याचसाठी केला होता अट्टाहास

"आय टेल यू, टूरिझम इज वे ओव्हररेटेड."

जगातील कुठल्याही कोपर्‍यातील लोक दोन दिवस सुट्टी मिळाली तरी कुठेतरी जाण्याचा बेत करत असताना असे वाक्य उच्चारणे याचा अर्थ तुम्हाला अशी प्रक्षोभक वाक्ये टाकून लोकांच्या झुंजी लावण्याचा छंद आहे किंवा तुम्ही मराठी सायटींचे (मसा) सदस्य आहात. अर्थात मसावर नुसते वाक्य उच्चारून भागत नाही. त्याला थोडी पार्श्वभूमी वगैरेंची फोडणी देऊन चर्चाप्रस्ताव तयार करावा लागतो. पण हे विषयांतर झाले. पर्यटण मलाही लई आवडते, पण त्याबरोबर येणारे काही शत्रू लोक डोक्याची कल्हई करतात.

म्युझियम

कुठल्याही नवीन शहरात गेल्यावर तिथे मोठ्ठे म्युझियम आहे असे कळले की माझ्या छातीत धडकी भरते. याचा अर्थ मला म्युझियम बघायला आवडत नाहीत असा अजिबात नाही. खरी वेदना वेगळीच आहे. एखादे टिपिकल, (जगप्रसिद्ध इ.) म्युझियम बघण्याचा अनुभव रोचक असतो. अ‍ॅड्रेनलिन नसानसांतून धावत असते. प्रवेश केल्यावर मी प्रत्येक गोष्ट निरखून बघायला सुरुवात करतो.

"वा! काय कलाकुसर आहे!" "अहो, ते तिकीट कौंटर आहे, म्युझियम अजून पुढे आहे" वगैरे.

हळूहळू पहिला, दुसरा करतकरत पाच-सहाव्या मजल्यावर पोचतो. सातव्या शतकामधला पहिला भाला, दुसरा भाला असे करत करत तेराव्या भाल्यापर्यंत मेंदू सॅच्युरेट व्हायला लागतो. मग डोक्यात ब्याकग्राउंडमध्ये अजून काय बघायचे राहिले आहे, उद्याची ट्रेन कधी आहे इ. विचारांची गर्दी वाढायला लागते. याचा वैताग नकळत कलाकृतींवरच निघायला लागतो.

"तेराव्या शतकातल भांडं, यातून काय बरं पीत असतील लोक? पुढे... हस्तलिखित ग्रंथ. हम्म. ’कंट्रोल सी-कंट्रोल व्ही’ची किंमत आता कळते आहे. पुढे... कुठल्यातरी राजाचा रत्नजडित मुकूट, च्यायला मजा होती राव यांची. रिसेशन नाही की काही नाही. पुढे... हम्म रंग थोडे भडक वाटतायत. ऊप्स, कोण दा विंची का? सॉरी बॉस, काय आहे उद्याची ट्रेन पकडायची आहे, पोटात कावळे कोकलतायत. म्हणून थोडं दुर्लक्ष झालं. डोंट माइंड हं. बाकी कलर कॉम्बोमध्ये तुमचा ब्रश धरणारं जगात तरी कुणी आहे का? हे हे हे..." इ.

अशा ठिकाणी आजूबाजूला नजर टाकलीत तर कुरुक्षेत्रावर घायाळ होऊन पडलेल्या वीरांप्रमाणे रंजले-गांजलेले पर्यटक अन्नपाण्याच्या शोधात गलितगात्र होऊन पडलेले आढळतील. (म्हूनतर बनिये लोक तिथे हाटेलं काढून बसले का नाय? साद्या पान्याच्या बाटलीला तीन-तीन युरो मोजून र्‍हैले नं भौ!)

म्हणून लूव्ह्र किंवा कलकत्त्याचे ऐतिहासिक म्युझियम अशी प्रचंड म्युझियम्स बघायला आवडतात. पण खरं सांगायचं तर शेड्डारसारख्या एखाद्या पिटुकल्या गावातील ३० कोटी वर्षांमध्ये तयार झालेल्या नैसर्गिक गुहा आणि सोबतचे आटोपशीर प्रागैतिहासिक म्युझियम बघताना खूप मजा येते.

शंकेखोर वृत्ती

जे आहे ते स्वीकारावं नं? पण नाही, आमच्या मनात वेगवेगळ्या शंका यायला लागतात. आता पेंटींगचंच घ्या. दा विंची, मायकेल वगैरे बाप लोक. पण बाकीच्यांचं काय? सिस्टीन च्यापेलचं कॉन्ट्रॅक्ट अँजेलो, बोत्तीचेल्ली प्रभृतींना मिळाल्यावर गल्लीबोळातल्या चित्रकारांमध्ये चर्चा होत असणार. "काय तुम्ही, निस्ते हिते बसून टिंग्या टाकून र्‍हैले. तिकडे तो अँजेलो घेऊन बसला ना कॉन्ट्रॅक्ट. सगळी वशिलेबाजी, आता म्हैन्याच्या म्हैन्याला बक्कळ कमिशन मिळते का नाय बघा." आता अशा गल्लीबोळातल्या एखाद्या चित्रकाराची कलाकृती इथे नाही कशावरून? सोळाव्या शतकातले आहे, म्हणून सगळेच उत्तम असे कुणी सांगितले? बरं, मला चित्रकलेतील ओ का ठो कळत नाही. खाली मास्टरपीस पाटी असली की आम्ही उत्सुकतेने बघणार.

क्या मेरा क्या तेरा

"मी येते आहे ना फ्रेममध्ये?" एका यांकिणीचा प्रश्न. बाईंचे आकारमान बघता कुठल्याही फ्रेममध्ये त्या न येणे अशक्य होते.

"आणि आयफेल टॉवर?"

ओत्तेरी! बाईंना टॉवरबरोबर फोटू हवाय तर. त्यात त्यांच्या क्यामेर्‍याचा झूम पिटुकला.

"बाई, मी मागे-मागे जातो. क्यामेर्‍यात तुम्ही आणि टॉवर दोन्ही आले की फोन करतो."

मला फोटोग्राफी अतिशय प्रिय आहे, पण प्रेक्षणीय स्थळे आणि फोटोग्राफी हे गणित मला सुटत नाही. ताजमहाल, पिसाचा मनोरा अशा ठिकाणांचे सर्व अँगलमधून, सर्व ऋतूंमध्ये, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, उत्कृष्ट फोटो लोकांनी आधीच काढून ठेवले आहेत. त्यात मी आणखी काय करणार? शिवाय क्यामेरा असला की काहीही नवीन दिसले की आधी फोटो काढण्याची घाई. त्यापेक्षा नकोच तो ताप डोक्याला. बरं, लोकांना त्यांचे स्वतःचे फोटो घ्यायची हौस असते, पिसाचा मनोरा माझ्या मागे, पुढे, उजवीकडे, डावीकडे इ. मला ती ही नाही. त्यामुळे मी प्रेक्षणीय स्थळांना जाताना क्यामेरा बरोबर घेऊन जायचे सोडून दिले आहे.

गीत गाता चल

माझ्या मेंदूमध्ये रस्त्यांना जागा नाही. अजूनही संभाजी पुलावरून भरतला जायचे म्हटले तर मेंदू काही वेळ हँग होतो. मग नवीन शहरात तर विचारूच नका. सदैव नकाशा हातात. आणि एखादा रस्ता लक्षात राहिला तरी मेंदू तो रस्ता रॅममध्ये टाकून देतो. काही वेळाने सगळे साफ. लगेच सिच्युएशननुसार गाणे वाजायला लागते. "कहां से तू आया और कहां तुझे जाना है... गीत गाता चल..."

पूर्वी मुंबईच्या तीन लोकल लाईन्स लक्षात ठेवताना पंचाईत व्हायची. पॅरिसला गेल्यावर तिथल्या १६ रंगांतल्या १६ मेट्रो लाइन्स पाहिल्यावर मेंदू म्हणाला, "तुझं तू बघ बाबा. माझं तर काही डोकंच चालत नाही." पहिला दिवस पूर्ण भंजाळलो, दुसर्‍या दिवशी थोडे-थोडे लक्षात यायला लागले. मग नोत्र दामवरून आयफेल टॉवरला जायला कुठला मार्ग सर्वात चांगला हे शोधणे म्हणजे कोडे सोडवण्यासारखे वाटायला लागले. लहानपणी सकाळ वगैरेंच्या पुरवणीत बंडू एका कोपर्‍यात, त्याचा कुत्रा एका कोपर्‍यात आणि मध्ये गुंतागुंतीचे जाळे. बंडूला त्याच्या कुत्र्यापर्यंत कसे पोचवाल? तसे काहीसे.

सर्वात मोठा दुर्गुण. प्रत्येक गोष्ट ओव्हर-अ‍ॅनालाइझ करणे. पाय दुखत असताना, पोटात कावळे ओरडत असताना मोनालिसाची कलाकृती कितपत एन्जॉय करता येते? आणि पाच मिनिटे तिच्याकडे पाहिल्यावर नाविन्य संपते, मग वाटते इतका अट्टाहास कशासाठी? मग क्युकगार्ड आठवतो. "जोपर्यंत कुठलीही गोष्ट तुम्ही तटस्थपणे बघत नाही, तोपर्यंत तिचा आस्वाद घेता येतो." प्रश्न वाढत जातात. खरेच टूरिझम इज ओव्हररेटेड असे वाटायला लागते.

पण मग रात्री पिवळ्या दिव्यांनी झगमगलेला आयफेल टॉवर दिसतो. दर पंधरा मिनिटांनी पांढर्‍या दिव्यांचा लखलखाट होतो. कुठल्याही क्यामेर्‍यात हे दृश्य बंदिस्त करणे शक्य नसते. आणि तसा प्रयत्न करणार्‍या लोकांची कीव यायला लागते. किंवा परत येताना टीजीव्हीमधून लांबच्या लांब पसरलेले हिरवेगार पट्टे, निळे आकाश, एक-दोन वाट चुकलेले ढग दिसतात. एप्रिलमधले सुरेख ऊन पडलेले. आणि मध्येच पिवळ्या फुलांची शेते लागतात. ती हिरवी-पिवळी-निळी रंगसंगती मेंदूत कोरली जाते. केवळ अवर्णनीय.

मग वाटते, याचसाठी केला होता अट्टाहास.

राज

http://rbk137.blogspot.com/2009/05/blog-post.html
1 comment