Uncategorized

स्क्रीन काळा आणि मोठ्ठा गोळा…!!

’होम थेटर…. ?? दिसतंय दिसतंय.. वरती धर अजून.. नवीन घेतलं का रे…?? कितीला पडलं ?’

’..म्हणजे रुपये किती होतात…??’

’आर्य काय करतोय रे… ?? दाखवायला जमेल का आत्ता…?’

’दिसला.. दिसला.. पण अस्पष्ट दिसतंय रे.. झोपलाय का…??’

’उठवू नको रे त्याला.. रडायला लागला बघ…’
….
’..अहो…हे बघा.. एकदम बंद झालं दिसायचं.. काहीतरी विंडोज विंडोज असंच येतंय स्क्रीनवर…’

’चालू करायला सांगा ना लवकर..तो आर्य झोपलाय ना.. त्याच्यावर फोकस करून दाखवत होता…’

…घराजवळच्या एका सायबर-खुराड्यात एकाच्या जागेत दोन अशा बेतानं कोंबलेल्या स्टुलासारख्या खुर्च्या…
…आणि त्यात डगमगत बसलेली एक आजी आणि एक आजोबा…
समोर मॉनिटर स्क्रीनच्या डोचक्यावर चिकटलेला वेब कैम… आजीकडे रोखून बघणारा…
आजीच्या कानाला हेडफोन… बोटांनी गच्च पकडलेला…. आजोबा बाजूला रिलॅक्स्ड आणि अलूफ असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत नुसतेच बसलेले… स्क्रीन कडेही न बघता… पण इतक्या म्हातारपणीही त्यांना तो अभिनय ’अज्जाब्बात’ जमत नाहिये…!!
आजोबा मधेच इंग्लिश वाक्यं वापरून आपल्या भावना लपवताहेत… आणि इंग्लिश वाक्यांतूनच आपलं कंप्यूटरचं ज्ञान आजीपेक्षा थोडं जास्त असल्याचं दाखवताहेत…

…स्क्रीन मधेच काळा झाला.. विंडोज चा स्क्रीनसेव्हर आला..आजी केविलवाणी झाली…

माझे डोळे थोडे खाजल्यासारखे वाटले म्हणून बघतो तर सालं डोळ्यांत पाणी…!!
विचित्र दिसतं चारचौघात…
’माऊस हलवा थोडासा आजी…’ मी मनात म्हटलं…
मोठ्यांदा बोलायचं म्हटलं तर घशात मोठ्ठा गोळा…
मग लवकर लवकर तिथून निघालो…!!

नचिकेत गद्रे

http://gnachiket.wordpress.com/2009/04/13/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%97/

Facebook Comments

1 thought on “स्क्रीन काळा आणि मोठ्ठा गोळा…!!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *