Uncategorized

नॅनी

nani is offline. Messages you send will be delivered when nani comes online.
मी: Hey … you there?

.
.
.

नॅनी: तू हल्ली इतका बिझी कसा?
Sent at 11:16 AM on Monday
.
.
.

मी: सध्या जरा सिन्सिअर व्हायचे भूत चढलेय … मे बी त्याच्यामुळे.
नॅनी: इतका की ब्लॉगवरपण काही टाकलं नाहीस. कित्येक वर्षात! १०० वर्ष झाली असतील!!!
मी: जखमेवर बोट!! 🙁
नॅनी: बिझी ऑफीसमधे. घरी काय बिझी ठेवतं तुला हे विचारतेय!
मी: कॉल्स असतात यार पुण्यामधे.
नॅनी: ऑफिसमधे प्यून तुझ्यापेक्षा जास्ती बिझी असेल.
मी: 😉
नॅनी: का काय झालं?
मी: आजतक मै तुमसे झूठ बोल रहा था. मै प्यून हूं. हां … मै प्यूनही हूं.
नॅनी: तुझी कंपनी भारी आहे बाबा. प्यूनला अमेरिकेत ट्रान्सफर करतात!
मी: इथे महाग असतात बाबा प्यून.
नॅनी: 🙂 असो. पण ब्लॉगपासून दूरी का?
मी: परत जखमेवर बोट!
नॅनी: जखमच का खरं?
मी: नाहीतर काय? सप्टेंबरपासून नवा पोस्ट नाही. मग जखमच की!
नॅनी: तेच तर म्हणतेय.
मी: ११ अनपब्लिश्ड पोस्ट्स आहेत यार. सगळे अर्धवट राहिलेत. च्यायला मन पुढे सरकले की परत मागच्या विषयावर येतच नाही.
असो.
बघू.
होयेगा.
कुछ तो होयेगा.
हा वीकेंड.
गच्चीसाठी खच्ची!
नॅनी: चलो… झोपायला जाते.
मी: बाय.
नॅनी: बाय. आणि लिही काहीतरी. तुझे पोस्ट्स खरंच मिस् करते मी.
मी: आई शप्पथ! लेखक पेटला आता. लेखकाला माहीतच नव्हते, की त्याला कोणी मिस् करते. आता बासच.
हर हर महादेव.
नॅनी: 🙂
मी: झोप तू आता. सोक्षमोक्ष लावतोच मी आता इकडे.
नॅनी: पेटते रहो.

nani is offline. Messages you send will be delivered when nani comes online.

.
.
.

कोणाशी कधी कसे सूत जमावे याचा काही नेम नाही. एकदम अनपेक्षित प्रकारे, काहीही कारण नसताना, किंबहुना चुकूनच आमची गाठभेट झाली. सुमारे ३ वर्षं झाली आता या ओळखीला. हा अनपेक्षित प्रकार म्हणजे एक ईमेल होतं, जे चुकून मला आलेलं.

आपल्या पुढची जनरेशन जशी नेहमी एकदम पांडू वाटते, तशी नॅनीपण जरा पकाऊ होती. चॅटमधे भरपूर “?” आणि “!”! शेवटचे अक्षर अगदी ओळ भरेपर्यंत टाईप करणे हे आणि असले प्रकार ठासून भरलेले. इंटरनेट, ईमेल्स आणि चॅटचे पहिले नऊ दिवस सुरू असल्याने, तेच तेच जुने झालेले फॉरवर्डेड ईमेल्स पाठवायची. आठवड्याला “Must See…”, “don’t ignore”, “toooooo good” या असल्या ईमेल्सचा रतीब टाकायची. आपण पाठवतो त्या ईमेलमधे काय आहे हे बघायच्या आधीच, माहीत असल्या-नसल्यांच्या इनबॉक्समधे ते ईमेल पोहोचवणे म्हणजे आपले परमकर्तव्य आहे असे मानणाऱ्या लोकांपैकी एक होती ती. सूत जुळावे असे आणखी काहीच आमच्यात नव्हते – फक्त डेस्टिनी. माझ्या लेखी सर्वार्थाने निरर्थक प्रकारामधे मोडणारे सगळे गुण तिच्यात. आणि रूड हा शिक्का माझ्यावर आधीपासूनच. एकमेकांशी बोलण्याचे – बोलत राहण्याचे आम्हांला काहीच कारण नव्हते. कोणत्याही क्षणी, कोणत्याही दिवशी, “चल जा, गेलास उडत,” असे झाले असते, तरी कोणालाही नवल वाटले नसते. पण असे झाले नाही. उलट जास्तीच ट्युनिंग जमत गेले.

एकमेकांकडून काडीचीही अपेक्षा नाही आणि काही गमावण्याचे भय नाही. कदाचित अशी एक बाजू प्रत्येकाला असते. आहेत त्या सर्व नात्यांना समांतर. आणि ती तशीच राहावी म्हणून मूक धडपडही सुरू असते. एकमेकांपासून अनभिज्ञ असण्यामुळे आमच्यातल्या बोलण्यावर आमच्या आजूबाजूच्या तात्कालिक गोष्टींचा फारसा प्रभाव पडलाच नाही. एकमेकाचे मूड्स वगैरे प्रकार फारसे मधे आलेच नाहीत. नॅनी उगाच शंभर प्रश्न विचारायची. “काय संबंध हिचा?” हा विचार येण्यापेक्षा “काय फरक पडणार आहे?” हा विचार डोक्यात यायचा. खरं म्हणजे तर आजीबाईसारखे इतके प्रश्न विचारते, म्हणून नॅनी नाव पडलेले. आज जेव्हा कधी कधी असे निवांत बसतो, तेव्हा वाटते, यार… ३ वर्षं! केवढे काही झाले यात. मीही कुठच्या कुठे आलो आणि तीही! जिथे आमच्या बोलण्यात “हू केअर्स?” भाव असायचा, तिथे बरेच दिवस कोणी पिंग नाही केले की त्याचीही नोंद व्हायची. आणि हे असेच तब्बल ३ वर्षं सुरू आहे. मित्र व्हायला प्रत्यक्ष भेटायला थोडेच लागते? बरेच किस्से ऐकलेले असे, पेन फ्रेंड्स वगैरेंचे. नॅनीमुळे मलाही असा एक अनुभव आला.

पण जरा विचार केला की, वाटते, यात माझाच स्वार्थ होता. म्हणजे असे की – या मागच्या इतक्या वर्षांत हळूहळू मी स्वतःच कुठेतरी गढूळ होत गेल्याची भावना येत होती. हाताकडे बघितले की वाटायचे, यार… ३-४च तर रेघा आहेत. त्याही आखल्यासारख्या. असे कसे काय गिजमीट झाल्यासारखे वाटतेय सगळे? बऱ्याच गोष्टी, बरेच विचार आतल्या आतच रहायचे. बोलतो कशाला, उगाच वाटायचे. आधी स्वतःकडे बघा, असले काहीतरी मीच स्वतःला म्हणून गप्प व्हायचो. आपले अक्षर जरी चांगले असले, तरी आपली पाटीच कोरी नसेल तर ती वाचणार तरी कोण? कधी-काळी यावर असेही म्हणलो असतो, मी कसा का असेना. म्हणून मी काय म्हणतो त्याचे महत्त्व आणि त्याचा दर्जा कमी थोडाच होतो? पण हळूहळू हे उत्तर पटेनासे झाले. आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टींसाठी मी एक मूक प्रेक्षक व्हायचो. आणि आपण मूकपणे बघतो, म्हणून शब्द आणखीच रसातळाला जायचे. पण या सगळ्या गढूळपणात मग एक असेही अंग पुढे यायचे, जे एकदम पारदर्शक, एकदम स्वच्छ असायचे. अर्थाअर्थी काही संबंध नसताना, केवळ यात काही अशुद्ध नाही म्हणून बरे वाटायचे. त्याच्या टिकण्याने किंवा न टिकण्याने कोणालाही काही फरक पडणार नसायचा. पण तरीही त्याचे अस्तित्व उगाचच निरागस वाटायचे. त्यात कशाचे भय नाही. त्यामधे अजूनही ’खुली किताब’ आहोत आपण असे वाटायचे. यातून तयार होणारा नॉस्टॅल्जियाच मग पुढे ते टिकवायला भाग पाडायचा. नॅनीबरोबरचे नाते कदाचित माझ्यासाठी असे होत गेले. आणि ते असेच ठेवले यामागे हा इतका सगळा स्वार्थ!

पण… हे असे सगळे मला हल्ली वाटते. म्हणजे आफ्टरमॅथ.

आपण टप्प्याटप्प्याने मोठे होतो. प्रत्येक टप्प्यावर आपण वेगळे. बेटाबेटांवरून पुढे जातो. प्रत्येक बेटावर कोणाकोणाला भेटतो. बऱ्याच कला दाखवतो. त्यांची कदरही होते. त्यातून निर्माण झालेल्या अपेक्षांचे मूठभर मांस चढवून मग पुढच्या बेटावर जातो. पण मग त्याच कला कलेकलेने मारूनही टाकतो. एक वेगळेच रूप घेतो. नव्या बेटावरच्या नव्या कला. चक्र सुरू. आणि मग परत एकदा या जुन्या बेटावरच्या सवंगड्यांची भेट झाली, की मग मुखवटा पांघरतो. जसे काही आपण अजून तसेच आहोत. पण मुखवट्याविना होती, ती मजा त्यात राहत नाही. कदाचित समोरच्याला तीच मजा येतही असेल, पण ते श्रेय कदाचित मुखवट्याला आहे. बरीच बेटे पार केल्यावर बरेच मुखवटे जमतात. आणि मग अचानक कुठेतरी एक जागा मिळते, जिथे मुखवट्याची गरजच लागत नाही. कारण सगळेच अनोळखी. दर वेळी तितकेच नवे. मुखवट्याविना स्वतःला बघणेही तितकेच रंजक. पूर्वी पुण्यात असताना दर वीकेंडला आश्रमातल्या मुलांना भेटायला जायचो. दर वेळी प्रचंड ताजेतवाने वाटायचे. त्या लहान लहान मुलांचा उत्साह बघून स्फुरण चढायचे. पण गेली २ वर्षं आता तो आश्रमही नाही आणि ती मुलेही नाहीत. अगदी तेवढे नाही, पण त्याची आठवण करून देणारे असे काहीतरी आहे बिनमुखवट्याचे वावरण्यात. नॅनी आणि माझी बडबड प्रसंगी अगदी निरर्थकही असली, तरी यात अशी गोडी आहे. एकमेकांना चुकायचा स्कोपही आम्ही देत नाही आणि बरोबर-चूक मोजतही नाही. एकदम काहीच्याकाही बडबडत राहणे आणि काहीच मनाला लावून न घेणे.

गेली ३ वर्षं इतके काही झाले न भेटता. पुढेही कधी भेटू याची खात्री नाही. Thanks to Globalization. नॅनीचे लग्नही आहे आता थोड्या दिवसांत. तिचे करिअरही सुरू होईल. एकामागून एक नव्या जबाबदाऱ्या खांद्यावरती घेईल. माझ्याही ऑफिसमधे माझी पुढच्या रोलची धडपड सुरू होईल. पायातली भिंगरी आणखी कुठेतरी घेऊन जाईल. आणखी एखादे बेट येईल. नवे लोक, नव्या कला, नवे मुखवटे. पण परत ती क्षणिक गडबड सरली, की मेसेंजरवर एकमेकांना पिंग मारू…

Hey … you there?

संग्राम

http://rohitbhosale.blogspot.com/2009/02/blog-post.html

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *