Uncategorized

’सुट्टी सुरू!!’ आणि ’तेल-वेणी’

सुट्टी सुरू!!

रंगपंचमीनंतर मला कोल्हापूरचे वेध लागायचे. मग वार्षिक परीक्षा झाली की, आई किंवा बाबा मला कोल्हा्पूरला सोडायला यायचे. आईबरोबर एस.टी.ने जाणे म्हणजे अवघड परीक्षा असे. कारण कात्रज यायच्या आतच आई ’आ’ वासून झोपून जाई. बरं, तिच्या झोपण्यातसुद्धा भारी निग्रह असे. कितीही हलवलं, भुण-भुण केली, चिमटे काढले, तिचे डोळे हाताने उघडायचा प्रयत्न केला तरी ती ठामपणे झोपून राही. मग पहिला अर्धा तास लोकाना तिची दया येत असे. पण नंतरचे पाच तास मात्र माझी कीव येत असे. क-हाडच्या आसपास आई खडबडून जागी होई. मग आपण अजून दीड तास झोपू शकतो या जाणिवेने ती माझ्याशी थोडा वेळ बोलायचा प्रयत्न करीत असे. पण एकूण आईबरोबर जाणे आणि एकटे जाणे यांत फारसा फरक नसे.
बाबाबरोबर पुणे-कोल्हापूर प्रवास म्हणजे खूप मजा. कारण स्वारगेटवर जरी “बाबा,पॉप्पिन्स” असं म्हटलं तरी लगेच मिळत असे.
बस-स्टॅन्डवर बाबा जगातली सगळी वर्तमानपत्रं विकत घेत असे. मग बसमध्ये चढल्यावर बाबा मला माझ्या तिकिटाचे पैसे काढून देत असे. कंडक्टरकडून तिकीट काढून घेईपर्यंत मी शांत असे. मग एकदा का बस निघाली की, जेमतेम कात्रजपर्यंत माझा गुणी शांतपणा टिके! घाट सुरू होण्याआधी माझा पहिला प्रश्न, “बाबा, कोल्हापूर कधी येणार?”.
मग वेगवेगळ्या निमित्ताने हाच प्रश्न विचारला जाई. कधी कंटाळून, कधी फक्त संभाषण म्हणून, तर कधी सवय म्हणून!
पण बाबा न कंटाळता फलंदाजी करत असे. “आता कात्रज येणार बरं का सयडम्‌.” (मला लाडाने बाबा सयडम्-खयडम्-डब्बा-डायडम् म्हणत असे!).
“कात्रज म्हटल्यावर काय आठवतं सांग पाहू?”
“मला न आवडणारं पचपचीत दूध?”
हे उत्तर बहुधा बाबाला अपेक्षित नसावं. त्यामुळे थोडा वेळ क्लीन बोल्ड झाल्यासारखा चेहरा करून “अजून काय सांग?” असा प्रश्न विचारी!
“बोगदा.”
“बरोब्बर!”
मग प्रत्येक थांब्याचा इतिहास-भूगोल सांगण्यात बराच वेळ निघून जात असे.
माझा भूगोलातला रस कमी झाला की, माझे इतर प्रश्न सुरू होत. जे बाबाला फारसे आवडत नसत.
“आपण राजारामपुरीत रिक्षानी जायचं की चालत?”
“स्नेहा घरी असेल? मला बघितल्यावर ती काय म्हणेल?”
“तू परत जायच्या आधी आपण रंकाळ्यात जाणार ना? आणि सोळंकीत आईस्क्रीम?”
मग थोड्या वेळाने बाबा नवीन युक्ती शोधून काढे.
“पुढच्या एक तासात जर एकही प्रश्न विचारला नाहीस तरच साता-यात तुला खाऊ मिळेल.”
मग पंधरा मिनिटं बळं गप्प बसून माझा सोळाव्या मिंटाला पुन्हा प्रश्न, “झाला एक तास?”
बसमधले इतर लोक या प्रश्नावर हमखास हसत आणि मी त्यांच्याकडे, “चोमडे कुठले” अशा नजरेने बघून गाल फुगवत असे.
क-हाड आल्यावर मला “अब कोल्हापूर दूर नहीं” वाटायला सुरुवात होई. टोप नावाचं गाव आलं की अगदीच सुटका झाल्यासारखं वाटू लागे! कोल्हापूर बस-स्टॅन्डअवरचा “येळगुड दूध” असा बोर्ड दिसला की माझी सुट्टी ख-या अर्थाने सुरू होई!
मग रिक्षा राजारामपुरीतल्या अकराव्या गल्लीत शिरली की माझा चेहरा खुलत असे. कारण पुढचे पूर्ण दोन महिने संपूर्ण दिवस स्नेहाबरोबर खेळण्यात आणि अज्जीच्या गोष्टी ऐकण्यात जायचे. 🙂
आज-काल पुणे-कोल्हापूर प्रवास ड्रायव्हरसहित हॉन्डा सिटीतून करायला मिळतो. आणि नव्या रस्त्यामुळे वेळही कमी लागतो. पण अजुनही एस.टी.च्या “लाल डब्यातून” केलेले प्रवास जास्त जवळचे वाटतात!
त्या बसमधल्या गजांचा लोखंडी वास आणि टरटरीत रेग्झिनची बाकडी सुट्टी सुरू झाल्याच्या आनंदात विरून जायची. आणि आईच्या रोजच्या “भाजी खा. नुस्ता तूप-भात मिळणार नाही.”मधूनपण सुटका! अज्जी नुस्ता तूप-मीठ-भात लाडाने भरवत असे! आणि कोल्हापूरच्या हवेमुळे की काय कोण जाणे, भाज्यांमधल्या व्हिटॅमिनची कमी सुट्टीत कधीच जाणवत नसे!

http://unhalyachisutti.blogspot.com/2009/03/blog-post_14.html

——————————————————————

तेल-वेणी

कोल्हापूरला जाताना नेहमी एक दु:ख असायचं. स्नेहाचे केस खूप मोठे झाले असणार. आई नेहमी “कोण वेण्यांचा व्याप करणार?” म्हणून माझे केस कापत असे. पण स्नेहाचे केस खूपच सुंदर होते. कुणालाच ते कापावेसे वाटायचे नाहीत. एकदा ती कंटाळून ब्यूटी-पार्लरमध्ये गेली केस कापायला. तर तिथल्या मुलीचे कात्री चालवायचे धाडसच होईना! मग स्नेहानी स्वत:च्या हाताने पहिला “वार” केला आणि तिला कात्री दिली.तर अशा केसांना शह द्यायचा, म्हणजे किमान पक्षी लांबी तरी पाहिजे!
पण कोल्हापुरात मुलींची “वेणी” घालणे हे मामीचे परम-कर्तव्य असायचे!
रोज सकाळी, “स्नेहा ऊठ! नाहीतर तडाखा खाशील,” अशा झणझणीत धमकीने सुरुवात व्हायची. “तडाखा” हा पुणेरी “धपाट्याचा” कोल्हापुरात राहणारा मामेभाऊ. या धमकीनंतर “वेळेत उठला नाहीत, तर मी वेणी घालून देणार नाही,” हे असायचं. मला या धमकीने खूप आनंद होत असे. मामीकडून वेणी घालून घेणे म्हणजे स्वत:च्या एकुलत्या एक डोक्याचा नारळ खोवून घेण्यासारखे असायचे!
“हं, बस खाली.” असा हुकूम व्हायचा.
“आई, आधीच सांगते. खसकन फणी फिरवायची नाही.”
“मला वेळ नाहीय तुझ्या सूचना ऐकायला. बस म्हंटलं की बसायचं. सईचीपण घालायचिये.”
मग फणीच्या सगळ्यात बारीक बाजूने “वार” सुरू व्हायचे. तरी नशीब आमचे, कायम तेल्या मारुती असायचो. साधारण दहा-एक मिनिटं नुस्तेच केस विंचरण्यात आणि स्नेहाचे फूत्कार ऐकण्यात जायचे. त्यानंतर मामी दोन घट्ट वेण्या घालायची. त्यांचा घट्टपणा तपासण्यासाठी वेण्या घालून झाल्यावर त्या ओढून बघायची. हाच सगळा प्रकार माझ्यावरही करण्यात यायचा. त्या वेण्या इतक्या घट्ट असायच्या की कधी कधी आमच्या भुवयासुद्धा ताणल्या जायच्या बोटॉक्स दिल्यासारख्या!
आम्ही दिवसभर कितीही दंगा केला~, तरी दुस-या दिवशी सकाळीसुद्धा वेण्या तशाच असायच्या.
कधी अज्जी वेणी घालायची. ती मात्र कलाकार होती. तिचे मऊ हात अलगद चालायचे. कधी पाचपेडी तर कधी सातपेडी! कधी दोन वेण्या एकमेकींना कानाशी बांधून झोपाळा, तर कधी गोफ. कधी परकर-पोलकं घातलं की खोपा!
मग अशा वेळी अज्जी आम्हांला भवानी मंडपात घेऊन जात असे. दोघींच्या वेण्यांमध्ये बकुळीचे गजरे माळत असे. येता येता भेळपण मिळायची!
वेण्या घालण्याइतकाच न्हाण्याचा कार्यक्रम अवघड असायचा. न्हाणीघरातल्या दगडावर दोघींना एकत्र बसवण्यात येत असे. “हं …डोळे मिटा!” असा मामी-हुकूम येत असे. मग आम्ही जिवाच्या आकांताने डोळे मिटायचो. मग शिकेकाई, रिठे, संत्र्याची साल यांचा कढत वस्त्रगाळ अर्क आमच्या डोक्यांवर ओतला जाई. हे तरी सोपं असायचं. नंतर वस्त्रात उरलेलं प्रकरण हाता-पायावर खसाखसा घासण्यात येई! आणि हे कमी म्हणून की काय, शेवटी बटाटे उकडावेत इतके गरम पाणी डोक्यावर ओतण्यात येई. या सगळ्या प्रकाराआधी जमेल तितके तेल आमच्या शरीरांमध्ये मुरवण्यात येत असे. रविवारची ही महा-आंघोळ आटोपल्यावर मामी टी.व्ही.वर रामायण बघत असे. एवढी संगीत आंघोळ झाल्यावर मी दोन तास डाराडूर झोपत असे. त्यामुळे माझं रामायण कच्चं राहिलं!
पुण्यात माझं आणि मला सांभाळणा-या विमलमावशीचं मेतकूट होतं. जसं ती तिच्या मुलाला अज्जीनं कापडात गुंडाळून काचेच्या बरणीतून पाठवलेलं लोणचं देते हे मी आईला सांगायचे नाही, तसंच ती मी दिवसभर चिखलात खेळते, गळ्यात झिंजा घेऊन फिरते, रस्त्यातली मांजरं उचलून आणते हे तीही आईला सांगत नसे! मग आई घरी यायच्या बरोब्बर पंधरा मिनिटं आधी माझी वेणी व्हायची. आईची पाच फुटी मूर्ती कोप-यावर दिसली की मी एकदा शेवटची नखं साफ करीत असे.
त्यामुळे रोज नेमक्या वेळेला जुलमी अधिकाराने घातलेली वेणी मला अजिबात आवडत नसे!
पण सोमवारी सकाळी उशीला जो शिकेकाईचा वास यायचा तो आठवला की अजुनही उगीच डोळ्यात पाणी वगैरे येतं!
आज माझी कुणी तशी वेणी घालून देणार असेल तर मी एका पायावर तयार आहे!

सई केसकर

http://unhalyachisutti.blogspot.com/2009/03/blog-post_25.html

Facebook Comments

3 thoughts on “’सुट्टी सुरू!!’ आणि ’तेल-वेणी’”

  1. सुट्टी सुरू आणि तेल वेणी मस्तच. सहज, ओघवते, अकृत्रिम लेखन. स्मृतींत रमलो. अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *