Uncategorized

आरसा आपुलिये/आंगी आपण पाहे/तरी जाणणें जाणों लाहे/आपणयातें

मूलभूत, उदाहरणार्थ हिंसा, सत्ता, निष्ठा किंवा व्यभिचार वगैरे वगैरे…

कॉलनीच्या ओसाड पटांगणात महाळुंग्यानं उगाच रिकाम्या फुटबॉलला लाथ घातली. पंधरा-वीस मिनिटांत निदान तीन वेळा तो वॉचमनला वेळ विचारून आला होता. रविवारी दुपारी काही केल्या दोनच्या पुढे घडाळ्याचा काटा काही सरकत नव्हता. या वेळी कुणाच्या घरी जाऊन खेळायचं म्हणजे फुकटात शिव्या खायच्या इतपत व्यवहार त्याला माहीत होता. रिकाम्या गोकर्ण्याचं तसं नव्हतं. तो येताना सगळ्या मित्रांची दार वाजवत आलेला. दार वाजवल्यावर ’कोण’ या प्रश्नाचं उत्तर देण्याइतपतपण रिकाम्या तिथे थांबला नव्हता. रिकाम्याला पाहून महाळुंग्याला उगीच बरं वाटलं. रिकाम्याचं भरून वाहाणारं नाक आणि विटके कपडे यांच्या पलीकडेही महाळुंग्याला रिकाम्या आवडायचा. म्हणजे साहित्यिक भाषेत कसं इमानी वगैरे होता तो. महाळुंग्यानं प्रेमाच्या भरात आरोळी ठोकली “हैश्य्य्य्य्य्य्य्य.” फुटबॉलला मनसोक्त तुडवून झाल्यावर रिकाम्यानं खिशातून मोर मारून भरल्यासारखी निळीगर्द गोटी काढली आणि डोळ्याला लावून गंमत बघायला लागला. “च्यायला,” मैदाच्या पोत्यासारखा भुस्स्स रिकाम्या गोटीतून गरागरा इकडेतिकडे बघत म्हणाला, “लै भारी दिस्तं बे यातून.” ज्या अर्थी रिकाम्याला नाकातली लोळी सिंपली ग्रॅव्हिटी गुणगुणत खाली आलेली कळालंपण नाही, त्या अर्थी खरंच त्या गोटीतून लैच भारी दिसत असणार हे महाळुंग्यानं ताडलं आणि रिकाम्याच्या हातातून ती गोटी जवळजवळ हिसकावूनच घेतली. निळ्या गोटीतून खूपच वेळ निळंच दिसतं यापलीकडे महाळुंग्याला त्यात काय लै भारी आहे हे कळत नव्हतं. “कायपण! नुस्तंच निळं.” महाळुंग्यानं त्याचं कोपर रागारागात रिकाम्याच्या मांडीवर दाबलं. तितक्यात एक निळा मुलगा सायकल हाकत ग्राउंडवर येताना महाळुंग्याला दिसला. महाळुंग्यानं दचकून डोळ्यावरची गोटी बाजूला केली. “मी, पिंगाक्ष. इथे नवीन आलोय राहायला.” स्वच्छ आवाजात तो स्वच्छ मुलगा बोलला. का ते कळालं नाही, पण महाळुंग्या उगीच मनात खट्टू झाला. रंगीत खडूच्या बदल्यात वासाचा खोडरबराचा तुकडा अदला-बदल करून मिळतो, तसं काही तरी करून पिंगाक्षाचं नाव, त्याचा स्वच्छ रंग, त्याच्या आजूबाजूला दरवळणारा पावडरचा ब्येष्टं वास, सारं कशाच्यातरी बदल्यात आपल्याला बदलून मिळावं असं महाळुंग्याला उगाच वाटलं.

बघण्या-दाखवण्याचे अनेक कार्यक्रम पार पडून पिंगाक्ष अखेर रिकाम्याच्या शाळेत पडला अन पवित्र झाला. शाळा सुटेपर्यंत शिळा होत जाणार्‍या रिकाम्याबरोबर बसण्यात खरं तर पिंगाक्षाला कसलाच रस नव्हता, पण वर्षाच्या अध्येमध्येच वर्गात आल्यानं दुसरी कोणतीच जागा रिकामी नव्हती. आठवड्याच्या आतच पिंगाक्षाचा रिकाम्याविषयी शिसारी ते करुणा, कणव इ. इ. असा एक समृद्ध बुद्धप्रवास झाला.

पिंगाक्ष रिकाम्याचं काय सुरू आहे हे बघतच राहिला. समोर बसणार्‍या मुलाच्या बगळा शुभ्र शर्टवर रिकाम्यानं पेनचं टोक अल्लाद टेकवलं होतं. टिपूसभर निळा थेंब बघता बघता मोठाच मोठा होत जात होता. त्या निळसर बनत जाणार्‍या ढगाकडे बघण्यात रिकाम्या इतका तल्लीन झाला होता की, बाहेर आलेलं त्याचं जिभेचं टोक नाकाला लागेल की काय असं पिंगाक्षाला वाटलं. त्या दोघांची ही तंद्री मोडणारा एक मोठा आवाज झाला आणि रिकाम्याला वाटलं, त्याच्या निळ्या ढगातून वीजचं पडली. पिंगाक्ष घाबरून उभा राहिला, तेव्हा कुठे रिकाम्याला पाठीत बसलेल्या गुद्याची जाणीव झाली. पुढे किती तरी वेळ, का कोण जाणे, पिंगाक्ष गोकर्णाच्या वागणुकीची हमी देत राहिला.

पिंगाक्षाच्या या अनपेक्षित मदतीची परतफेड रिकाम्यानं त्याला घरी जाताना सायकलवरून डब्बलसीट नेऊन केली. रिकाम्याच्या आयुष्यात त्या सायकलचं जे काही महत्व होतं, त्या हिशोबानं त्यानं पिंगाक्षाचा सर्वोच्च सन्मान केला होता.

पिंगाक्ष आणि रिकाम्या हे नवं घट्ट समीकरण पाहून महाळुंग्याला काहीतरी तुटल्यासारखं वाटलं आणि त्यापेक्षाही जास्त त्याला ते अपमानकारक वाटलं.

कुठल्याही सर्वसाधारण दर्जाच्या संध्याकाळसारख्या वेळी महाळुंग्याला मैदानावर अचानकच एकटा रिकाम्या दिसला. “जॉली आणि स्टॅच्यू.” डोळ्यात जाईल इतपत अंतरावरून बोट नाचवत महाळुंग्या जुनाच खेळ नव्यानं खेळला. रिकाम्या नेहमीप्रमाणेच कॅज्युअल. त्यानं हातावर निरखून पाहिलं आणि स्वच्छतेच्या भलभलत्या भाषणापायी पिंगाक्षाला मनातल्या मनात शिव्या हासडल्या. त्याच्या हातावर जॉलीपुरताही शाईचा ठिपका नव्हता. त्यानं निराशेनं मान हलवली. कदाचित ती निळीशार गोटी महाळुंग्याला द्यावी लागणार होती. “जॉली आणि स्टॅच्यू एकदम. जॉली नसेल तर समोरच्या पाण्याच्या टाकीवर डोळे मिटून चढायचं आणि स्टॅच्यू असताना हलायचं नाही,” महाळुंग्यानं अप्रतिम गेम टाकला होता; एकाच वेळी हलायचं आणि हलायचं नाहीपण, असं काहीतरी. उंचच उंच टाकीवर डगमगत्या शिडीवरून चढायचं म्हणजे हातपाय मोडून घ्यायची खात्री. त्यापेक्षा स्टॅच्यू होऊन उभं राहावं असा सर्वमान्य विचार करून रिकाम्या जॉली नसल्याबद्दल काय शिक्षा मिळणार याचा विचार करत उभा राहिला. स्टॅच्यू ओव्हर झाल्यावर महाळुंग्यानं दहा बचाबच बुक्के जीव खाऊन रिकाम्याच्या पाठीत घातले. रिकाम्याला वाटलं, आपलं आतडंच उलटून पडेल. रिकाम्या कितीतरी वेळ आतल्या आत मोडत राहिला. दिवसाचा थोडा अंश घेऊन संध्याकाळ विझत गेली आणि भुकेल्या लांडग्याप्रमाणे रात्र स्वप्नांवर तुटून पडली. रात्रभर रिकाम्याला गर्गर फिरत पाठीत बसणारा महाळुंग्याचा हात आणि त्याच्या डोळ्यात पेटलेला सूर्य दिसत राहिला.

रिकाम्या महाळुंग्याच्या घरात भाड्याने राहातो ही बातमी पिंगाक्षाला फारशी मजेदार वाटली नसली, तरी महाळुंग्याच्या पाठीमागे त्याचा जो उल्लेख होतो तो मात्र पिंगाक्षाला खचितच मजेदार वाटला. त्याचा अर्थ काय आहे हे माहीत नसलं, तरी एक न केलेली गोष्ट करायला मिळते याच्या आनंदात पिंगाक्षाने त्याला ऐन मैदानात एकदा खच्चून “ए भाडखाऊ” अशी हाक मारली आणि आख्खं मैदान कचाकचा हसलं. मैदानावर पुढचे कितीतरी दिवसं हात लांब करून गोलगोल फिरत छोट्या पोरी नवंच गाणं म्हणायच्या, “साडे बाई माडे / कोणं खातो भाडे // भाड्याची बायको पळाली / गंगेमध्ये बुडाली!”

महाळुंग्याचं दोस्तांत मिसळणं हळूहळू कमी झालं. संध्याकाळभर तो डुगडुगत्या शिडीवरून टाकीवर जाऊन बसायचा. रिकाम्या पाहत असायचा. महाळुंग्याला असा संपू द्यायचा नव्हता त्याला. वेळ संपल्यासारखा सूर्य एक दिवस घाईघाईत बुडाला, तसं रिकाम्यानं हलकेच टाकीखालची शिडी काढून टाकली. रिकाम्याच्या दृष्टीनं भिडस्त सुडाची ती परिसीमाच होती. महाळुंग्याला कळेपर्यंत मैदान ओसाड पडलं होतं. त्याला असं वाटलं की, त्याचं उरलेलं सारं आयुष्य त्या टाकीवरच जाणार. त्याच्या पोटातून आरपार कळ गेली. वॉचमननं त्याला बर्‍याच वेळानं खाली उतरवलं, तेव्हा ओलेत्या कपड्यांमध्ये त्याचा स्वाभिमान विझू विझू झाला होता.

कुणी नाही बघून महाळुंग्यानं एक दिवस दुपारीच रिकाम्याची सायकल विस्कटून टाकली. सायकलचा एक एक सुटा भाग बघूनही रिकाम्या रडला नाही. चेंदामेंदा झालेला आपलाच माणूस अनोळखी वाटला, तर शोक कसला करणार? रिकाम्यानं महाळुंग्याच्या दारावर त्वेषानं सायकलचे काही अवशेष फेकले आणि निग्रहाने रडू आवरत “भाडखाऊ” असा उद्धार करत चालता झाला.

अंगावरचे माराचे वळ मिटण्याआधीच रिकाम्यानं महाळुंग्याचं घर सोडलं आणि तेव्हाच कधी तरी महाळुंग्याचं आतलं एक टोक तुटलं ते तुटलंच.

सूर्य उगवतो आणि मावळतो ही किती मोठ्ठी गोष्ट आहे ना! क्षण, तास, दिवस, आठवडे इ. इ. सरत राहतात आपोआप.

जाणार्‍या दिवसांसोबत मनात अढी ठेवून पोरं आढीत घातलेल्या आंब्यासारखी पिकत राहीली…

संवेद

http://samvedg।blogspot.com/2008/11/blog-post_19.html

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *