Uncategorized

अनुक्रमणिका

०१. दिशांचे पहारे – क्षिप्रा

०२. बरेच काही उगवून आलेले – नंदन होडावडेकर

०३. ३१ दिवस… नो पेन… – मॉशिअर के

०४. परत एकदा पहिल्यासारखे होणे नाही, होणे नाही – मेघना भुस्कुटे

०५. आरसा आपुलिये / आंगी आपण पाहे / तरी जाणणें जाणों लाहे / आपणयातें – संवेद

०६. फिर पुकारो मुझें… फिर मेरा नाम लो… – ट्युलिप

०७. अगं अगं बशी…!!! – श्रद्धा भोवड

०८. देहबोलीचे ठोकताळे – अबोली

०९. बेचव काळ्या भुंग्याची गोष्ट / उंदरा, कुठंयस तू? – निवेदिता बर्वे

१०. नॅनी – संग्राम

११. सुट्टी सुरू!! / तेल-वेणी – सई केसकर

१२. सावली – विशाखा

१३. स्क्रीन काळा आणि मोठ्ठा गोळा…!!! – नचिकेत गद्रे

१४. याचसाठी केला होता अट्टाहास – राज

१५. चल तर जाऊ… – प्रसाद बोकील

१६. रंगुनी रंगात सार्‍या… – गायत्री नातू

१७. लेजंड ऑफ प्रिन्स धृमण – धृमणाची धर्वणाश्रम भेट – यॉनिंग डॉग

१८. स्तंभावरती चार सिंह – अ सेन मॅन

१९. ह्या बंदिस्त ए. सी. रूमची शपथ! – वैभव जोशी

२०. कुणाच्या ह्या वेणा! – नीरजा

Uncategorized

कुणाच्या ह्या वेणा!

कसल्या या खुणा
कोण येऊन गेलं इथे
कुणाच्या ह्या वेणा
रुतल्यात जिथे तिथे

गेली असतील इथून
काही आतुर पावले
थोडे घुंगरू पैंजणातून
अलवार ओघळले

वाळलेल्या पानावर
हे खळ्ळकन पाणी
आत आत कुठेतरी
दुखली असेल राणी

झाडे काळवंडलेली
हवाही काळीशार
थिजलेला गारवा
रुततोय आरपार

कुणी मंतरून ठेवले
की शाप हा भोवला
उभ्या राजस संध्येचा
सूर असाच गोठला

नीरजा

http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/2009/07/blog-post_24.html

Uncategorized

ह्या बंदिस्त ए. सी. रूमची शपथ !

ह्या बंदिस्त ए. सी. रूमची शपथ ! बाहेर पडणा-या पावसात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. म्हणजे … माझ्या अत्यंत तरल मनाला पाऊस पाहिला की हटकून कुणाची तरी आठवण नको यायला वगैरेसारखा हा काव्यात्मक निषेध नाहीये. आय ऍम जस्ट नॉट इंटरेस्टेड. एवढ्या तप्त धरणीवर ह्या सरी उपकार केल्यासारख्या येऊन जाणार आणि आपण उगाचच हरखलेले चेहरे वर करून “आहे आहे! कुठेतरी अजून न्याय आहे,” म्हणत ओंजळभर लाटांवर हेलकावे खाणार ह्यासारखा विनोद नाही. (मला इथे अपमान म्हणायचं आहे). विशेषत: दुष्काळ अंगवळणी पडत चाललेला असताना आलेल्या ह्या लहरी सरींना क्रूर थट्टा का म्हणू नये???

कधीतरी सगळं “लहर” ह्याच सदरात मोडणार अशी भीती होतीच. आपला जन्म म्हणजे कुणालातरी न थोपवता आलेली लहर (सौमित्र ह्याला आईबापाचा बहर म्हणतो- टायपो असणार!) आपलं शिक्षण म्हणजेसुद्धा कुणालातरी नातेवाईकांना, शेजा-यांना खिजवायची आलेली लहर, लग्न म्हणजे काही ऑप्शन्सपैकी एखादा निवडून रिस्क घेण्याची लहर आणि पुढील सारे सोपस्कार म्हणजे दोन लहरींची एकमेकांशी चाललेली चढाओढ. कमिटमेंट ह्या गोंडस नावाखाली सर्रास खपवल्या आणि खपवून घेतल्या जाणा-या लहरी. पिरियड!

नाही म्हणायला एक कविता येत जात असते आयुष्यात, जिने निदान आपला स्वभाव लहरी आहे हे कधीच लपवलं नाही. तिला भिजवायचं असतं म्हणून ती येते, बरसायचा कंटाळा आला म्हणून निघून जाते… कधी चिंब भिजवून, कधी अर्ध्यामुर्ध्या कोरड्या, विनोदी अवस्थेत ठेवून. येणार म्हणून आश्वासन नाही, जाते म्हणून धमकी नाही. किमान तिची अनिश्चितता निश्चित आहे. तिच्या अशाश्वत, क्षणभंगुर निळाईइतकं सुंदर आणि तिच्या सावळत जाण्याइतकं शाश्वत काही नाही.

हे त्या निळाईच्या आशेने आहे? की सावळण्याच्या आशंकेने??? माहीत नाही.स्वघोषित लहरींच्या येण्या- न येण्यातलं सुख सारखंच.

एक किनारे पे तुम हो और एक किनारे पे हम हैं
वक्त को बहते देख रहे हैं … यह मंजर भी क्या कम है।

ऍंड बिफोर आय साईन ऑफ… ह्या बंदिस्त ए. सी रूमची शपथ! मला कुणाचीही आठवण येत नाहीये.

वैभव जोशी

http://runaanubandh.blogspot.com/2009_07_01_archive.html

Uncategorized

स्तंभावरती चार सिंह

हल्ली तो कविता करतो
चार कडवी रोज लिहितो

एक कडवं शब्दांचं
कमळावरल्या थेंबांचं

दुसरं कडवं सुचलेलं
लोणच्यासारखं मुरलेलं

तिसरं सहज उमटतं
ध्रुवासारखं तळपतं

ए सेन मॅन

http://asanemanthinks.blogspot.com/2009/07/blog-post.html

Uncategorized

लेजंड ऑफ प्रिन्स धृमण – धृमणाची धर्वणाश्रम भेट

राजपुत्र धृमण मनातल्या मनात कंटिन्युअसली शिव्या घालत होता. त्या निबिड धुंग अरण्यातून केवळ चालणे हेपण मोठ्या धाडसाचे काम होते.

“बाबांनापण ना, नस्ते उद्योग लागतात. काय गरज आहे च्यायला त्या यडचाप राजर्षींचे ऐकायची? पाऊस काय यज्ञाने पडणारे? चार दिवस थांबायचे, पडेल की, जातोय कुठे?
बरं करा हो यज्ञ, आमच्या बापाचे काय जातेय? म्हणजे जातंय आमच्याच बापाचे, पण जे राज्यात मिळतंय ते सामान वापरा ना.
ह्यांना त्या यज्ञासाठी धुंगारण्यात राहणाऱ्या धर्वण ऋषींनी दिलेले गंध हवे!
वर राजर्षी म्हणतात, आपले शूर कुमार सहजी करतील हे काम.
आयला, एक दिवस यांच्या आश्रमातल्या मुलींना तलवार दाखवत होतो, तेव्हा म्हणाले, कोण आपण, काय काम आहे इथे?
आता आपले शूर कुमार म्हणे! आईची कटकट.”

असे बडबडत राजपुत्र आपल्याच तंद्रीत चालला होता, तेवढ्यात अचानक त्याच्या पोटऱ्यांवर एक चाबकाचा फटका बसला – पूर्वीसारखाच. तो जोरात ओरडला “आऽऽऽव”. मागे वळून पाहिले तर कुणीच नव्हते. तो अजूनच वैतागला.

“मायला काय फटके बसत आहेत मगापासून, पाय हुळहुळला. म्हणून मी म्हणतो कायम चंद्याला, ही अरण्ये आहेत ना, जाळली पाहिजेत खांडववनासारखी दण्णादण्ण.
काय पोच नाही हो. कोवळा म्हणून नाही, राजपुत्र म्हणून नाही. हाणतायत आपले मगापासून. पकडायचे तरी कुणाला?”

अजून किती चालायचे असा विचार करत असतानाच त्याला, राजर्षींनी निघायच्या आधी दोन सूचना दिल्या होत्या, तो प्रसंग आठवला –

“आग्नेय दिशेने निरलसपणे चालत राहायचे. ह्या अरण्यात अश्वारूढ न होता गेलेलेच उत्तम.” राजर्षी म्हणाले.
“हॅहॅहॅ… बोंबला, इथे पूर्वेकडे तोंड केल्यावर उजव्या हाताला दक्षिण एवढेच माहिते. त्यात परत डाव्याउजव्याचा गोंधळ आणि हे महाराज म्हणताहेत आग्नेय दिशेला. शिवाय चालत जायचे! अश्वमेधासाठी राखून ठेवा सगळे अश्व.”
हे विचार मनातच ठेवून राजपुत्राने केवळ गंभीर चर्येने मान डोलावली.
राजर्षींना धृमण एक गहन कोडेच वाटायचा. त्याने यापूर्वी अनेक खडतर आव्हाने पार पाडून राज्याला संकटातून बाहेर काढले होते. स्वत:हून कुठलेही साहसी कार्य करण्यास तो उद्युक्त होत नसे, पण एकदा कार्यारंभ केल्यास यशस्वी होत असे. याउलट त्यांना अनेक साहसी तरुण आठवले, जे पराक्रमी सदैव साहस करण्यास उत्सुक असूनही बहुतेकदा अयशस्वी परत येत. धृमणची अनुत्सुकता हेच त्याचे अमोघ अस्त्र आहे असे त्यांना क्षणभर वाटले.

राजर्षी पुढे म्हणाले, “चालत गेल्यावर काही दिवसांनी एक सरोवर येईल. तिथे तुमची खडतर कसोटी आहे, योग्य निर्णय घेतल्यास तिथूनच तुम्हाला धर्वण ऋषींच्या आश्रमाकडे जायचे मार्गदर्शन उपलब्ध होईल.”
“धन्य आहे या बाबाची – कसली कसोटी ते सांगता येत नाही? एकतर सरोवर, हिंस्र जनावरं पाणी प्यायला येणार तिथे. मगरीबिगरीसुद्धा असतील कदाचित त्यात. पोहायची कसोटी घेतली नाही म्हणजे झालं.
आणि वर योग्य निर्णय घेतल्यास मार्गदर्शन मिळेल – सगळीच संदिग्धता ! वेळीच योग्य निर्णय घेऊन दादाबरोबर युद्धाला गेलो असतो तर बरे झाले असते,”, धृमणाचा संभ्रमित चेहरा पाहून राजर्षी हसून म्हणाले,
“कसोटीचे स्वरूप तर मलाही माहीत नाही. कुमार, धर्वण ऋषींच्या कुठल्याही आज्ञेचे उल्लंघन करू नका, यशस्वी भव.”

परत एकदा धृमणाच्या पोटऱ्यांवर चाबकाचा फटका बसला आणि तो भानावर आला. एव्हाना त्याला फटक्यांची सवय झाली होती. धुंगारण्यात खायला फळे व कंदमुळे पुष्कळ प्रमाणात असल्याने या एकाबाबतीत धृमण आनंदी होता. चांगल्या चवीचे एखादे फळ मिळाल्यावर तो भूक असो व नसो, ते फळ खाऊ लागे व त्याचा सगळा वैताग निघून जाई. असेच एक फळ मिळाल्यावर मार्गक्रमण करता करता तो आनंदाने गुणगुणू लागला –
धुंगारण्यात धुंद मी, खातो गोड कंद मी,
फटके खातो, पण गंधासाठी भटकतो मी…
ओ हो हो, ला, ल्ला ल्ल्ल्ला…ऊ…हो ह्हो… (झांज)

</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>
काही होतच नाहीये यात. म्हणजे खूप चालला धृमण, आता त्याने शौर्य तरी दाखवावे किंवा दया, त्याग यांसारखा एखादा गुण. हा टॅग म्हणजे ब्रेकींग द फोर्थ वॉल आहे. बोस्टन लीगलमधे असायचे तसे. एका एपिसोडमधे डॅनी आणि ऍलन डायरेक्ट शेवटच्या सीनमधे भेटतात. डॅनी म्हणतो, अरे कुठे होतास पूर्ण एपिसोडभर पाहिले नाही मी तुला. असले माहीत असते आपल्याला, फोर्थ वॉल-बिल. बौद्धिक चर्चेला उपयोगी पडते.
“हं, मला आवडते स्क्रब्ज सिरीयल. Mainly because even though, they don’t break fourth wall in conventional manner, it always seems to me that at start of each episode they break fourth wall once and for all.”
असे मी एकदा म्हणालो होतो. लोक येडेच झाले.
कंटिन्यू – दया दाखवावी. माझे टॅग लिहीणारे थ्रेड एवढ्या उशिरा का जागे झाले, अशाने सरळसोट गोष्टच झाली असती की ही.

</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>

गाण्याच्या ठेक्यात थोडेसे बागडतच चालला होता धृमण. त्या लाल प्राण्यावर पाय पडणार एवढ्यात त्याने स्वत:ला सावरले. नीट गुडघ्यावर टेकून पाहिले, तर लाल ससा होता तो. त्याचे डोळे किलकिले होते आणि फारच कष्टी दिसत होता तो. त्याने हळुवारपणे सशाच्या पाठीवरून हात फिरवून त्याला विचारले,
“सशा सशा, लाल सशा, झाले तरी काय तुला, घे थोडे पाणी आणि खा हे फळ.”
ससा म्हणाला,
“नको मला पाणी आणि नको मला फळ. मला फक्त हवी वेळ.”
धृमणाला काहीच कळाले नाही. तो म्हणाला गद्यात सांग बुवा, झेपलं नाही.
ससा म्हणाला –
हो ना यार, मरताना कुठे यमक जुळवतोस! राजकुमारा, मला वेळ पाहिजे, माझा अंत:काल जवळ आला आहे. आम्हां लाल सशांना वर आहे – आम्ही ज्या दिवशी मरणार त्याच्या आदल्या दिवशी सूर्यास्तालाच कळते आम्हांला, की उद्या मरणार आपण. मग पुढच्या दिवसभरात मरणाची वेळ आम्हांला इच्छेनुसार निवडता येते. न निवडल्यास दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताला मरण येते. आज माझा मरणदिन आहे, माझी लाल सशी मला सोडून आधीच निघून गेली. काल रात्री तिने माझ्या स्वप्नात येऊन सांगितले,
“माझ्या प्रिय सशुल्या, उद्या तू सकाळीच एखाद्या उंच झाडावर चढून बस. दुपारी एक सोनेरी गरुड आकाशात दोन घिरट्या घालेल, त्याच वेळी तू म्हण ’गरुडा गरुडा, नेलेस माझ्या सशीला, तसेच ने मला.’ त्या गरुडाने तुला खाल्ल्यास तू आणि मी अनंतकालासाठी एकमेकांचे होऊ.”
परंतु राजकुमारा, काय सांगू दुर्दैव माझे, मी झाडावर चढताना पडलो आणि पायाला दुखापत झाली. आता मी माझ्या सशीला कधीच नाही भेटणार, कारण मला वेळच नाही कळणार, गरुड कधी येणारे त्याची – आणि इथून खालून गरुडापर्यंत माझा मंद आवाज कधीच पोचणार नाही.
धृमण म्हणाला, “अरेच्या, एवढेच ना ससुकल्या? अजून तर दुपार नाही झाली. मी आत्ताच या उंच वृक्षावर चढतो. तुला वेळ तर सांगतोच, पण तुझ्या वाटचे ओरडतोसुद्धा,” एवढे वाक्य पूर्ण करुन धृमण सरसर वृक्षावर चढलाही. वृक्षमाथ्यावर येताक्षणीच त्याने आग्नेय दिशेला पाहिले आणि तो आनंदला, एका विशाल सरोवराचे पाणी उन्हात चमकत होते. सरोवराच्या अलीकडे एक ठळक काळी रेषा दिसली त्याला. ती कसली रेषा असेल हा विचार करत तिकडे टक लावून बघत बसला तो. शेवट असेल कडेला जमा झालेला गाळ म्हणून सोडून दिला विषय त्याने.
थोड्या वेळाने अचानक त्याच्या दक्षिणेकडची झाडे सळसळली. चीं चीं असा उच्चारव करत एक सुवर्णकांतीचे गरुड उडाले आणि क्षितिजाकडे झेपावले. धृमणाची नजर त्याचा पाठलाग करत होती. क्षितिजाला शिवल्यासारखे करून गरुड आपल्या दीर्घ कक्षेतून परतले. आणि पुनश्च एकवार क्षितिजाकडे चालले. धृमणाची खात्री पटली. तो जोरात ओरडला,
“गरुडा गरुडा, नेलेस ह्याच्या सशीला, तसेच ने ह्याला…”
नंतर हळूच पुटपुटला, त्याच्या पायाला लागलंय म्हणून मी ओरडतो आहे, चालले पाहिजे. गरुडाने क्षणार्धात दिशा बदलली व तो सशाकडे झेपावला.

आपल्याकडे येणाऱ्या गरुडाला पाहून ससा आनंदाने म्हणाला,
“राजपुत्रा, तू मला मुक्ती दिलीस. धुंगारण्यातल्या प्रवासात तू कुठे अडखळलास तर फक्त म्हण – लाल सशाला दिली मी वेळ, पण आता कसा सोडवू हा खेळ?”
धृमणाने ओलावल्या नेत्रांनी शेवटचे त्याच्याकडे पाहिले आणि झाडावरून खाली उतरला.

</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>
This is decision box in my Dhruman story flowchart. अजून किती लांबवायची? असे सशासारखे १०-१५ प्रसंग टाकता येतील. आत्ता तो झाडावरून उतरतो आहे, तेव्हाच एखाद्या खारीला दुष्ट मांजरीपासून वगैरे वाचवू शकेल. पुढे १०-१५ संकटेपण टाकता येतील मग ओघाने. खूप लांबड लागेल. अजून बरीच गोष्ट राहिली आहे – सरोवरापाशीपण काहीतरी घडवायला पाहिजे. खरे तर ब्लॉगच्या बाबतीत एक नियम करायला पाहिजे, १०२४*७६८ रीझॉल्यूशनमधे नोटपॅड फुल स्क्रीनमधे उघडायचे, मग विनास्क्रोलबार जेवढे मावेल तेवढेच एक पोस्ट पाहिजे. सध्या एकच प्रसंग पुरे. धृमण दीर्घायुषी होता. अजून एखादी गोष्ट लिहू वाटल्यास.
फॉर्म्युला सही आहे पण, जेवढ्या मदती तेवढी संकटे. एकदाच विचार करायचा *२ कंटेंट मिळते गोष्टीसाठी.
च्यायला, मेल्यावर मी स्वर्गात जाईन का? सशाला मारून टाकले बिचाऱ्या.

</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>

झाडावरून उतरल्यावर धृमणाने चालण्याचा वेग वाढवला. आता सरोवर एकदा बघितल्यामुळे त्याला हुरूप आला होता. त्याच्या अंदाजानुसार अजून एका प्रहरात तो सरोवरापाशी पोहोचला असता. झपाझप पावले टाकत तो जात होता, अधेमधे पोटऱ्यांवर फटके पडतच होते. जसा जसा तो जवळ जात होता, तसा तसा अंधार दाटून येत होता. अजून सूर्यास्ताला बराच अवकाश असताना अंधार का दाटतो आहे अशा विचारात तो चालला होता. हळूहळू आजूबाजूच्या व समोरील वृक्षवेलीही कमी होत गेल्या आणि एक विस्तीर्ण समतल भूभाग सुरू झाला, जेथे क्षुल्लक तृणांकुरांशिवाय जीवनाचे काही अस्तित्व दिसत नव्हते. समोर नीट पाहिले, तर त्याच्या लक्षात आले, उंचावरून दिसणारी ती गडद रेषा म्हणजे एक उंचच उंच काळीकभिन्न भिंत होती. कुठवर ही भिंत पसरली आहे ते पाहण्यासाठी त्याने डावी-उजवीकडे नजर टाकली, तर भिंतीला काही अंतच नव्हता.
विषुववृत्त म्हणतात ते हेच काय असा प्रश्न पडला त्याला क्षणभर. भिंतीला स्पर्श करण्यासाठी उत्सुकतेने तो धावतच जवळ गेला. अतिशय नितळ, गुळगुळीत भिंत होती ती.
पलीकडे सरोवर आहे हे माहित नसते, तर त्याने भिंत ओलांडायचा विचारही केला नसता.
धृमण जोरात हसला व म्हणाला,
“ह्या भिंतीच्या माथ्यावर गेल्यावर गंधाची तरी काय गरज आहे? ढगांना उचलूनच घेऊन जावू राज्यात. राजपुत्रा, चढ बाबा ही भिंत, बापाला तुझ्या राज्य चालवायचे आहे.”

भिंत चढायचा एकच मार्ग होता, आपल्या बाणांचा एक सेतुसोपान तयार करणे व चढून जाणे. अंदाजाने तो मागे चालत गेला. खांद्यावरून आपले धनुष्य काढून त्याने दोन्ही हातात समोर धरले. डोळे बंद करून हळुवारपणे त्यावर माथा टेकवत तो म्हणाला, “जमदग्नये नमः।”
एकवार आकाश भेदणारा टणत्कार करून त्याने प्रत्यंचा खेचली व त्या कृष्णकड्याच्या दिशेने बाण सोडला. त्याच्या मनात क्षणभरही विचार आला नव्हता की, धृमणाचा बाण वाया जाऊ शकतो… भिंतीवर बाण धडकून ठिणग्या उडाल्या तर खऱ्या, परंतु बाण रुतला नाही.
हे असे प्रथमच झाले होते. तो पुटपुटला, “ज्या धृमणाच्या बाणांनी कुब्रपुरीचा हीरकपर्वत भेदून जलस्त्रोत निर्माण केले होते, त्याच धृमणाच्या बाणाचा एका सामान्य भिंतीने अवरोध करावा?” हे प्रकरण मायावी असल्याने याचा उलगडा झाल्याशिवाय पुढचे मार्गाक्रमण अशक्य आहे हे त्याला कळून चुकले.
वर बघत धृमणाने एक गगनभेदी आरोळी ठोकली, “लाल सशाला दिली मी वेळ, पण आता कसा सोडवू हा खेळ?”

आता काय होईल याची कल्पना नसल्याने त्याने सर्व इंद्रिये सज्ज ठेवली. आकाशवाणी झाली, तर कानात प्राण आणून ऐकायला तो तयार होताच. त्याच वेळी गरुडाच्या नजरेने आजूबाजूचे निरीक्षण करू लागला. निमिषार्धातच काळ्या भिंतीच्या दोन्ही बाजूंना दोन लाल रेषा उमटल्या. भिंतीच्या मध्यावर येऊन त्या दोन रेषा एक झाल्या व एकच आरक्त रेषा त्याच्या दिशेने वेगाने धावू लागली. त्या जवळ येताच त्याला कळाले. एखाद्या चपळ घोडदळाप्रमाणे असंख्य लाल ससे त्याच्याकडे धावत येत होते. तो काही बोलणार इतक्यात अग्रभागी असलेला लाल ससा म्हणाला,
“राजपुत्रा, आम्हांला काही प्रश्न विचारू नकोस. ह्या भिंतीच्या खालून सरोवरापाशी पोहोचवाणारे भुयार तयार करून हवे असेल तर फक्त म्हण – शशकेंद्रासाठी गेलो मी वर, माझ्यासाठी खणा चर.”

धृमणाने तसे म्हणताच, विद्युल्लतेच्या वेगाने सशांची रांग भिंतीकडे गेली आणि थेट जमिनीत घुसली. थोडयाच वेळात नाहीशी झाली. धृमण पळत पळत भिंतीकडे गेला, तर एका वेळी चार माणसे जातील असे रुंद भुयार तयार होते. काही विचार न करता तो त्यात शिरला व धावतच राहिला. उतार संपला आणि चढ सुरू झाला, तसे आल्हाददायक रविकिरण चमकू लागले. आणि वाऱ्याच्या थंड झुळका वाहू लागल्या. बाहेर पडल्यावरचे दृष्य विहंगम होते. धृमण जोरात ओरडला,
“मायला! राजर्षींचा विजय असो. हे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी मी चालत काय, रांगतपण आलो असतो!” समोर अथांग पसरलेले निळेशार सरोवर, चोहोबाजूला पिवळी फुले, उगाचच उंच उड्या मारत कस्तुरीगंध पसरवणारे मृग आणि मंद कूजन करणारे पक्षी.
धृमण बराच वेळ वेड्यासारखा हसला आणि म्हणाला,
“येथे कसली कसोटी? अशा रम्य जागी हिंस्र श्वापदांशी युद्ध जरी केले, तरी त्यात रंभेसह प्रणयाचा गोडवा असेल.” आपले विचार भरकटायला लागले हे लक्षात येऊन तो एकदम भानावर आला व कसोटीचा विचार करू लागला. सरोवराचे पाणी प्यायला जायचे नाही हे त्याने आधीच ठरविले होते. ते मनात पक्के केल्यासारखे तो म्हणाला,
“या अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात हो. माहीत नाही तर कशाला प्या नं पाणी? मायावी बियावी असतंय हे असलं. खाण्याचे ठीक आहे, पण आपलं आपलं आणलेले पाणी प्यावे माणसाने.”

</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>
या पॉईंटला मी थकलो आहे. एक भिंत ओलांडली भुसनळ्याने आणि शंभर ओळी त्याच्यावर. आत्तापर्यंत कसोटी होऊन गोष्ट संपायला पाहिजे होती. आणि जमिनीत बाण मारून भुयार खणायची कल्पना धृमणाला सुचली होती, पण वेळ गेला असता त्याने. आठवडाभरात गंध घेऊन, परत जाऊन, यज्ञ करून पाऊस पाडायचा आहे.
बोर लिहितो राव मी जाम. असू दे. भिंत ओलांडायला खरं अजून एक ऑप्शन होता. भिंतीला दरवाजा असणार आणि मंगलसिंग गार्ड असणार अशीही कल्पना मनात आली होती. मग त्याला हरवायला ससे कसेतरी मदत करणार. म्हणजे मंगलसिंगला या गोष्टीत टाकले असते ना, तर जब्बरी बॅकरेफरन्स झाला असता. टॅरँटिनोसारखं. पण नको, आधीच एक लिंक आली आहे आधीच्या पोस्टची.
शिवाय “मी गेलो वर, मला खणा चर,” हा यमक आवडला माझा मलाच. इथे युद्ध नको टाकायला, रम्य प्रदेशाचे मातेरं होईल. धृमण शूर आहे, पण शक्यतो सामोपचाराने घेतो तो. मागे त्याने कुब्रपुरीचा हीरकपर्वत भेदला, तेव्हा केले होते त्याने विकट, फीअर्स असे युद्ध.
एका बैठकीत हे सर्व कोणी वाचू शकेल का? नाही, हे सर्व कोणी वाचू शकेल का?
टॅग लिहिण्यातपण वेळ जातो यार. पुढे. आता लवकर संपवू या राव.

</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>

राजपुत्र आता आजूबाजूला कुठे आश्रम दिसतो का ते पाहू लागला, पण कुठेही आश्रमाचे चिह्न नव्हते, की कुणा मनुष्याची चाहूल नव्हती. त्याच्या कानांनी वेगळाच आवाज टिपला. गोड आवाज होता तो, पण पक्ष्यांचा निश्चितच नव्हता. सरोवराच्या शांत निळ्या पाण्यात अरंख्य जलतरंग उमटले… व एक आकृती प्रकटली. धृमणाने त्या ललनेकडे पाहिले. आधीच त्याला ह्या प्रदेशाचे सौंदर्य सहन होत नव्हते, त्यात ही आता. साक्षात सौंदर्यच त्याच्यासमोर उभे होते. केशरी, पिवळ्या फुलांचा माळा घालून श्वेत वस्त्र ल्यालेले सौंदर्य!
आपसूकच तो म्हणाला,
“ओह…फक!” (धृमणाला भावना अनावर झाल्या, की तो विचित्र अगम्य भाषेत काहीतरी बरळू लागे.)
सावरून तो म्हणाला, “सादर वंदन… आपण कुठल्या देवी? क्षमा करा, मी ओळखले नाही.”
मंजुळ आवाजात खळखळून हसत ती युवती म्हणाली,
“राजकुमार, मी कोणी देवी नाही. धर्वणआश्रमात प्रवेश करण्याआधी मी प्रत्येकाची परीक्षा घेते. यात उत्तीर्ण होणाऱ्यांनाच आश्रमात प्रवेश मिळतो.”
कसली परीक्षा आता, हे धृमणाच्या मुद्रेवरचे भाव वाचून ती म्हणाली, “राजकुमार, मी तुम्हांला तीन प्रश्न विचारीन. त्यातल्या दोन प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे दिलीत, तरच तुम्हांला धर्वण ऋषींचे दर्शन लाभेल. लक्षात घ्या कुमार, बरोबर किंवा चूक उत्तराची अपेक्षा नाही. तुमच्या अंतर्मनातील प्रामाणिक उत्तर द्याल, तरच तुम्हांला प्रवेश मिळेल.”
धृमणाने विचार केला, हे बरं आहे राव. कटकट नाही. नाहीतर काही जणांना जाम अवघड कसोट्या द्याव्या लागतात. आपण आपले मनात येईल ते सांगायचे. वा. धर्वण चांगला आहे बुवा माणूस. विचार थांबवून तो म्हणाला,
“विचारा प्रश्न.”
हलकेच हसत ती युवती म्हणाली, “विचारते, पण अजून एक. कृपया मला समजेल अशा शुद्ध भाषेत उत्तर द्या. मगाशी काहीतरी अगम्यच…” धृमणाने हसत मान डोलावली व मनातल्या मनात इष्टदेवतेचे स्मरण केले.

“पहिला प्रश्न, जीवनात सर्वांत वाईट व्यसन कोणते?”

धृमण आत्मविश्वासाने बोलू लागला,
“मद्य, वारांगना, द्यूत अथवा तत्सम व्यसने धरतीच्या कानाकोपऱ्यात पसरली आहेत व ती स्वाभाविकपणे वाईटच आहेत. परंतु माझ्या मते जीवनात सर्वात वाईट व्यसन अध्यात्माचे, आपले काम सोडून अविरत भक्तिमाहात्म्य आळवण्याचे.
जेव्हा मनुष्य विवेक विसरून कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करतो, तेव्हा ते व्यसन म्हणून गणले जाते. प्रत्येक व्यसनाने मनुष्य कर्तव्यच्युत होतोच. मद्य वा द्यूत या प्रकारच्या व्यसनांनी पोखरलेल्या मनुष्याला जाणीव असते, की तो वाममार्गाला लागला आहे; परंतु अध्यात्माचे व्यसन भल्याभल्यांना कर्तव्याचा विसर पाडते. ह्या व्यसनाने आजवर भूतलावर अनेक राज्ये, साम्राज्ये लय पावली आहेत.
कर्म करून ईश्वरसाधना करणाऱ्या सजीवासारखा पुण्यवान जीव नाही आणि ऐहिक कर्तव्ये टाळून, भक्तीचा अतिरेक करूनही स्वत:स पुण्यवान समजणाऱ्यासारखा दुर्दैवी जीव नाही.
ते सर्वात वाईट याकरिता, कारण ज्याला हे व्यसन जडले आहे तो मनुष्य स्वत:स व्यसनी तर समजत नाहीच; पण समाजही अध्यात्माच्या व्यसनाला व्यसन समजत नाही. इतर प्रकारच्या व्यसनी लोकांना समज देण्यात येते, त्यांची हेटाळणी होते परंतु अध्यात्मापायी आपले कर्तव्य टाकून पळालेल्या लोकांचे समाज गुणगान गातो.
साक्षात भगवंतांनी कर्माचे महत्व विषद करून अर्जुनास युद्धास भाग पाडले. भगवंतांचा कर्माचा उपदेश अंगी बाणविताना यश, अपयश प्राप्त करणाऱ्यांच्या कर्माची व वर्तणुकीची विश्लेषणे होतात. तर केवळ त्या उपदेशाचे निर्हेतुक पाठ करून उपदेश करणाऱ्यांवर अविमृष्य श्रद्धा ठेवली जाते!
जर बाह्य साधनांनी क्षणभर मन निर्विकार करून आनंद शोधणाऱ्यांचा तिरस्कार केला जातो, तर अनंत काळाच्या सुखाच्या अनुभूतीच्या मागे लागणारे, मोक्षासाठी सर्व विधित कर्तव्ये विसरून झटणारेसुद्धा तीव्र तिरस्कारास पात्र नाहीत का?
देवी, अध्यात्माचे व्यसन वैयक्तिक पातळीवर क्षती तर पोहोचवतेच, शिवाय ते पूर्ण समाजपतनासही कारणीभूत ठरते,”
धृमणाने क्षणभर श्वास घेतला व म्हणाला,
“देवी, क्षमा असावी, उत्तर योग्य असेल वा अयोग्य. प्रामाणिक उत्तर द्यायचे आहे, म्हणून मी हे उत्तर दिले. राजर्षी, धर्वण व या धरेच्या भल्यासाठी झटणाऱ्या असंख्य कर्मयोगी ऋषिगणांच्या प्रति मला अतीव आदर आहे.”

धृमणाने असे म्हटल्यावर युवतीची गंभीर मुद्रा बदलली व ती म्हणाली, “कुमार, पुढच्या वेळी थोडक्यात उत्तर दिले तरी चालेल.”

“दुसरा प्रश्न, सौंदर्य श्रेष्ठ का बुद्धिमत्ता?”

धृमण पूर्वीच्याच आत्मविश्वासाने बोलू लागला,
“दोन्ही समसमान हे साहजिक उत्तर आहे. किंबहुना बुद्धिमत्तेला नेहमीच श्रेष्ठ समजले जाते. पण देवी, माझ्या मते, सौंदर्य हेच बुद्धिमत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे. एखाद्या व्यक्तीला परिश्रमाने ज्ञान ग्रहण करता येते, पण सौंदर्य आणि बुद्धिमत्ता ईश्वरदत्तच असते. दोन्हीही धारण करणाऱ्यांना ते मिळविण्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत. बुद्धिमत्ता मरेपर्यंत सोबत असते, तर सौंदर्य हे केवळ तारुण्यात. या कारणाने सौंदर्याला नेहमीच हिणवले जाते व बुद्धिमान लोकांना आदर दिला जातो. ह्याच अन्यायामुळे माझा कल सौंदर्याकडे आहे. त्यामुळे आयुष्यभर आपल्या पुंजीतले केवळ अंश पुरवणाऱ्या बुद्धिमत्तेपेक्षा तारुण्यात आपले सर्वस्व उधळून देणारे सौंदर्यच श्रेष्ठ.”

युवती किंचित संभ्रमित झाली होती. धृमणाचे विचार मनापासून न पटल्याचे तिच्या चर्येवर स्पष्ट दिसत होते. पण निमिषार्धातच पूर्ववत स्मित देवून ती म्हणाली,
“राजपुत्र धृमण, आपली उत्तरे प्रामाणिक आहेत व तुम्हांला धर्वणाश्रमात आदराने प्रवेश मिळेल. तिसरा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही, परंतु आपली इच्छा असल्यास मी तो विचारीन.”

धृमण त्वरेने म्हणाला, “नको नको देवी, शक्यतो काम टाळणे व तरीही मिळालेच तर मनापासून करणे असा माझा स्वभाव आहे. तेव्हा आपण लवकरात लवकर गुरुजींकडे जाऊन गंध घेऊ. मंडळी खोळंबली आहेत घरी.”
त्याच्या या बालिश उत्तरावर खळखळून हसत युवती म्हणाली,
“राजकुमार, प्रामाणिकपणे उत्तरे द्यायची कसोटी संपली आता. मला आता धवलिका म्हणा आणि चला लवकर आश्रमाकडे. बाबा वाट पाहत असतील.”
ती पाण्यातून पूर्णपणे बाहेर आली. आपला हात पुढे करून म्हणाली, “डोळे मिटून माझा हात धरा.”
धृमणाच्या मनात आले, हात तर पकडीन गं बाई, पण जातेस कुठे? पुढे पाणी, मागे काळी भिंत आणि भुयार. त्याला असे विचारात थांबलेले पाहून धवलिका म्हणाली,
“काळजी करू नका, मी सुखरूप आश्रमात घेऊन जाईन तुम्हांला.”
धृमणाने तिचा हात धरला व डोळे मिटले. डोळे उघडले, तेव्हा तो एका स्वच्छ कुटीत होता. पुढे सरोवर तसेच होते, तर मागे काळ्या भिंतीच्या इथे लांबलचक काळीभोर जमीन होती.

</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>
संपली आहे आयडियली गोष्ट आता, पण मनात आहे ते सगळे उतरवावे. सगळीकडे का मन मारा? ’फक’ शब्द मधे घालणे गरजेचे नाहीये, पण योग्य आहे तो शब्द तिथे. आटपतोच आता १०-१५ वाक्यांत.
बोर आहे, its more of a kissing sort of scene towards the end of the story.

</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>

प्रसन्न मुद्रेने बसलेल्या धर्वणांना राजपुत्राने साष्टांग प्रणाम केला. राजपुत्राला गंध लावून ऋषी त्याच्याकडे सस्मित मुद्रेने पाहू लागले.
धृमण उतावीळपणाने म्हणाला, “गुरुजी, आणि मला राज्यात न्यायला गंध?”
ऋषी म्हणाले, “धृमणा, तुझ्या राज्यात पर्जन्यवृष्टी सुरू झाली रे आधीच.”
तेवढ्यात धवलिकेने कुटीत प्रवेश केला व म्हणाली, “बाबा, झाली सर्व व्यवस्था.” प्रवेशद्वारापाशीच ती संकोचून उभी होती.
धृमणाने तिच्याकडे पाहिले, तेव्हा त्याला प्रश्न पडला, काही क्षणांपूर्वी आपली कसोटी घेणारी ती हीच का?

“तू आता सरोवरी स्नान करून घे. मग थोडेसे अन्नग्रहण करून याच कुटीत निद्रा घे. प्रात:समयी मी समोरच्या त्या ध्यानकुटीत असेन. जा, सरोवराचे पाणी कोमट केले आहे.”
धृमणाने परत प्रणाम केला व तो उठला. जाताना त्याने धवलिकेकडे पाहिले, तर ती तशीच संकोचून पायाच्या अंगठ्यांनी माती उकरत उभी होती.

दुसऱ्या दिवशी पहाटे जाग आल्यावर धृमणाने स्नान आटोपले व तो ध्यानकुटीकडे गेला. त्याला बसायची खूण करून ऋषी म्हणाले,
“धृमणा, तू इथवर प्रवास करून आलास. आम्ही कसोटी घेतली, तर आम्हाला अधिकार न विचारता नम्रपणे प्रामाणिक उत्तरे दिलीस. आमच्या मनात आपण तुझ्या उपयोगी पडावे असे आहे. तुझ्या मनातला वर माग.”
धृमण म्हणाला,
“पण गुरुजी, आपणांमुळे तर पर्जन्यवृष्टी सुरू झाली आहेच माझ्या राज्यात. मी ज्याच्यासाठी आलो ते कर्तव्य पार पडले. मला आणिक काही वर नको.”
धर्वण हसून म्हणाले, “पर्जन्यवृष्टी तर निसर्गाने केली. असो. तुझ्याविषयी ऐकले ते खरे आहे म्हणजे. तू मागितला नाहीस, म्हणून आम्ही वर देऊ नये असे नाही.”
आपल्या कमंडलूमधले पाणी त्याच्या माथ्यावर शिंपडत ते पुढे म्हणाले, “वत्सा, तुझ्या हातून सुटलेला बाण कुठ्ल्याही इच्छित गोष्टीला भेदू शकेल. ती गोष्ट मायावी असल्यास बाण माया भेदेल.”
“कूल!”, धृमणाला आपला आनंद लपविता आला नाही. त्याने ऋषींना साष्टांग नमस्कार केला.

“वत्सा, एक इच्छा आहे माझी. तुला शक्य असल्यास होय म्हण,” ऋषींचे वाक्य पूर्ण होण्याआधीच धृमण म्हणाला, “आपली इच्छा ही मजप्रत आज्ञा आहे गुरुजी.”
“धवलिकेने तुमच्या राजर्षींच्या आश्रमात यापुढील अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे. तुला शक्य असल्यास तू तिला राजर्षींच्या आश्रमात पोहोचते करशील का?”
धृमणाने शक्य तेवढ्या निर्विकार चेहऱ्याने होकार दिला.

निघण्यापूर्वी धर्वणांनी राजपुत्राला दोन अबलख अश्व दिले. धवलिकेच्या डोळ्यातले पाणी पुसून ते म्हणाले, “मुलांनो, या अश्वांना केवळ टाच मारा. सूर्यास्ताच्या आत तुम्ही राजर्षींच्या आश्रमापाशी पोहोचाल,” धवलिकेकडे बघून ते पुढे म्हणाले, “वाटेत काही संकटे आली, तर राजकुमार समर्थ आहेतच.”

दोघांनीही धर्वणांना पुनश्च एकवार वंदन केले व ते प्रस्थान करणार एवढ्यात धृमण म्हणाला,
“गुरुजी, एक विचारायचे राहिले, इथले ससे लाल कसे? फारच गूढ आहेत ते.”
धर्वण म्हणाले, “अरे, जाताना धवलिकेशी काहीतरी बोलशील का नाही? बघ किती उदास दिसते ती. तिला विचार नंतर याचे उत्तर.”
या अनपेक्षित उत्तराने थोडासा गांगरून धृमण पुढे म्हणाला, “आणि धुंगारण्यातून येताना सतत मला पोटऱ्यांवर मार बसत होता तो काय प्रकार आहे?”
धर्वण परत हसून म्हणाले, “आता निघतोस का नाही, सूर्यास्ताच्या आत पोहोचायचे आहे ना? परत धवलिकेला माझ्याकडे सोडायला येशील तू. कदाचित नंतरही येशील वारंवार. तेव्हा कधीतरी एकदा तुलाच उकलेल ते गूढ.”

</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>
च्यायला संपली एकदाची. डोक्याला ताप. शेवटच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आहेत माझ्याकडे. काहीतरी फिलॉसॉफिकल लिंका जुळवायच्या आपल्या. पण अशी उत्तरे गोष्टीत सांगितली नाहीत की भारी वाटते एकदम. हे पोस्ट करण्यापूर्वी परत एकदा वाचणे म्हणजे शिक्षा आहे. गोष्ट नको, पण टॅग आवर.
टॅग गाळले, ’फक’, ’कूल’ गाळले तर कसे होईल? नको तसे.
मधेच धृमणाला मारून टाकावे, असे मनात आले होते. झाडावरुन उतरताना पडून मरतो तो, असे. तिकडे त्याचा भाऊ पण मरतो युद्धात. मग धवलिका गंध घेऊन जाते त्याच्या राज्यात आणि राज्य करते. असे सगळे मनात आले होते, पण लयच इन्सेन्सिटीव्ह झाले असते.

होल्सेलमधे झाले हे पोस्ट एकदम.

</गोष्ट लिहीणारे मेंदूमधले थ्रेड>

http://bashkalbadbad.blogspot.com/2009/07/blog-post.html

Uncategorized

रंगुनी रंगांत सार्‍या…

तुझ्या कथा, तुझ्या कविता.
तू लिहितोस त्यातला शब्द-न्‌-शब्द, वाक्य-न्‌-वाक्य मला तुला अभिप्रेत असलेल्या अर्थासहच जाणवावं असा हट्टाग्रह का तुझा?
का समजावून देऊ पाहतोस प्रत्येक ओळ मला?
तुझं लिखाण वाचताना माझ्यापासचं अनुभूतींचं गठुळं मी का सारायचं बाजूला?
तू लिहिताना त्यात तुझं तुझेपण ओतलंस, मी वाचताना माझं मीपण ओतते.
त्या वाचनाचा पहिला अनुभव तरी माझा मला एकटीला घेऊ देत. उगाच प्रस्तावना देत बसू नकोस.
मला वाटलं तर घेईन तुला विचारून, का-कधी-कुठे सुचलं हे तुला.
काही काही शब्द मला ’कळणार’ नाहीत. अवघड वाटतील.
वाटू देत.
तू तरी कुठे ’कळला’ आहेस मला?
अरे ते सोड, मी तरी कुठे कळली आहे मला?
पण कळत नसलेली प्रत्येक गोष्ट आवडत नाही असं नाही काही.
उलट मला तर कळत नाहीत त्याच गोष्टी जास्त आवडतात कधी कधी!
म्हणजे झुंजता येतं रे त्यांच्याशी… मस्त कुस्ती खेळता येते…
अशी दाबायची एका वाक्याची मुंडी बगलेत… अस्सं लोळवायचं घोळवायचं त्याला तासभर डोक्यातल्या तांबडमातीत… दोघंही जॉकी बिल्डिंगीतल्या पैलवानांसारखे धूळमाखले होईतोवर. कधी कधी आपटी खावी लागते मलाच… पण जेव्हा त्या वाक्याला उताणं पाडायला जमतं तेव्हा काय लाख आनंद होतो!
मग मी विजयोन्मादात तुला सांगत येणार… हे बघ, हे चित्र दडलंय तुझ्या त्या वाक्यात!
आणि तू चक्क हिरमुसणार?
’मला हे असं नव्हतंच म्हणायचं’ म्हणणार?
अरे पावसाच्या पोरा, माझ्या गर्भात मी हौसेनं पेरून घेतलेल्या तुझ्या शुक्राणूचं जितंजागतं बाळ मी तुला कौतुकानं दाखवायला आणलंय आणि तू मात्र ’याच्याशी माझा संबंध नाही हां’ म्हणत त्याला झटकून टाकतो आहेस? मला माहिती आहे ते ’तुझं’ नाहीये… पण तुझ्यामुळे आहे हे सत्य नजरेआड करता नाही यायचं तुला. आणि समजा तिकडे काणाडोळाच केलास तू, तरी गोजिरवाणं ते बाळ, त्याचं आल्यागेल्यासारखं कौतुक तरी करशील!
तुझं म्हणणं, तुझी कविता एकसंध शिल्पासारखी. ती तुझ्यासारखी जिला कळेल ती तुझी सिंड्रेला.
पण मला माहितीये, कसे तुकडे तुकडे सांधून शिल्प बनवलंयस तू ते. मला एक्कच तुकडा हवाय त्यातला. म्हणजे तुझ्या त्या शंकराच्या पायाच्या अंगठ्याचं नख. किंवा त्या नटराजाचा मुकुटमणी. माझ्याकडे माझे स्वत:चे कित्ती कित्ती तुकडे आहेत… आणि माझ्या तुकड्यांना तुझ्यातला एकुलता तुकडा परिपूर्ती देणारेय. “घेऊ नको” म्हणूच शकत नाहीस तू. एकदा तू तुझं शिल्प मला दाखवलंस की ते माझ्या डोळ्यांचं झालं. ग्रीकांची शिल्पं हुबेहूब नकलणार्‍या रोमनांचा वारसा मिरवते म्हटलं मी. तुझ्या नटराजाचा मणी भंगला तर भंगेल कधी. पण माझ्या परकर्‍या पोरीच्या कानात डूल म्हणून जाऊन बसलेला तो मणी काही तिथून हटायचा नाही.
___

आदित्यराणूबाई, आज तुम्ही आमच्याच कवितेवरचं निरूपण दाखवायला आणलंत आम्हांला. खरं सांगावं तर अभिमान वाटला तुमचा. पण तुम्हांला जे काय दिसलं होतं ते फक्त तुमचं होतं – आमचे शब्द फक्त निमित्तमात्र. म्हणजे उंच डोंगरावर अगदी ओसंडायला आलेली एक तळी असावी आणि एका ढगानं उगाच मुतल्यासारखी एक धार तिच्यात सोडली की धबाधबा पाणी वाहातं व्हावं असा तो प्रकार. आता बघा, हे असं कधी निसर्गात होत नसतं. पण असं व्हावं असं आम्हांला बुवा वाटतं. त्यामागे आम्ही आंबोलीला गेलो होतो तेव्हाची एक आठवण आहे दडलेली.
विचारलंत, कोणती आठवण होती ते विचारलंत?
अहो, तुमची ही उत्सुकता आमच्याशी प्रत्यक्ष बोलताना जशी दिसते… तशी ती जरा आमच्या कविता वाचताना दिसूद्यात कधी, एवढंच म्हणतो झालं.
तुम्ही आत्ममग्न, तुम्ही स्वयंपूर्ण, तुमच्या संततीला बापाची गरज फक्त बीजरूपानं – हे का आम्ही ओळखत नाही? पण तुम्हांला बीज म्हणून जे दिसतं आहे, ती आणखी कुणाची संतती आहे… तिचं ”त्याला हवं तसं’ कौतुक व्हावं अशी त्याची अपेक्षा आहे हो. अवाजवी असेल ही अपेक्षा, पण अमानवी नक्कीच नव्हे. आणि तुमच्यासारखे शहाणे दिसणारे लोक अशी उत्सुकतेशिवायची पुनर्निर्मिती करू जातात तेव्हा वाईट वाटतं इतकंच. मी अमूर्त शैलीत काढलेल्या रेड्याच्या चित्राचं तुम्ही ’किती गोंडस उंदीर’ म्हणून कौतुक करून वर त्याच्याशेजारी आपला गणपती आणून बसवणार आणि आम्ही त्या अख्ख्या सजावटीत धन्यता मानावी असं म्हणणार? नाही, विनोदी आहे ही उपमा. आम्ही धन्यताही मानूच. पण तुमच्या विश्वामित्री प्रतिसृष्टीला कधी कधी वल्गनेचा वास येतो. आमची मूळ सृष्टीच काय, पण तिच्या इतर सार्‍याच प्रतिकृती तुम्हांला क:पदार्थ वाटायला लागतील अशी भीती वाटते. “तुम्हांला आतून जाणवलेले सर्व सर्व तुमच्यासाठी सत्य”, हे बरोबर. पण अधूनमधून इतरांना जाणवलेले त्यांच्यासाठीचे सत्य न्याहाळत चला. तुमची जाणीव अधिक खोल होईल. स्वत:च्याच विचारांचं डबकं नका बनवू. सर्व जलौघांना सामावणारा समुद्र बनू देत त्यांना.
___

होय आहेच माझी अपेक्षा – मी लिहिलेल्या ओळींचा मला अभिप्रेत असलेला अर्थच तुला समजावा अशी. आणि हीच माझ्या मनातल्या सिंड्रेलासाठीची कसोटी आहे हेही बरोबरच ओळखलंस तू. लाकूड तासून तासून एकही खिळा न वापरता नौका बनवावी तितक्या काळजीपूर्वक शब्द तासून बसवतो मी माझ्या निर्मितीमध्ये. काय बिशाद आहे की कुठे फट राहील नि पाणी आत शिरेल! एक शब्द इकडचा तिकडे झाला की भाव बदलला वाक्याचा. आणि तू म्हणतेस तुला सांगूच नको मी, तो भाव काय होता? मनात थेंबा-थेंबानं झिरपलेले विचार – काही तर कित्येक वर्षांपासून झिरपत आलेले – ते गोळा होऊन बनलेली ती ताडी. तुला तिची चव ’झेपली’ आहे की नाही ते कळायला नको मला? माझ्या भाषेचं प्रयोजन म्हणजे माझ्या मेंदूत उमटलेला भाव तुझ्यापर्यंत पोहोचवणं. त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता तू हपापल्यासारखं गटागटा सगळं वाचणार, त्यात चार-पाच शब्द पूर्णपणे चुकीचे वाचणार, दहाबारा शब्दांच्या जागा बदलणार, एखादी ओळ तुझ्या डोक्यातच नाही शिरणार – आणि मग त्या कच्च्या पायावर तू स्वत:च्या कल्पनेचे इमले उभे करत सुटणार. कुस्तीबिस्ती खेळलीस तरी तूच बांधलेल्या आखाड्यात. तुझ्या त्या प्रथमदर्शनी कल्पनेचा काहीच प्रभाव त्या कुस्तीत राहात नाही तुझ्यावर, असं छातीठोकपणे सांगत असशील तर मानतो.
आपला तो गाणारा मित्र एकदा म्हणाला नव्हता,’ गाण्यानंतर इतर सगळ्यांनी केलेलं कौतुक आवडत नाही असं नाही – पण ज्याला गाणं ’कळतं’ त्याची शाबासकी मिळाली की फार छान वाटतं.’ माझंही तसंच आहे काहीसं. मी शब्दांच्या माध्यमातून ’ये हृदयीचें ते हृदयीं’ घालू पाहातो आहे. ते मला हवं तसंच समोरच्याच्या हृदयात पोहोचलं तर जो आनंद होतो तो वर्णनातीत. त्यात माझ्या प्रकटीकरणाचा जसा सन्मान आहे तसाच त्या व्यक्तीच्या जाणतेपणाचाही. तू अशी जाणती वाटलीस म्हणून तुझ्याकडे आकृष्ट झालो. पण मग जाणवलं की एकमेकांना छेदून जाणार्‍या आपल्या अनुभवविश्वांच्या सामाईक तुकड्यातलं माझं लिहिणं तुला कळतं जसंच्या तसं. पण उरलेल्या त्या ’केवळ माझ्या’ विश्वाचं काय? ते तर तू पाहिलंही नाहीयेस. तुला ते मी न सांगता कळावं अशी अपेक्षा कशी ठेवावी मी? नाहीच कळायचं तुला मी सांगितल्याशिवाय ते. तुला पहिल्यांदा नहाण आलं तेव्हा तुला काय वाटलं होतं ते कुठे कळलं होतं मला तू सांगितल्याशिवाय?
हौसेनं गर्भात पेरून घ्यायला निर्मितीचं बीज म्हणजे हौसेनं नाक टोचून ल्यायचा खडा नव्हे. आयुष्यभराचं आईपण पेलण्याची तयारी आहे की नाही याचा विचार कर आणि मग बोल… नाहीतर मूल जन्माला घालून मोकळी होशील आणि त्याला काय म्हणायचं आहे ते कधीच लक्षात घेणार नाहीस.
___

त्याचं काही ऐकू नको आदीमाऊ तू. एकदा त्याच्या काळजाजवळच्या मतांच्या विरोधात काही बोललीस की बालेकिल्ले उभे करत बसतो शब्दांचे. तोच म्हणतो तशा विटा अशा तासून बसवत जातो की वार्‍याला आत शिरता येऊ नये. हे स्वत:ला विज्ञाननिष्ठ म्हणवणारे लोक असेच! अरे साहित्यनिर्मिती करता आहात… प्रयोगांची निरीक्षणं नाही नोंदवत आहात काही. ’आपले शब्द वस्तु्निष्ठ पद्धतीने स्वीकारले जावेत, व्यक्तिनिष्ठ पद्धतीने नव्हे’ याची काळजी शोधनिबंध लिहिताना करावी(च). शोधनिबंध लिहिताना(च) करावी असं नाही. कायदे, नोटिसा, बातम्या – अनेक प्रकारचं लिखाण आहे जिथे अशी एकेका शब्दाला मोजा-मापायची गरज असते, अन्यथा अनर्थ उद्भवतो. पण महाशय ’साहित्यनिर्मिती’ करताहेत. भावनांच्या प्रकटीकरणाचा खेळ मांडताहेत. (आता चिडेल बघ या शब्दप्रयोगावर. त्याच्या लेखी लिहिणं हे केवढं सीरियस काम! जणूं खेळ मांडणं फार भुक्कड असतं. अरे लिहिताना याची काय तंद्री लागत असेल एवढी माझ्या चिऊची तंद्री लागते रोज घराबाहेरच्या बांधकामाच्या ढिगात दगडगोटे शोधून मांडऽऽऽऽऽऽत बसताना.) तर यानं एक गोष्ट लिहिली आणि ती वाचून तुला प्रतिक्रियेदाखल काही स्फुरलं तर यानं त्याला त्याच्या अपेक्षेनुसार प्रतिक्रिया मिळाली नाही म्हणून का धुसफुसावं? त्याच्याच शब्दांना तू नवा अर्थ दिलाहेस हे स्वीकारण्याइतकं त्यानं तरी मोकळं का न व्हावं?
___

सम्राट, आपल्यासमोर वाद चालला असेल तर कुण्या एकाची बाजू घेऊ नये. विशेषत: आपलाच पुरेसा विचार झाला नसेल त्या विषयावर तर. आणि आजचे प्रतिद्वंद्वी तुल्यबळ आहेत. एकमेकांशी युद्ध खेळतानाच एकमेकांना स्वत:चे डावपेच शिकवताहेत. बघ वाद संपे-संपेतो दोघंही अजून जास्त कळायला लागतील एकमेकांना. तटबंदी मजबूत असेल आपापली, पण गवाक्षं नक्की उघडतील. आम्हीही थोडे विचलित झालो होतो सुरुवातीला, पोरीचा हेका बघून. पण आता वाटतं ’वादे वादे जायते तत्त्वबोध:’ मध्ये खरंच काही तथ्य असावं. आता कुणी तिच्यासमोर व्यक्त होत असेल तर ती थोडं अजून बारकाईने ऐकेल – ’आपण ऐकतो आहोत तेच त्याला म्हणायचं आहे का’ या विचाराला ’काय फरक पडतो?’नं धुडकावून लावणार नाही कदाचित. आणि तो कदाचित ’आपली निर्मिती थोडी तटस्थपणे पाहायची असते’ या विचाराला थोडी जागा देईल मनात.
भावनांना शब्दरूप देणं म्हणजे कॅलिडोस्कोपमध्ये काचांचे तुकडे मांडणं. येणारा प्रत्येकजण स्वत:ला हवं तसं त्यांना फिरवणार, दर वेळी एक वेगळीच आकृती त्याला दिसणार – हे त्याला जाणवायला लागेल. ’आपली कला नितळ व्हावी’ असं कोणत्या कलाकाराला वाटत नाही? नवनिर्मिती हातून घडताना ती ज्या भावभावनांसकट निपजली, त्याच जर तिचा आस्वाद घेणार्‍या व्यक्तीच्या मनात उमटल्या तर तो निर्मात्याच्या अट्टाहासाचं सार्थक झाल्याचा क्षण हे का आम्हांला ठाऊक नाही? पण समजा तसं झालं नाही तरीही ती निर्मिती उणी ठरत नाही, उलट निर्मात्यानंही न कल्पिलेले भाव ती पाझरवू शकते – ती निर्मात्याहून स्वतंत्र होते – कदाचित त्याच्याहून मोठी! तो धास्तावल्यासारखा वाटतो तो याच कल्पनेनं की काय? पण मी सांगू, त्याच्या लिखाणाला आपले चेहरे चिकटवणार्‍या लोकांची धास्ती घेऊ नये त्यानं. आपले विचार त्याला करू देऊन, त्याच्या विचारांबाहेर जगच नाही असं त्याला वाटायला लावणार्‍या लोकांची धास्ती घ्यावी!!!
___

“It comes about that if anyone spends almost the whole day in reading, and by way of relaxation devotes the intervals to some thoughtless pastime, he gradually loses the capacity for thinking, just as the man who always rides forgets how to walk. This is the case with many learned persons; they have read themselves stupid.” : Schopenhauer

गायत्री नातू

http://bolaacheekadhee.blogspot.com/2009/06/blog-post.html

Uncategorized

चल तर जाऊ…

हे कृष्णसखे,
आवर गं आवर तुझे अश्रू. यमुनेला पूर कसा अनावर झालाय बघ. वासरं अगदी कासावीस झालीत. आयांच्या मानेखाली तोंड खुपसून भीती लपवण्याचा प्रयत्न करतायत. हा पूर आवरायला तो नाही गं इथे कुठे. एका करंगळीवर अख्खा दुःखाचा डोंगर लीलया पेलणारा तो नाही येणार आता. बेईमान, आता कसा डोंगरायेवढं दुःख तुझ्या पदराशी बांधून गेलाय. तू तर कधी कुंतीसारखं दुःख मागितलं नव्हतंस! किंबहुना तू तर कधी काही मागितलंच नव्हतंस. मागणारा तो होता, हट्ट करणारा तो होता, झाकून दडवून ठेवलेलं चोरून नेणारा तो होता आणि लाडीगोडीनं बळजोरी करणाराही तोच होता. तू फक्त कायम होकार भरत राहिलीस. अगदी जेव्हा तो जाण्यासाठी निघाला, तेव्हासुद्धा तू मुक्यानेच फक्त हो म्हणालीस. तुला खात्री होती, की जर तू म्हणाली असतीस,” कान्हा, नको रे जाऊस” तर तो गेला नसता. खरंच?

तो यशोदेचा पोर त्या वेळूच्या बनातून त्याला घरी पोचवताना काही पावलांत बाल्य ओलांडून तरुण झाला. तो कदंब साक्षी आहे. त्या बासरीनं जणू गारूड केलं होतं आसमंतावर. तो अशोक बहरला फुलांनी, तशी मालती अजूनच बिलगली त्याला. यमुनेच्या डोहावर सारंग पक्ष्याचं एक जोडपं उतरलं होतं. ते उगंच एकमेकांवर पाणी उडवत होते. किती युगांचं अंतर गेलं मधे कोण जाणे.

अजूनही पाण्यावरून येताना, करवंदामागून खडा मारल्यासारखा त्याचा प्रश्न येईल, “चल, येतेस?”
पण तुझा निश्चय मात्र पक्का आहे या वेळी.
आता काही तू हो म्हणायची नाहीस. खरंच ना?
राधे!

चल तर जाऊ-
पण, नको जिन्यावर, नको गच्चीवर
आम्रतरूंच्या घनरानातील, बकुळफुलांची अस्फुटलेली
शय्या कधीची झुरते आहे
मुरलीची धून विरते आहे
आठवणीने आठवणींचे मोरपीस ते ठेव बरोबर

चल तर जाऊ-
पण, नकोच दिवसा, नकोच रात्री
अंधाराला उसवत फसवत, आकाशाची रेशीम छत्री
फुले चमकती वेचून गेली
धुके गुलाबी वरती खाली
आठवणीने अबोलकीशी चंद्रकोर ती ठेव बरोबर

चल तर जाऊ-
पण, नको बोलणे, नको अबोला
चित्तचोरटी नेत्रपल्लवी, सलज्ज हळवे सजल इशारे
कवितेच्या विस्मरल्या ओळी
दोन आसवे शापित भोळी
आठवणीने भैरवीतले सूर अभोगी ठेव बरोबर

प्रसाद बोकील

http://prasadik.blogspot.com/2009/05/blog-post.html

Uncategorized

याचसाठी केला होता अट्टाहास

“आय टेल यू, टूरिझम इज वे ओव्हररेटेड.”

जगातील कुठल्याही कोपर्‍यातील लोक दोन दिवस सुट्टी मिळाली तरी कुठेतरी जाण्याचा बेत करत असताना असे वाक्य उच्चारणे याचा अर्थ तुम्हाला अशी प्रक्षोभक वाक्ये टाकून लोकांच्या झुंजी लावण्याचा छंद आहे किंवा तुम्ही मराठी सायटींचे (मसा) सदस्य आहात. अर्थात मसावर नुसते वाक्य उच्चारून भागत नाही. त्याला थोडी पार्श्वभूमी वगैरेंची फोडणी देऊन चर्चाप्रस्ताव तयार करावा लागतो. पण हे विषयांतर झाले. पर्यटण मलाही लई आवडते, पण त्याबरोबर येणारे काही शत्रू लोक डोक्याची कल्हई करतात.

म्युझियम

कुठल्याही नवीन शहरात गेल्यावर तिथे मोठ्ठे म्युझियम आहे असे कळले की माझ्या छातीत धडकी भरते. याचा अर्थ मला म्युझियम बघायला आवडत नाहीत असा अजिबात नाही. खरी वेदना वेगळीच आहे. एखादे टिपिकल, (जगप्रसिद्ध इ.) म्युझियम बघण्याचा अनुभव रोचक असतो. अ‍ॅड्रेनलिन नसानसांतून धावत असते. प्रवेश केल्यावर मी प्रत्येक गोष्ट निरखून बघायला सुरुवात करतो.

“वा! काय कलाकुसर आहे!” “अहो, ते तिकीट कौंटर आहे, म्युझियम अजून पुढे आहे” वगैरे.

हळूहळू पहिला, दुसरा करतकरत पाच-सहाव्या मजल्यावर पोचतो. सातव्या शतकामधला पहिला भाला, दुसरा भाला असे करत करत तेराव्या भाल्यापर्यंत मेंदू सॅच्युरेट व्हायला लागतो. मग डोक्यात ब्याकग्राउंडमध्ये अजून काय बघायचे राहिले आहे, उद्याची ट्रेन कधी आहे इ. विचारांची गर्दी वाढायला लागते. याचा वैताग नकळत कलाकृतींवरच निघायला लागतो.

“तेराव्या शतकातल भांडं, यातून काय बरं पीत असतील लोक? पुढे… हस्तलिखित ग्रंथ. हम्म. ’कंट्रोल सी-कंट्रोल व्ही’ची किंमत आता कळते आहे. पुढे… कुठल्यातरी राजाचा रत्नजडित मुकूट, च्यायला मजा होती राव यांची. रिसेशन नाही की काही नाही. पुढे… हम्म रंग थोडे भडक वाटतायत. ऊप्स, कोण दा विंची का? सॉरी बॉस, काय आहे उद्याची ट्रेन पकडायची आहे, पोटात कावळे कोकलतायत. म्हणून थोडं दुर्लक्ष झालं. डोंट माइंड हं. बाकी कलर कॉम्बोमध्ये तुमचा ब्रश धरणारं जगात तरी कुणी आहे का? हे हे हे…” इ.

अशा ठिकाणी आजूबाजूला नजर टाकलीत तर कुरुक्षेत्रावर घायाळ होऊन पडलेल्या वीरांप्रमाणे रंजले-गांजलेले पर्यटक अन्नपाण्याच्या शोधात गलितगात्र होऊन पडलेले आढळतील. (म्हूनतर बनिये लोक तिथे हाटेलं काढून बसले का नाय? साद्या पान्याच्या बाटलीला तीन-तीन युरो मोजून र्‍हैले नं भौ!)

म्हणून लूव्ह्र किंवा कलकत्त्याचे ऐतिहासिक म्युझियम अशी प्रचंड म्युझियम्स बघायला आवडतात. पण खरं सांगायचं तर शेड्डारसारख्या एखाद्या पिटुकल्या गावातील ३० कोटी वर्षांमध्ये तयार झालेल्या नैसर्गिक गुहा आणि सोबतचे आटोपशीर प्रागैतिहासिक म्युझियम बघताना खूप मजा येते.

शंकेखोर वृत्ती

जे आहे ते स्वीकारावं नं? पण नाही, आमच्या मनात वेगवेगळ्या शंका यायला लागतात. आता पेंटींगचंच घ्या. दा विंची, मायकेल वगैरे बाप लोक. पण बाकीच्यांचं काय? सिस्टीन च्यापेलचं कॉन्ट्रॅक्ट अँजेलो, बोत्तीचेल्ली प्रभृतींना मिळाल्यावर गल्लीबोळातल्या चित्रकारांमध्ये चर्चा होत असणार. “काय तुम्ही, निस्ते हिते बसून टिंग्या टाकून र्‍हैले. तिकडे तो अँजेलो घेऊन बसला ना कॉन्ट्रॅक्ट. सगळी वशिलेबाजी, आता म्हैन्याच्या म्हैन्याला बक्कळ कमिशन मिळते का नाय बघा.” आता अशा गल्लीबोळातल्या एखाद्या चित्रकाराची कलाकृती इथे नाही कशावरून? सोळाव्या शतकातले आहे, म्हणून सगळेच उत्तम असे कुणी सांगितले? बरं, मला चित्रकलेतील ओ का ठो कळत नाही. खाली मास्टरपीस पाटी असली की आम्ही उत्सुकतेने बघणार.

क्या मेरा क्या तेरा

“मी येते आहे ना फ्रेममध्ये?” एका यांकिणीचा प्रश्न. बाईंचे आकारमान बघता कुठल्याही फ्रेममध्ये त्या न येणे अशक्य होते.

“आणि आयफेल टॉवर?”

ओत्तेरी! बाईंना टॉवरबरोबर फोटू हवाय तर. त्यात त्यांच्या क्यामेर्‍याचा झूम पिटुकला.

“बाई, मी मागे-मागे जातो. क्यामेर्‍यात तुम्ही आणि टॉवर दोन्ही आले की फोन करतो.”

मला फोटोग्राफी अतिशय प्रिय आहे, पण प्रेक्षणीय स्थळे आणि फोटोग्राफी हे गणित मला सुटत नाही. ताजमहाल, पिसाचा मनोरा अशा ठिकाणांचे सर्व अँगलमधून, सर्व ऋतूंमध्ये, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, उत्कृष्ट फोटो लोकांनी आधीच काढून ठेवले आहेत. त्यात मी आणखी काय करणार? शिवाय क्यामेरा असला की काहीही नवीन दिसले की आधी फोटो काढण्याची घाई. त्यापेक्षा नकोच तो ताप डोक्याला. बरं, लोकांना त्यांचे स्वतःचे फोटो घ्यायची हौस असते, पिसाचा मनोरा माझ्या मागे, पुढे, उजवीकडे, डावीकडे इ. मला ती ही नाही. त्यामुळे मी प्रेक्षणीय स्थळांना जाताना क्यामेरा बरोबर घेऊन जायचे सोडून दिले आहे.

गीत गाता चल

माझ्या मेंदूमध्ये रस्त्यांना जागा नाही. अजूनही संभाजी पुलावरून भरतला जायचे म्हटले तर मेंदू काही वेळ हँग होतो. मग नवीन शहरात तर विचारूच नका. सदैव नकाशा हातात. आणि एखादा रस्ता लक्षात राहिला तरी मेंदू तो रस्ता रॅममध्ये टाकून देतो. काही वेळाने सगळे साफ. लगेच सिच्युएशननुसार गाणे वाजायला लागते. “कहां से तू आया और कहां तुझे जाना है… गीत गाता चल…”

पूर्वी मुंबईच्या तीन लोकल लाईन्स लक्षात ठेवताना पंचाईत व्हायची. पॅरिसला गेल्यावर तिथल्या १६ रंगांतल्या १६ मेट्रो लाइन्स पाहिल्यावर मेंदू म्हणाला, “तुझं तू बघ बाबा. माझं तर काही डोकंच चालत नाही.” पहिला दिवस पूर्ण भंजाळलो, दुसर्‍या दिवशी थोडे-थोडे लक्षात यायला लागले. मग नोत्र दामवरून आयफेल टॉवरला जायला कुठला मार्ग सर्वात चांगला हे शोधणे म्हणजे कोडे सोडवण्यासारखे वाटायला लागले. लहानपणी सकाळ वगैरेंच्या पुरवणीत बंडू एका कोपर्‍यात, त्याचा कुत्रा एका कोपर्‍यात आणि मध्ये गुंतागुंतीचे जाळे. बंडूला त्याच्या कुत्र्यापर्यंत कसे पोचवाल? तसे काहीसे.

सर्वात मोठा दुर्गुण. प्रत्येक गोष्ट ओव्हर-अ‍ॅनालाइझ करणे. पाय दुखत असताना, पोटात कावळे ओरडत असताना मोनालिसाची कलाकृती कितपत एन्जॉय करता येते? आणि पाच मिनिटे तिच्याकडे पाहिल्यावर नाविन्य संपते, मग वाटते इतका अट्टाहास कशासाठी? मग क्युकगार्ड आठवतो. “जोपर्यंत कुठलीही गोष्ट तुम्ही तटस्थपणे बघत नाही, तोपर्यंत तिचा आस्वाद घेता येतो.” प्रश्न वाढत जातात. खरेच टूरिझम इज ओव्हररेटेड असे वाटायला लागते.

पण मग रात्री पिवळ्या दिव्यांनी झगमगलेला आयफेल टॉवर दिसतो. दर पंधरा मिनिटांनी पांढर्‍या दिव्यांचा लखलखाट होतो. कुठल्याही क्यामेर्‍यात हे दृश्य बंदिस्त करणे शक्य नसते. आणि तसा प्रयत्न करणार्‍या लोकांची कीव यायला लागते. किंवा परत येताना टीजीव्हीमधून लांबच्या लांब पसरलेले हिरवेगार पट्टे, निळे आकाश, एक-दोन वाट चुकलेले ढग दिसतात. एप्रिलमधले सुरेख ऊन पडलेले. आणि मध्येच पिवळ्या फुलांची शेते लागतात. ती हिरवी-पिवळी-निळी रंगसंगती मेंदूत कोरली जाते. केवळ अवर्णनीय.

मग वाटते, याचसाठी केला होता अट्टाहास.

राज

http://rbk137.blogspot.com/2009/05/blog-post.html

Uncategorized

स्क्रीन काळा आणि मोठ्ठा गोळा…!!

’होम थेटर…. ?? दिसतंय दिसतंय.. वरती धर अजून.. नवीन घेतलं का रे…?? कितीला पडलं ?’

’..म्हणजे रुपये किती होतात…??’

’आर्य काय करतोय रे… ?? दाखवायला जमेल का आत्ता…?’

’दिसला.. दिसला.. पण अस्पष्ट दिसतंय रे.. झोपलाय का…??’

’उठवू नको रे त्याला.. रडायला लागला बघ…’
….
’..अहो…हे बघा.. एकदम बंद झालं दिसायचं.. काहीतरी विंडोज विंडोज असंच येतंय स्क्रीनवर…’

’चालू करायला सांगा ना लवकर..तो आर्य झोपलाय ना.. त्याच्यावर फोकस करून दाखवत होता…’

…घराजवळच्या एका सायबर-खुराड्यात एकाच्या जागेत दोन अशा बेतानं कोंबलेल्या स्टुलासारख्या खुर्च्या…
…आणि त्यात डगमगत बसलेली एक आजी आणि एक आजोबा…
समोर मॉनिटर स्क्रीनच्या डोचक्यावर चिकटलेला वेब कैम… आजीकडे रोखून बघणारा…
आजीच्या कानाला हेडफोन… बोटांनी गच्च पकडलेला…. आजोबा बाजूला रिलॅक्स्ड आणि अलूफ असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत नुसतेच बसलेले… स्क्रीन कडेही न बघता… पण इतक्या म्हातारपणीही त्यांना तो अभिनय ’अज्जाब्बात’ जमत नाहिये…!!
आजोबा मधेच इंग्लिश वाक्यं वापरून आपल्या भावना लपवताहेत… आणि इंग्लिश वाक्यांतूनच आपलं कंप्यूटरचं ज्ञान आजीपेक्षा थोडं जास्त असल्याचं दाखवताहेत…

…स्क्रीन मधेच काळा झाला.. विंडोज चा स्क्रीनसेव्हर आला..आजी केविलवाणी झाली…

माझे डोळे थोडे खाजल्यासारखे वाटले म्हणून बघतो तर सालं डोळ्यांत पाणी…!!
विचित्र दिसतं चारचौघात…
’माऊस हलवा थोडासा आजी…’ मी मनात म्हटलं…
मोठ्यांदा बोलायचं म्हटलं तर घशात मोठ्ठा गोळा…
मग लवकर लवकर तिथून निघालो…!!

नचिकेत गद्रे

http://gnachiket.wordpress.com/2009/04/13/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%97/

Uncategorized

सावली

“अथर्वशीर्ष येतं?” – हो.
“रांगोळी काढता येते?” – बऱ्यापैकी छान.
“सवाई गंधर्वला जाणारेस का?” – अर्थात! शास्त्रीय शिकतेय गेली ६ वर्षं – कानसेन झाले तरी मिळवली.
“अरुणा ढेरे”? – त्यांची नवीन कविता दिवाळी अंकात वाचली. खूप सडेतोड, तरी सुंदर वाटली.
“ज्ञानेश्वरीवर प्रवचन आहे.” – हो का? मला खूप आवडतात त्यांच्या विराण्या.

– “पासओव्हर (passover) कधी आहे?” – चेहरा कोरा.
– “कालचं आमचं डिनर म्हणजे three-can-cooking होतं.” – ह्म्म. मला का सुचत नाहीत असले भन्नाट शब्दप्रयोग? three-can-cooking!
– “मी ४ वर्षाची असताना द्राक्षाचा रस म्हणून चुकून वाईन प्यायले होते म्हणे,” – तू मला काही चांगल्या वाईनची नावं सांगशील का? मला try करून बघायच्यायत.
– “Kind of like P-Diddy… 🙂 ” – हा कोण गायक बुवा?

कधी जाणवलं नव्हतं भारतात असताना, की एक “सांस्कृतिक सत्ता” असते. तुम्ही तिचे सभासद असाल, तर तुमच्याकडे देण्यासारखं खूप असतं. “गृहस्थ”चा लिंगबदल केला, की “गृहिणी” होतं, हे तुम्हांला माहिती असतं. दृष्टद्युम्न द्रौपदीचा भाऊ होता, हेही. “साबण लावली” म्हणणाऱ्यांपेक्षा तुम्ही खुशाल स्वत:ला श्रेष्ठ समजू शकता.
पण वेगळ्या देशात ज्या क्षणी पाऊल ठेवलं, त्या क्षणी तुम्ही अक्षरश: होत्याचे नव्हते होता. तुमचं सांस्कृतिक भांडवल, घसरणाऱ्या रुपयासारखं क्षणार्धात कचरा-कचरा होऊन जातं. किंवा अगदीच कचरा नसेल कदाचित, पण शोभेच्या काचेच्या बाहुलीसारखं, कधीमधी काढून पुसायचं, पुन्हा कपाटावर ठेवून द्यायचं, असं होऊन जातं.

कालपर्यंत मी अखंड, सुसंबद्ध होते, आणि आज?
आज मी सदा मूक, पण ऊन कुठल्याही दिशेला गेलं तरी पायाला घट्ट धरून राहणारी, ती सावली झाले आहे.
ह्या देशाला देण्यासारखं असेल माझ्याकडे बरंचसं, पण इथून खूपसं घेतल्याशिवाय मला जे द्यायचं ते देताही येणार नाहिये, ही अस्वस्थ करणारी भावना आज मला छळत राहिली.

काल कोणी मला म्हटलं असतं, की तुमच्या उच्चभ्रू संस्कृतीने आमची गळेचेपी झाली, तर मी खूप समजूतदारपणे त्यांच्याकडे बघून म्हटलं असतं, “पण आम्ही ती मुद्दामहून करत नव्हतो!”
आज “खालच्या पायरीवर” असण्याचा अनुभव घेतेय. त्यात कमीपणा वाटण्यापेक्षा निराशा वाटतेय.

जर कोणी मला विचारलं, की अमेरिकन संस्कृतीबद्दल मला काय वाटतं, तर मी म्हणेन, “मला एक दिवस खरी सावली म्हणून इथे जगायचंय. माझ्या अमेरिकन मैत्रिणीच्या घरात तिच्या पाठोपाठ शिरायचंय. ग्रोसरी स्टोअरमधे आम्ही दोघी जातो, पण ती किती वेगळ्या वस्तू उचलते! मग ती घरी जाऊन त्यांचं काय करत्येय ते बघायचंय. माझ्यासारखा तिच्याकडेही असेल पसारा? कोणतं गाणं लावते ती, संध्याकाळी थकून घरी आल्यावर! शनिवारी ती जाते का भक्तिभावाने सिनॅगॉगमधे Hebrew Schoolला? तिच्या मुलांच्या वाढदिवशी Sprinkler Party म्हणजे नक्की काय करतात?”

मनातल्या मनात यादी करताना मी शेवटी थकून जाते. सगळ्या गोष्टी शिकता येतात, पण संस्कृती? अदृश्य भिंतीसारखी ती खुणावते, पण दार सापडत नाही. कधी मला वाटतं, ती धबधब्यासारखी आहे, पण माझे फक्त तळवेच टेकलेत कसेबसे पाण्यात. बाकीची मी- अधांतरी! कदाचित सावलीचं प्राक्तनही ह्यापेक्षा बरं असेल!

विशाखा

http://aavarta.blogspot.com/2009/03/blog-post_25.html