Uncategorized

अगं अगं बशी…!!

दर शनिवारी मी बशीत बसून मुंबैला येते.
आजवर मी अनेक प्रकारच्या बशींमधून प्रवास केला. एस.टी (लाल डब्बा म्हटलं, तर हल्ली एस.टीवाल्यांना राग येतो असं ऐकलं!), एशियाड, सेमी-डिलक्स, स्लीपर कोच, व्हिडीओ कोच, ए.सी., नॉन-एसी… यू नेम इट!
पण दर शनिवारी घडणारा ’शिवनेरी’चा प्रवास मला मनापासून आवडतो!
एरव्ही एशियाड स्टॅंड्च्या बाहेर रिक्शाने उतरलं, की रिक्शावाल्याशी हुज्जत घालून होत नाही, तोवरच नीता ट्रॅव्हल्स, मेट्रो बस, स्वप्नदर्शन आणि तत्सम नावाच्या बसकंपन्यांचे एजंण्ट्स अंगावर चाल करून येतात. पण ती नामुष्की माझ्यावर सहसा येत नाही, कारण माझं तिकीट ’प्रिय’ने आधीच रिझर्व्ह केलेलं असतं आणि तो मला गाडीने सोडायला आलेला असतो.
’प्रिय’ची प्रचंड बोंब ठोकत येणारी चेतक, पिलियनवर त्याहून जास्त कलकलाट करणारी मी आणि मी काय बोलतेय यातलं एक अक्षर जरी कळलेलं नसलं, तरी दर दुसर्‍या मिनिटाला मुंडी हलवणारा ’प्रिय’ अशी आमची वरात एशियाड स्टॅंडवर आली, की “कोण आलं ते?” अशा आविर्भावात स्टँडवरच्या निम्म्या नजरा आमच्याकडे कुतुहलाने वळतात.
आणि…
घनघोर गवतात एखादी छोटीशी मुळी उगवावी, तशी मी ’प्रिय’च्या मागून अवतरलेली पाहून बर्‍याच जणांच्या चेहर्‍यावर हसू फुटतं.
एवढंच पुरेसं नाही, तर त्या दोन बाय दोन अंगुळे साईझच्या पाण्याच्या बाटल्या वाटण्यात मग्न असलेला पेप्सीकोलाच्या साईझचा माणूसही आमच्याकडे नजर टाकून घेतो…
बसमध्ये चार तास निवांत मिळतात, म्हणून मी करायला कामाची जंत्रीच आणलेली असते. त्यामध्ये राहून गेलेले वाचन, कवितांचे ड्राफ्ट्स सुरेख उतरवून काढणे, ’आज तू कसा चुकलास??’ हे १२ साईझचा एसेमेस लिहून ’प्रिय’ला पाठवणे अशी बरीच कामे येतात.
वाचनात पु.लं., चि.विं. वगैरे असेल, तर मी माझं नेहमीचं होहो-हुई करत खिदळखोबरीसारखी खिदळते (तोंडावर हात ठेवून लाजरं हसणं-बिसणं बात आमच्यात नाही). त्यामुळे बसमध्ये काहीतरी विनोदी वाचायचा माझा बेत आहे हे ’प्रिय’च्या लक्षात आलं, की तो ’आमेन!’ (माझ्या सहप्रवाशांसाठी) म्हणूनच मला बसमध्ये पाठवतो.
तिकीट घेऊन शिवनेरीत शिरत नाही, तोच लक्षात येतं की झाडून सगळ्यांची नाकं ऑलरेडी कपाळावर गेलेली आहेत..
उजवीकडे ’I Suffer From CRS (Cant Remember Shit!)’ तत्सम अर्थाचा शर्ट घातलेली बोजी. डावीकडे टाईम्स लावून लावून वाचणारा बोजा. टिपिकल पब्लिक…
अरे, यांना कोणीतरी सांगा रे… शिवनेरीत मराठीचे वावडे नाही म्हणून!
कोणाच्याही हातात संध्यानंद, सामना तर म्हणतच नाही मी, पण गेला बाजार सकाळही दिसत नाही.
शिवनेरीच्या एसीमध्ये आल्यावर टाईमपासच्या कल्पनापण ’शीतकटबंधीय’ होतात की काय कोण जाणे!
मी पुढच्या वेळी ’द फाउंटनहेड’ वाचायला आणणार आहे आणि केवळ हातातलं पुस्तक हिंग्लीश आहे, म्हणून आपण आहोत त्यापेक्षा जगाला कितपत वेगळे दिसू शकतो हे बघणार आहे.
माझ्या जागेपाशी येऊन ’प्रिय’च्या उर्ध्व लागलेल्या डोळ्यांची तमा न बाळगता मी माझ्या शेजार्‍याला न्याहाळून घेते आणि मगच आपल्या सीटवर जाऊन बसते.
शिवनेरीची सीट ही माझ्याकरता एक डोकेदुखी आहे.
सीटवर मागे डोके ठेवायच्या जागी सतत डोकं ठेवून पडलेला एक काळा डागवाला खळगा असतो.
कधी पूर्ण रिकाम्या शिवनेरीत जाऊन बघा, सगळ्या सीट्स काळा मळवट भरलेल्या निळ्या बायांप्रमाणे दिसतात.
पण हे प्रकरण फक्त दिसण्यापुरतं बरंय. कारण भडभडून येण्याइतपत फ्लेवरचा वास या मळवटांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.
त्यामुळे शक्यतो त्या काळ्या मळवटापासून ६ इंच खाली डोकं ठेवून, त्याखाली आपलं धड ऍडजस्ट करून, उरलेल्या जागेत पाय ठेवू म्हटले, तर ठेवावेत तरी कुठे, या विवंचनेत ’पोझिशन’ ऍडजस्ट करेपर्यंत औंध येतं.
आजपावेतो माझ्या शेजारी कोणीही बेबी/बाबी लोकं आलेली नाहीत. नेहमी आलीत ती बाबा/बाप्पू लोक.
बाबा आला की सामान ठेवण्याच्या बहाण्याने आपल्या बाजूची स्त्रीलिंगी वस्तू कशी आहे हे तो डोळ्याच्या कोपरयातून बघून घेतो.
डुईपासून सुरुवात करताना माझ्या बॉयकटपाशीच त्याचा उत्साह निम्मा झालेला असतो अणि पायातल्या कॅन्हासच्या शूजपाशी शक्तिपात!
त्यामुळेच माझ्या शेजारचे बाबा लोक निव्वळ झोपा काढत असावेत बहुतेक!
पण मी?
मला असले डोळ्यांचे व्यायाम बिल्कुल जमत नाहीत.
मायला… ताकाला जाऊन भांडं लपवायचंच कशाला म्हणते मी?
मी त्याला सीध्ध्धा न्याहाळून घेते.
बरा वाटला तर ’प्रिय’ला फोन करून पकवायला आयताच एक विषय. नाही बरा…Who Cares?
माझ्याबाजूला आलेला बाबा ’खूबसुरती बाहरी नही, अन्धरूनी होती है’ अशा टाईपचा उदारमतवादी जरी असेल, तरी औंधपर्यंत माझे ऍक्रोबॅटस बघून शरणचिट्ठी देतो आणि सरळ झोपी जातो.
“कसली खसखस चालवलेये कार्टीने? डोळ्याला डोळा लागू देईल तर शप्पथ!” हे सायलंट. मनातल्या मनात!
छान स्थिरस्थावर होऊन मी माझ्या आवडीचं काही करायला घेतेय, तोच तो फूड-मॉल येतो आणि पुण्यात सगळ्या दुकान-हॉटेलांचा हरताळ असल्यासारखं सगळं पब्लिक ते भयंकर महागडं खाणं खायला बाहेर पळतं.
आता मै और मेरी तनहाई?
अहं…
बसमधल्या एकांताचा फायदा घ्यायला एखाद-दुसरं जोडपं रेंगाळलेलं असतंच.
दोन सीट्समधल्या फटीतून मला सग्गळं दिसत असतं. पण त्यांना मी तिथे आहे याची जाम खबर लागत नाही.
पण माझा मूड बूटात असेल, तर अचानक त्यांच्यापुढे उगवून त्यांची गाळण उडवण्याचं धक्कातंत्र मी जरूर अवलंबते.
मग हडबडलेला मुलगा मुलीला म्हणतो, “चल… लेट्स ईट आऊट!”
ऑमॉला सग्गळं ठाऊक्काय… लब्बॉड! Lets eat out म्हणे…
१० मिनिटांनी सगळे परतले, की त्या काचबंद शिवनेरीत भयंकर दर्प दरवळायला लागलेला असतो.
माझ्यावर सूड उगवायचा, म्हणून माझा शेजारी फूडमॉलवरच्या फोडणीच्या पातेल्यात जाऊन बसल्यासारखा घमघमत असतो. मागच्या सीटवाल्याने तोंडाची गिरणी चालू केलेली असते आणि गिरणीतून मच्याक मच्याक आवाज यायला सुरुवात झालेली असते…
माझं डोकं अचानक खूप भणभणायला लागतं.
त्यामुळे घाट येईस्तो मी डोक्यावर शाल ओढून घेऊन, कानात ’टेंपरेचर’ फुल ऑन ठेवून गपचीप पडून राहते.
थोडया वेळाने एसीच्या थंड वार्‍याने तो वास ’बसला’, की मी डोकं बाहेर काढून पुन्हा पोझिशन, चुळबुळ इ.च्या मागे लागते.
“कसली खुडबुड चालवलिये कार्टीने? डोळ्याला डोळा लागू देईल तर शप्पथ!” या वेळी मात्र चेहर्‍यावर हिंसक भाव!
अशा रितीने पनवेल येता येता पुस्तकाची २० पाने वाचून होतात न होतात, तोच आलेल्या ढेकरामुळे आज फूड-मॉलवाल्याने पावभाजीत चमचाभर बटर जास्तच दिलं हे ड्रायव्हरच्या लक्षात येतं आणि त्या आनंदात तो आम्हां सगळ्यांना कंपल्सरी ’यफ.यम.’ ऐकायला लावतो. शिंची कटकट!
आता हातातलं पुस्तक गुमान आत ठेवायचं आणि बाहेरची गंमत(?) बघत बसायचं.
पण त्यातही नंतर गंमत वाटायला लागते.
खारघरचा फ्लाय-ओव्हर ओलांडेपर्यंत बसमध्ये ’उठा-उठा सकळीक’ झालेलं असतं.
माझ्या सीटवर अनैसर्गिक स्वस्थता बघून बाजूचं पब्लिक अंधारात हातोहात बदललं की काय हे डोळे फाडफाडून बघायचा प्रयत्न माझा शेजारी करत असतो.
पण तेवढ्यात चुनाभट्टी येतं आणि चुनाभट्टी आल्यावर नेहमी लागणारं हिमेशचं ’हरी आऊम… हरी आउम… हरी ओआऊऊम’ लागतं आणि मी ’खिक’ करून दात काढते.
फुस्स. आपल्याबाजूची पार्टी तीच आहे, काही अंधारात बदलली बिदलली नाहीये हे शेजार्‍याच्या लक्षात येतं आणि तो लक्षात येण्याइतका हिरमुसून बळंच पलीकडच्या खिडकीतून बाहेर पाहायला लागतो. गेला टिपरीत!
सायनच्या ट्रॅफीकमध्ये कारमधल्या, बसमधल्या छोट्या पोरांना चिडवत, डोळे काढून घाबरवत वेळ जरा बरा जातो.
मग येतंच दादर…
दादरला आल्यावर मात्र पुण्याच्या हवेने सुस्त झालेली, ’प्रिय’च्या लाडांनी हुळहुळी झालेली माझ्यातली मुंबईकरीण खाडकन जागी होते आणि ’कशीही करून ८-५६ मिळालीच पाहिजे, जय महाराष्ट्र!’ अशी बोंब ठोकत रेल्वे स्टेशनच्या दिशेने धावते…
शिवनेरीतून उतरते ते पुढच्या शनिवारी भेटण्याच्या वायद्यानेच!
’शिवनेरी’ही मग मोठ्याने भूश्श आवाज काढत मला ’सीया!’ म्हणते…

श्रद्धा भोवड

http://shabd-pat.blogspot.com/2008/12/blog-post_3917.html

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *