Uncategorized

बरेच काही उगवून आलेले… भाग १ व २

बरेच काही उगवून आलेले…[भाग १]

झाडांबद्दल मराठीत शेकडो लेख, कविता आल्या असाव्यात. बोरकरांच्या किंवा अलीकडे द. भा. धामणस्करांच्या कविता वाचताना, घासून गुळगुळीत झालेल्या ह्या रूपकालाही नवीन रूपडं कसं बहाल करता येतं, हे जाणवतं. सगळं आयुष्य शहरात गेल्यामुळे असेल, पण ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे’ वगैरे आतून मला कधीच वाटलं नव्हतं. पण गेल्या काही महिन्यांत झाडांची वेगवेगळी रूपं पाहिली. इतकी भिन्न, इतकी वेधक की अगदी अट्टल शहरी माणसालाही त्यांच्यात रस निर्माण व्हावा. त्यांच्याबद्दल लिहून, त्यांना न्याय द्यायचा तर तेवढीच अलौकिक प्रतिभा हवी. तिचा अभाव असला, तरी पूर्वसुरींनी जे काम करून ठेवलंय ते अधूनमधून आठवत होतं. ही कदाचित -’लाईफ इमिटेटिंग आर्ट, आर्ट इमिटेटिंग लाईफ’सारखी आस्वादाची दुहेरी प्रक्रिया असावी. म्हणजे क्वचित कधी सरत्या संध्याकाळी जसं ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’ आठवतं किंवा पावसात ‘ओ सजना’/’रिमझिम गिरे सावन’ डोक्यात प्ले होऊ लागतं; त्याच्या उलट ’सारे प्रवासी घडीचे’ किंवा शंकर पाटलांच्या कथा वाचताना आपला गाव आठवतो किंवा लंपन वाचताना आपणही लहानपणी असाच बर्‍याचदा मॅडसारखा विचार करायचो असं वाटत राहतं. रोजच्या जगण्यात अचानक एखाद्या कलाकृतीची आठवण व्हावी आणि कधी काही वाचताना, ऐकताना ‘स्मरणाचा उत्सव जागून’ विसरलेलं काही पुन्हा आठवावं – ही जोडी तशी रंजक आहे.

अर्थातच, हे नेहमी होणे नाही. तसं झालं तर त्यातली उत्स्फूर्तता, मजा निघून जाईल. त्यामुळे झाडं पाहून आठवलेल्या त्या एक-दोन कविताच फक्त लिहिण्यापेक्षा एकंदरीतच सापडलेले झाडांचे उल्लेख एका लेखात लिहावेत असं जेव्हा प्रथम डोक्यात आलं; तेव्हा हे कृत्रिम तर होणार नाही ना, ही शंकाही जोडीनेच आली. पण त्या एखाद-दोन क्षणांचा कल्पनाविस्तार केला तर इतरांनाही कदाचित त्यात काही ओळखीचं सापडेल, असंही वाटलं. त्यामुळेच हे – ‘बरेच काही उगवून आलेले…’

दहिसरचं मुंबईकरण होण्यापूर्वी अनेक वेगवेगळी झाडं पहायला मिळायची. शाळेला जायच्या रस्त्यावर पांगारा आणि अमलताश होते. ग्रीष्मात अनुक्रमे लाल आणि पिवळ्या रंगांत फुलून यायचे. ठिकठिकाणचे गुलमोहर, देवळाकडचं पार असलेलं पिंपळाचं झाड, गुंजाची – बदामाची झाडं, सुबाभूळ, अशोक आणि कितीतरी नाव माहीत नसलेली फुलझाडं – दहिसरचं दहा वस्त्यांचं गाव हे वर्णन सार्थ ठरवत.

शाळेच्या इमारतीतून मैदानापलीकडचं खाचर दिसायचं. गडद पावसाळी दिवसांत अंधारून येऊन पाऊस पडायला लागला की तिथली झाडं अक्षरशः झोडपून निघायची. क्वचित बाईही मग शिकवणं थांबवायच्या. अंधारल्या वर्गात बसून ढगांच्या गडगडाटात, डोळेभरुन ती गदगदणारी झाडं मग सगळे पाहत राहत. पण शाळा म्हटली की, प्राथमिक शाळेच्या जवळचं एक झाड आठवतं. त्याच्या अंगाखांद्यावर ‘रम्य बाल्य ते जिथे खेळले’पासून त्या तरूतळी ‘तसव्वुर-ए-जानाँ किये हुए’ करत बसून राहण्यापर्यंतची सर्वांची प्रगती, तशी त्याच्याच जोडीने झाली. मित्राने एक अतिशय जुना फोटो पाठवल्यावर या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. यंदाच्या फेरीत हे झाड दिसलं नाही, पण त्याच्या नसण्याने काही विशेष वाटलंही नाही. जुनी इमारतच मोडकळीला आल्याने वर्गही नवीन जागेत भरू लागले होते. तेव्हापासून त्याचं प्रयोजनच संपलं असावं.

ग्रँटरोडच्या चिखलवाडीच्या चाळीत मात्र झाडांचं इतकं कौतुक करायला कुणाला सवड नसे. नाही म्हणायला नानाचौकाकडून चौपाटीकडे जाताना मणीभवनच्या गल्लीत हिरवीगच्च झाडं दिसत. त्या रस्त्याचे नावही रसिकतेनं लॅबर्नम रोड, म्हणजे बहावा/अमलताश मार्ग ठेवलेलं. मागे जसं फोर्टमधल्या टॅमरिंड लेनचं ‘मुदण्णा शेट्टी मार्ग'(!) म्हणून नामकरण झालं; तसंच लॅबर्नम हे कुण्या इंग्रजाचं नाव असल्याने (बापूंच्या वास्तव्याने पुनीत इ. झालेल्या) मणीभवनकडच्या त्या रस्त्याचं नावही बदलण्याचा घाट मुंबई महापालिकेने घातला होता. सुदैवाने तो बेत तेव्हा तडीस गेला नाही.

झाडांबद्दल लिहीत असताना कोकणातल्या झाडांचा उल्लेख होणार नाही, हे अशक्यच. लेकुरवाळा फणस. काजूची बुटकबैंगण झाडं, करवंदीच्या जाळ्या, रातांबे नि जामाची झाडं. हापूस-पायरी-रायवळ-माणकुराद आंब्यांची कैक झाडं. आंबा पिकून जाळीत पडल्याचा आवाज आल्यावर, भावंडांबरोबर शर्यत लावायची आणि ज्याला प्रथम सापडेल त्याने तो खायचा. ‘आठवणींच्या चिंचा गाभुळ’ ऐकलं की चिंचांऐवजी, त्या आंब्यांचीच चव आठवते. फुलझाडांची तर गणतीच नाही. पण तळकोकणात काय किंवा गोव्यात काय; ज्याला व्यवच्छेदक म्हणावं असं झाड म्हणजे नारळाचं. हिरवं मोकळं खाचर आणि त्याच्या कडेला असलेली माडाची झाडं काय सुरेख दिसतात. पाच-सहा झाडांतलं एक उगाच तिरपं, जमिनीशी अधिक सलगी साधत वाढलेलं असतं. एखाद्या फॅमिली फोटोसाठी प्रौढ मंडळी गंभीरपणे उभी आहेत, आणि मध्येच एखादा गोटू गंमतीने जरा वाकड्याच पोझमध्ये उभा राहला आहे, असं ते पाहून वाटत राहतं. मंगेशी-शांतादुर्गेच्या देवळाबाहेरच्या तळ्यांवर हिरवी सावली धरणारे माड मात्र तसे गंभीर. अर्थात, हे झाड खरं पहावं ते किनार्‍याजवळ. माडांशिवाय कुठल्याही किनार्‍याला शोभा नाही, हे पुलंचं मत इकडचे भुंडे किनारे पाहिले की पटतं. रेड्डीच्या महागणपतीकडे जाणारा रस्ता सुंदर आहेच, पण तितकाच देवळापाठचा किनाराही. लाल माती, हिरवी झाडी आणि समोरची निळाई.

इथल्या प्रवासांत वेगवेगळी झाडं पहायला मिळाली. आधी अनोळखी, अपरिचित वाटणारी. हळूहळू सवयीने मग थोडीफार ओळखीची झालेली. शिकागोला दोन वर्षांपूर्वी भर थँक्सगिव्हिंगच्या (नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा) काळात गेलो होतो. तपमान शून्याच्या बरंच खाली. नुकताच बर्फ पडून गेलेला. भणाणत्या वार्‍यामुळे आणि अपुरे गरम कपडे आणल्याने गोठलेला मी. अशा वेळी चालताना एक वळण घेतलं, आणि अनपेक्षितपणे दिव्यांनी मढवलेली निष्पर्ण तरूंची राई समोर आली.

पुढे कधीतरी जेव्हा पु. शि. रेग्यांची ‘गंधरेखा’ वाचली, तेव्हा – एक आहे झाड माझे, रांठ ज्याच्या जीर्ण शाखा; साठीषण्मासी परंतु लाख ज्या येती शलाका – या ओळीवर अडखळून हीच झाडं पुन्हा डोळ्यासमोर उभी राहिली.

एक आहे झाड माझें रांठ ज्याच्या जीर्ण शाखा;
साठिषण्मासीं परंतु लाख येती ज्या शलाका

झाड माझें लाल ज्याला आग्रहाची लाख पानें;
आणि माझी बंडखोरी घोषतों मी गात गाणें.

झाड माझें लाखमोली लाल ज्याला फक्त पानें,
नेणतां ये एक ज्याला शुभ्र कांही जीवघेणें.

एक, ज्याला जाणिवेच्या लांच्छनाच्या गंधरेखा;
पाहतों मी ज्यात माझें झाड, माझ्या आणभाका

ग्रेसच्या बर्‍याच कवितांसारखाच या कवितेचा अर्थ बिनचूकपणे सांगणे अशक्य आहे. पण हट्टाने बंड करुन, जगाशी सारे संबंध तोडून आपल्या कोशात राहिलेल्या – वेळोवेळी ती आग्रही लाल पानांची तुसडेपणाकडे झुकणारी बंडखोरी मिरवणार्‍या; एखाद्या वठलेल्या खोडासारख्या माणसाला काही कारणाने, अवचितपणे ‘आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले’ सारखी पालवी फुटावी (नेणतां ये एक ज्याला शुभ्र काही जीवघेणें) आणि ती हवीहवीशी वाटली तरी इतक्या वर्षांच्या सवयीने त्या गंधरेखेबद्दल थोडी शरम वाटावी, असं काहीसं. थोडक्यात ‘ऍज गुड ऍज इट गेट्स’मधली जॅक निकल्सनची तुसड्या, विक्षिप्त लेखकाची ऑस्करविजेती भूमिका. झाडांवर झालेल्या मानव्याच्या आरोपाबद्दल (चेतनगुणोक्ती अलंकार) पुढे लिहीनच, पण ‘पाहतों मी ज्यात माझें’, असं हे रेग्यांचं झाड त्याचं उत्तम उदाहरण ठरावं.

शिकागोतल्या या झाडांसारखी इतर अनेक झाडं भटकंतीत सापडत गेली. स्मोकी माऊंटन नॅशनल पार्कमधलं वार्‍या-पावसात करकरणारं ‘कराल’ झाड. सॅन फ्रान्सिस्कोजवळचं प्रसिद्ध ‘द लोन सायप्रस’ आणि त्याच्या शेजारी दुर्लक्षलेलं ‘देहा फुटले वारा फांटे, अंगावरचे पिकले कांटे, आभाळांत खुपसून बोटें’ उभं असणारं ‘घोस्ट ट्री’. ब्राईस कॅन्यनमध्ये ‘खडकावरील अंकुरा’सारखं उगवून आलेलं एकुलतं एक झाड. रेडवूडमधली गाढ हिरवी शांतता, सिकोयामधले प्रचंड घेराचे प्राचीन वृक्ष. ‘शिशिरऋतुच्या पुनरागमे, एकेक पान गळावयां’ होण्यापूर्वी बॉस्टनजवळ झाडांवर पाहिलेला रंगांचा उत्सव. स्वप्नात केलेला प्रवास वाटावा, अशा कोलोरॅडोतल्या एका रेल्वेप्रवासात दोन्हीकडे पिवळ्या-लाल रंगांच्या पानांच्या झाडांनी भरून गेलेले डोंगर. पेट्रिफाईड नॅशनल फोरेस्टमधली ‘माझ्या मना बन दगड’ म्हणून चक्क दगड बनलेली झाडं. प्रत्येकाची तर्‍हा वेगळी.

पण या सर्वांत विलक्षण असेल तर ते आर्चेस नॅशनल पार्कमध्ये पाहिलेलं एक झाड. यूटाहमधल्या या अप्रतिम राष्ट्रीय उद्यानात ‘फिएरी फर्नेस’ म्हणून एक रेंजर-गायडेड, अर्थात उद्यान अधिकार्‍याच्या नेतृत्वाखालीच होणारा ट्रेक आहे. त्या ट्रेकदरम्यान रेंजरने एक झाड दाखवलं होतं. काही वर्षांपूर्वी त्याच्या खोडाच्या मध्यावर वीज पडून त्याच्या जळून जवळपास चिरफळ्या उडाल्या होत्या. पण जगण्याची इच्छा इतकी चिवट असते, की मृतप्राय झालेल्या त्या खोडालाही पुन्हा पालवी फुटली.

एकाच या जन्मी, फिरुनि नवे जन्मलेल्या; पोटात वीज थिजवून उभ्या असलेल्या, जागेपण गिळून उभे असेपर्यंत वाढणार्‍या ह्या गूढ, जायबंदी झाडाला बोरकरांची ही कविताच न्याय देऊ शकते.

झाड गूढ झाड गूढ, ओल्या प्रकाशाची चूड
गार गार पारा गाळी, स्वप्नरंगांचे गारुड

झाड पाताळ फोडिते, झाड आकाश वेढिते
ताळमूळ संसाराचे गाठीगाठीत जोडिते

झाड वाकडे-तिकडे, छेडी फांद्यांची लाकडे
वीज थिजवून पोटी, वारी मेघांचे साकडे

झाड स्वच्छंदी आनंदी, सुखे होय जायबंदी
घावाघावातून गाळी, फुले ज्वा़ळांची जास्वंदी

झाड माझे वेडेपिसे, उन्हीं जळताना हसे
रुसे धो धो पावसात, चांदण्यात मुसमुसे

वेडे झोपेत चालते, अर्ध्या स्वप्नांत बोलते
गिळोनिया जागेपण, उभे आहे तो वाढते

http://marathisahitya.blogspot.com/2008/09/blog-post.html
—————————————————————–

बरेच काही उगवून आलेले…[अंतिम भाग]

[प्रस्तावना – हा (थोडा रुक्ष) भाग, झाडांचा चेतनागुणोक्ती अलंकारात झालेल्या साहित्यातील उपयोगाविषयी आहे, आणि उदाहरणार्थ द.भा. धामणस्कर, रेगे, बोरकर यांच्या काही कविता उद्धृत केल्या आहेत.]

माणसाचं किंवा मानवी जीवनाचं रुपक म्हणून झाडांचा साहित्यात उपयोग कायमच होत आला आहे. पण याचं ‘मूळ’ काय? उत्क्रांतीच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर झाडालाही आपल्यासारखा जीव आहे, कदाचित भावनाही आहेत हे आपल्याला समजलं असावं? आदिमानवाला जेव्हा आपल्यासारख्याच वाढणार्‍या, खुरटणार्‍या, बहरणार्‍या आणि उन्मळून पडणार्‍या झाडाबद्दल प्रथम आत्मीयता वाटली, ही झाडं तर आपल्यासारखीच असं वाटून जिवाचे मैत्र जडले; तो क्षण ‘मा निषाद’च्याच तोडीचा असावा. आणि कदाचित सुसंस्कृत होण्याचा पहिला टप्पाही.

ज्या गोष्टीबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटतो, तिला आपल्या गोटात ओढण्याचा आपण जाणता-अजाणता प्रयत्न करत असतोच, त्यातलाच झाडांचे रूपक, हा एक भाग असावा असं मला वाटतं. (ममता हा शब्दच मुळात मम-ता म्हणजे माझेपणा यातून आला असावा. आत्मीयता, आपलेपणा यांचे शब्दशः अर्थही तसेच.) एखाद्या जिवलग मित्राला भावासारखा म्हणून अधिक आतल्या वर्तुळात आपण ओढत असतो, त्यातला प्रकार. तेव्हा झाडांवर होणारं हे मानवी भावभावनांचं ‘रोपण’ वृक्षवल्ली आम्हां सोयरी याच भावनेतून उगवलं असावं.

‘जो खांडावया घाव घाली, की लावणी जयाने केली, दोघां एकची साऊली, वृक्षु जैसा’ म्हणत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगणारे आणि काव्य म्हणजे काय, विचारल्यावर जिच्याकडे बोट दाखवावं अश्या ‘कोंभाची लवलव, सांगे मातीचे मार्दव’सारख्या ओळी लिहून गेलेले ज्ञानेश्वर; वृक्षवल्लींना सोयरी म्हणणारे तुकाराम आणि कांदा, मुळा, भाजीत विठाई पाहणारा सावतामाळी; पाण्यात पाय सोडून बसलेला बालकवींचा औंदुबर; नितळ न्याहारीला काळा वायू घेणारी मर्ढेकरांची झाडं; गीतरामायण लिहिताना झालेल्या उन्मनी अवस्थेचे वर्णन ‘चंद्रभारल्या जिवाला नाही कशाचीच चाड; मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड’ अशा शब्दांत करणारे गदिमा; ‘प्रत्येक झाडामाडा त्याची त्याची रुपकळा, प्रत्येक पानाफुला त्याचा त्याचा तोंडवळा’ म्हणत प्रत्येक माणसातलं वेगळेपण शोधणारे, पावसाळ्यात ‘वेली ऋतुमती झाल्या गं’ असं लिहून जाणारे बोरकर; तमाच्या तळाशी दिवे लागल्याचा अपूर्व अनुभव ‘रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले; तिथे मोकळा मी मला हुंगिताना, उरी गंध कल्लोळुनि फाकले’ अशा शब्दांत मांडणारे शंकर रामाणी; निष्पर्ण तरूंच्या राईत ‘झाडांत पुन्हा उगवाया’ची आस लागलेले ग्रेस; ‘आणिक तुझिया लाख स्मृतींचे, खेळवीत पदरात काजवे; उभे राहुनी असे अधांतरी, तुजला ध्यावे, तुजला ध्यावे’ अशी रक्तामध्ये ओढ मातीची लागलेल्या इंदिराबाई संत; युगानुयुगीच्या चिर-तंद्रीत कृष्णाची प्रतीक्षा करणार्‍या राधेला ‘जलवाहिनी निश्चल कृष्ण, वन झुकले काठी राधा, विप्रश्न’ म्हणणारे पु. शि. रेगे; ‘ग्रासली झाडे दिशांनी नग्नदेही, कोरड्या डोळ्यांत आता थेंब नाही’ असं लिहून जाणारे महानोर; ‘रांडेपेक्षा आहे रांड, मुलापेक्षां आहे मूल’ असे रोखठोक वर्णन करणार्‍या विंदांचे ‘उगाचफूल’; काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग लिहिणारे दासू वैद्य; ‘नेमस्त झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तिथे’ म्हणणारा संदीप खरे; गद्यातले उदाहरण द्यायचे झाले तर अंतू बर्व्याच्या दारातला गेली चाळीस वर्षं न मोहरलेला हापूस, ‘कोसला’मध्ये वेताळाच्या टेकडीवरचं झाड पाहून – ‘खरं झाड म्हणजे जमिनीत असतं. वरचं झाड म्हणजे आतडी, फुफ्फुसं असं. माणसाचं जमिनीत काय आहे?’ असे आणि तत्सम प्रश्न पडणारा पांडुरंग सांगवीकर किवा बर्ट्रांड रसेलला ‘गर्भश्रीमंतीचे झाड’ म्हणणार्‍या पद्मजा फाटक; चौकट राजातलं बोन्सायच्या झाडाचं उघड रूपक आणि जवळचा भाग असूनही गूढ, अज्ञात राहिलेल्या देवराईचं तरल प्रतीक; शाकुंतलातील ‘आद्ये वः कुसुमप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः’ अशा शकुंतलेच्या वर्णनापासून ते रुदालीत गुलजारच्या ‘तेरा छूंआ लागे, मेरी सूखी डाल हरियाए’पर्यंत अक्षरशः एक प्रबंध लिहिता येईल इतकी उदाहरणं सापडतील.

जन्माला, नवनिर्मितीला पालवीची उपमा अगदी प्राचीन आहे. आणि ह्या वाढणार्‍या अंकुराला पाहून, ‘सोसंल का त्याला, ऊन वारा पानी’ म्हणत धास्तावणारे जन्मदात्यांचे वात्सल्यही तितकेच सनातन. द. भा. धामणस्कर त्यांच्या ‘बरेच काही उगवून आलेले’मधल्या ‘केळीचे पान’ या कवितेत म्हणतात तसे –

…तर हिरव्या पाना
अस्तित्वाच्या लांबलचक देठाभोवती मातीनं
सुरक्षित गुंडाळून ठेवलेलं तुझं
शैशव उलगडत जाताना मी
किती हळुवार, किती हळवा झालो होतो हे
तुला नीट सांगताही येणार नाही आता मला…
सुरुवातीच्या पहाटत्या हिरव्यात
अधिकाधिक हिरवेपण कसे भरत गेले याचा
क्षणाक्षणांचा हिशेब माझ्या डोळ्यांत…
आता ऐन नव्हाळीत एक सौंदर्यसंपन्न हिरवा
तुझ्यात काठोकाठ भरून आणि मी
बराचसा कृतार्थ तुझा
आत्यंतिक उत्कटतेचा दिवसही
पाहतो आहे म्हणून्; तसा खूपसा भयभीतही –
तथाकथित जगरहाटीनुसार तुझ्या विनाशाला आता
कधीही सुरुवात होईल म्हणून…

मला दिसते आहे, प्राणपणाने
जपावे असे काही तुझ्यात – तू
एक देखण्या पूर्णत्वाचं प्रतीक तुझ्या अखंडतेत;
या प्रदेशातून वाहणारे चंचल वारे मात्र
माझ्याशी सहमत नाहीत. भय वाटते ते
त्यांचेच…

स्त्री ही क्षणाची पत्नी, पण अनंतकाळची माता असते असं म्हणतात. तसंच पत्नीत ‘गृहिणी सखी सचिवः’च्या जोडीला आईपण शोधणार्‍या पुरुषालाही पितृसुलभ वात्सल्याची भावनाही जाणवत असतेच. अशाच समजूतदार, प्रेमळ सख्याच्या रुपातली पु. शि. रेग्यांची ‘शेवगा’ ही छोटेखानी कविता.

दोन प्रहर. निवांत सारें.
श्रमभराने बाजेवरतीं
पांगुळलेली तू.
खिडकीबाहेर ढाळितो चवरी
आसुरलेला शेवगा दारचा.

‘सा विद्या या विमुक्तये’सारखाच प्रगल्भ प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे हा आपल्या वात्सल्याचे बंधन न होऊ देण्याचा. अडनिड्या वयात उगाच रागावून अबोल होऊन बसणारी टीन-एजमधली मुलं काय किंवा वेगळ्या वाटा शोधायला घर सोडून निघालेलं तारुण्य काय; सोशिक अनाग्रही आईबाप धामणस्करांच्या ‘परिपक्व’ झाडांसारखेच –

रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही…

मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत…

कशासाठी जगावं, हा प्रश्न कळतं झाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर पडत असावा. पण वृद्धत्वात आणि ‘मिड-लाईफ’मध्ये कदाचित जरा जास्तच वेळा. बोरकरांची ही कविता, अनंत काणेकरांच्या त्या प्रसिद्ध लघुनिबंधातलं तत्त्वज्ञानच सांगते (‘दोन मेणबत्त्या’मधील दुसर्‍यासाठी जगलास तर जगलास, स्वत:साठी जगलास तर मेलास); पण जरा बदलून. ‘स्वतःला विसरून दुसर्‍यांसाठी जगा’ पेक्षा ‘स्वतःबरोबरच दुसर्‍यांनाही आनंद देत जगा’ असे. गीतेतल्या वर मुळे, खाली फांद्या असलेल्या अश्वत्थ वृक्षाचे रूपक रंजक आहेच, पण आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता जितके जमतील तितके वेगवेगळे अनुभव घ्या, असं शेवटच्या ओळीत सांगणारे बोरकर या एका ओळीतूनच ‘बाणा कवीचा’ दाखवून जातात. आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात त्यातले इतर अन्वयार्थही स्पष्ट होत जातातच.

कुणासाठी तरी या रे, या रे मोडून फळांनी
कुणासाठी तरी झुका, झुका जडून फुलांनी

कुणासाठी तरी, या रे गाढ भरून सुखांनी
कुणासाठी तरी, गा रे मुक्त सहस्र मुखांनी

पसरून पाळेमुळे, धरा धरित्रीचा तळ
पानोपानी खेळवा रे, तिच्या कुसव्याचे जळ

भुजाबाहूंनी कवळा, स्वैर धावणारे वारे
लक्ष हिरव्या डोळ्यांत, रात्री बिंबवा रे तारे

व्हा रे असे अलौकिक, लोकी येथल्या अश्वत्थ
कंप भोगा शाखापर्णी, मुळी राहून तटस्थ

उत्पत्ती, स्थितीबरोबरच लयाचा निर्देश करण्यासाठीही झाडांचं रूपक वापरलं जातं. छान पिकत जाणार्‍या वृद्धत्वाची तुलना अनाग्रही, समजूतदार झाडांशी होणे साहजिकच. वाढत्या वयात, कळत जाते तसे राग-रोष सरून एक अलिप्त एकटेपणा येतो. पाडगावकर म्हणतात तसा ‘सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालण्याचा’ समजूतदारपणा. ‘जो तो आपापला येथे कुणी ना आधार’ चा शहाणा स्वीकार. अशा वेळी, बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर –

कळत जाते तसे, कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून, कसे तळ्यामधेच पेंगू लागतात

अशी अवस्था होते. बोलण्यात वारंवार पिकल्या पानांचे, वठलेल्या खोडाचे संदर्भ येतात. असं असलं तरी, मागे वळून पाहताना मनाच्या एका समाधानी अवस्थेत, आपलं आयुष्य अगदीच काही वाया गेलं नाही अशी कृतकृत्यतेची जाणीवही कधी दिलासा देऊन जाते. ‘जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले, तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले’ सारखी. द. भा. धामणस्करांची ही शेवटची कविता अशीच नम्र कृतार्थतेची भावना अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त करते –

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले…

नंदन होडावडेकर

http://marathisahitya.blogspot.com/2008/09/blog-post_26.html

Facebook Comments

3 thoughts on “बरेच काही उगवून आलेले… भाग १ व २”

  1. लेख वाचलेला होताच. प्रतिक्रियाही दिलेल्या होत्या. पण परत वाचला. नंदनराव , तुम्ही फार फार श्रीमंत आहात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *