हतंस. मागणारा तो होता, हट्ट करणारा तो होता, झाकून दडवून ठेवलेलं चोरून नेणारा तो होता आणि लाडीगोडीनं बळजोरी करणाराही तोच होता. तू फक्त कायम होकार भरत राहिलीस. अगदी जेव्हा तो जाण्यासाठी निघाला, तेव्हासुद्धा तू मुक्यानेच फक्त हो म्हणालीस. तुला खात्री होती, की जर तू म्हणाली असतीस," कान्हा, नको रे जाऊस" तर तो गेला नसता. खरंच?

तो यशोदेचा पोर त्या वेळूच्या बनातून त्याला घरी पोचवताना काही पावलांत बाल्य ओलांडून तरुण झाला. तो कदंब साक्षी आहे. त्या बासरीनं जणू गारूड केलं होतं आसमंतावर. तो अशोक बहरला फुलांनी, तशी मालती अजूनच बिलगली त्याला. यमुनेच्या डोहावर सारंग पक्ष्याचं एक जोडपं उतरलं होतं. ते उगंच एकमेकांवर पाणी उडवत होते. किती युगांचं अंतर गेलं मधे कोण जाणे.

अजूनही पाण्यावरून येताना, करवंदामागून खडा मारल्यासारखा त्याचा प्रश्न येईल, "चल, येतेस?"
पण तुझा निश्चय मात्र पक्का आहे या वेळी.
आता काही तू हो म्हणायची नाहीस. खरंच ना?
राधे!

चल तर जाऊ-
पण, नको जिन्यावर, नको गच्चीवर
आम्रतरूंच्या घनरानातील, बकुळफुलांची अस्फुटलेली
शय्या कधीची झुरते आहे
मुरलीची धून विरते आहे
आठवणीने आठवणींचे मोरपीस ते ठेव बरोबर

चल तर जाऊ-
पण, नकोच दिवसा, नकोच रात्री
अंधाराला उसवत फसवत, आकाशाची रेशीम छत्री
फुले चमकती वेचून गेली
धुके गुलाबी वरती खाली
आठवणीने अबोलकीशी चंद्रकोर ती ठेव बरोबर

चल तर जाऊ-
पण, नको बोलणे, नको अबोला
चित्तचोरटी नेत्रपल्लवी, सलज्ज हळवे सजल इशारे
कवितेच्या विस्मरल्या ओळी
दोन आसवे शापित भोळी
आठवणीने भैरवीतले सूर अभोगी ठेव बरोबर

प्रसाद बोकील

http://prasadik.blogspot.com/2009/05/blog-post.html
Post a Comment