बेचव काळ्या भुंग्याची गोष्ट आणि “उंदरा, कुठंयस तू?!”

बेचव काळ्या भुंग्याची गोष्ट

बाहेर ऊन रणरणत होतं आणि काळं-हिरवं मांजर ध्यानस्थ बसलं होतं. बेबलॉश्की कोपऱ्यात कुठल्याशा काळ्या डब्याशी चाळा करत बसला होता. अशा शांत वातावरणात नेहमीच होतं त्याप्रमाणे एक वादळ “गुण-गुण” करत मांजराच्या नाकाभोवती घोंघावू लागलं. मांजराने चमकून डोळे उघडले, तर एक मोठ्ठा भुंगा त्याच्या समोर आला. मांजराने तत्परतेने भुंग्याला एक सणसणीत पंजा मारला, पण भुंगा बचावला आणि त्वेषाने गुणगुणू लागला. त्यात भर म्हणून बेबलॉश्की मोठ-मोठ्याने ही-ही करत हसायला लागला. हे पाहून मांजर इरेला पेटलं आणि त्यानं भुंग्याला पंजा मार, त्याच्यावर उडी मार असं काहीबाही करण्याचा सपाटाच लावला. मग थोडा वेळ खूपच गोंधळाचं वातावरण तयार झालं. भुंगा मांजराला न जुमानता ऐटीत उंडारत होता, त्यात बेबलॉश्कीने जोरजोरात काळा डब्बा उडवत त्या दोघांभोवती विचित्र आदिवासी नाच करायला सुरुवात केली. मांजर मग जास्तच चेकाळलं आणि त्यानं भुंग्यावर एक जोरदार हल्ला चढवला. भुंगा भेलकांडत खाली येऊन पडला आणि मांजराने त्वरित झडप घालून त्याला तोंडात कोंबलं. पण दुसऱ्याच क्षणी त्यानं भुंग्याला बाहेर ओकून टाकलं, कारण भुंगा भलताच बेचव आणि कडक हाडांचा होता! बेबलॉश्कीने लगेच भुंग्याकडे धाव घेतली आणि कसंबसं त्याला त्याच्या पायांवर उभं केलं. बेबलॉश्कीनी भुंग्याला उडण्यासाठी खूप विनवण्या केल्या, पण भुंगा जागचा हललाच नाही. मग बेबलॉश्की वेड्यासारखा हातातल्या काळ्या डब्ब्यावर खूप वेळ हात मारत राहिला, पण भुंगा तटस्थपणे आकाशाकडे डोळे लावून शून्यात बघत राहिला.
मांजराला उगाचाच कसंनुसं वाटलं आणि एक उसासा टाकून ते परत ध्यानस्थ झालं.

http://kachakavadya.wordpress.com/2009/01/11/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B/

------------------------------------------------------------------------------------------------

“उंदरा, कुठंयस तू?!”

दुपारच्या वेळी जेव्हा सर्व मांजरं आपापल्या घरात राहणं पसंत करतात, त्या वेळी काळ्या-हिरव्या मांजराला तसंच केल्यामुळे एकटेपणाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळेच की काय त्याला त्याच्या एका जुन्या सवंगड्याची आठवण झाली. आठवण झाल्यासरशी त्याला भेटणं अपरिहार्यच होतं, पण तो होता तरी कुठं? मांजराला शेवटचं त्याला सोफ्याखाली पाहिल्याचं आठवलं, पण आता तो तिथं नव्हता हे पाहून मांजराला आश्चर्यच वाटलं. “तो कधीच एकटा कुठं पळून जात नाही, कधीही त्रास देत नाही. तो दुसऱ्या उंदरांसारखा नाहीच. खरं तर दिसतो पण कसा गोरा गोरा आणि त्याच्या कापडी पोटानी नाकाला कसल्या गुदगुल्या होतात... हीही ... हीहीं...” मांजराला आठवूनच हसायला यायला लागलं.
मांजराचा दंगा ऐकून बेबलॉश्कीनी आठ्या पाडून त्याच्याकडे पाहिलं. मांजराला आता पहिल्यांदाच बेबलॉश्कीबद्दल शंका वाटू लागली, “बेबलॉश्कीनं तर कापडी उंदराला खेळायला नेलं नसेल???!!” लगेच मांजर बेबलॉश्कीच्या खोलीत गेलं आणि तिथलं दृश्य बघून क्षणभर भयचकित होऊन उभं राहिलं. एका उंच दोरीवर कापडी उंदराला चिकटवलं होतं आणि त्याच्या शेपटीतून पाणी ठिपकत होतं! अर्थ उघड होता, मांजराचा संशय बरोबर होता. बेबलॉश्कीनीच उंदराला इतक्या उंच चिकटवलं होतं! आता कुठच्याही परिस्थितीत उंदराला सोडवायलाच हवं होतं. मांजरानं जिवाच्या आकांतानी उड्या मारायला सुरुवात केली.
शेवटी मांजराच्या प्रयत्नांना जेव्हा यश आलं आणि उंदीर त्याच्या हाती आला तेव्हा तो आश्चर्यकारकरीत्या जास्त गोरा आणि मऊ झाल्याचं त्याला जाणवलं!

निवेदिता बर्वे

http://kachakavadya.wordpress.com/2009/04/20/%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A5%82/
Post a Comment